18 November 2019

News Flash

‘सा ही बेसुरा’

सुरुवात सुरात असली की दिवस तालात, लयबद्ध जातो.

|| मकरंद देशपांडे

सुरुवात सुरात असली की दिवस तालात, लयबद्ध जातो. दुसऱ्यांना आपला त्रास कमी होतो. जगभर त्याचे सकारात्मक पडसाद उमटतात. पण सुरुवात चांगली नाही झाली तर एखाद्या ‘बटरफ्लाय इफेक्ट थिअरी’नुसार जगभर (जीवनभर) वाईट परिणाम दिसू शकतात. एडवर्ड लॉरेन्जचं म्हणणं होतं, की एखाद्या फुलपाखराच्या पंख फडफडण्यानं कधी तरी कुठे तरी तुफान येऊ शकतं. अगदी सोप्या भाषेत समजवायचं तर- ज्या संवेदनशील व्यवस्था असतात, त्यात एखादा छोटा बदलही खूप मोठा परिणाम दाखवू शकतो. याला ‘सायन्स ऑफ सरप्राइज’ म्हटलं जातं. पण हे  सरप्राइज प्लेझंट नसतं, म्हणून आपण श्रीगणेशाने सुरुवात करतो.

‘सा ही बेसुरा’ या नाटकाच्या कथानकात साकेतनाथ हे नामांकित नट.. अगदी नटसम्राट म्हणायला हरकत नाही असे. असा हा दर्जेदार, अनुभवी अभिनेता मनात सुरुवातीपासून असलेल्या एका भीतीला बळी पडतो. ती भीती म्हणजे- ‘एक दिवस जर मला संवाद आठवलेच नाहीत तर?’ आणि तसं होतं ‘सा ही बेसुरा’ हे नाटक करताना. त्यांना संवाद आठवले नाहीत. आणि डोक्यात फक्त अंधार. एवढा भयानक अंधार- की त्यानंतर ते रंगमंचावर जायलाच तयार नाहीत. त्यांची मुलगी रोशनी त्यांना मदत करते. अगदी तालमीसुद्धा करून घेते. पण आता साकेतनाथ काही केल्या रंगमंचावर जायला तयार नाहीत. त्यांची बायको पुण्याला असते.. त्या दोघांचे पटत नसल्याने! डिवोर्स नाही झालेला; पण ते वेगळे राहतात. रोशनीला सतत डोकेदुखी असल्यानं तीसुद्धा गोळ्या घेतेय. साकेतनाथला वाटतं की आपली मुलगी आपल्यामुळे आजारी पडलीय. पण रोशनी हसत हसत दोघांचा एक ‘मेडिसिन टाइम’ फिक्स करते आणि दोघं ‘चीअर्स ’करत वेळेवर गोळ्या घेतात.

साकेतनाथच्या फॅन्सपकी एक रांगडा, सडकछाप पक्या जाता-येता धमकीवजा बोलून त्यांना पुन्हा रंगमंचावर आणण्यासाठी धडपड करतो. साकेतनाथ मात्र भीतीपोटी तयार होत नाहीत. अशा वेळी नेमका एक स्ट्रगलर अ‍ॅक्टर साकेतनाथांकडून अ‍ॅक्टिंग शिकायला येतो. त्याचं नाव- मोहित कुमार. शिकण्यासाठी त्याला त्याने आधी शिकलेलं सारं विसरावं लागणार असतं. कारण तो अतिशय ‘फिल्मी’ आहे. तो चित्रपटांतले प्रसंग पाहून अभिनय शिकलाय. म्हणजे बच्चन, देओल, शेट्टी यांचे प्रसंग त्याला तोंडपाठ. हातवारे, आवाजाच्या फेकीसकट. जसेच्या तसे. फरक फक्त एकच- की त्याला अभिनय करताना बघून पोट दुखेल एवढं हसू येतं. साकेतनाथांचा ‘फिल्मी’ अ‍ॅक्टर्सवर खूप राग. पण रोशनीला मोहितनं हसवलं म्हणून ते मोहितला सहन करतात. रोशनीचं म्हणणं पडतं, की यात मोहितची काही चूक नाही, अ‍ॅक्टिंग स्कूल्समध्ये असंच शिकवतात. साकेतनाथ दोन कारणांमुळे मोहितला शिकवायला तयार होतात. एक म्हणजे मोहित आल्यामुळे घरातलं दु:खी वातावरण हलकंफुलकं होतं. आणि दुसरं- त्याच्यावर रागवायच्या निमित्ताने साकेतनाथांच्या अ‍ॅक्टिंगलाही सुरुवात होते.

साकेतनाथ एक दिवस मोहितला आपल्या घरी राहायला यायला सांगतात आणि मोहित जवळजवळ घरचाच होऊन जातो. रोशनी आधी वडिलांच्या या निर्णयावर चिडते; पण नंतर तिलाही पटतं, की मोहितमुळे वडिलांच्या तब्येतीत केवढा फरक पडलाय. खरं तर तिच्याही गोळ्या बंद झाल्यात.

साकेतनाथ मोहितला अ‍ॅक्टिंगचे अनेक एक्सरसाइझ सांगतात. एका एक्सरसाइझमध्ये मनातलं बोलायचं असतं. रोशनीसुद्धा त्यात भाग घेते आणि तिच्या बोलण्यातनं तिचं आतलं दु:ख कळतं. तिला वाटतं की ती तिच्या आईसारखी छान कथ्थक डान्सर नाहीए आणि वडिलांचं नाव जपण्यायोग्य नटीही नाहीए. सतार शिकलीय, पेंटिंग शिकलीय, पण सगळं थोडं थोडं. मात्र कशावरही आपलं प्रभुत्व नाही. तिला वाटतं, आपल्याऐवजी दुसरं कोणीतरी या टॅलेंटेड आई-बापाच्या घरी जन्माला यायला हवं होतं.

रोशनी बोलायची थांबत नाही. आता हा एक्सरसाइझ तिचं जीवन उलगडू लागतो. रोशनीच्या बोलण्यातनं कळतं, की ती आपल्या आईसोबत गाडीनं पुण्याला जात असताना आपल्या अपूर्णतेबद्दल तिच्याशी बोलत असताना आईचा अचानक गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला. त्या अपघातात आई गेली आणि रोशनी त्या ट्रॉमामध्ये अपघाताआधीचं सगळं विसरली आणि जवळ जवळ गप्पच झाली.. ही वस्तुस्थिती आहे.

रंगमंचावर घराचा जो सेट आहे, ती जागा खरं तर हॉस्पिटलचा वॉर्ड आहे. डॉक्टर मोहितने मोहित कुमार बनून साकेतनाथांना विश्वासात घेऊन हा ‘प्रयोग’ केला आहे. टू गेट रोशनी बॅक टू लाइफ! या प्रयोगात साकेतनाथांची भीतीसुद्धा दूर होते. साकेतनाथांचा फॅन पक्या हा वॉर्ड बॉय तुकाराम आहे.

सुरुवात बेसुरी होती. पण शेवट गोड नसला तरी सुरात आणि वर्तमानात आला. साकेतनाथ आपल्या मुलीबरोबर पुन्हा रंगमंचावर पदार्पण करायला तयार होतात. डॉक्टर मोहित रोशनीच्या प्रेमात पडतात आणि रोशनी हसून त्यांना होकार देते. आईच्या पुण्यतिथीला नाटकाचा पहिला शो!

नाटक लिहून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडून बाप-मुलीचं एक इमोशनल नाटक लिहिलं गेलंय.. ज्याला शेवटी ट्विस्ट आहे. वडिलांची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे, त्यात मुलगी मदत करतेय. पण शेवटी कळतं- की खरं तर मुलीची ट्रीटमेंट चालू होती. वडील तिला मदत करताना स्वत: आजारी पडले होते. एक गमतीदार जाणीव झाली, ती अशी- की ‘सर सर सरला’ लिहिल्यावर मला आता नाती लिहायला आवडायला लागलीयेत आणि पात्रं वास्तवात असल्यानं- वास्तवाला प्लेझंट सरप्राइजेस नको असतात म्हणून शेवटी आपण ट्विस्ट वापरला आहे.

दिग्दर्शक म्हणून मला असं वाटलं की नाटकातला मेलोड्रामा कमी करण्यासाठी त्यातलं हास्याचं पुट हे एखाद्या कारंजासारखं उडायला हवं. टिनू आनंदना साकेतनाथसाठी भेटलो होतो तेव्हा का कुणास ठाऊक, नाटकाच्या त्या पहिल्या वाचनात मी म्हणालो होतो की- साकेतनाथ आणि मोहित कुमार यांच्यातला अ‍ॅक्टिंगबद्दलचा संवाद हा एवढा फनी हवा की पृथ्वी थिएटरचं छप्पर खाली यायला हवं. टिनू आनंद खूप हसले सीन ऐकून. पण त्यांना साधारण आपली काम करायची पद्धत आवडली नाही म्हणा किंवा ते फिल्म्समध्ये बिझी होते म्हणून म्हणा- त्यांनी ती भूमिका केली नाही. पण त्यांच्या रिअ‍ॅक्शनमुळे मला एक खात्री पटली की, अशा मेलोड्रामा असलेल्या नाटकामध्ये अतिशय विनोदी प्रवेश आपण करू शकतो. ठरलं- की तो प्रवेश पृथ्वीचं छप्पर हसवून खाली आणणार! साकेतनाथसाठी मी माझ्या विश्वासातले, हमखास चांगलं परफॉर्म करणार याची गॅरंटी देणारे सुधीर पांडय़े यांना विचारलं आणि त्यांनी आपल्या शूटिंगच्या तारखा कॅन्सल करून होकार दिला. (नाटकवाल्याला नाटक करशील का, असं विचारलं तर तो काहीही सोडू शकतो.) मोहित कुमार आणि डॉक्टर अशी दुहेरी भूमिका करण्यासाठी विजय मौर्यला कास्ट केलं. विजय मला म्हणाला, ‘मॅक, यह बॉम्ब है, धमाका होगा.’ मुंबईच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये फिल्म्सच्या व्हिडिओ क्लिप्स बघून मोहित कुमार काय काय शिकला, हा सीन विजयने स्वत: लिहिला; आणि त्याने जेव्हा पहिल्यांदा मला तो करून दाखवला तेव्हा मी हसून हसून पडलो.

विजय जात्याच विनोदी वृत्तीचा. पण विनोद लेखनात आणणं हे एक वेगळंच कसब. अनुरागसारखा विजयसुद्धा माझ्या डोळ्यांसमोर लेखक झाला. आता बऱ्याचशा फनी जाहिराती विजय लिहितो किंवा दिग्दर्शित करतो. पण पंचाईत आली- जेव्हा त्याला डॉक्टरसुद्धा व्हायचं होतं. या भूमिकेत त्याला आधी जेवढं हसवलं तेवढंच सीरिअस काम करावं लागणार होतं. आणि ते करणं त्याला मुश्कील नव्हतं. पण प्रेक्षकांना एवढं हसवून झाल्यावर जर सांगितलं की आता हा मोहित कुमार हा ‘डॉक्टर मोहित’ आहे, तर ते हसणारच. तालमीत तरी सगळे हसायचे. अगदी त्याचा भाऊ संजय मौर्य- जो प्रकाशयोजना करायचा; आणि टेडी- जो कलादिग्दर्शन करायचा, तोही. विजय त्यामुळे थोडा साशंक होता. पण मी त्याला एवढंच म्हणालो, की तू स्वत: सायन्स डबल ग्रॅज्युएट आहेस, तेवढं आठव. प्रयोगात खरंच त्याने आणि सुधीरभाईंनी पृथ्वीचं छप्पर खाली आणलं. प्रेक्षक खूप हसले. आणि शेवटची वीस मिनिटं कोणीही जागेवरून हललंसुद्धा नाही. तेव्हा अचानक लक्षात आलं- विजयचा डॉक्टर यशस्वी झालाय.. कुणीही हसलं नाही.

डी. संतोषने पक्या आणि वॉर्ड बॉय एवढा छान केला की मला असं वाटलं- या अ‍ॅक्टरसाठी नाटक लिहायला हवं, किंवा एखाद्या नाटकाच्या केंद्रस्थानी त्यानं असावं. एखाद्या नटाकडे स्वत:ची अशी ‘ग्रोथ’ करण्याची भूक असते आणि त्यासाठी तो किती सुरात आणि तालात सहज प्रयत्न करत असतो, याचं डी. संतोष हे उत्कृष्ट  उदाहरण. तो पनवेलवरून तालमीला यायचा. त्यानं कधीच आम्हाला जाणवू दिलं नाही, की तो किती लांबून येतोय. मात्र त्याचा एक हट्ट होता, की प्रयोगाआधी मी दोन मिनिटं प्रेक्षकांशी बोलावं. त्यामुळे वातावरण बदलतं असं त्याचं म्हणणं होतं.

रोशनीची भूमिका हिबा शाहनं संवेदनशीलतेनं, मिस्टिरियसली साकारली. वडिलांबरोबर प्रेमळ, पण रागीट आणि मोहित कुमारबरोबर हसतमुख चेहरा करताना त्यात खूप खरेपणा आणला. हिबाच्या संवादफेकीत शब्दांचा अर्थ व्याकरणासकट येतो. शेवटच्या सीनमध्ये तिला ओरडायचं होतं. साधारणत: नट किंवा नटी सांभाळून ओरडतात. याची कारणं दोन.. एक म्हणजे आवाज बसू नये. दुसरं कारण- प्रेक्षकांचे कान फाटू नयेत. पण हिबा ज्या भावनिक आवेगानं ओरडली त्यानं प्रेक्षकांची मनं सुन्न झाली.

दिग्दर्शक म्हणून दोन गोष्टी मी परिणामकारक केल्या. पहिली- मी रंगमंचाच्या मधोमध प्लॅटफॉर्म उभा केला. अडीच फूट उंच, सहा फूट रुंद आणि आठ फूट लांब. दोन्ही बाजूंनी चढा-उतरायला पायऱ्या. त्यामुळे घरातल्या प्रवेशात बोलता बोलता थिएटरची घंटा वाजवली जायची आणि पात्रं दोन्ही बाजूंनी प्लॅटफॉर्मला नमस्कार करून वर आली की घर रंगमंच व्हायचं. दुसरं परिणामकारक दिग्दर्शन म्हणजे घराचा वॉर्ड बनणं. मी ब्लॅकआऊट केला आणि पक्याला- जो साकेतनाथ फॅन होता- त्याला पांढऱ्या कपडय़ांत फिनाईल टाकून प्लॅटफॉर्म पुसायला लावला. वरून निऑन लाइट. त्यामुळे काहीतरी अवास्तविक घडतंय असं वाटलं गेलं आणि पृथ्वीसारख्या छोटय़ा प्रेक्षागृहात फिनाईलचा वास पसरला.

संजय मौर्यने उत्कृष्ट पद्धतीनं घर नाहीसं करून वॉर्ड उभा केला. केवळ प्रकाशयोजनेनं! त्याला सुंदर साथ शैलेन्द्र-स्वप्नील यांच्या संगीताची. नाटकाचं संगीत एवढं परिणामकारक होतं की त्याची सीडी बनवा असं त्यावेळी प्रेक्षक सांगायचे. नाटकाचा प्रेक्षक नाटकाच्या प्रत्येक अंगाला मनापासून दाद देतो, हेच खरं.

जय संगीत! जय प्रकाश!

जय नट-नटी! जय प्रेक्षक -इति!

mvd248@gmail.com

First Published on June 30, 2019 12:07 am

Web Title: makarand deshpande sa hi besura
Just Now!
X