03 March 2021

News Flash

टाइम प्लीज!

टपालकी

|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यास,

दादासाहेब गावकरचा दंडवत!

लईच कावलेलं दिसून ऱ्हायलंय सदाभौ तुमी. जरा सबुरीनं घ्या. मार्चयंडच्या झळा तुमा चाकरमान्यान्ला वाईच जरा जास्ती परेशान करत्यात. ठाव हाय आमास्नी. ईरसाल सासरा परवडला, पर बॉस नगं. देखल्या देवा दंडवत!

बॉसची मर्जी सांभाळावी लागतीच. मूळव्याधावानी आसतंया ते. शहनबी हुत न्हाई आन् सांगताबी येत न्हाई. अवगड जागेचं दुखनं. कितीबी दर्द झाला, तरीबी चेहऱ्यावर हासू ठिवावंच लागतं, मर्दा! सदाभौ, तुमी कायबी काळजी करू नगा. आमी इस्वेस्वराला कौल लावून ऱ्हायलोय. या साली तुम्चं प्रोमूशन नक्की. तुमी फकस्त कामामंदी ध्यान ठिवा.

तुमास्नी म्हून सांगतो, देखणी बायकू हमेशा शेजाऱ्याचीच आसती. तुमाला वाटत आसनार, दादासायबाला बॉसची कटकट न्हाई. आमचाबी बिगबॉस हाय. त्यो तिकडं कैलासावर बसलेला. सगळीकडं वॉच ठिवून आसतू. त्येच्या मर्जीबिगर कायबी हुत न्हाई. पाऊसपानी समदी त्येची किरपा. आमीबी मार्चमंदी हिशेबाच्या चोपडय़ा लिवीत बसतू.

गडीमानसास्नी दिलेली उचल, बी-बियाणं, खतं, जनावारास्नी चारा, दवापानी, इजबील, आन् शेवटला बाजार समितीत गावलेलं पेमेंट. कायबी करा, गणित सुटतच न्हाई. गुणाकार न्हाईच, नुस्ता भागाकार. बेरजा न्हाईत, नुस्त्या वजाबाक्या. आन् बाकी शून्य!

मस ठरविलेलं आसतंया, तुम्च्या वैनीसायबास्नी पठणी घिवून देयाची. जोडीला मोत्याची नथ. लेकीला गिअरवाली सायकल. म्हातारीला चारधाम यात्रंला पाठवायची हाय यात्राकंपनीबरूबर. पर, न्हाई जमून ऱ्हायलंय गडय़ा.

यंदाच्या सालीबी त्येच. म्होरल्या वर्सी बगू. आलं देवाजीच्या मना, त्येच्यापुडं कुनाचं चालीना. मार्चयंड आमास्नीबी येप्रील फूल करून ऱ्हायलाय सदाभौ.

आमचं आबासायेब म्हनायचं, आपुन हिंमत हारायची न्हाई. कामामंदी देव आसतुया. त्येला घामाचा नवेद दाखवायचा. येक ना येक दिवस तो पावतुच. कितीबी दुस्काळ पडू द्या, आपुन आपली जिमीन नांगरून ठिवाची. कदीबी त्येची किरपा हुईल. आन् शिवार पान्यानं भरून जाईल. आपुन हमेशा रेडी रहायला हवं. दीस येतील, दिस जातील, भोग सरंल, सुख येईल.. आक्षी तसंच हुईल बगा!

फकस्त यंदाच्या साली पाऊसपानी चांगलं होवू दे रे द्योवा इस्वेस्वरा!

बांधावरचा आंबा मोहरलाय जनू. आमच्या आजानं लावलेलं झाड हाई त्ये. गोटी आंबाच हाई, पर तुम्चा हापूस झक मारील त्येच्यापुडं. मायेचा गोडवा उतरला हाई त्यात. रिक्वेश्ट हाय सदाभौ, येक डाव या आंब्याची चव चाखाया शमर शीझनमंदी गावाकडची वारी कराच.

गावाकडं वैशाख वणवा प्येटलाय जनू. उन्हातान्हात नांगरट करताना, आम्च्या सर्जा-राजाच्या तोंडाला फेस येतुया. महागाईनं आम्च्या तोंडाला येतुया, डिट्टो तसाच. घामानं कापडं वलीचींब हुत्यात. आपली कंडीशन आक्षी या कापडावानी झालीया.

सरकार वॉशींग पावडर झालंया. ‘धो डाला’ म्हनूनशान फेस आणून ऱ्हायलंय. महागाई दु:खाच्या डागण्या देऊन ऱ्हायलीया. आपून आपलं ‘दाग अच्छे होते है’ म्हनायचं आन् नशिबात आसंल त्ये फ्येस करायचं.

अशा वक्ताला, परत्येक मनुक्ष कुठलातरी आधार शोधतुया. कुनी कुनी बाबा-बुवाच्या मागं लागतं. कुनी गंडे दोरे, ताईत बांधून ऱ्हायलंय. न्हाई तर कुनी देवाधर्मात बुडून गेलंया. कुनी चपटीला जवळ केलंया. तुम्चं मोटिव्हेशनल गुर्जी आजून न्हाईत गावाकडं. समदं रस्तं बंद झालं, की जीव टांगणीला लावायचा..

कुटवर चालायचं हे सगळं?

सदाभौ, तुमी आम्चं सगेदोस्त, आम्चं आधारकार्ड. तुमीच आम्चं मोटिव्हेशनल गुरू. व्हिटॅमीन-एमचा मोटिव्हेशनल डोस देऊन ऱ्हायलंय जनू. आमास्नी वाटलं, तुमी आमाला शक्सेशमंत्र देनार. तुमी दावलेल्या वाटेवरनं चाललं की झालं. पीकपानी जोरात हुईल, चांगलं पकं मिळतील. आसं झालं की, तुमास्नी पेडा बरफीचा नवेद दावू. पर तुमी अ‍ॅडव्हान्समंदी ‘बरं फी?’ मागून ऱ्हायलं तर न्हाई परवडनार.

वाईच जरा गंमत क्येली सदाभौ! पर आमी अडचणीत आसलो, की तुमालाच सांगावा धाडनार. तुमी आसाल तसं धावून येशीला, ह्ये इश्वास हाय आमाला. अशा वक्ताला मोटिव्हेशनल गुरू न्हाई, फकस्त सच्चा दोस्त कामाला येतु. दुनियेसाटी तुमी बिनधास्त प्रेरक वक्ता की काय, ते होवून ऱ्हावा. आमच्यासाटी फकस्त सदाभौ, आम्चं जिग्री दोस्त!

आमालाबी येक मोटिव्हेशनल गुरू गावलाय बरं का! तुमास्नी ठावंच हाय, आमच्या सुभान्यानं श्येततळं उभारलंय. मस पानी हाय त्येच्याकडं. समदं गाव तहानलेलं पर सुभान्याचं रान हिरवंगार. आमास्नीबी कळंना, सुभान्या येवढं हुश्शार कदी झालं?

परवा शीक्रेट कळलं त्येचं. सुभान्यानं एकत्तीस मार्चच्या रातचीला गावाला आवताण धाडलं हुतं. गोडाधोडाचं जेवन हुतं. चार-पाच पंगती उटल्या. कशापाई गावज्येवन? सुभान्या हूं न्हाई की चू न्हाई. सुपारी-तमाखूचं बार भरून झालं आन् सुभान्यानं शीक्रेट वोपन क्येलं. आज्या.. आजित, सुभानरावाचा भाचा. दिल्लीला शिकलेलं. आयआयटीमदनं. नंतर दोन वरीस फारेन्ला हुतं. मस पकं मिळत्यात त्येला. आक्षी डालरचं पीक तरारून येतंया दरसाली.

सुभान्यानं गावाला आजितची वळख करून दिली. पंचवीशीतलं पोरगं. फाड फाड विंग्रजीत बोलतू फूनवर. पर आमच्या संगट येकदम गावरान मऱ्हाटीत बोललं. सुभान्याला श्येततळ्याची आयडिया ह्यनंच दिल्ती. कागदपत्रं, शबशिडी समदं त्येनंच जमीवलं. राम राम घातला आन् गडी बोलाया लागला. हार्ड वर्क नगं स्मार्ट वर्क कराया पाहिजे, म्हन्ला.

ब्लू िपट्र हुती जनू त्येच्याकडं गावासाटी. सरकारी योजना, अनुदान, कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन, मातीपरीक्षण.. समदं डिटेलमंदी सांगितलं. आजितनं त्येच्या आईला वचन दिल्तं. मी कितीबी मोटा झालो, तरी येक वर्स गावासाटी देनार.

नोकरी सोडून येक वर्स आम्च्या गावामंदी राहनार हाये त्यो. पाच-सहा श्येततळी, सेंद्रिय शेती, बायोगॅस, ग्रीन हाऊस, पानीसोसायटी या सगळ्याचं प्लॅनिंग हाये त्येच्याकडं. फकस्त एक वर्स द्या मला, असं गावाला साकडं घातलंया. समदा गावबी येकदिलानं साथ देनार हाय त्येला. फूलशेतीईषयीबी बोलला गडी. पपई, पेरू, डाळींब, क्येळी, लिंब.. माल परदेशी कसा धाडायचा, समदं शिकवीतो म्हन्ला.

फकस्त येकच मागनं हाय त्येचं. या साली गावात भांडणतंटा नगं, हेवेदावे नगं, बारी बारी, गरज पडेल तसं योकमेकांच्या रानात कामाला जायाचं. समदं गाव तयार हाय. धा लाख रूप दिलं त्येनं. म्हन्ला, ह्ये माझा वाटा. माझ्यापास्नं सुरुवात. परत्येकानं जमंल तशी भर घाला ह्यत. गावासाटी मशिनरी घेवू यात. कापणी सटासट हुईल. फंड जमला की साटवणीचं बगू, म्हन्ला. श्येवटला गावापुडं दंडवत घातला, काळ्या मातीला भाळी लावून चला कामाला लागू या, म्हन्ला. बेणं लई हुश्शार हाये. गावानं समदं शिकून घ्यावं, स्वत:चा ईकास करावा; पर माझ्या गुरूदक्षिणेचं काय, आसं ईचारू ऱ्हायला.

मोट्टा पॉज घ्येत्ला. म्हन्ला, ‘गावचा येक हुश्शार मानूस हवा मला वर्सभर. म्या सांगेन त्या गावात जाऊन ऱ्हायचं त्येनं वर्सभर. आन् त्ये गावबी सुदरून टाकायचं. कबूल?’

समदे ‘हो’ म्हन्ले. सदाभौ, ‘उपकार’वालं मनोजकुमारच दिसून ऱ्हायलंय आमाला आजितमंदी. येक वर्सानंतर त्यो फारेनला परत जानार. पर ह्ये वारसा येका गावातून दुसऱ्या गावात चालूच ऱ्हाईल. आजित आम्चा मोटिव्हेशनल गुरू. गावचा न्हवं आख्ख्या देसाचा!

सदाभौ, तुमी म्हनून ऱ्हायलं तसं अपना टाइम आयेगा और मेहनत रंग लायेगा. जरासा येट आन् वाच करा. वाइच टाइम प्लीज म्हना!

आमी सुखाची धपांडी देऊन ऱ्हायलोय तुमाला.

तोवर सदाभौ, इष्टॉप.

 

तुम्चा जिवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गावकर.

 

kaukenagarwala@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 12:12 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by kaustubh kelkar nagarwala 2
Next Stories
1 वैशाख मातला
2 म्युझिक ‘मुक्ती’
3 ‘अनुराधा’ आणि पं. रविशंकर
Just Now!
X