18 October 2019

News Flash

जनतेस पत्र..

मी आणि बायको सकाळचा चहा पित पेपर वाचत होतो.

|| श्याम मनोहर

जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहणाऱ्या आणि त्याबद्दल ‘जनते’ला आत्ता काही सांगण्याचा प्रयत्न करण्याआधीच ‘जनता’ म्हणजे काय, कुणाला जनता म्हणायचे नि कुणाला म्हणायचे नाही, जे ‘जनता’ नसतात ते कोण.. अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यातून मार्ग काढावा लागलेल्या लेखकाची ही कथा..

मी आणि बायको सकाळचा चहा पित पेपर वाचत होतो.

बायको म्हणाली, ‘हे बघितले का?’

‘काय?’

‘सर्व पक्षांच्या उमेदवार निवडीची यादी आलीय.’

‘निवडणूक डिक्लेअर झालीय. उमेदवार डिक्लेअर होणारच.’

‘मला वेगळेच म्हणाचेय.’

‘काय?’

‘या यादीत नटनटय़ा आहेत, खेळाडू आहेत.’

‘त्यात काय विशेष? नटनटय़ा, खेळाडू यांना जनतेत बेस असतो.’

‘ते नाही म्हणत मी. या याद्यांत एकही लेखक नाहीय, एकही सायंटिस्ट नाहीय. हे बरोबर नाही. लेखक, सायंटिस्ट महत्त्वाचे असतात.’

बायको काहीशी त्रस्त झाली होती. कारण मला उमजले. आमचा मुलगा इस्रोत सायंटिस्ट आहे, मुलगी मराठी वाङ्मयावर पीएचडी करतेय. सायंटिस्ट आणि लेखक यांना राजकारणी निग्लेक्ट करताहेत, हे बायकोला लागलेय.

मी म्हणालो, ‘काय करायचे मग? असाच आहे आपला समाज.’

‘काहीतरी केले पाहिजे.’

‘काय पण?’

‘हा मुद्दा जनतेत न्यायला पाहिजे. जोरदारपणे न्यायला पाहिजे.’

‘कसा न्यायचा? आपण काही भाषणे देणार नाही.. फार तर वर्तमानपत्रात पत्र लिहू शकतो.’

‘पत्राचा फार उपयोग नसतो. काहीतरी भक्कम आवाज उठवला पाहिजे.’

‘ते शक्य नाही,’ मी मनात म्हणालो.

दोन दिवस बायको टीव्ही पाहताना हा मुद्दा वरचेवर काढायचीच. माझीही फुरफुरी वाढत चालली.

मला उपाय सुचला. जनतेला या संदर्भात पत्र लिहायचे. मी हे बायकोला बोललो.

‘पण जनतेला पोचणार कसे?’

‘लोकसत्तेत छापायचे. लोकसत्ता हल्ली जनतेत खूप वाचला जातो.’

‘लोकसत्ता छापेल?’

‘बघू पाठवू तरी.’

‘तुला जमेल लिहायला?’

‘आपली मुलगी मराठी वाङ्मयावर पीएचडी करतेय. तिच्यातले लिहिण्यातले माझ्यात आले असेल ना थोडे तरी?’

बायको खळाळून हसली. म्हणाली, ‘पालकांचे काही अपत्यात येते की अपत्यांचे पालकांत? काहीही तू बोलतोस.’

बायकोचे कौतुक करण्यासाठी मी म्हणालो, ‘आपला मुलगा सायंटिस्ट आहे. माझ्यात तर सायंटिस्टचे काहीच नाहीय. मुलात आले ते तुझ्यामुळे. तुझ्यात सायंटिस्टचे काहीतरी असणार.’

‘उगाच झाडावर चढवू नकोस. माझ्यात सायंटिस्टचे काही नाहीय.’

‘मग मुलगा सायंटिस्ट कसा झाला?’

‘स्पेस-टाइममधनं त्याच्यात आलेय.’

मी जोरात म्हणालो, ‘स्पेस- टाइम हे मुलाकडूनच तुझ्यात आलेय ना? तसे मुलीकडून माझ्यात लिहिण्याचे आलेले असणार. मी लिहितोच आता.. आणि लक्षात घे, मुलांकडून त्यांच्या पालकांत काही ना काही येते. हा नवा सिद्धान्त आपल्याला सापडलाय. सिद्धान्त हे आपल्याला मुलामुळेच कळलेय. आपल्याला सिद्धान्त सापडला. हे मुलामुळेच आलेय. लिहितोच आता.’

‘ठासून लिही मुद्दा.’

‘बघू कसं जमतेय.’

‘सविस्तर लिही. मस्त झालं पाहिजे.’

‘बघतो.’

आहाहा! पत्र लिहायचे. एकदम जुन्या काळात गेल्यासारखे वाटले. रोमँटिक!

प्रिय जनते..

आणि एकदम दचकायला झाले. ‘प्रिय जनते..’ असं लिहायचे? ‘जनते’? ‘जनते’ असं लिहिणे योग्य नाही. अगदी जवळचे कुणी असले तर एकारान्त करायचे असते. जनता जवळची की लांबची? गोंधळायला होतेय. तरी जनता जवळची म्हटलेच पाहिजे. लोकशाहीत जनता जवळची. सार्वभौम. तरी ‘जनते..’ एकारान्त नको. कसेतरी वाटतेय.

प्रिय जनता..

हां, हे ठीक आहे. जवळची आहेच, शिवाय आदरही व्यक्त होतोय.

तरी एक शंका मनात येतेय. जनता स्त्रीलिंगी. मी पुरुष पत्र लिहितोय. स्त्रीला पुरुषाने पत्र लिहिणं, पहिल्यांदाच.. कसंतरी वाटतेय. बायकोने किंवा मुलीने पत्र लिहायला हवे.

तर मग-

प्रिय समाज..

असे लिहावे काय?

समाज पुल्लिंगी आहेय. ‘समाजपुरुष’ असेच म्हटले जायचे. स्त्री-पुरुष समानतेचे वारे आले आणि ‘समाजपुरुष’ यातलं पुरुष गळाले. समाज राहिला. पुरुषाने पुरुषाला पत्र लिहिलेले चालते. गे असणे कायद्याने चालते.

आपल्या समाजाला भव्य इतिहास आहे, प्राचीन आहे, थोर परंपरा आहे.. अमुक अमुक सामाजिक सुधारणा व्हायला हव्यात, सामाजिक बांधिलकी हवी, असे उलटसुलट समाजाबद्दल बोलले जाते. समाज हा शब्दच महत्त्वाचा. ‘प्रिय समाज..’ असेच लिहावे..

पण.. लगेच शंका मनात.

मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज, अल्पसंख्य समाज.. निव्वळ समाज उरलाय की नाही?

सत्ताधारी निवडणूक काळात म्हणतात, जनता विरोधकांना ओळखून आहेय. सत्तेसाठी हपापलेले आहेत ते.

विरोधी निवडणूक काळात म्हणतात, जनता सत्ताधाऱ्यांच्या वल्गनांना कंटाळली आहेय.

जनता.

निवडणूक डिक्लेअर होते आणि समाजाचे रूपांतर जनतेत होते.

‘प्रिय जनता..’ हेच बरोबर.

कधीकाळी ‘जनताजनार्दन’ असे म्हटले जायचे. आता जनता. जनार्दन रद्द.

जनता म्हणजे मतदार. अठराच्या आतले मतदार नसतात. ते जनतेत येत नाहीत. अठराच्या पुढचे सर्व मतदार असले, तरी सर्व ‘जनता’त येत नाहीत. हा बारकावा नीट समजावून घ्यायला हवा. खरे तर हा बारकावा नाहीय, मोठावाच आहेय. ज्यांचा राजकारण्यांनी कल्याण, प्रगती, विकास करायचा आहे, ते लोक म्हणजे जनता. आणि विकास म्हणजे आर्थिक विकास. आर्थिक स्थिती सुधारणे, अर्थ वाढणे, क्रयशक्ती वाढणे. म्हणजे ‘जनता’मध्ये कोण येते, ते आर्थिक निकषावर ठरते. त्या दृष्टीने उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्नवाले, दारिद्रय़रेषेवरचे, दारिद्रय़रेषेखालचे असे लोक ‘जनता’मध्ये येतात.

मोठे इंडस्ट्रिअ‍ॅलिस्ट, मोठे जमीनदार, प्रचंड मोठी र्कज घेणारे, फाइव्ह स्टारचे, खासगी बँकांचे, विमान कंपन्यांचे, मॉल्सचे, सिनेमा थिएटरांचे मालक, बिल्डर, सिनेमातले हीरो, हीरॉईन.. हे जनतेत येत नाहीत, मतदार असले तरी. यांचा राजकारणी काय विकास करणार? तेच राजकारण्यांचा विकास करतात. सचिव, सीईओ, सेवानिवृत्त सैन्य अधिकारी.. हे ‘जनता’मध्ये येत नाहीत. वेडेही ‘जनता’मध्ये येत नाहीत. वेडय़ांना विकास फिजूल वाटतो. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, वकील, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यपाल..

अशांना कुणी जनता म्हणेल? जनताच अशा अनेकांना ‘जनता’बाहेरचे समजते. दादागिरी करणारेही ‘जनता’बाहेर.

आता अजून एक मोठावा घेऊ या.

शास्त्रज्ञ ‘जनता’मध्ये येतात? म्हणजे इस्रोतले, अणुशास्त्रातले, नॅशनल लॅबोरेटरी वगैरेतले शास्त्रज्ञ?

शास्त्रज्ञांच्यात श्रेणी असतात. एक नंबरचे शास्त्रज्ञ, दोन नंबरचे.. सिनियर, ज्युनिअर.. श्रेणींप्रमाणे आर्थिक उत्पन्न असते. म्हणजे शास्त्रज्ञांच्यात अतिउच्च, उच्च, उच्च मध्यमवर्गीय.. असे आर्थिकदृष्टय़ा स्तर असतात. मध्यम, दारिद्रय़रेषेखालचा, दारिद्रय़रेषेवरचा.. असे अर्थात शास्त्रज्ञ नसतात. एखाद्या लॅबोरेटरीच्या डायरेक्टरला कुणी राजकारणीही जनता म्हणू धजणार नाही. ‘जनता’बाहेर असायला अलौकिकपणा असावा लागतो. किंवा पॉवर, एनर्जी, बल असावे लागते. केवळ आर्थिकतेवर ‘जनता’बाहेर कुणी राहत नाही. विद्यापीठातले प्रोफेसर, रीडर, लेक्चरर यांना हल्ली पगार चांगले भरगच्च असतात. त्यांच्या वर्तुळात थोडीफार पॉवर असते. थोडीफारच. अलौकिक काही नसते. ते ‘जनता’मध्येच असतात. विद्यापीठांच्या कुलगुरूंना अजून तरी पॉवर आहेच. कुलगुरू ‘जनता’मध्ये नसतो. पुढे कदाचित कुलगुरूही ‘जनता’मध्ये येतील. महाविद्यालयातले प्राध्यापक, प्राचार्य.. पगार चांगले असले तरी जनताच. तसेच बहुतेक शास्त्रज्ञ जनताच.

कलावंत ‘जनता’मध्ये असतात? लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार.. ‘जनता’मध्ये असतात?

कलावंत जनता, समाज मानत नाहीत.

कलावंत आणि रसिक अशी कलाजगतात मांडणी असते.

तरी कलावंतांच्यात श्रेण्या असतात. श्रेष्ठ कलावंत, दुय्यम कलावंत, हौशी कलावंत अशा श्रेण्या असतात. श्रेष्ठ लेखक, श्रेष्ठ कवी.. असे असते.

श्रेष्ठ कलावंत ‘जनते’बाहेरचे असतात. बाकीचे कालवंत ‘जनता’मधले असतात.

कलावंत साठीच्या पुढे गेला, की त्याचा उल्लेख ‘ज्येष्ठ कलावंत’ असा केला जातो. जसे की, ज्येष्ठ गायक, ज्येष्ठ लेखक, ज्येष्ठ कवी.. ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ नाही, हे गुपचूपपणे सगळ्यांना माहीत असते.

माझे आणि बायकोचे मिळून एकूण सदुसष्ट नातेवाईक आहेत. मी आणि बायको एका पौर्णिमेला रात्री टेरेसवर कॉफी पित चांदण्यात गप्पा करत बसलो होतो, तेव्हा आम्ही नातेवाईकांची मोजदाद केली. प्रौढ वयात हा रोमान्सच. मग आम्ही नातेवाईकांतले कवी मोजले तेहतीस. तेहतीस? आम्ही खूप हसलो, एकमेकांना टाळ्या दिल्या. रोमान्स!

अर्थात तेहतीस जणं स्वत:ला कवी समजत नाहीत. ‘आम्ही कविता करतो’ असे ते म्हणतात.

कवीवरून एकाने मला एक निरीक्षण सांगितले. खरं तर ते गायकाबद्दल आहे. माझा मित्र शास्त्रीय गाण्यातला दर्दी आहेय. शास्त्रीय गाण्यांच्या मैफलींच्या आठवणीत तल्लीन होतो तो.

दहा-बारा वर्षे रियाज झाल्यावर गुरू शिष्याला मैफली करायची परवानगी देतो. शिष्य चार-पाच मैफिली करतो अन् त्याचे त्यालाच कळते- तो मैफिलीचा गायक आहे की नाही. नाही, असे कळले की तो आनंदाने, समजूतदारपणे गायनाच्या शिकवण्या सुरू करतो, रेडिओवर गातो, ओळखीतल्यांकडे छोटय़ा, घरगुती वा कौटुंबिक समारंभात गातो. कवीला कळले जरी की तो दुय्यम दर्जाचा आहे, तरी तो कवितांची पुस्तके प्रसिद्ध करत राहतो. कवीला शिकवण्या मिळत नसतात ना?

जे ‘जनते’मधले असतात, त्यांना तिकीट मिळत नाही. जे ‘जनते’बाहेरचे असतात, त्यांना तिकीट मिळते. एखाद्या दादालाही, दादाच्या बायकोलाही.

तर श्रेष्ठ गायक, श्रेष्ठ लेखक, श्रेष्ठ चित्रकार.. यांना कोणताच पक्ष तिकीट का देत नाही? श्रेष्ठ शास्त्रज्ञांना का देत नाहीत?

श्रेष्ठ गायक, श्रेष्ठ लेखक, श्रेष्ठ शास्त्रज्ञ.. यांना ग्लॅमर नसते म्हणून?

श्रेष्ठ लेखक, श्रेष्ठ चित्रकार.. यांना समाज ग्लॅमर देत नाहीय. हा समाजाचा दोष आहेय.

राजकारणी सबंध समाजाच्या चुका काढू धजत नाहीत. त्यांच्या विरोधकांच्याच चुका ते काढतात. सबंध समाजाच्या चुका काढल्या तर राजकारणी जीवनातूनच उठतील. श्रेष्ठ कलावंत, श्रेष्ठ गायक, श्रेष्ठ लेखक, श्रेष्ठ शिल्पकार सबंध समाजाच्या.. माणसांच्याच थेट चुका काढतात म्हणून राजकारणी निवडणुकीच्या काळात श्रेष्ठ कलावंतांना, श्रेष्ठ शास्त्रज्ञांना टाळतात की काय!

सकाळी मी न् बायको चहा पीत पेपर वाचत होतो.

‘बघितलंत का हे?’ बायको म्हणाली.

‘काय?’

‘रघुवीर म्हणताहेत, भारतात श्रेष्ठ म्हणावेत असे प्रतिभावंत शास्त्रज्ञच नाहीत.’

‘कोण रघुवीर?’

‘मी सगळं वाचलं नाहीय.. मुद्दा महत्त्वाचा- भारतात प्रतिभावंत शास्त्रज्ञ नाहीत.’

आम्हाला मुलगा आठवून वाईट वाटले. रघुवीर कोण.. त्याचे खरे कशावरून?.. मनात आले, बोललो नाही.

तीन दिवसांनी बायको म्हणाली, ‘आज वेगळेच आलेय.’

‘काय?’

‘सबंध भारतीय समाजाचा म्हणावा असा भारतात कोणत्याच भाषेत एकही लेखक नाहीय.’

‘कोण म्हणतंय?.. तो रघुवीर?’

‘सगळं वाचलं नाहीय.. खरंच असा लेखक नाहीय?’

चार दिवसांनी मी वाचले : ‘भारतात कोणत्याच क्षेत्रात काहीही सैद्धान्तिक असे होत नाहीय.’

मी बायकोला बोललो नाही. पेपराचे ते पान तिला दिले नाही.

इतके निगेटिव्ह का बोलले जातेय?

फक्त राजकारणी निगेटिव्ह बोलत नाहीत. निगेटिव्ह बोलले तर राजकारणातून उठतील.

नसू दे श्रेष्ठ शास्त्रज्ञ, नसू दे श्रेष्ठ लेखक!

राजकारणीही दुय्यम दर्जाचेच आहेत.

मग दुय्यम दर्जाच्या शास्त्रज्ञांना, लेखक वगैरेंना उमेदवारी का दिली जात नाही?

जनतेपुढे हा मुद्दा मांडायचा-

लोकशाहीत जनता सार्वभौम असते.

वाक्यात एकदम खटकले.

लोकशाही.. मग जनता का? जनता असेल तर जनताशाही हवे, समाजशाही हवे; लोक कसे?

गडबड होतेय.

शिवाय शाही.. शाही काय?

‘शाही’ शब्द आपला आहे? शाहीचा अर्थ काय?

काय हे आपले घर! घरात शब्दकोश नाही, विश्वकोश नाही. वर्तमानपत्रात येते :  लोकशाही. तेच डोक्यात. निव्वळ वर्तमानपत्रावर आपले बौद्धिक जीवन. बौद्धिक जीवन.. हे मुलाकडून कळले. मुलगा सायंटिस्ट नसता तर ‘बौद्धिक जीवन’ हा शब्दही लक्षात आला नसता. अरेरे! काय हे आपले जीवन!

उदास व्हायला झाले.

काही वेळात उदासी गेली. उदासी, निराशा, दु:ख आम्ही टिकू देत नाही. बायको म्हणते, ‘आनंदात जगायचे. मुलगा सायंटिस्ट आहे, मुलगी वाङ्मयातली आहे. आणखी काय पाहिजे?’ बायको आणखी म्हणते, ‘इतर उच्चमध्यमवर्गी कुटुंबे बघा. कुणाची दोनपैकी एक अपत्य डॉक्टर, दुसरे इंजिनीअर, नाहीतर एक अपत्य गायनॅकॉलॉजिस्ट, दुसरे डोळ्यांचे डॉक्टर, नाहीतर एक अपत्य सीए, दुसरे आर्किटेक्ट.. काय मजाय असल्या अपत्यात? काही सांस्कृतिक आहे? आपले बघा. एक सायंटिस्ट, दुसरे वाङ्मयातले.. सांस्कृतिक. आपल्या फॅमिलीला सांस्कृतिक डायमेंशन आहे. सायन्स, वाङ्मय हे समाजाचे अलंकार असतात. आपले जीवन कृतार्थ आहे.’

बायकोचे पटते. तरी मला लिहिण्याच्या नादाने शंका, हरकती काढायची सवय लागलीय. आमची अपत्ये सायन्स, वाङ्मयातली आहेत, हे चुकून घडलेय. मला आणि बायकोला आमची अपत्ये सायन्स आणि वाङ्मय यातलीच हवीत, असे वाटत नव्हते. अपत्ये चांगला पैसा मिळवणारी हवीत, एवढे वाटत होते. आमची अपत्ये डॉक्टर, इंजिनीअर असती तरी आम्ही आनंदात असतो. आमच्या अपत्यांपैकी एक जरी अपत्य कलेक्टर, आयएएस असते तर मी नक्की सांगतो, मी न् बायको आनंदाने आतून चेकाळलो असतो. कलेक्टर मोठा, आमदार मोठा, मंत्री मोठा, मुख्यमंत्री म्हणजे तर मोठय़ाचा मोठा. पंतप्रधान म्हणजे तर मोठेपणाचा कहर!

आमचे काही खरे नाही.

लिहायला लागले की निगेटिव्ह फार येते. लिहीत नाहीत ते.. मीही लिहायच्या आधी.. कसे मस्त, खातपीत करत मजेत जगतात!

किती भरकटायला झाले.

हा माझा नेचर नाहीय. मी ब्रेनवर नेहमी कंट्रोल ठेवतो. मुद्दा सोडायचा नाही.

काय विचार करत होतो?

हं.. जनतेला पत्र..

लोकशाही. जनताशाही नाही. समाजशाही नाही. लोकशाही. लोक. लोक महत्त्वाचे. लोक सदासर्वदा असतात. जगभर लोक आहेत.

 

प्रिय लोक हो..

हे योग्य.

पुन्हा शंका.. जगभर निव्वळ लोक नाहीत. लोकांचे प्रकार आहेत- ब्रिटिश, अमेरिकी, आफ्रिकी, इराणी, भारतीय..

म्हणजे ‘प्रिय भारतीय लोक हो’ असे लिहायचे?

किती किचकट होऊन बसलेय जगणे!

लिहिणे.. त्यामुळे किचकट होते सगळे.

आणि एकटय़ाने विचार करत बसणे.. अघोरीपणा! चारचौघात बोला, काही ताप नसतो. राजकारणी कसे मस्त भाषणावर भाषणे देतात. तेच तेच बोलायचे. कधी कधी जीभ घसरते. दिलगिरी व्यक्त करायची. द एंड!

जनतेला.. नाही, लोकांना पत्र लिहायचे.. पुन्हा लिहिण्याच्या काहीही फंदात पडायचे नाही. यापुढे बोलायचे.

‘प्रिय लोक हो..’ असेही लिहायची गरज नाही. ‘लोक होऽऽऽ’ एवढे पुरे की!

लोक.. स्वर्गलोक, नरकलोक आणि मर्त्यलोक..

अकस्मात सुचले.

आणि मजा आली.

एकटेपणात, लिहिण्यात असे काय काय सुचते. मजाही येतेच. मेंदू मोकळा सोडायचा. एकटय़ाने मजा करायची. ही मजा मला आयुष्यात पहिल्यांदाच कळतेय.

पृथ्वीला मर्त्यलोक नाही म्हणायचे. सजीव लोक म्हणायचे. अंतराळात फक्त पृथ्वी अशी आहेय, जिच्यावर सजीव आहेत. इतर कुठे अजून तरी सजीव सापडले नाहीत. आणि पृथ्वीवर सजीव तरी किती प्रकारचे? नाना प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, कीटक, सूक्ष्म जिवाणू.. मानव..

मानव..

‘लोक हो’ऐवजी ‘मानव हो’.. हे छान आहेय.

सबंध मानवजात धरायची. अस्सल रोमँटिक वाटते, वाटतेय.

तरी..

शंका..

माणूस मानवजात हे नाही धरून ठेवू शकत.

माणूस.. व्यक्ती.. व्यक्ती हे मानवजातीचे युनिट आहेय.

आहाहा! केवढा मोठा, लांबलचक फेरफटका मारला मी स्पेस-टाइममध्ये. प्रत्येक व्यक्ती असा मोठा, लांबलचक स्पेस-टाइममध्ये फेरफटका मारत असणार. असा फेरफटका मारणे आणि अर्थ शोधणे हा माणसाचा वंडरफुल गुणधर्म आहे. व्यक्ती स्वतंत्र आहे म्हणून फेरफटका मारू शकते, अर्थ शोधू शकते.

वंडर!

आश्चर्य ही भावना आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे.

नसू दे श्रेष्ठ शास्त्रज्ञ, नसू दे श्रेष्ठ लेखक.

राजकारणीही दुय्यम दर्जाचे आहेत.

मग दुय्यम दर्जाच्या लेखकांना, शास्त्रज्ञांना वगैरेंना उमेदवारी का नाही द्यायची?

 

प्रिय व्यक्ती,

शास्त्रज्ञ, लेखक वगैरेंना राजकारणी का जुमानत नाहीत? का गणत नाहीत? याचा जाब आपण विचारला पाहिजे. दारात जे प्रचारक येतील.. कोणत्याही पक्षाचे.. त्यांना लेखकांची, शिल्पकारांची, शास्त्रज्ञांची नावे माहीत आहेत का, हे विचारायचे.

गायकांची एखाद्या वेळेस माहिती असतील. रेडिओ, टीव्हीमुळे.

प्रिय व्यक्ती, आपणही हे आठवू या.

आणखी एक मुद्दा :

उच्च मध्यमवर्गीयांतले हल्ली युरोपात, अमेरिकेत टूरवर जातात. आम्हीही जाऊन आलोय. तिथे आपण मोठमोठय़ा, प्रशस्त, सुंदर लायब्रऱ्या, म्युझियम्स पाहतो, चकित होतो. अशा लायब्रऱ्या, म्युझियम्स आपल्याकडे का नाहीत? सुट्टीच्या दिवशी आपण आळसात वेळ घालवतो. नातेवाईकांकडे जातो, नातेवाईक येतात. गरज नसली तरी खाणे होते, तेच तेच बोलणे होते.. छान लायब्रऱ्या, म्युझियम्स असते, तर? आपला वेळ छान गेला असता, मजा आली असती. आपल्याला वाचन करायची आवड नसते, वाचनाची आवड लागली असती. राजकारणी युरोप अमेरिकेला जातातच.. मग लायब्रऱ्या, म्युझियम्स पाहत नाहीत? मेट्रो, मॉल, जपानमधली बुलेट ट्रेन एवढंच पाहतात? राजकारण्यांच्या जाहीरनाम्यात वाचनालयाचा मुद्दा आहे की नाही, हे आपण तपासून पाहू या. प्रचारकांना त्याचाही जाब विचारू या.

प्रत्येक व्यक्तीने तब्येत सुधारू या.

तुमचाच,

तुमच्यातला.

ता. क. :

कलावंत, शास्त्रज्ञ यांनी आवर्जून स्पेस-टाइमबाहेर जावे. अस्तित्वाचे गुणधर्म शोधावे. निर्मिती करावी. प्रत्येक व्यक्तीने जाणून घेण्यासाठी उतावीळ व्हावे.

First Published on April 14, 2019 12:15 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by shyam manohar