20 January 2019

News Flash

भटक्या-विमुक्तांच्या व्यथा-वेदनेची पुनर्माडणी

भारतात असाही एक समाज आहे, ज्याचा स्वातंत्र्यदिन इतर भारतीयांपेक्षा वेगळा आहे. आजकाल ज्वलंत राष्ट्रवादाचा इतका कर्कश्श जागर सुरू आहे की, ‘हिंदुस्थाना’त राहून एखादा समाज वेगळा

| July 12, 2015 01:02 am

lr16भारतात असाही एक समाज आहे, ज्याचा स्वातंत्र्यदिन इतर भारतीयांपेक्षा वेगळा आहे. आजकाल ज्वलंत राष्ट्रवादाचा इतका कर्कश्श जागर सुरू आहे की, ‘हिंदुस्थाना’त राहून एखादा समाज वेगळा स्वातंत्र्यदिन मानतोच कसा, असा सवाल कोणी करू शकेल. असा सवाल करणाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी प्रशांत पवार यांचं ‘३१ ऑगस्ट १९५२’ हे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक अंजनाचं काम करू शकेल. ब्रिटिशांनी १८७१ साली बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत भटके जीवन जगणाऱ्या जातींना कायदेशीररीत्या गुन्हेगार ठरवलं. म्हणजे या जातींची एक यादी बनवली. या यादीत समाविष्ट जातींसाठी खुले तुरुंग तयार केले गेले. या तुरुंगातील लोकांसाठी अनेक प्रतिबंध घातले गेले.
ब्रिटिशांच्या वंशश्रेष्ठतावादी विचारपद्धतीचा हा एक परिपाक होता. त्यांना नेटिवांच्या ग्रामजीवनपद्धतीचं योग्य ते आकलनच झालेलं नव्हतं. जगात इतरत्रही ‘जिप्सी’ पद्धतीने जीवन जगणाऱ्या टोळ्या होत्या, आहेत. या जिप्सींचा अभ्यास करताना ब्रिटिश संशोधकांनी भलतेच निष्कर्ष काढले. जिप्सींना कुठलंही मांसभक्षण वज्र्य नसल्याने ते माणसांपेक्षा निराळे आहेत, ते प्राण्यांप्रमाणे केसाळ असतात, त्यांच्यात लैंगिक संबंधांचे विधिनिषेध पाळले जात नाहीत, त्यांची प्रजननक्षमता जास्त असल्याने कुत्री किंवा डुकरांप्रमाणे त्यांना भरपूर मुलं होतात, ते चोऱ्या करण्यात पटाईत असतात, ही माणसे सहज कोणाचाही खून करू शकतात.. असे निष्कर्ष काढून ब्रिटिशांनी भटके जीवन जगणाऱ्या टोळ्यांना माणसांपेक्षा निराळेच मानले. त्यांचा हा दृष्टिकोन भारतातही प्रतिबिंबित झाला. त्यातून भटक्या जातींना गुन्हेगार ठरवलं गेलं. त्या ‘गुन्हेगार’ यादीत घातलेल्या पारधी, भिल्ल, कातकरी, कैकाडी, वडार, टकारी इत्यादी जातींना आजही समाज गुन्हेगारच मानतो. ब्रिटिशांकडून घेतलेला वंशश्रेष्ठत्वाचा हा एक अवगुण आपल्यात अजूनही शिल्लक आहे. पूर्वी शेतकरी बलुतेदारांना बलुतं म्हणून पिकातला ठरावीक हिस्सा द्यायचे, तसेच अलुतेदारांना अलुतंही मिळायचं. हे अलुतेदार म्हणजे गावराखणीचं काम करणारे पारधी, पावसाचा दिलासा देणारे नंदीबैलवाले, आजारांवर औषधं देणारे वैदू, मरीआईवाले, इत्यादी लोक. अशा अनेक भटक्या जाती-जमाती जरी प्रत्यक्ष गावात राहत नसल्या, तरी शेतकरी समाज त्यांना सन्मानाने वागवत होता. ब्रिटिशांनी इथली ही मूळची सौहार्द संस्कृती मोडली. अर्थात इतरही कारणांनी नंतरच्या काळात दुष्ट जातीयता प्रबळ झाली नि भटके जीवन जगणाऱ्या समाजावर दलितांपेक्षाही हीन जीवन जगण्याची अवस्था येऊन ठेपली. या अवस्थेतून त्या समाजाची मुक्तता व्हावी यासाठी कायदेमंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक काहीएक प्रयत्न केल्याची नोंद आढळते. या गुन्हेगार जातींतील काही कार्यकर्तेही स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत होते. हे कार्यकर्ते काँग्रेसचे लक्ष आपल्या समाजाकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेऊन आचार्य भिसे गुरूजींनीही स्वातंत्र्यपूर्व काळातच भटके-आदिवासींसाठी आश्रमशाळा उभारणीचे कार्य सुरू केले होते. या पाश्र्वभूमीवर पं. जवाहरलाल नेहरूंनी ३१ ऑगस्ट १९५२ रोजी गुन्हेगार यादीतील जातींना त्या यादीतून मुक्त केले. त्या दिवसापासून या जाती ‘विमुक्त’ झाल्या. म्हणूनच हा दिवस या जमाती आपला स्वातंत्र्यदिन मानतात. पण खरंच दोन-दोनदा स्वातंत्र्य मिळूनही या विमुक्तांच्या पदरी नेमकं काय पडलं? या प्रश्नाचा वेध प्रशांत पवार यांनी याद्वारे शोधपत्रकारितेतून घेतला आहे.
मराठी साहित्यात आजवर भटक्या-विमुक्तांच्या जीवनावर विपुल लेखन झाले आहे. विभावरी शिरुरकर यांनी मराठीत सर्वप्रथम विमुक्तांच्या जीवनावर ‘बळी’ ही कादंबरी लिहिली. नंतरच्या काळात लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, रामनाथ चव्हाण इत्यादी अनेकांनी भटक्या-विमुक्तांचे जीवन प्रकाशात आणले आहे. हे लिखाण बरंचसं आत्मचरित्रात्मक, ललित तसंच संशोधनात्मक स्वरूपाचं आहे. प्रशांत पवार यांचं हे पुस्तक मात्र त्यात शोधपत्रकारितेचा बाज असल्याने वेगळं ठरतं. पवार यांनी महाराष्ट्राबाहेरही भटकंती करून नव्याने विमुक्तांची वेदना समजावून घेतली आहे. बिहारमध्ये एक भक्कम ‘व्होट बँक’ असूनही तेथील मुसहरा समाजाची झालेली दैना पवार या पुस्तकात मांडतात. त्याप्रमाणे राजस्थानमधील एका भटक्या जातीत स्त्रियांचा देहविक्रय हेच त्या जमातीचं उदरनिर्वाहाचं- त्यापेक्षाही जीवनशैलीचं ‘साधन’ कसं झालं आहे, हे कटू वास्तव पवार खास आपल्या पत्रकारी भूमिकेतून उघड करतात. या लेखसंग्रहात विविध जमातींची सद्य:स्थिती, त्यांचा इतिहास, रूढी, प्रथा, लोककथा आदी लेखकाने मांडल्या आहेत.
या समाजाच्या केवळ वेदना मांडूनच प्रशांत पवार थांबलेले नाहीत, तर त्यांनी या पददलित समाजांतूनच पुढे आलेल्या आशादायक व्यक्तींनाही प्रकाशात आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. मसणजोगी समाजातील संजय विभुते, वैदु समाजातील सुनीता लोखंडे, पारधी जातीतली रेखा राठोड, गोपाळ समाजाचे के. ओ. गिर्हे आणि जनाबाई गिर्हे यांचा संघर्ष शब्दबद्ध करून त्यांनी दलित चळवळीत मोलाचे काम केले आहे.
लेखकाने ‘बुधन थिएटर’ची करून दिलेली ओळखही वाचकाला महत्त्वाची वाटेल. लेखक जवळपास वीस वर्षे पत्रकारितेमध्ये आहे. मुख्य मीडियात दरवेळी पददलितांच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळतोच असं नाही. भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे नि सेलिब्रिटींच्या चकचकाटात तळागाळातले अनेक प्रश्न चळवळीची पाश्र्वभूमी असलेल्या पत्रकारांच्या मनात खदखदत राहतात. ही खदखद पवारांनी या लेखनातून मोकळी केली आहे.
दैनिकातील सदराच्या स्वरूपात प्रसिद्ध केलेल्या या लेखनावर संपादकीय संस्कारांची मात्र गरज होती. कारण हे नेहमीसारखे वाचून हातावेगळे आणि मनावेगळे करण्याचे पुस्तक नाही. या पुस्तकातील लेखांना जीवनाचा- तोही समकालीन जीवनाचा गंध लाभलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या आधारे अनेकांना भटक्या-विमुक्तांच्या जगण्याची नव्याने ओळख होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकात संदर्भ नोंदींची कमतरता जाणवते. दैनिकातील सदरापेक्षा पुस्तकाला जास्त संदर्भमूल्य असते. त्यामुळे यातील संघर्षरत व्यक्तींची, सेवाभावी संस्थांची संपर्क माहिती यात आली असती तर त्याचा संशोधकांना, सामान्यजनांना फार उपयोग झाला असता. हा एक दोष सोडल्यास पुस्तकाची निर्मिती देखणी झाली आहे. पवार हे अद्यापही भटक्या-विमुक्तांच्या चळवळीत सक्रिय असल्याने त्यांच्याकडून अशा लेखनाची यापुढेही अपेक्षा धरता येईल. भटक्या-विमुक्त-पददलित समाजांचे प्रश्न व समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असले तरीही या समाजात व समाजाबाहेरूनही काही लोक त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत, हा दिलासा हे पुस्तक देतं. आणि म्हणूनच त्याचं स्वागत व्हायला हवं.
‘३१ ऑगस्ट १९५२’-
प्रशांत पवार, साकेत प्रकाशन,
पृष्ठे- १८३, किंमत- २०० रुपये.
प्रशांत खुंटे

First Published on July 12, 2015 1:02 am

Web Title: marathi book review 17