07 July 2020

News Flash

या मातीतील सूर :   चतुर(स्र)

निरमा, धारा धारा, झंडू बाम, संतूर यांसारख्या असंख्य जाहिराती त्यांनी केल्या आणि लोकप्रियही करून दाखविल्या.

नरेंद्र भिडे narendra@narendrabhide.com

अगदी लहानपणापासून मला एक गीत कायमच मोहित करत आलंय. म्हटलं तर ते काही साधं गाणं नव्हतं; अनेक प्रदेशांतील अनेक संगीतप्रकारांचा आणि भाषांचा गुंफलेला तो एक सुंदर गोफ होता. बऱ्याचदा आपण अशी गाणी ऐकतो आणि वर्षांनुवर्ष त्या गाण्यांचं गारुड आपल्या मनावर कायम राहतं. परंतु अशी गाणी तयार करण्यामागे किती जणांचे कष्ट आणि किती प्रतिभावंतांची बुद्धी खर्ची पडलेली असते याचा आपल्याला साधा अंदाजही येत नाही. ‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ हे गाणं गेली तीस वर्ष लोकप्रियतेचा उच्चांक टिकवून आहे. इतकं, की त्याला जवळपास एका राष्ट्रगीताइतका दर्जा प्राप्त झाला आहे. या गाण्यातील अप्रतिम कॅमेरा टेकिंग, अप्रतिम संकलन आणि नावाजलेल्या उत्तुंग लोकांचं त्यात होणारं दर्शन या जमेच्या बाजू आहेतच; परंतु यापल्याड या सगळ्याच्या मुळाशी आहे ती त्याची अद्भुत संगीतरचना. आणि ते रचनाकार आहेत अशोकजी पत्की.

अर्थात अशी आव्हानात्मक कामं पार पाडण्याकरता एक उपजत प्रतिभा असायला लागते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संगीताची ओळख असणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे. अशोकजी खूप लहानपणापासून हार्मोनियम आणि तबला अशी दोन्ही वाद्यं अप्रतिम वाजवायचे. एक स्वरवाद्य आणि एक तालवाद्य तुमच्या हातात बसलेलं असेल तर संगीतकार होण्याच्या दृष्टीनं ते अत्यंत उपयुक्त असतं आणि ती एक उत्तम पायाभरणी ठरू शकते. लहानपणीच त्यांच्या भगिनीबरोबर त्यांनी लहान-मोठय़ा कार्यक्रमांत साथीदार म्हणून काम बजावलं आणि त्यातूनच त्यांच्यातला संगीतकार हळूहळू घडू लागला. त्यानंतर ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर त्यांनी देशात व परदेशात अनेक कार्यक्रमांमध्ये साथ केली आणि नंतर सुमनताईंबरोबरच अनेक ध्वनिमुद्रिकासुद्धा निर्माण केल्या. त्याच वेळेस ते पंचमदा आणि सचिनदा यांच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊ लागले व पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबरसुद्धा त्यांचे सहाय्यक म्हणून अशोकजींनी गोवा हिंदु असोसिएशनच्या अनेक नाटकांकरता काम केलं. या सगळ्याचा परिपोष त्यांच्या भविष्यातील अनेक रचनांमध्ये दिसून येतो.

अशोकजींच्या सगळ्या कारकीर्दीवर नजर टाकली की एक बाब प्रकर्षांने जाणवते, ती ही की त्यांच्याइतका विविध क्षेत्रांमध्ये वावर असणारा दुसरा मराठी संगीतकार निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. गेली पन्नास र्वषे चित्रपट, नाटक, जाहिराती, भावगीत आणि अशा अनेक प्रकारांमध्ये विस्तृतपणे वावरणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हे. पण अशोकजी ती अत्यंत सहजपणे पार पाडतात. आपल्याला असलेलं संगीताचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोचवताना ते पुरवून पुरवून वापरावं लागतं याचं भान अशोकजींकडे जेवढं आहे तेवढं ते क्वचितच दुसऱ्या संगीतकाराकडे असलेलं आपल्याला आढळतं. हिंदीमध्ये जगजीत सिंग यांच्याकडे ते होतं असं नेहमी जाणवे. आपल्याकडचं संगीत हे कितीही श्रेष्ठ असलं तरी लोकांपर्यंत पोचण्याकरता त्याचा किती आणि कसा वापर करावा हे कळणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे भान असलं तरच तुम्ही लोकांची नस बरोबर पकडू शकता. आपल्याकडचं संचित लोकांपुढे मांडण्याचा मोह अनेकांना पडलेला दिसतो आणि क्वचितच त्यातून लोक सुटले आहेत. परंतु अशोकजींनी हा नियम पहिल्यापासून कसोशीने पाळला आणि त्यातच त्यांचं यश सामावलेलं आहे.

अशोकजी आर. डी. बर्मन यांच्या कंपूमध्ये सामील झाले ते एक तालवादक म्हणून. मारुतीराव कीर यांच्यासारख्या अतिशय प्रयोगशील तपस्वीचा सहवास त्यांना त्यावेळेस नक्कीच लाभला असणार आणि त्याचे पडसाद अशोकजींच्या काही गाण्यांवर ठळकपणे उमटलेले दिसतात. बहुतेककरून सत्तरीच्या दशकातली जी गाणी अशोकजींनी सुमनताई यांच्या आवाजात रेकॉर्ड केली, त्यातली काही गाणी बघा! ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘एकदाच यावे सखया’, ‘नाविका रे’ आणि ‘दारी पाऊस पडतो’ यांसारख्या गाण्यांमध्ये बर्मनदांचा खूप प्रभाव जाणवतो. विशेषकरून त्यातलं ताल संयोजन नक्कीच बर्मन स्कूलशी नातं सांगतं. तसंच यातील काही गाण्यांमध्ये संचारीचा वापर केलेला दिसतो. ढोबळमानाने सांगायचं झालं तर संचारी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या अंतऱ्याच्या मध्ये मुक्तपणे अस्थाई आणि अंतरा यांच्यापेक्षा भिन्न स्वरांचं नक्षीकाम असलेला एक भाग. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ या गीतातील दुसऱ्या अंतऱ्याच्या आधीसुद्धा हा संचारीचा प्रयोग आपल्याला आढळतो.) सुमनताईंनी गायलेली ही गाणी मराठी भावसंगीतात एक दिमाखदार स्थान टिकवून आहेत- आजसुद्धा.

अशोकजींनी रचलेल्या इतर भावगीतं व चित्रपटगीतांवर नजर टाकली तर हे जाणवतं, की अशोकजी कायम बदलत गेलेले आहेत. काळानुसार चित्रपट संगीत आणि भावसंगीत यांच्यात तंत्रज्ञानानं बऱ्यापैकी घुसखोरी (चांगल्या अर्थानं!) केली आणि त्याचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं. बऱ्याच संगीतकारांना ही घुसखोरी सहन झाली नाही, किंवा त्याप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवून आणणं त्यांना जमलं नाही असे म्हणू या. आणि मग जे आपल्याला जमत नाही ते कसं चुकीचं आहे किंवा त्यामुळे कशी रसहानी होते अशा तक्रारी बरेच लोक करू लागले. परंतु त्यात काही अर्थ नसतो. सिंथेसायजरचा वाढता वापर हा अपायकारक नसून उपकारक आहे आणि त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास त्याने एक वेगळ्या प्रकारचं- विशेषकरून तरुणांना आकर्षित करणारं संगीत निर्माण करता येऊ शकेल हे अशोकजींनी पुरेपूर जाणलं आणि त्याप्रमाणे ते बदलत गेले. छापखाने आले म्हणून जसा साहित्याचा दर्जा खालावत नाही, त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाने कुठल्याही अर्थानं संगीताचा दर्जा खालावत नाही याचं पुरेपूर भान अशोकजी यांच्याकडे होतं. म्हणूनच गेल्या तीन पिढय़ांमध्ये अशोकजी कायम लोकप्रिय राहिले. त्यांची गाणी सर्व वयाच्या लोकांच्या तोंडी कायम रेंगाळत राहिली. ‘दिस चार झाले मन’, ‘दूर किनारा राहिला’, ‘राधा ही बावरी’ आणि ‘राधे कृष्ण राधे कृष्ण’सारखी गाणी अशोकजी वयाच्या सत्तरीमध्येसुद्धा लीलया करू लागले त्याचं हेच कारण आहे.

परंतु परंपरा मात्र त्यांनी कधीही सोडली नाही. अगदी ‘राधा ही बावरी’सारखं पूर्णपणे Pop Genre चं गाणं घ्या! मुखडय़ातच अशोकजी अशा सुरांची योजना करतात की ज्यामुळे ‘राधाधर मधु मिलिंद जय जय’ हे प्रसिद्ध नाटय़गीत आपण ऐकतोय की काय अशी शंका यावी. परंतु तेवढी हलकीशी झुळूक येऊन ते गाणं नंतर वेगळंच वळण घेतं. दोन्ही गाण्यांमध्ये पहिला शब्द ‘राधा’ आहे यावरून हे त्यांना सुचलं असावं, किंवा खरं तर त्यांनीच हे गाणं लिहिलेलं असल्यामुळे ही चतुराई त्यांनी केली असावी असं लक्षात येतं. याच चतुरपणाच्या जोरावर जाहिरात क्षेत्रातसुद्धा अशोकजी यांनी प्रचंड प्रमाणावर मुबलक काम केलं. जवळपास ५००० जाहिरातींचं संगीत त्यांनी केलं. पंधरा सेकंदाच्या अवकाशात एखादी अत्यंत उठावदार आणि दीर्घकाळ स्मरणात राहील आणि सगळ्यांना म्हणता येईल अशी ओळ बांधणं हे एखाद् दोन वेळेस जमतं! पण असं सलग वर्षांनुवर्ष करत राहणं याकरता नुसती प्रतिभा असून चालत नाही, तर एक अंगभूत चातुर्यही असावं लागतं. निरमा, धारा धारा, झंडू बाम, संतूर यांसारख्या असंख्य जाहिराती त्यांनी केल्या आणि लोकप्रियही करून दाखविल्या.

चित्रपटांबरोबर मराठी नाटक या क्षेत्रातसुद्धा अशोकजी अतिशय रमले. ‘सुयोग’ या सुधीर भटांच्या नाटय़संस्थेच्या जवळपास सर्व नाटकांचं संगीत अशोकजी यांनीच केलंय. प्रशांत दामले यांच्यासारख्या गायक-नटाबरोबर त्यांनी अतिशय आकर्षक आणि गोड अशी गाणी तयार केली. ‘मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणं आज जवळजवळ वीस वर्ष झाली तरीसुद्धा लोक विसरू शकत नाहीत. अशोकजी रूढार्थानं शास्त्रीय संगीत शिकले नव्हते, परंतु त्यांची सांगितीक स्मृती अतिशय प्रबळ होती आणि त्या जोरावर त्यांनी जवळजवळ चाळीस-पन्नास वर्षे अफाट काम केलं. ‘सजल नयन नितधार बरसती’ किंवा ‘तू सप्तसूर माझे’सारखी शास्त्रीय बैठक असलेली अजरामर गाणी अशोकजींनी आपल्याला भेट दिलेली आहेत.

मराठी मालिकांची शीर्षकगीतं या क्षेत्रात तर अशोकजींनी सर्व उच्चांक मोडलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘अवघाची संसार’, ‘आभाळमाया’, ‘तुला पाहते रे’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘मानसी’, ‘वादळवाट’ आणि ‘पिंपळपान’ यांसारखी अत्यंत भन्नाट शीर्षकगीतं अशोकजी यांनी संगीतबद्ध केली. मुळातच जाहिरात क्षेत्राचा प्रचंड अनुभव आणि त्याचबरोबर अभिषेकीबुवांसारख्या ऋषितुल्य संगीतकाराचा सहवास असा मिलाफ असताना ही जादू न घडती तरच नवल होतं! ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’सारखं जुनं भावगीत प्रसिद्ध असताना त्याला पूर्णपणे नवीन चाल देऊन ती लोकप्रिय करणं ही अवघड कसरत पण त्यांनी केली. ‘अधुरी एक कहाणी’ ही ओळ संपताना ती dominant chord वर (प नी रे) संपवून त्यातील अधुरेपणाचा प्रत्यय त्यांनी अधिक गहिरा केला. देवकीताई, सुरेशजी, स्वप्नील बांदोडकर आणि आत्ताच्या पिढीतील आर्या आंबेकर यांसारख्या अप्रतिम गायकांकडून त्यांनी ही गाणी गाऊन घेतली; जी कायम मराठी रसिकांच्या स्मरणात राहतील.

आज पन्नास वर्ष सतत काम करूनसुद्धा अशोकजी अजिबात थकलेले नाहीत. त्याच उत्साहानं ते दररोज घरातून बाहेर पडतात, स्टुडिओत जातात, नवीन आणि जुन्या पिढीतील वेगवेगळ्या गायकांना, वादकांना व तंत्रज्ञांना एकत्र आणतात आणि कुठलीतरी रचना करत असतात. जरा दोन-तीन दिवस रेकॉर्डिग जास्त झालं की आम्ही दमतो, शिणतो. पण हा माणूस मात्र सतत काहीतरी नवीन नवीन करतच राहतो आणि अजून अनेक वर्ष करत राहील! आजही माझ्यासारख्या संगीतकाराकडून काही चांगलं काम घडलं की त्यांचा फोन येतो, त्यांची शाबासकी मिळते आणि असं वाटतं की, आपल्याला यांच्यासारखं काम करायला जमलं पाहिजे. अव्याहतपणे लोकांना दर्जेदार आणि टवटवीत स्वरानंद देण्याचं काम!

आणि लक्षात येतं की ते सोपं नाही! ते फक्त अशोकजीच करू जाणे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 12:03 am

Web Title: marathi music composer ashok patki zws 70
Next Stories
1 आषाढस्य प्रथम दिवसे
2 आलो उल्लंघुनि, दु:खाचे पर्वत!
3 सूर्यास्तानंतरची धारावी..
Just Now!
X