20 September 2020

News Flash

या मातीतील सूर : तुझ्या गाण्यात रे गोडवा…

अतिशय सुमधुर आणि सोप्या, सरळ, साध्या, परंतु थेट तोंडावर रुळणाऱ्या चाली देणारे ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी!

दशरथ पुजारी यांची इतर गाणी ऐकली आणि एक खजिना गवसल्याचा आनंद झाला.

नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

एखाद्या संगीतकाराला किंवा खरं तर कुठल्याही कलाकाराला व्यावहारिक यश मिळणं किंवा न मिळणं यामागे काही ठोस असं कारण नक्कीच नाही. अत्यंत सामान्य दर्जाच्या आणि काहीही संगीताचं संचित नसलेल्या व सरासरी संगीत देऊ शकणाऱ्या लोकांचासुद्धा उदोउदो होतो आणि दर्जेदार संगीत ऐकलेल्या, दर्जेदार चाली करणाऱ्या आणि अनेक र्वष त्या स्वरांची जादू लोकांच्या मनावर उमटवू शकणाऱ्या लोकांचं आयुष्यसुद्धा अत्यंत तीव्र उपेक्षेनं ग्रासलेलं असू शकतं. त्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक स्थैर्य लाभत नाही, त्यांना कुठलेही मानमरातब मिळत नाहीत आणि नामांकित असे पहिल्या फळीतील फारसे गायक-गायिका त्यांची गाणी गात नाहीत; पण तरीसुद्धा त्यांची गाणी वर्षांनुर्वष लोकांच्या तोंडी टिकून असतात. त्यांची गाणी प्रचंड गाजतात. परंतु ती त्यांचीच आहेत ही जाणीव सर्वसामान्यांच्या गावीसुद्धा नसते. मराठी भावसंगीत आणि चित्रसंगीतात अजोड कामगिरी करणारे, परंतु त्यामानाने उपेक्षित आणि कायम लोकांच्या नजरेआड राहणारे संगीतकार आणि संगीतकर्मी या क्षेत्रात होते आणि आहेत. या सगळ्यांमध्ये एक नाव अत्यंत ठळकपणे आपल्यासमोर येतं.. अतिशय सुमधुर आणि सोप्या, सरळ, साध्या, परंतु थेट तोंडावर रुळणाऱ्या चाली देणारे ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी!

लहानपणी जेव्हा संगीतातलं फारसं कळत नव्हतं त्यावेळची गोष्ट. कुठल्या लोकल किंवा ट्रेनमधून प्रवास करताना एखादा भिकारी गाणं गात यायचा : केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा..नंतर बऱ्याच ठिकाणी या गाण्याची चेष्टा भिकाऱ्यांचं गाणंम्हणून झालेली बघितली आणि आपण सगळ्यांनीच ती त्या- त्या वेळी हसण्यावारी नेली आणि त्यात सामीलसुद्धा झालो असू यात काही शंका नाही. मोठं झाल्यावर आणि कळू लागल्यावर मात्र या गाण्याचा गोडवा लक्षात आला. दुर्गासारखा अत्यंत साधा, ओडव जातीचा राग..  जो दुर्दैवाने सुगम संगीतात फारसा कधी वापरला गेला नाही आणि शास्त्रीय संगीतातसुद्धा हा राग फार लोक गाताना किंवा वाजवताना दिसत नाहीत. परंतु या रागात इतकी सुंदर आणि प्रासादिक चाल होऊ शकते हे दशरथ पुजारी यांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि लहानपणी अजाणतेपणी का होईना, आपण केलेल्या त्या क्रूर थट्टेची आठवण झाली आणि कासावीस व्हायला झालं. आणि मग लक्षात आलं की या गाण्याला जी लोकप्रियता लाभली आहे, तेवढी क्वचितच दुसऱ्या कुठल्या गाण्याला मिळते. भिकाऱ्यांच्या तोंडी का होईना, एखादं गाणं लोकप्रिय होणं ही सोपी गोष्ट नाही. किंबहुना ही सर्वाधिक अवघड गोष्ट आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपल्या कोषातल्या व्यक्तींकडून वाहवा मिळवतो आणि त्यात खूश असतो. परंतु  समाजातल्या अगदी खालच्या थरापर्यंत आपली कलाकृती प्रसिद्ध होणं याला एक अतिशय अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि ती गोष्ट सर्वाधिक अवघड आहे असं माझं स्पष्ट मत. गेल्या पन्नास वर्षांत इतक्या विविध स्तरांमध्ये स्वागत झालेली केशवा माधवासारखी दुसरी फार उदाहरणं चटकन् डोळ्यासमोर येत नाहीत. आणि मग दशरथ पुजारी यांची इतर गाणी ऐकली आणि एक खजिना गवसल्याचा आनंद झाला, हे मान्यच करावं लागेल.

दशरथ पुजारी यांचा जन्म बडोद्यात झाला असला तरी त्यांच्यावर संगीताचे संस्कार बार्शीमध्ये भातंब्रेकर गुरुजी यांच्याकडे झाले. फार उत्तम पद्धतीचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांना मिळालं आणि त्या शिक्षणातच त्यांच्या पुढील कारकीर्दीचा पाया आपल्याला दिसतो. पुजारी यांची गाणी ही ढोबळमानाने रागसंगीतावर आधारित नाहीत. रागातल्या ठरावीक स्वराकृती त्यांच्या गाण्यांमध्ये दिसतात, परंतु त्यात एक आगळी गंमत आहे. काही काही गाणी ही काही काही रागांवर इतक्या सवंगपणे आधारलेली असतात की ती ऐकताना आपोआपच एक कंटाळ्याचा अनुभव येतो. रागसंगीतातल्या वर्षांनुर्वष दळलेल्या त्याच त्या जागा परत या गाण्यांमध्ये ऐकवत नाहीत. सुगम संगीतात खूप संगीतकारांनी अप्रतिम पद्धतीने वापरलेला यमनकल्याण दशरथ पुजारी यांच्याही काही गाण्यांमध्ये आपल्याला दिसतो. परंतु तो इतका सुंदरपणे व्यक्त झालाय, की आपलं भान हरवतं. वसंत बापट यांनी लिहिलेलं एक सुंदर गीत अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसतेहे दशरथ पुजारी यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम गीतांपैकी एक आहे असं म्हणावं लागेल. यमन रागात बांधलेली, ऐकायला अत्यंत सोपी व अत्यंत गोड सुरावट.. आणि या गाण्याचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू म्हणजे दशरथ पुजारी यांचा स्वत:चा आवाज! गायक म्हणून दशरथ पुजारी यांनी खूप कमी गाणी गायली; परंतु त्यांची शास्त्रीय संगीताची तयारी आणि भावसंगीताचा केलेला अभ्यास स्पष्टपणे त्या गाण्यांमध्ये जाणवतो. अजून त्या झुडुपांच्या मागेहे गाणं ऐकलं की त्यांच्या आणि बाळासाहेब मंगेशकर यांच्या आवाजात एक विलक्षण साम्य आहे असं कधी कधी वाटतं. अशीच अमुचि आई असती सुंदर रूपवतीहे मधुकर जोशी यांनी लिहिलेलं गीतसुद्धा दशरथ पुजारी यांच्यातल्या गायकाची आपल्याला ओळख करून देतं. दशरथ पुजारी यांची गाणी बहुतेककरून गायिकांनी गायलेली आहेत. गायक पुजारी यांच्या गाण्यांना फारसे मिळालेच नाहीत. गजाननराव वाटवे यांनी त्यांचं एक गाणं गायलंय आणि अरुण दाते यांनी एक. परंतु ही दोन्ही गाणी फारशी उल्लेखनीय नाहीत. दशरथ पुजारी यांनी स्वत: स्वत:ची गायलेली गाणी मात्र फार श्रवणीय आहेत. वर उल्लेख केलेल्या दोन गाण्यांव्यतिरिक्त मस्त ही हवा नभीहे सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर गायलेले युगुलगीत किंवा पावनखिंडीत पावन झालोहे गाणंसुद्धा अत्यंत उल्लेखनीय आहे.

गायिकांमध्ये पुजारी यांची गाणी म्हटली की एक नाव अत्यंत प्रकर्षांने समोर येतं- सुमनताई कल्याणपूर!  मराठी रसिकांनी सुमनताईंना भरभरून धन्यवाद देणं हे मला अत्यंत आवश्यक वाटतं. दुर्दैवाची गोष्ट ही की लताजी आणि आशाजी यांनी दशरथ पुजारी यांच्याकडे एकही गाणं गायलेले नाही. दशरथ पुजारी यांच्या चाली इतक्या गोड आणि त्याचबरोबर गायला आव्हानात्मक आहेत, की लताजी किंवा आशाजी यांनी त्या गायल्या असत्या तर मराठी रसिकांना एका वेगळ्याच उंचीचा स्वरानंद मिळाला असता यात काही शंका नाही. परंतु नियतीच्या मनात हा योग जुळून यायचं नव्हतं. परंतु ही उणीव बऱ्याच अंशी भरून काढली ती सुमन कल्याणपूर यांनी. या जोडीची जवळजवळ चाळीस ते पन्नास तरी गाणी असावीत आणि सर्वच गाणी अप्रतिम आहेत. अक्रुरा नेऊ नको माधवा’, ‘अजून नाही जागी राधा’, ‘असावे घर ते अपुले छान’, ‘आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले’, ‘केशवा माधवा’, ‘झिमझिम झरती श्रावणधारा’, ‘नकळत सारे घडलेआणि ते नयन बोलले काहीतरीयांसारखी अनेक गाणी त्यात आहेत. परंतु ज्यांना दशरथ पुजारी यांचा मास्टरपीस म्हणता येईल अशी गाणी म्हणजे सुरेश भटांचे चल उठ रे मुकुंदा’, रमेश आणावकर यांचे मृदुल करांनी छेडित ताराआणि रा. ना. पवार यांनी लिहिलेले सावळ्या विठ्ठला’! पण याही पलीकडे जाऊन आणावकर यांनीच लिहिलेले वाऱ्यावरती घेत लकेरीहे यमन रागातील गाणं अफाट आहे आणि सुमनताईंनी ते अतिशय अप्रतिम पद्धतीने गायलं आहे. मराठी सुगम संगीतातील यमन रागावर आधारित पहिल्या पाच गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश व्हायला हवा असं निदान माझं तरी मत आहे.

अजून एक अद्वितीय गायिका दशरथ पुजारी यांच्या गाण्यांना लाभली : विदुषी माणिक वर्मा! माणिकबाईंच्या सोज्वळ आणि सात्विक,सुरेल गळ्याने दशरथ पुजारी यांच्या गाण्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं यात दुमत असण्याचं कारण नाही. अभंग माझा एकतारीवर’, ‘जनी नामयाची’, ‘नका विचारू देव कसा’, ‘भाग्य उजळले तुझे चरण पाहिले’, ‘रंगरेखा घेऊनी मीआणि क्षणभर उघड नयन देवाया गाण्यांत माणिकबाईंनी अक्षरश: कमाल केली आहे. परंतु या सर्व गाण्यांपेक्षा दशरथ पुजारी यांनी संगीतकार म्हणून जे सर्वात अप्रतिम गाणं आपल्यासमोर सादर केलं ते म्हणजे त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं..जोग रागात बांधलेली चाल. परंतु ज्या पद्धतीने ती चाल शुद्ध रिषभावर येते आणि त्यानंतर एक बारीक हरकत घेऊन परत षड्जावर विराजमान होते, त्याला खरोखरीच दाद द्यावी तेवढी थोडीच. दशरथ पुजारी यांच्या कारकीर्दीतील हे सर्वोत्तम गाणं आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरू नये.

दशरथ पुजारी यांनी बहुतेक गाणी ही भावगीत म्हणूनच रचली. चित्रपट संगीतात त्यांची कारकीर्द अजिबात बहरली नाही. एखाद् दोन चित्रपट त्यांनी केले असतीलही, परंतु चित्रपट संगीतात ते रमले नाहीत, किंवा ते वातावरण त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाला साजेसं नव्हतं असं म्हणावं लागेल. बोलकी बाहुलीनामक एका चित्रपटात त्यांनी आठवे अजुनी यमुनातीरहे गाणं केलं आहे. परंतु चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिगचा जो एक थाटमाट असतो तो त्यांच्या गाण्यांना शोभून दिसत नाही. बासरी, तबला, एखादे व्हायोलिन आणि एक सतार (जी त्यांच्या जवळजवळ सर्वच गाण्यांत ऐकू येते.) अशा कमीत कमी वाद्यवृंदात आणि ग्रामोफोनच्या खरखरीमध्येच त्यांचं गाणं उठून दिसतं. या सगळ्या झगमगाटरहित वातावरणातच पुजारी यांनी विविध गाण्यांना दिलेली चाल निखरून येते. बावनकशी सोन्यासारखी!

पुजारी यांची गाणी ऐकली की एक गोष्ट जाणवते की, तशा अर्थी त्या गाण्यांना व्हरायटी नाही, त्यांच्यात वैविध्य नाही. भाव/भक्तीगीत सोडून बाकी कुठल्याही गीतप्रकारात दशरथ पुजारी फार वावरले नाहीत. शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या आणि शोभाताई गुर्टू यांनी गायलेल्या काही लावण्या त्यांनी केल्या, काही स्फूर्तिगीतेही केली; परंतु भावगीत हाच त्यांचा पिंड राहिला. आजकाल आपण बघतो की प्रत्येक गायक-गायिका आणि संगीतकारसुद्धा वेगवेगळ्या संगीतप्रकारांवर आपली किती हुकूमत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि स्पर्धेत टिकण्याच्या दृष्टीने ते करावंच लागतं. परंतु दुर्दैवाने वैविध्य आणि गुणवत्ता यांची गल्लत करणारं हे युग आहे. एका विषयात शंभर टक्के  मार्क मिळवण्यापेक्षा पाच-सहा विषयांत चाळीस-पन्नास टक्के  मार्क मिळवून पास होणारे आज जास्त मोठे ठरत आहेत. परंतु अस्सल रसिकांनी या प्रकारची मूल्यांकनाची पद्धत वापरता कामा नये. चित्रपट संगीतात असते तर पुजारी यांनासुद्धा या प्रकारच्या परीक्षेला सामोरं जावं लागलं असतं. परंतु त्यांनी आयुष्यभर फक्त सुरेल आणि कसदार भावगीतांच्या चाली बांधण्याचं काम केलं आणि त्यात त्यांना भरघोस कलात्मक (लौकिक नव्हे.) यश मिळालं, हे निर्विवादपणे म्हणता येईल. मागे एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये माझं एकही गाणं बाबूजींनी गाण्याचा योग आला नाही,’ अशी खंत पुजारींनी बोलून दाखवली होती, ते मला अजूनही आठवतं. दशरथ पुजारी-सुधीर फडके किंवा दशरथ पुजारी-लता मंगेशकर हा योग जुळून आला नाही हे निश्चितच आपलं दुर्दैव आहे. पण तरीसुद्धा दशरथ पुजारी यांनी आपल्याला जी अप्रतिम गाणी भरभरून दिली त्याबद्दल सर्व मराठी रसिकांनी त्यांचे ऋण कायम स्मरणात ठेवले पाहिजेत, हेही तितकंच खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 2:16 am

Web Title: marathi music director dashrath pujari ya matitil soor dd70
Next Stories
1 हृदयस्थ मैत्री
2 चळवळींच्या अंतरंगाचे त्रिमिती दर्शन
3 जीएसटी : केंद्र-राज्य दुहीचे बीज
Just Now!
X