30 October 2020

News Flash

‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’

‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या माझ्या नाटकाला भरपूर आयुष्य लाभले आहे. आमची सुरुवातीची नाटकं स्पर्धेतली होती. तीन-तीन महिने तालमी झाल्यावर नाटकाचा प्रवास एक किंवा दोन प्रयोगांत आटपत

| April 19, 2015 12:56 pm

‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या माझ्या नाटकाला भरपूर आयुष्य लाभले आहे. आमची सुरुवातीची नाटकं स्पर्धेतली होती. तीन-तीन महिने तालमी झाल्यावर नाटकाचा प्रवास एक किंवा दोन प्रयोगांत आटपत असे. ‘आपल्या lok01बापाचं काय जातं’चे अकरा प्रयोग झाल्यावर आम्हाला जगज्जेते वगैरे असल्यासारखं वाटत होतं. थिएटर अ‍ॅकॅडमीच्या कार्यशाळेसाठी लिहिलेल्या ‘शतखंड’ची डॉ. श्रीराम लागूंनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे अनेक वाचने केली. ते दिग्दर्शित करून त्यात अभिनयही केला. त्यानं खूप समाधान मिळालं. मात्र, त्याचेही प्रयोग मर्यादित झाले. त्यामानाने ‘डॉक्टर’ने मोठा पल्ला गाठला. १९९१ च्या जूनमध्ये महेश मांजरेकरने चंद्रकांत कुलकर्णीच्या दिग्दर्शनात ‘अश्वमी थिएटर’तर्फे ते रंगभूमीवर आणलं. तेव्हा अनेक प्रयोग झाल्यानंतर साधारण दहा वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णीनीच ‘जिगिषा’तर्फे डॉ. गिरीश ओक, प्रतीक्षा लोणकर, समीर पाटील, प्रतिमा जोशी यांना घेऊन त्याचे शंभरावर प्रयोग केले. शिवाय त्यानेच सचिन खेडेकर, नीना कुळकर्णी, भैरवी रायचुरा यांना घेऊन अनुया दळवी अनुवादित ‘डॉक्टर, आप भी..’ हिंदीत केलं. शफी इनामदारांनीही मधल्या काळात भक्ती बर्वे, मनोज जोशी, शेफाली शेट्टी- शहा यांना घेऊन त्याचे गुजरातीत धडाक्यात प्रयोग केले होते. जिथे जिथे मराठी माणूस राहतो, तिथे तिथे या नाटकाचे प्रयोग वा अंश कधी ना कधीतरी सादर केले गेलेले आहेत. सध्याही आम्ही औरंगाबादच्या ‘स्वयम्’ संस्थेतर्फे या नाटकाच्या संपादित अंशाचं वाचन करीत असतो. त्यालाही चांगला प्रतिसाद आहे.
यातला वैद्यकीय व्यवसायातल्या नीतिमत्तेसंबंधीचा विषय काही नवा नाही. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी त्यांच्या ‘डॉक्टर्स डायलेमा’ या नाटकात त्याचं सुंदर चित्रण केलं आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत त्यानं पुढील अर्थाचं वाक्य लिहिलं आहे.. ‘एखाद्या पेशंटच्या बोटाची जखम बरी करून जर डॉक्टरला पन्नास रुपये मिळत असतील, आणि हात तोडून पाच हजार मिळत असतील तर डॉक्टर हातच तोडेल. जखम का बरी करील?’ निरंकुश खासगी वैद्यकीय सेवेचं समर्थन करणाऱ्यांना आजही या प्रश्नाचं उतर देता येणार नाही. युक्रांदमधला माझा मित्र डॉ. अरुण लिमयेने आणीबाणीत तुरुंगात असताना ‘क्लोरोफॉर्म’ लिहून वैद्यक क्षेत्रातील अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला. त्याचाही माझ्या मनावर गंभीर परिणाम झाला तरी मी या विषयाकडे लगेच वळलो नाही. हा इतका उघड आणि सर्वाना स्पर्श करणारा प्रश्न आहे, की आपण विचार करेपर्यंत कुणीतरी यावर लिहीलच असं वाटत राहिलं. शिवाय आपल्या फारशा अनुभवाच्या नसलेल्या गोष्टीवर लिहायला मन धजावत नसणार!
ज्या काळाविषयी मी लिहितो आहे त्या काळात औरंगाबाद कितीही झपाटय़ानं वाढत असलं तरी त्याच्या अंतर्यामी एक छोटंसं गावच होतं. बरेच लोक परस्परांना ओळखत होते. नात्यांना आणि अनुबंधांना महत्त्व होतं. बरेच महत्त्वाचे डॉक्टर सरकारी रुग्णालयात काम करीत होते. फॅमिली डॉक्टरची संकल्पना नुकतीच नष्ट होत होती आणि विशेषज्ञांचा सुकाळ सुरू होत होता. तरी अरुणनं लिहिलेल्या अनेक गोष्टी आम्हाला अज्ञातच होत्या. पण लवकरच परिस्थितीत बदल होऊ लागला. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर व्यापारीकरण जोरात सुरू झालं. वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या, शिकवणाऱ्या अनेक मित्रांनी खासगी व्यवसाय थाटले. हा- हा म्हणता त्यांची मोठी इस्पितळं उभी राहिली. ती भरभराटीलाही आली. डॉक्टर्समध्ये अंतर्गत गट निर्माण झाले. त्यांना जातीय रंगही मिळाला. पुण्या-मुंबईच्या इस्पितळांसाठी- निदान केंद्रांसाठी यंत्रसामग्री पुरवणाऱ्या वितरकांना औरंगाबादची बाजारपेठ उपलब्ध झाली. नव्या शोधांचा आणि सुविधांचा वापर पेशंटला दिपवून पैसे कमावण्यासाठी होऊ लागला. औरंगाबादचा प्रसिद्ध ‘तारा पान सेंटर’वाला आपल्यापेक्षा अधिक कमावतो याचं वैषम्य तरुण, उच्चशिक्षित डॉक्टर्सना वाटू लागलं. आणि व्यवसायाचं धंद्यात रूपांतर झालं.
याच काळात कधीतरी (नाटकातल्या) रत्ना पवारची केस ऐकली, आणि मी आतून हललो. समोरच्या बदलत्या परिस्थितीचं चित्रण करावंसं वाटायला लागलं. अनेक डॉक्टर मित्रांशी, ज्येष्ठांशी, तज्ज्ञांशी बोललो आणि मगच नाटक लिहायला घेतलं. लिहिताना तीन गोष्टी डोक्यात पक्क्या होत्या.
एक : नाटक वैद्यकीय व्यवसायाचं निदान करण्यासाठी असणार आहे.
दोन : एकाच व्यवसायातल्या पती-पत्नीमधल्या संबंधांच्या केंद्रबिंदूभोवती ते फिरणार आहे.
तीन : या प्रश्नाविषयीची माझ्या मनातली कळकळ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते व्यावसायिक रंगभूमीसाठी असणार आहे. (आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ते करणार आहे.)
या विषयावर मी लिहितो आहे म्हटल्यानंतर अनेक डॉक्टर मित्रांनी ‘कोमा’ किंवा ‘ब्रेन’सारख्या केसेस शोधून देण्याचं आश्वासन दिलं. ज्यांना रत्ना पवारसारख्या केसची माहिती होती, त्यांनी तिच्यावरच फोकस ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गॅलरीदेखील फुल्ल होण्याची खात्री दिली. पण माझा फोकस स्पष्ट होता : मला डॉक्टरांवरचं नाटक लिहायचं होतं. त्यांच्याच नीतिमत्तेविषयी प्रश्न उपस्थित करायचे होते. त्याचप्रमाणे मला अपवादात्मक किंवा शहारे आणणारी केस नको होती. कोणत्याही बिझी डॉक्टरच्या हातून अनवधानाने किंवा तणावाखाली होणाऱ्या निष्काळजीपणातून झालेली चूक हवी होती. वैदेही ही काही या नाटकातली व्हिलन नव्हे. रत्नाला मूल नसल्यामुळे ती टय़ूब पेटन्सी टेस्ट करायचे ठरवते. त्या टेस्टपूर्वी आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. टेस्टच्या वेळी रक्तस्राव होतो आणि गर्भाशय काढून टाकावं लागतं.. अशी ही केस. रत्ना गर्भाशयाच्या बदल्यात डॉक्टरीणबाईंचं गर्भाशय मागते. त्यामुळे नाटक सनसनाटी असल्यासारखं काहींना वाटलं. पण खरं तर ती मागणी आई होऊ इच्छिणाऱ्या स्त्रीच्या अपेक्षेची तार्किक परिणती होती. गर्भाशय देता-घेता येत नसल्यामुळे दुसरा एखादा अवयव दाखवावा, असेही काहींचे म्हणणे होते. पण मुळात रुग्णाच्या अवयवाच्या बदल्यात डॉक्टरच्या शरीराचा भाग देणं, हे कोणत्याही दृष्टीनं मलाच मान्य नव्हतं. गर्भाशयाच्या जागी गर्भाशय देण्याचा पायंडा पडला तर पुरुषांनी स्त्रीरोगतज्ज्ञ व्हायलाच नको! प्रश्न तांत्रिक नसून नैतिक होता.
सरकारी महाविद्यालयात सर्जन- प्राध्यापक असलेल्या अविनाशनं पत्नीच्या नर्सिग होममधील गैरप्रकाराविरुद्ध उभं राहणं, हा या नाटकातला कळीचा भाग. त्यामुळे नाटक प्रेक्षकांसमोर घडण्याला मदत झाली तरी तो निर्णय व्यावसायिक गरजेपोटी अजिबात नव्हता. व्यावसायिक भागीदार आयुष्याचे जोडीदारही असतील तर त्यांचे वैवाहिक जीवन कसं असेल, याविषयी मला कुतूहल होतं. आयुष्यातली आणि व्यवसायातली भागीदारी आपापल्या ठिकाणी अपरिवर्तनीय असल्यामुळे हे संबंध चितारणे आव्हानात्मक ठरेल असं वाटत होतं. शिवाय ‘शतखंड’पासून सावकाश भ्रष्ट होत जाणारी माणसं बघण्यात मला रस होता असं म्हटलं तरी चालेल. आता तर काळ खूप बदलला आहे. ‘आपला नवरा पैसा कुठून आणतो, हे जर पत्नी विचारत नसेल तर तिच्यात आणि वेश्येत फरक उरत नाही..’ असं पु. ल. देशपांडे म्हणाले होते. आता कुणालाही समर्थन देण्याची गरजच वाटत नाही. तरुण डॉक्टर्सशी बोलताना शिरीष पेंडसे स्पष्ट होऊ लागला. त्याची आग्र्युमेंट्स कळली. व्यवस्था चांगली असती तर यांना गैरमार्गानी जावं लागलं नसतं असं वाटलं. शिरीष पेंडसेही त्यामुळे माझ्या दृष्टीनं ग्रे झोनमध्येच आहे.
प्रत्येक नाटकाला, त्याच्या विषयाला एक स्वत:चा प्रेक्षकवर्ग असतो. तिथपर्यंत पोहोचण्याचा निर्माता-दिग्दर्शकानं आटोकाट प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. महेश मांजरेकर तरुण, उत्साही निर्माता होता. (आजही त्याचा उत्साह तसाच आहे.) त्यानं निर्मितीत कोणतीही कसर राहू दिली नाही. चंद्रकांत कुलकर्णी तर लेखनाच्या प्रक्रियेपासूनच बरोबर होता. रत्ना पवार डॉ. अविनाशला भेटून आपल्या फसवणुकीची कथा सांगते, त्यानंतर अविनाश दुसऱ्या दिवशी जाब विचारतो, असं मी लिहिणार होतो. चंद्रकांतने त्याच रात्री तो प्रसंग घडवायला सांगितले आणि रात्रीच्या पार्टीचं दृश्य आकाराला आलं. अशा काही सूचना, काही संपादन यामुळे नाटक शार्प व्हायला मदत झाली. चंदूचा नाटककारावर आणि स्वत:वर गाढ विश्वास. त्यामुळे नाटकाच्या सुरुवातीला बराच वेळ कोणतीही घटना घडत नसतानाही त्याला काहीच अडचण वाटली नाही. त्यानं आणि निर्मात्यानं नेपथ्याची जबाबदारी रघुवीर तळाशीलकरांवर टाकली. त्यांनी माझ्या कल्पनेतलं नेपथ्य साकारलं. खाली क्लिनिक, ओपीडी आणि वर घर असलेली अनेक छोटी इस्पितळं मी पाहिली होती, तसंच ते होतं. काऊंटर, ओपीडी, घर यांना बांधायला इंटरकॉम हा माझ्या रचनेतला आवश्यक भाग होता. संगीताची जबाबदारी अशोक पत्कींनी स्वीकारली आणि प्रभावी संगीत दिलं. ‘डॉक्टरांवरच नैतिकता सांभाळायची सगळी जबाबदारी का?’ असं अनेकजण विचारतात. सचिन खेडेकरच्या आवाजातील ‘आला श्वास, गेला श्वास, त्याचं न्यारं रे तंतर। अरे जगनं मरनं एका श्वासाचं अंतर’ या नाटकाचा पडदा उघडण्यापूर्वी येणाऱ्या बहिणाबाईंच्या ओळी हे त्याला उत्तर होतं. नाटकाच्या तालमी रंगायला लागल्यावर अनेक मित्र, रंगकर्मी येऊन बसायला लागले. नाटकाचा प्रभाव तेव्हापासूनच जाणवत होता.
या नाटकाला पहिल्यापासूनच ताकदीचे नट मिळाले. सुरुवातीला सुनील शेंडे अविनाश करताहेत म्हटल्यावर मी विचारात पडलो. कारण मला त्या भूमिकेसाठी ‘जावळ’ असणारा अभिनेता हवा होता. नाटकातला अविनाश हा फक्त तत्त्वनिष्ठच नाही, तर तो चांगला रसिकही आहे. कलांमध्ये त्याला रुची आहे. अर्थात शेंडेंनी मराठी-हिंदी दोन्ही प्रयोगांत चांगले काम केले. पुढे ‘जिगिषा’च्या प्रयोगात मला रसिक दिसणाराही अभिनेता मिळाला. अनेक नाटकांतून सुहासताईंचं काम पाहिलं होतं. नाटक मी सुरुवातीला त्यांनाच वाचून दाखवलं होतं. त्यांच्या होकाराचा प्रोजेक्टला आधार होता. मोहन गोखलेनी उभा केलेला डॉ. शिरीष पेंडसे पाहणं हा निखळ आनंद होता. त्याच्या जाण्याने रंगभूमीचे किती नुकसान झालंय हे सांगणं कठीण आहे. याशिवाय सुरेश पवारच्या भूमिकेत भरपूर भाव खाणारा नंदू माधव, रत्ना म्हणून आसावरी घोटीकर सगळेच चांगले होते. पुढे काही प्रयोगांत महेश मांजरेकरनीही काम केलं. एकूण मराठी-हिंदी-गुजराती प्रयोगांत संजय सुगावकर, सुनील अष्टेकर, सुजाता कानगो, विजय दिवाण आणि इतरही अनेक गुणी नटांनी कामं केली.
नाटकाचे प्रयोग सुरू झाल्याबरोबर त्यावर टीकाही सुरू झाली. परीक्षण वाचून मिरजेच्या एका डॉक्टरनं प्रयोग न पाहताच एक पत्र लिहिलं. त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णीनं त्याला उत्तर दिलं. मग वादविवादाचा एक सिलसिलाच सुरू झाला. ‘डॉक्टरांविरुद्धचे आरोप खोडसाळपणाचे आहेत, पेशंट्सना भडकवण्याचाच हा प्रकार आहे..’ इथपासून ‘गर्भाशय दिले-घेतले जाऊ शकत नाही’ या तांत्रिक ज्ञानापर्यंत सगळं काही सांगितलं गेलं. वास्तविक नाटकाच्या शेवटी ‘डॉक्टरच्या अवयवाइतकाच पेशंटचा अवयवही महत्त्वाचा आहे’ हे कळावं म्हणून डॉक्टरीणबाईंचं गर्भाशय मागितल्याचं रत्ना सांगते. पण ते कळायला मुळात नाटक बघावं लागतं ना!
नाटकाच्या दुसऱ्या अंकात एके ठिकाणी अविनाश डॉक्टर्सच्या वृत्तीबदल बोलतो. (ते सगळ्याच व्यावसायिकांविषयी खरं आहे!) तो म्हणतो की, ‘वैयक्तिक भेटीत आपण सगळं मान्य करतो, पण एक समूह म्हणून किती घाबरट होतो नाही?’ त्याची प्रचीतीच मला या टीकेतून येत होती. सुदैवानं सुरुवातीच्या या टीकेनंतर अनेक डॉक्टर्स या नाटकाच्या बाजूने उभे राहिले. डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. आनंद निकाळजे यांची ‘हॅलो’ संघटना त्यापैकीच एक. त्यांनी पुण्याला येऊन नाटक पाहून खात्री करून घेतली आणि ते औरंगाबादला बोलावून लोकांना दाखवलं. डॉ. भालचंद्र कानगोंसारखे आमचे मित्र पहिल्यापासूनच नाटकाच्या बाजूने उभे होते. नुकतेच औरंगाबादच्या आयएमएत शंभर ते सव्वाशे डॉक्टर्स वाचनाला उपस्थित होते. व्यवसायात या गोष्टी होताहेत, हे आता सर्वानीच मनोमन मान्य केलंय. आता समस्येची व्याप्ती आणि खोलीही वाढलीय. खासगी महाविद्यालयांत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जर विद्यार्थ्यांना दोन- दोन कोटी मोजावे लागत असतील तर त्यांना मूल्यं जपत प्रॅक्टिस करायला आपण कसं सांगणार? आणि ते तरी का ऐकतील? आता व्यवस्थेत मोठा बदलच आवश्यक आहे. डॉ. अनंत फडके आणि त्यांचे सहकारी मागणी करीत आहेत त्याप्रमाणे (ब्रिटनसारखी) ‘युनिव्हर्सल हेल्थ केअर सिस्टम’ हे कदाचित याचे उत्तर असू शकेल.
या नाटकाचं कौतुकही अनेकांनी केलं. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीनं ‘त्यांच्या पोटात असलेलं मी ओठांवर आणलं’ होतं. मला ज्यांच्याबद्दल आदर आहे अशा डॉ. रवी बापट, औरंगाबादच्या डॉ. आर. बी. भागवत, डॉ. सविता पानट यांना नाटक आवडलं होतं. मराठीतले मामा वरेरकर सन्मान, मुंबई मराठी गं्रथसंग्रहालयाचा अनंत काणेकर सन्मान, नाटय़दर्पणचा सवरेत्कृष्ट व्यावसायिक नाटककार असे सन्मान नाटकाला मिळाले. विषयाबरोबरच नाटकाची बांधणी, हाडामांसाच्या व्यक्तिरेखा, संवाद यांनाही ती मिळालेली दाद आहे असं मी मानतो. समांतर रंगभूमीवरच्या काही दिग्गजांनीही ‘चोख व्यावसायिक नाटक’ म्हणून नाटकाचं स्वागत केलं.
‘जिगिषा’ने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले तेव्हा मला माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा मी जे बोललो ते सांगून समारोप करतो. ‘या नाटकाला लाभलेल्या दीर्घ अशा इनिंगमुळे एक लेखक म्हणून मला समाधान आहे. पण इतक्या वर्षांनंतरही प्रश्न सुटलेला नाही; उलट तो अधिकच जटिल, गुंतागुंतीचा झालाय, म्हणून एक माणूस म्हणून मी खरोखरच
व्यथित आहे.’     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2015 12:56 pm

Web Title: marathi plays in post 1990 doctor tumhi sudha
Next Stories
1 उजळल्या दिशा
2 संपानंतरच्या गिरणगावाचा कुलूपबंद दस्तावेज!
3 ‘ते पुढे गेले’
Just Now!
X