चित्रपटसृष्टीत ‘द ग्रेटेस्ट अ‍ॅरेंजर’ म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल येत्या ३ सप्टेंबरला पंच्याहत्तरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने..
बऱ्याच वर्षांपूर्वी आनंद मोडकचं एक रेकॉर्डिग चाललं होतं. श्रेष्ठ व्हायोलिनवादक अमर हळदीपूर यांचे सोलो पीसेस होते. ‘दोघी’ या  राष्ट्रपतीपदक विजेत्या चित्रपटातलं गाणं होतं. त्यातले माहेरच्या आठवणींचे कढ अमरजींच्या व्हायोलिनमधून असे उतू गेले होते, की स्टुडिओतल्या कुणाचेच डोळे कोरडे राहू शकले नाहीत. टेक संपल्यावर सर्वजण (मुख्यत: आनंद मोडक) थोडे सावरल्यानंतर अमरजींच्या अद्भुत प्रतिभेने भारावलेले आम्ही त्याबद्दल बोलू लागलो. अमरजी म्हणाले, ‘‘व्हर्शन कॅसेट्सचं पेव फुटलं होतं तेव्हा मी एकदा अशीच पाच-सहा गाणी वाजवली आणि पुढचं गाणं कळल्यावर व्हायोलिन पॅक करून त्यांना म्हणालो, ‘ये प्यारेसाहबने बजाया है, मैं इसे हाथ लगाने की हिम्मत नहीं कर सकता.’ आणि घरी निघून गेलो..’’
ते गाणं होतं- ‘हकीकत’मधलं रफीसाहेबांनी गायलेलं ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था..’ अमरजी म्हणाले, ‘‘प्यारेसाहेबांनी त्यात श्वास कसा वापरलाय, मला अजून नाही कळलेलं..!’’
व्हायोलिनमध्ये श्वास? हे परिमाण मला नवीन होतं. पूर्वपुण्याईमुळे या प्रसंगानंतर काही महिन्यांतच मला साक्षात प्यारेलालसाहेबांच्या घरी त्यांना भेटण्याचंच भाग्य लाभलं. काही अपवाद वगळता या महान लोकांमध्ये एक समान गुण मी अनुभवला आहे. ते भरभरून बोलतात. अत्यंत प्रांजळपणे, कुठलाही आडपडदा न राखता, स्पष्ट बोलतात. प्रेमाने, आस्थेने बोलतात. प्यारेसाहेब हे त्या अपवादांपैकी नक्कीच नव्हेत. त्यांनीही त्या पहिल्याच वेळी (आणि नंतरही झालेल्या चार-पाच भेटींमध्ये) काहीही हातचं राखलं नाही.
‘‘ये प्यारे‘साहब’ क्या है? घर आये हो, मेरे बेटेसमान हो; मेरे भतिजे वगैरा सब मुझे चाचा कहते है, तुम भी चाचा कहो,’’ असं त्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकलं, आणि माझं काही अवघडलेपण शिल्लक असेल तर ते ‘और तुम्हारी चाची को (त्यांच्या पत्नी. त्या मराठी आहेत.) ‘काकू’ बुलाओ..’ या त्यांच्या पुढच्या वाक्याने इतिहासजमा झालं. आणि मग पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्याशी झालेल्या त्या अविस्मरणीय भेटींमध्ये चित्रपट, त्यातलं संगीत, पाश्र्वसंगीत, गीतकार, गायक-गायिका, वादक, रेकॉर्डिस्टस् आणि अन्य संगीतकार यांच्या आणि त्यासंदर्भातल्या स्टुडिओज, रेकॉर्डिग मशिन्स, मायक्रोफोन्स, टेक्निशियन्स अशा अनेक विषयांवर माझ्या समजुतींमध्ये मुळापासून सुधारणा झाल्या.
या अनेक विषयांमध्ये एक होता- चित्रपटसृष्टीतले वादक- प्यारेसाहेबांचे वडील रामप्रसाद. हे स्वत: उत्तम वादक आणि इंडस्ट्रीतल्या निम्म्या वादकांचे गुरू. प्यारेसाहेब एकेक नाव घेऊन त्या वादकाचं मोठेपण सांगत असताना मी अमरसाहेबांचा उल्लेख केला आणि ‘दोघी’च्या वेळचा प्रसंग सांगितला. प्रथम त्यांनी संकोचून, ‘नहीं, नहीं, बडा अच्छा, टॅलेन्टेड लडका (!) है, बहोत अच्छा बजाता है,’ वगैरे केलं. पण मी जेव्हा श्वासाचा विषय काढला तेव्हा म्हणाले, ‘हाँ, तो? साँस क्या सिर्फ गाने मेंही इस्तमाल होती है क्या? इन्स्ट्रमेन्ट प्लेइंग में भी साँस की उतनीही जरुरत होती, है जितनी सिंगिंग में.’’
आणि मग त्यांनी मला एक अत्यंत मूलभूत, पण मला तोपर्यंत माहीत नसलेलं एक सत्य सांगितलं. ‘‘अरे भई, कोई भी इन्स्ट्रमेंट हमारी बॉडी का एक्स्टेन्शन होता है, तो उसके चालचलन में साँस का काँट्रिब्युशन रहेगा ही. जिस में दमसाँस जादा होगी, उसके बजाने में उतनाही एक्स्प्रेशन आएगा..’’
..त्यानंतर मला अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. ज्या गाण्यांच्या ऑर्केस्ट्रेशनचा किंवा अंतऱ्यांपूर्वीच्या आणि गाण्याच्या मागे वाजणाऱ्या संगीताचा माझ्यावर परिणाम होत असे, तो का होत असे, ते कळू लागलं. विशेषत: ग्रूप व्हायोलिन्समधून जे एक्स्प्रेशन निर्माण होतं (खरं तर हार्मोनियम, अ‍ॅकॉर्डियन, पियानोपासून मेंडोलिन, गिटापर्यंत सर्वच स्वरवाद्यांमधून होतं ते.) त्याचं मुख्य कारण कळलं. त्यामुळेच पुढे हेही लक्षात आलं, की स्वरवाद्य म्हणजे शरीरातल्या स्वरयंत्राचे बाह्याविष्कार आहेत. आणि म्हणूनच या लोकांच्या रचनांमधली वाद्यं गायल्याप्रमाणे ऐकू येतात. विशेषत: प्यारेभाईंच्या अ‍ॅरेन्जमेंट्समध्ये तर सर्वच स्वरवाद्यं गात असतात. हे मला प्रथम जाणवलं होतं ते प्यारेभाईंकडून हे तत्त्व समजण्याच्या चौदा-पंधरा र्वष आधी.. हेमंतदांनी गायलेलं ‘सूरज रे जलते रहना’ ऐकताना. लक्ष्मीकांत- प्यारेलालच्या दुसऱ्या-तिसऱ्या चित्रपटातलं (हरिश्चंद्र तारामती) हे गाणं ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी नक्की ऐकावं. यात तीन अंतरे आहेत. त्यांच्या चाली सारख्या आहेत. पण त्यामागे वाजणाऱ्या (काऊंटर/ काँट्रा मेलडी) व्हायोलिन्सचे स्कोअर्स दरवेळी निराळे आहेत, आणि खरोखर गायल्याप्रमाणे आहेत. अर्थात, कोणत्याही महान संगीतकाराला शब्द चांगले कळतातच, तसे ते यांनाही कळले. आणि समान चालीमधले शब्द वेगवेगळे असल्यामुळे प्यारेभाईंनी काँट्रा मेलडीमधून त्या शब्दांमधले वेगवेगळे संदर्भ व्यक्त केले. जिज्ञासूंनी त्यांच्या रचना यादृष्टीने ऐकाव्यात. फार आनंद मिळेल.
‘ढोलकचा फार वापर करतात बुवा!’ हा त्यांच्यावरचा आरोप निखालस चुकीचा आहे. ढोलकशिवाय त्यांनी केलेल्या गाण्यांचं प्रमाण सत्तर-पंच्याहत्तर टक्के तरी निघेल. असे अनेक चित्रपट आहेत- ज्यात एकाही गाण्यात ढोलकचा ठेका त्यांनी वापरलेला नाही. अनेक तालवाद्यांमध्ये ढोलक एक असेल, तर  त्याला ‘ढोलकचा वापर’ म्हणता येईल का? म्हणजे ‘शागिर्द’मध्ये ‘दिल-विल प्यार-व्यार मैं क्या जानूं रे’ आणि  ‘उडके पवन के.. रुक जा ऐ हवा, थम जा ऐ बहार’ या गाण्यांमध्ये तालवाद्यांच्या संचातला एक घटक  म्हणून ढोलक आहेच; पण दोन्ही ठेक्यांचे पॅटर्नस् ‘ढोलक’चे नाहीत. आणि त्यातल्याच ‘कान्हा कान्हा आन पडी  मैं तेरे द्वार’मध्ये पखावज-तबला यांच्यासोबत ढोलक आहे, पण ठेका भजनाचा आहे. त्यातली बाकी गाणी पाश्चात्त्य ठेक्यांची आहेत. ‘प्यासी शाम’मध्येही हीच गंमत आहे. मुळात  माझ्या असं लक्षात आलं आहे की, हा आरोप करणाऱ्यांना ‘तुम गगन के चंद्रमा हो’, ‘जीवनडोर तुम्ही संग बांधी’ (दोन्ही ‘सती-सावित्री’), ‘बहुत  दिन बीते’ (संत ज्ञानेश्वर), ‘खुबसूरत हसिना’, ‘मेरे महबूब कयामत होगी’ (दोन्ही ‘मि. एक्स इन बॉम्बे’),  ‘सुन ले प्यार की दुश्मन दुनिया’, ‘दिल हमने दे दिया’, ‘किसने पुकारा मुझे मैं आ गयी’ (तिन्ही  ‘प्यार किये जा’), ‘बा-होश-ओ हवास मैं दीवाना’, ‘नजर न लग जाये’ (दोन्ही ‘नाइट इन लंडन’), ‘ना जा कही अब न जा’, ‘छलकायें जाम’ (दोन्ही ‘मेरे हमदम, मेरे दोस्त’), ‘क्या तेरी जुल्फे  है अदा’, ‘अजनबी तुम जाने-पहचाने से लगते हो’  (दोन्ही ‘हम सब उस्ताद है’), ‘आयी  बहारों की शाम’ (‘वापस’),  ‘रुक जाना नहीं तू कहीं हार के’, ‘रोज शाम आती थी’, ‘बुझा दे.. जल गयी अरे मैं जल गयी’ (तिन्ही ‘इम्तिहान’),  ‘जानी ओ जानी’ (राजा जानी),  ‘गाडी  बुला रही है’ (दोस्त), ‘मैं आया हूँ  लेके  साज  हाथों में’ (‘अमीर गरीब’) ही आणि अशी अन्यही अगणित  गाणी- त्यामध्ये ढोलक नसल्यामुळे लक्ष्मी-प्यारेंची नाहीतच असं वाटत असतं! पण निसर्गप्रेरणेने सौंदर्याकडे धाव घेणाऱ्या आपल्या आनंदासक्तीचे पाय खरे रसिक असल्या पूर्वग्रहांनी जखडून टाकत नसतात.
लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलाल शर्मा या संगीतकार जोडीमध्ये गाण्यांच्या चाली कोणी कोणत्या केल्या, आणि अ‍ॅरेंजमेंट्स कोणत्या कोणी, याबद्दल मात्र लक्ष्मीजींनीही त्यांच्या  हयातीत कधी चकार शब्द काढला नाही, आणि प्यारेसाहेबही तो मुद्दा नेहमीच टाळत आले आहेत. तरीही चित्रपटसृष्टीमध्ये प्यारेसाहेबांची ओळख ‘द  ग्रेटेस्ट अ‍ॅरेंजर’ अशी आहे. पंचमसाहेब एकदा मला म्हणाले होते, ‘प्यारे जैसा अ‍ॅरेंजर दुसरा नहीं हो सकता.. ही इज द नंबर वन!’ अशा माणसाबद्दल किती आणि काय काय सांगणार? त्यांच्या हयातीत आपण जन्मलो आणि त्यांच्या महानतेची प्रचीती येण्याइतपत सौंदर्यदृष्टी आपल्याला मिळाली आहे, याबद्दल परमेश्वराचे आभार मानायचे आणि त्यांच्या निर्मितीचा आणखी अधाशीपणे आनंद घ्यायचा..
..आणि स्वत: प्यारेभाईंना काय म्हणणार?
‘आपल्या अनंत संवेदनशील (आणि संवेदनप्रवणही), बुद्धिमान अन् म्हणूनच प्रयोगशील रचनांद्वारे आमची आयुष्यं समृद्ध, संपन्न केलीत.. तुम्हाला मनोमन प्रणाम!’

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”