कुमार गंधर्व यांच्या गायकीचे पाईक आणि त्यांचे विचार पुढे नेणारे प्रामाणिक आणि संवेदनशील कलाकार पं. विजय सरदेशमुख यांचे अलीकडेच निधन झाले. तबलावादक आणि संगीत अभ्यासक धनंजय खरवंडीकर यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी..

पं. कुमार गंधर्वाच्या गायकीचे पाईक असलेल्या पं. विजय सरदेशमुख यांचे अलीकडेच निधन झाले. या निधन वार्तेने एक सुन्नपणा आला. दोन तानपुऱ्यांमध्ये तल्लीन झालेले पं. विजय सरदेशमुख आता दिसणार नाहीत. विश्वासच बसत नाही अजून. विजयबरोबर व्यतीत केलेल्या नादमय क्षणांचा पट डोळ्यांसमोर उभा राहिला.

विजय आणि माझ्यात ज्ञान, वय, ज्येष्ठता, सांगीतिक संवेदनशीलता अशा अनेक गोष्टींत जरी खूप अंतर होते, तरीही आमच्यात मत्रीचे आणि स्नेहाचे अरे-तुरेचे नाते कधी निर्माण झाले हे समजलेच नाही. हा खरं पाहता माझा अधिकार नाही, तरीही मला ते जवळकीचं नातं विसरता येत नाही.

मे २००६ ची संध्याकाळ. मी, माझी पत्नी कविता आणि बाबा (अनिल अवचट) आम्ही, विजयच्या घरी अनौपचारिकरित्या मफल जमवली होती. विजयला काहीतरी ऐकवण्याचा आग्रह केला. साथीला इलेक्ट्रॉनिक तानपुरा आणि विजय पेटीचा सूर धरून बसलेला. प्रथम त्याने पेटीच्या सुराप्रमाणे तानपुऱ्याचा अचूक बिंदू मिळवला. तो मिळवल्यावरच समजलं की, हा तानपुरा जुळवायलासुद्धा विजय एवढा वेळ का घेतो ते. त्याच क्षणी तोंडातून उत्स्फूर्त ‘वा!’ निघून गेलं. आजच्या जमान्यात विसंगत वाटणारी, पण अत्यंत आवश्यक अशी तबीयतदारी विजयकडून शिकायलाच हवी, असं त्याक्षणी वाटून गेलं.

तानपुरा हा ताणलेल्या कॅनव्हाससारखा हवा, ही नुसती थिअरी न राहता ती प्रत्यक्षात आणणारे विजयसारखे कलाकार आज कमीच. इथेच आम्हाला कुमारांचे विचार आतपर्यंत झिरपल्याचा पहिला साक्षात्कार झाला.

एकदा तानपुरे जुळल्यावर विजय कुणीतरी वेगळाच भासू लागे, हे आम्ही अनेकदा अनुभवले आहे. तो सुरांच्यात आणि सूर त्याच्यात इतके एकजीव होत की आपणही नकळत त्यात ओढले जाऊ लागतो असे प्रत्येकाला वाटे. त्या दिवशी त्याच्याकडून ‘श्री’ राग ऐकायला मिळाला. तबल्याच्या साथीसाठी न बसता नुसता श्रोता म्हणून त्याचा आनंद घेण्याचा अनुभव काही वेगळाच होता. केवळ मानवी गळ्यातूनच निघू शकणारे श्रुतीयुक्त स्वरलगाव अगदी आत जाऊन भिडत होते.

वेगवेगळ्या बंदिशींमधून रागाचे वेगवेगळे पलू दाखवताना त्याने कुमारांचे त्यामागचे विचारही सांगितले. आवाजातील चढ-उतारांच्या साहाय्याने स्वरांच्या, विशेषत: वरच्या स्वरांच्या विविध छटा त्याने प्रभावीपणे दाखवल्या. मला पुन्हा एकदा जाणवून गेलं की, कुमारांचे विचार पचवलेला आणि ते पुढे नेणारा एक प्रामाणिक आणि संवेदनशील कलाकार म्हणजे विजय. मला कित्येकदा वाटतं की, आज कुमारांच्या गायकीचे व्यावसायिक अनुकरण करणाऱ्या अनेक कलाकारांनी विजयकडे चार गोष्टी शिकायला हव्या होत्या. तसाही विजयचा स्वभाव अत्यंत संकोची. त्याच्या स्वभावात इतकी ऋजुता होती की, त्याने या तथाकथित अनुकरणप्रियांना काही ठणकावून सांगावे हे अवघडच. परंतु ज्या प्रकारे या गायकीला वाकवणं आणि त्यात भेसळ करणं चालू आहे, विजय तिला योग्य मार्गावर आणू शकला असता असा माझा विश्वास आहे.

एक साथीदार म्हणून विजयबरोबर अनेक मफिलींमधून त्याच्या गाण्याचा साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली. आजही ज्यांच्याबरोबर साथ करताना खरा कस लागावा, अशा मोजक्या कलाकारांमध्ये मी विजयचे नाव घेईन. अनेकांच्या मते, नुसता ठेका तर धरायचा असतो, परंतु आघातयुक्त, लयदार, आसदार ठेका धरण्यासाठी किती कस लागतो हे तबला वादकालाच माहीत. असा ठेका मिळाला की विजयचं गाणं किती बहरायचं हे मी अनुभवलं आहे. मफलीत गाताना त्याचे डोळे मिटलेलेच असत, म्हणजे लौकिकार्थाने श्रोत्यांशी आणि साथीदारांशी डोळ्यांनी संवाद नसे, पण त्याचे सूर आणि त्यांना असणारी लय, त्याच्या बंदिशी, अगदी त्याच्या गाण्यातील मोकळ्या जागा ( spaces) या गोष्टी सर्वाशी वरच्या पातळीवरून संवाद साधत असत. आणि सर्व गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे जुळलेल्या असल्या की, त्याच्याही नकळत कधीतरी फुललेलं हसू मला दाद देऊन जाई. त्याच्या गाण्याबरोबर ठेक्याच्या लयीचा तोल सांभाळणं खूपच मुश्कील असे. लयीत पडलेला सूक्ष्म फरकही त्याच्या लगेचच लक्षात येई. तालाची अक्षरे त्याला सुस्पष्टच लागत. तसाच दोन बोलांमध्येही कमीत कमी भरणा अपेक्षित असे. आधीच्या अक्षराची आस घेऊन गायला त्याला आवडे. बंदिशीच्या मुखडय़ाची आमद तबलजीकडूनही सांभाळली जावी अशी त्याची रास्त अपेक्षा असे.

कुमारांच्या मफिलींमध्ये द्रुत ठेका सुरू झाला की संपूर्ण मफल डोलायला लागायची, ठेक्याचा आनंद घ्यायला लागायची असं विजयने बऱ्याचदा संगितलं आहे. हे श्रेय जसं कुमारांचं, तसंच ते पं. वसंतराव आचरेकरांच्या आसदार आणि घुमावदार ठेक्यालाही द्यायलाच हवं. हे सर्व चित्र विजयच्या मनात पक्कं असणारच, त्यामुळे असा नुसता वजनदार ठेका धरला की विजय रंगून जाई, हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. पण असा लयदार आणि आसदार ठेका धरण्यासाठी तबलजीला त्या गायकीची पक्की ओळख हवीच. आज ती करून देणाऱ्या विजयसारख्या गायकाचा दुवा निखळला आहे, असे म्हणावे लागते. विजयने आपल्या गायकीतून नुसती कुमारांची नक्कल केली असं मात्र अजिबात नाही. तो सांगत असे त्याप्रमाणे कुमारजी आक्रमक होते आणि आक्रमकता तर विजयच्या स्वभावात नावालाही नव्हती. त्यामुळे पट्टीही कुमारजींपेक्षा खालची. गायकीतही एक सलगपणा. शब्दांच्या उच्चारणातही फरक जाणवे. म्हणजेच त्याने कुमार गायकी डोळसपणे अंगीकारल्याचे ठळकपणे दिसे.

कुमारांचं त्यानं महत्त्वाचं काय घेतलं असेल, तर ते म्हणजे सुरांवरचं प्रेम. तंबोऱ्यात मिसळणारा एकेक सूर ऐकून कित्येकदा गदगदून येई आणि आमचे डोळे नकळतच दाद देऊन जात. एकाच सुराचे विविध रागांमधले निरनिराळे लागणारे दर्जे, ही घराण्याच्या परंपरेमधून आलेली गोष्ट तो ताकदीने दाखवू शकत असे. बंदिशींचे शब्द सुरांच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात कुमारजी माहीर होते. विजयही अशा प्रकारे रागाचा भावार्थ उत्कटतेने श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शके. त्या दिवशी कुमारजींच्या ‘मधसूरजा’ या धुनउगम रागातल्या बंदिशींतून हे प्रत्ययाला येत होतं. बळी जायला निघालेल्या बकऱ्याचा विलाप ‘बचा ले मेरी माँ’ या शब्दांमधून जसा दिसत होता तसाच, खरं तर त्याहूनही अधिक तो त्यासाठी योजलेल्या स्वरांमधून जाणवत होता. अशी संवेदनशीलता, प्रेम ही विजयला कुमारजींकडून मिळालेली देणगी होती आणि म्हणूनच बंदिशींच्या शब्दातून आणि सुरांमधून प्रकट होणाऱ्या भावार्थाला तो योग्य न्याय देऊ शकत असे. निर्गुणी भजनही गाताना केवळ कुमारांचं अनुकरण न दिसता त्यांचा त्यामागचा विचार समजल्याचा आत्मविश्वास प्रकर्षांने दिसे. माझ्या मते, विजयने आपला भिडस्तपणा सोडून हा आत्मविश्वास श्रोत्यांपर्यंत संवादातून पोहोचवायला हवा होता. कुमारजींच्या गाण्यामागची वैचारिक बैठक त्याने लोकांसमोर मांडायला हवी होती. व्यावसायिक यशासाठी होत असणाऱ्या अनुकरण लाटेला थोपवण्यासाठी व अस्सल कुमार गायकी पुढे नेण्यास विजय सक्षम होता, यात शंका नाही.

कुमारजींनीही आपल्या गायकीची परंपरा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी काही मोजक्या कलाकारांबरोबर विजयवरही टाकली असती. परंपरेमध्ये एका प्रतिभावंताच्या प्रज्ञेची भर पडून पुढे आलेली ही अस्सल गायकी मूळ स्वरूपात विजयकडून ऐकून आम्ही चक्रव्यूहात ओढले गेलोच होतो, अजूनही त्यातच आहोत. अनेक रसिकांनाही त्यात ओढले जाण्याची शक्ती विजयला मिळाली होती अशी माझी भावना आहे. पं. विजय सरदेशमुख यांच्या सांगीतिक विचारांचे नेहमीच स्मरण होत राहील.

dkharwandikar@gmail.com.