हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com

फ़िराक़ गोरखपुरी या विख्यात कवीचा एक शेर सुप्रसिद्ध आहे. त्यात तो म्हणतो-

सर-ज़मीन-ए-हिंद पर अ़क्वाम-ए-आलम के ‘फ़िराक़’,

क़ाफ़िले बसते गए हिन्दोस्ताँ बनता गया

या हिंदुस्तानात जगभरातल्या मानवी समूहांचे जत्थे आले, येत राहिले आणि हा हिंदुस्तान घडत गेला. भारताच्या सामाजिक इतिहासातील एका अतिशय महत्त्वाच्या घटकावर भाष्य करताना कवीने भारताच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे मुख्य कारण अगदी सहज, मनोहारी भाषेत सांगून टाकले; आणि आपल्या ‘विविधतेतील एकता’ या मूल्याचे सार सांगून टाकले आहे. हा शेर जाणत्या काव्यरसिकांना ज्ञात असला, प्रिय असला तरी त्यात दडलेली गुंतागुंत आणि आजच्या समाजातल्या धारणा मात्र काहीशा विसंगत असल्याचं दिसून येतं.

हिमालयाच्या उत्तुंग भिंतींनी आणि निळ्याशार समुद्रांनी तीन बाजूंनी वेढला गेलेला देश, असं भारताचं किंवा उपखंडाचं वर्णन वेगवेगळ्या काव्यांतून, श्लोक किंवा गीतांतून आपण वाचलेलं, ऐकलेलं असतं. या देशाचं, इथल्या संस्कृतीचं वेगळेपण टिकून राहिलं आहे, राहत आहे ते या चहुबाजूंनी भारताला वेढणाऱ्या भौगोलिक संरचनांमुळेच अशी धारणा अनेक कवींनी, लेखकांनी इथल्या जनमानसात रुजवली आहे. या वेगळेपणाच्या वर्णनासोबत आणखी एक धारणा या भौगोलिक संरचनांशी जोडलेली आहे. ती म्हणजे वर्षांनुवर्षे, शतकानुशतके या बलाढय़ भिंतींनी आणि गंभीर, रौद्र समुद्राने इथल्या रहिवाशांचे आणि इथल्या धर्म, संस्कृतीचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण केले आहे. या साऱ्या धारणा एका महत्त्वाच्या अध्याहृत गृहीतकावर बेतलेल्या आहेत, ते म्हणजे हा देश, इथली संस्कृती किंवा इथल्या वेगवेगळ्या परंपरा नेहमीच एकसंध, एकजीव व परप्रभावापासून मुक्त अशा राहिल्या आहेत. या अशा साऱ्या जनमानसातल्या भावना नेहमीच स्पष्टपणे अभिव्यक्त होत नसल्या तरीही त्या जनमानसात खोलवर रुजल्या असल्याचे वारंवार दिसून येते. मात्र आपल्या धारणांपेक्षा पुष्कळ वेगळे असलेले ऐतिहासिक वास्तव मात्र समाजात रुजलेल्या सरधोपट धारणांना छेद देणारे असते. वस्तुत: स्थलांतर हा मानवी इतिहासातील सार्वत्रिक-सार्वकालिक म्हणावे अशा तत्त्वांपैकी सर्वाधिक महत्त्वाचे तत्त्व आहे. आणि ते अतिशय वास्तववादी व व्यवहारी तत्त्व आहे. स्थलांतरित  झाला नाही असा कुठलाही मानवी समूह आज शोधून सापडणार नाही. दुर्दैवाने एकीकडे आज जग व्यवहारी व उपयुक्ततावादी होत असताना स्थलांतराचं ऐतिहासिक वास्तव मात्र क्षुद्र राजकारण आणि खोटय़ा अस्मितांमुळे नाकारायची रीत रूढ झाल्याचं दिसतं. तसे पाहता, जगात आजमितीला कुठलाही समाज किंवा मानवी समूह ‘शुद्ध’ वंशत्वाची बढाई मारू शकणार नाही इतपत संशोधन आज वेगवेगळ्या आंतरविद्याशाखीय ज्ञानक्षेत्रांतून पुढे येते आहे. मात्र राष्ट्र, भाषा, जात/जमात, श्रद्धा इत्यादी अस्मिता, त्यांचे राजकारण आणि बाजारपेठेवर-अर्थकारणावर प्रभाव टाकणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक गुंतागुंती इत्यादींमुळे समाजातील स्थलांतराच्या, समाजात मिसळून जाण्याच्या किंवा जुळवून घेण्याच्या प्रक्रिया विस्मृतीत टाकल्या जातात. मानववंशशास्त्रामध्ये स्थलांतर अभ्यासक्षेत्र तसे फारसे नवीन नाही. डग्लस मेस्से या विख्यात समाजशास्त्रज्ञाने प्रतिपादित केल्यानुसार, ‘‘समाजशास्त्राचा अभ्यास करताना केवळ एकसारख्या किंवा एकाच प्रकारच्या उदाहरणांना ठेवून स्थलांतराचा अभ्यास होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या ज्ञानशाखांतून, वेगवेगळ्या प्रदेशांतील घडामोडींमधून विचारसरणींमधून समोर आलेले मुद्दे व दृष्टिकोन यांचा सद्धांतिक परामर्श स्थलांतराच्या  इतिहास-समाजशास्त्राचा विचार करताना घ्यावा लागतो. त्यामुळे अनेकदा असा अभ्यास काहीसा संकुचित, अपुरा, संज्ञा आणि संकल्पनांच्या गुंतागुंती आणि गैरसमजांनी भारलेला वाटतो.’’ या संदर्भात भारतीय इतिहास/ समाजाभ्यास क्षेत्राकडे पाहिल्यास स्थलांतर या मुद्दय़ाची व्याप्ती दुर्दैवाने अकादमिक चिकित्सा/ जिज्ञासेपर्यंत न राहता समूहांचे अन् विचारसरणींचे राजकारण या एका मुद्दय़ाभोवती हा विषय फिरत राहिला असल्याचे दिसून येते.

भारतीय समाजाच्या इतिहासाविषयीच्या आकलनाची सर्वसाधारण चौकट ही वेदपूर्वकालीन सिंधू संस्कृती मग वेदकाळ सुरू होण्याआधीचे ‘आर्य’ आक्रमण/स्थलांतर (भारताबाहेरून किंवा भारतातून बाहेर झालेलं स्थलांतर या दोन्ही विचारसरणी), ग्रीक-कुशाण-हूण-शक-पहलव इत्यादींचा उपखंडात/ भारतात प्रवेश, इस्लामचा उपखंडात प्रवेश, वायव्येकडची मध्य आशियायी इस्लामधर्मीय शासकांची आक्रमणे, शिवकाल-पेशवाई, इंग्रजांची भारतावर सत्ता, स्वातंत्र्यलढा या तपशिलात अडकलेली दिसून येते. या साऱ्या घटना-घडामोडी वसाहतकाळाच्या आणि मग इंग्रजी शासकांनी आणि शिक्षणपद्धतीची पकड भारतीय समाजावर पक्की बसल्यावर अकादमिक रीतीने इथल्या समाजात रुजल्या हे आपण याआधीच्या लेखांत पाहिलं आहे. दुर्दैवाने ही शिक्षणपद्धती आपल्या समाजात रुजण्याच्या काळात युरोपीय भारतविद्याभ्यासक मंडळींनी जी ढोबळ गृहीतके बाळगली तीच गृहितके आज भारतविद्या किंवा भारतीय इतिहासाभ्यासाचे क्षेत्र अतिशय व्यापक होऊन, पुढे जाऊनही अभ्यासकांच्या आणि जनतेच्या मनात ठाण मांडून बसल्याचे दिसून येते.

ऋग्वेदकालीन आर्य भारताबाहेरून आले की इथलेच किंवा सिंधू संस्कृती ही वेदांशी संबंधित होती/ नव्हती. किंवा भारतीय समाज शांतताप्रिय असून आपण कधीही परराज्यावर आक्रमण/ घुसखोरी/ हिंसा केली नाही, या वादावर माध्यममर्यादेमुळे वेळ न दवडता आपण ठळक उदाहरणे आणि मुद्दे यानिमित्ताने चच्रेला घेऊ. ऋग्वेदाच्या भौगोलिक व्याप्तीविषयी बोलायचं झालं तर ऋग्वेदाच्या शेवटच्या मंडलात गंगेच्या खोऱ्यातील काही संदर्भ दिसून येत असल्याचा दावा काही अभ्यासक करतात. मात्र ऋग्वेदातील बहुतांश भौगोलिक संदर्भ आजच्या अफगाणिस्तानचा ईशान्य भाग, पाकिस्तानची वायव्य सीमा, भारत-पाकिस्तानचा पंजाब, हरियाणा या प्रदेशांतील दिसून येतात. वैदिक आर्याना (‘आर्य’ हा शब्द वंशवाचक नसून ते गुणवाचक संबोधन आहे) प्रिय असलेला सोमरस आणि त्यासाठी आवश्यक असलेली सोमवल्ली अफगाणिस्तान-पाकिस्तानचा सीमावर्ती भाग तुर्कमेनिस्तान वगैरे प्रांतात अजूनही वापरात असल्याचं दिसून येतं. व्हिक्टर सारियानिदी वगैरे अभ्यासकांनी तुर्कमेनिस्तानच्या प्रदेशात घोडय़ाचा बळी दिला जाणाऱ्या अग्निपूजेसाठी आवश्यक असलेल्या ‘यज्ञचिती’ किंवा कुंडे आणि संबंधित अवशेष शोधून काढलेले दिसतात. ही अग्निकुंडे झरतुष्ट्रीय परंपरेतील असल्याचे अभ्यासकांचे मत असले तरीही वादासाठी तथाकथित ‘आर्य’मंडळी भारतातून बाहेर गेली असा सिद्धांत आपण क्षणभर प्रमाण मानू. तसे मानल्यास तरीही कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे/ उद्देशामुळे इथल्या धार्मिक-कर्मकांडप्रिय समूहाने देश सोडून बाहेर धर्मप्रसार केला असा निष्कर्ष काढणे सयुक्तिक ठरायला हवे. काश्मिरातील कर्कोटक राजवंशातील पराक्रमी राजा ललितादित्य याची तुलना नेहमी विश्वविजेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सिकंदर किंवा चंगीझखानाच्या साम्राज्याशी केली जाते. हिंदू/ देशी पराक्रमाचे प्रतीक मानल्या जाऊ लागलेल्या या राजाने जवळजवळ सबंध मध्य आशियाचा प्रदेश जिंकला असल्याचं सांगितलं जातं. किंवा राजराज चोळ या दक्षिणेतील बलाढय़, महावीर सम्राटाने आग्नेय आशियात आपल्या वसाहती बनवल्याच्या नोंदी आपल्याला इतिहासात मिळतात. तुर्कमेनिस्तानात अश्वमेध यज्ञाचे मिळालेले अवशेष वैदिक राजांच्या पराक्रमाचे प्रतीक मानले, ललितादित्याने मध्य आशियायी प्रदेशात पराक्रम गाजवून सत्ता स्थापन केली असे मानले, राजराज चोळाच्या वसाहती स्थापनेविषयी अभिमान बाळगला तर आपल्या समाजात असलेल्या आपल्या शांतीप्रियतेच्या धारणा खोटय़ा ठरतात असे म्हणावे लागेल. राजकीय हेतूंनी केलेलं हे स्थलांतर-देशांतर सत्ताकांक्षा हा हेतू मनात ठेवून झाले नाही असे समजणे तर्कसंगत होणार नाही.

हिंदू धर्मातील वैष्णव संप्रदायातील यादवांच्या कुलनाशाची गोष्ट आणि त्यांच्यातील यादवीची कथा आपण सारे जाणतो. श्रीकृष्णपुत्र सांबाने आपल्या पोटाला मुसळ बांधून स्त्रीवेशात कुणा ऋषींची थट्टा करायच्या हेतूने ‘या गर्भातून मुलगा जन्म घेईल की मुलगी?’ असे विचारल्यावर ऋषींनी पोटाला बांधलेले हे मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल असा शाप सांबाला दिला. या शापावर तोडगा काढून कुलविनाश वाचावा यासाठी प्रायश्चित्त देण्यास देशातील कुणीही पुरोहित तयार न झाल्याने बलरामाने आर्यावर्ताबाहेरील प्रांतातून अग्निपूजक पुरोहित आणून प्रायश्चित्त विधी पार पाडल्याची आख्यायिका पारंपरिक जनश्रुतीत रूढ आहे. आजच्या नागर ब्राह्मण-भूमिहार ब्राह्मण वगैरे ब्राह्मणी जाती या अग्निपूजक पुरोहितांशी जैवनाते असल्याच्या आख्यायिका सांगतात. कुशाण, ग्रीक राजांनी माहेश्वर-वैष्णव वगैरे परंपरा स्वीकारून इथल्या परंपरा आणि समाजप्रणालीत ते बेमालूम मिसळून गेल्याचे पुरावे देणारे ऐतिहासिक पुरातत्त्वीय पुरावे विदिशा (मध्य प्रदेश), मथुरा वगैरे भागात दिसून येतात. थोर संस्कृत व्याकरणकार पाणिनी हा पणी या वेदांमध्ये उल्लेख असलेल्या परकीय व्यापारी समूहाच्या वंशजांपैकी असल्याचा दावा काही अभ्यासक करतात. हे पणी फिनिशियन (सीरियाचा किनारी प्रदेश व पॅलेस्टाईन) प्रदेशातील रहिवासी असल्याचे दिसून येते. सम्राट अशोकाने बौद्धधर्म प्रसारासाठी आपले दोन शिष्य श्रीलंकेत पाठवल्याचे आपण सारे जाणतोच. हे आणि असे अनेक भारतीय राजवंश/ शासक/ व्यापारी / धर्म प्रसारक वेगवेगळ्या कारणांनी भारताबाहेर स्थलांतरकरते झाले. ‘लोकप्रभा’ या लोकसत्ता समूहाच्या साप्ताहिकात या स्थलांतराचा आणि देशांताराचा ऐतिहासिक मागोवा घेणारे सदर  निखिल बेल्लारीकर हे अभ्यासक घेत आहेत. त्यातून भारतीय उपखंडतील लोकांच्या देशांताराचे-स्थलांतराचे विपुल तपशील वाचकांना मिळतील. या तपशिलांचा अर्थ आणि त्यामागील स्थलांतराचे तत्त्वज्ञान समजून घेणेदेखील आज तितकेच गरजेचे झाले आहे.

ऋषी-मुनी-परिव्राजक-भिक्खू-श्रमण- संन्यासी हा भारतीय तत्त्वज्ञान परंपरेचा महत्त्वाचा प्रसारक वर्ग. ऋग्वेदीय धर्मश्रद्धांपासून आकाशात घिरटय़ा घालणारा, जगाला संजीवनी देणारा सूर्य हा ब्रह्मचारी, मुनी, धर्मकर्तव्यांची जाणीव करून देणारी संजीवक देवता म्हणून सूर्याची प्रतिमा वेदांनी उभी केली आहे. सूर्याचे, नद्यांचे, वाऱ्यांचे वाहणे हा विश्वचक्रातील अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग. विश्वचक्रातील या नियमांना ऋत असे म्हटले आहे. वैदिक-हिंदू जैन बौद्ध या तिन्ही देशी परंपरांचा प्रसार-प्रचार करणारे प्रचारक मुनी-परिव्रजक सतत भ्रमणशील असतात. त्यांचे भ्रमण हे जगरहाटी समजून घेत आत्मविकास साधत मोक्ष/ निर्वाण/ अर्हन अवस्था साधणे व समाजाला त्या दृष्टीने जागृत करणे या एकमात्र हेतूने प्रेरित झालेले असते. पारलौकिक गोष्टींप्रमाणेच ऐहिक जगरहाटीमधील राज्य चालवणे, अन्नधान्यापासून ते कपडे-सुगंधी द्रव्ये-ऐषोआरामासाठीच्या गोष्टी इत्यादी द्रव्यांचा व्यापार हा स्थलांतराशिवाय शक्य होत नसतो. हे स्थलांतर अल्पकालीन वास्तव्यासाठी असते किंवा चिरकाल/ कायमस्वरूपी वास्तव्यासाठी केले जाते. बहुतांश भाग पर्वताळ भाग असलेल्या मध्य आशियातील अवशिष्ट मदानी प्रदेशातील नद्यांचे प्रवाह सुकल्यावर अन्न-पाण्यासाठी सप्तसिंधूंच्या प्रदेशात यायची ओढ प्राचीन काळापासून ते अहमदशाह अब्दालीपर्यंत दिसून येते. या स्थलांतरासाठी किंवा संबंधित प्रदेशातील साधनसंपत्तीवर स्वामित्व प्राप्त करण्यासाठी युद्धे, लूटमार, राज्ये बळकावणे वगैरे प्रकार ओघाने घडतात. या साऱ्या आक्रमणांसाठी वापरल्या जाणाऱ्या सन्यबळाला, स्वराज्यातील जनतेला देशांतराचे उद्योग पटवून देण्यासाठी आणि नव्याने जिंकलेल्या प्रदेशात आपले राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्व गाजवण्यासाठी धर्म-सांस्कृतिक प्रतीकांचा आक्रमक वापर करायची मध्ययुगीन रीत या स्थलांतरांतून प्रकर्षांने दिसून येते.

आजच्या उत्तराधुनिकतेला ओलांडून पुढे आलेल्या, भौतिक प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्या समाजांत पाश्चात्त्य देशात स्थलांतर करण्याची ओढदेखील लक्षणीय आहे. पाश्चात्त्य देशात जाऊन तिथे आपल्या संस्कृती-धर्म-चालीरीती यांचे आचरण करून, आपल्या समूहाचा एक राजकीय प्रभावगट बनवून संबंधित देशांतील राजप्रमुखांना आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलावणे, आपल्या गटाची मते त्यांना मिळावी यासाठी सांस्कृतिक सॉफ्टपॉवर वापरत आपल्या समूहाचे हितसंबंध सुफलित करणे किंवा आपल्या मायदेशाशी असलेले राजकीय संबंध प्रभावित करणे हे प्रकार आधुनिक काळात दिसून येतात. अनेकदा देश सोडून गेलेल्या, परकीय नागरिकत्व पत्करलेल्या समूहांत मायदेशाचे प्रेम, देशभक्तीपर गीतांचे गायन, धार्मिक संस्कारांचे वर्ग इत्यादी गोष्टी सुरू झालेल्या दिसतात. राष्ट्रराज्य संकल्पनेच्या उदयानंतर आधुनिक काळात राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अस्मिता अधिक ठळक झाल्याने परदेशात स्थायिक होताना आपली सांस्कृतिक मूळे न सोडणे सहज शक्य झाले आहे. मानवी समाजातील विरोधाभास आणि द्वंद्वे ही वेगवेगळ्या काळात अभिव्यक्त होत राहतात. मात्र शहाणीव जागवू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाने स्थलांतर या तत्त्वाचे ऐतिहासिक महत्त्व, औचित्य आणि त्यातून आकाराला येणाऱ्या वेगवेगळ्या मानवी अभिव्यक्ती यांच्याविषयी जागरूक, सजग राहून अधिकाधिक समावेशक मोकळेपण बाणवणे औचित्यपूर्ण ठरेल. स्थलांतर आणि स्थित्यंतर यांचे संतुलन साधण्याचा हा एकमात्र पर्याय आपल्या साऱ्यांच्या जाणिवेत-नेणिवेत रुजणे आजच्या अतिशय संवेदनशील झालेल्या जगात गरजेचे आहे.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)