या पुस्तकात एकंदर २३ कथा आहेत. या कथा काल्पनिक नसून वास्तववादी आहेत. शोषित-वंचितांच्या आयुष्याची चित्तरकथा या कथांमधून मांडलेली आहे. समाजाने परिघाबाहेर टाकलेल्या, बेदखल केलेल्यांच्या या कथा आहेत. त्यामुळे या कथांमधील जग हे तुमच्या-आमच्या जगापेक्षा वेगळं, निराळं आहे. या कथांतील माणसं वंचित, शापित, उपेक्षित, कलंकित आणि दुर्लक्षित जीवन जगतात. पण या त्यांच्या जगण्याला प्रत्येक वेळी तेच जबाबदार नसून समाजही तितकाच जबाबदार आहे. अनौरस, अनाथ मुलं ही कसलाही दोष नसताना केवळ समाज परंपरेचा भाग म्हणून व्यवस्थेचे बळी ठरतात. तशाच वेश्या, अनाथ, बलात्कारित स्त्रिया. त्यांच्या व्यथा-वेदना या कथांमधून डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मुखर केल्या आहेत. त्यांनी या वेगळ्या जगात राहणाऱ्या लोकांसमवेत खूप वर्षे काम केले, ते स्वत:ही त्याच पद्धतीने वाढले. त्यामुळे त्यांना या जगाची इत्थंभूत माहिती आहे. त्याआधारे लिहिलेले हे जिवंत अनुभव आपल्या संवेदनशील मनावर ओरखडे ओढतात.
‘दु:खहरण’ – सुनीलकुमार लवटे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – १२५, मूल्य- १३० रुपये.

अनुभवांची मुशाफिरी
तानापिहिनिपाजा हे इंद्रधनुष्यातल्या सात रंगांचं संक्षिप्त रूप आहे. माणसाच्या आयुष्यातही अशा रंगांचं मिश्रण सापडतं. म्हणून द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या आयुष्यातल्या आठवणींना या रंगांची उपमा दिली आहे. या पुस्तकाचे एकंदर चार भाग आहेत. शाळा-कॉलेज-धमाल-प्रेम, खाद्य-मद्य-मदिराक्षी, खेळ-माणसं-दादा-प्रवास-भाषा आणि धर्म-देव-समाजकारण-राजकारण. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात वाढलेल्या पिढीचे काही प्रातिनिधिक अनुभव संझगिरींच्या या लेखनात सापडतात. पुस्तकाच्या विभागांवरून लेखकाच्या अनुभवविश्वाचा अंदाज येतो आणि स्वभाववैशिष्टय़ांचाही. हे काही आत्मकथन नाही, तर आत्मकथनपर काही आठवणींचा हा कोलाज आहे. चित्रपट-क्रिकेट-खाणं-प्रवास या भोवती फिरणारे हे लेख स्मरणरंजनपर आणि खुसखशीत आहेत. आणि त्यामुळे वाचनीयही.
‘तानापिहिनिपाजा’ – द्वारकानाथ संझगिरी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, पृष्ठे – २१६, मूल्य – २०० रुपये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीतेचे अग्निदिव्य
 या पुस्तकाचे उपशीर्षक आहे- संपूर्ण रामायण व राम-महाकाव्यांत सीताचारित्र्य व अग्निदिव्य. रामायणात लोकभयास्तव राम सीतेला अग्निदिव्य करायला लावतो, हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय..  त्याचं लेखकाने मूळ श्लोकांच्या भाषांतरासह सटिक विवेचन केलं आहे. सीतेच्या अपहरणापासून ते शेवटच्या धरणीमातेच्या पोटात जाण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात लेखकाने अभ्यासूपणे मांडला आहे.
‘अग्निदिव्य’ – डॉ. प्रकाश पांडे, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर,  पृष्ठे -४८७, मूल्य – ४०० रुपये.