News Flash

सांगतो ऐका : संगीतकार सत्यजित रे

पाश्चात्य संगीत, साहित्य, कला यांवर रोखठोक मल्लिनाथी करत सांस्कृतिक विश्वाचे अनोखे पदर खुमासदार शैलीत उलगडणारे सदर..

(संग्रहित छायाचित्र)

मनोहर पारनेकर

samdhun12@gmail.com

पाश्चात्य संगीत, साहित्य, कला यांवर रोखठोक मल्लिनाथी करत सांस्कृतिक विश्वाचे अनोखे पदर खुमासदार शैलीत उलगडणारे सदर..

सेग्रेई आयझेन्स्टाइन, इंगमार बर्गमन, चार्ल्स चॅप्लिन, फेडरिको फेलिनी आणि अकिरा कुरोसावा या जागतिक सिनेमाच्या असामान्य दिग्दर्शकांच्या नामावळीत सत्यजीत रे (१९२१-१९९२) यांचं नाव सहजपणे सामावलं जातं. सर्वसाधारणपणे आजवरचे सर्वश्रेष्ठ भारतीय दिग्दर्शक म्हणूनदेखील त्यांना मानलं जातं. बंगाली Renaissance चे अखेरचे शिलेदार असं त्यांना म्हणता येईल. आजकालचा जमाना विशेषज्ञांचा आहे. पण या एका दृष्टीने दुर्बल विशेषज्ञांच्या काळातले रे हे एक श्रेष्ठ अष्टपलू प्रतिभावान होते. जागतिक दर्जाच्या चित्रपटकर्त्यांच्या यादीत कदाचित ते एकमेव संपूर्ण चित्रपटकत्रे असतील. त्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या कथा, पटकथा लिहिल्या. त्यांना संगीत दिलं. क्वचित प्रसंगी कॅमेरा हाताळला. चित्रपटाचं कलादिग्दर्शन केलं. सिनेमाची गीतं लिहिली. ते उत्तम इलस्ट्रेटर होते, ग्राफिक आर्टिस्ट होते. शिवाय, ते उत्कृष्ट जाहिराततज्ज्ञ आणि प्रकाशकदेखील होते. हे इतकं कमी होतं म्हणून की काय त्यांनी सिनेमाचे सेट, वेशभूषा, श्रेय नामावली आणि जाहिरात यांचं डिझाइनदेखील केलं. हा नव वास्तववादी (neorealist auteur) चित्रपटकर्ता आपलं लखलखीत अष्टपलुत्व अतिशय सफाईने आपल्या कलेत आणतो. सेटवर किंवा सेटच्या बाहेर सिनेमाचं संपूर्ण वनमॅन युनिट होण्याची क्षमता त्यांच्याकडे होती.

एक चित्रपटकत्रे म्हणून सत्यजित रे यांच्याबद्दल व्यापक प्रमाणात अगदी कौतुकानं लिहिलं गेलंय. पण एक संगीत रचनाकार म्हणून त्यांना जशी मान्यता मिळायला हवी तितक्या प्रमाणात ती त्यांना मिळाली नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. उत्पलेंदू चक्रवर्ती, कॅथरीन कॅलिनॅक आणि रे यांचे दोन महत्त्वाचे चरित्रकार अनुक्रमे मेरी सेटॉन आणि अ‍ॅन्ड्र्यू रॉबर्टसन यांचा सन्माननीय अपवाद वगळता, सिनेमाक्षेत्रातल्या विद्वानांनीदेखील त्यांच्या अष्टपलू व्यक्तिमत्त्वातल्या या तेजस्वी पलूला पुरेसा न्याय दिलेला नाही. हा लेख म्हणजे त्या दिशेने टाकलेलं एक छोटंसं पाऊल आहे. पण त्याआधी, ज्या एका लहानशा घटनेनं मी हा लेख लिहायला उद्युक्त झालो त्याबद्दल थोडंसं..

बी.ए.आर.सी. मध्ये वैज्ञानिक असलेल्या एका व्यक्तीशी माझी गेल्या वर्षी एका संध्याकाळी आमच्या एका सामाइक मित्राच्या घरी गाठ पडली. हा प्राणी सत्यजित रे यांच्याविषयीचा चालताबोलता ज्ञानकोश आहे, असं मानलं जातं. आणि या वैज्ञानिकाकडे रे यांच्याविषयीच्या फुटकळ माहितीचा आणि किश्श्यांचा खजिनाच होता. उदाहरणार्थ, रे यांनी ‘रे रोमन’ याव्यतिरिक्त रे बिझार, डफिन्स आणि हॉलिडे हे टाइपफेस (अक्षराकार) विकसित केले आहेत हे त्यांनी सांगितलं. शिवाय जितान्स हा फ्रेंच सिगारेटचा ब्रँड रे यांचा आवडता होता हेही सांगितलं. या गृहस्थांना कीबोर्ड वाजवून गाणंही म्हणता येतं. त्यांनी आम्हाला ‘आमी चिनी गो चिनी तोमारे ओगो बिदेशिनी’ हे रे त्यांच्या ‘चारुलता’ या सिनेमातील गाणं कीबोर्डच्या साथीने उत्तम गाऊन दाखवलं. मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही आम्हाला या गाण्यातले पियानोचे जे गोड हळुवार तुकडे आत्ता वाजवून दाखवले, त्याचं ऑर्केस्ट्रेशन आणि संचालन स्वत: रे यांनी केलं आहे. इतकंच नव्हे, तर हे पियानोचे तुकडेसुद्धा त्यांनी स्वत: वाजवले आहेत.’’ मी त्यांना हेही सांगितलं, ‘‘चारुलतामधील चारूचं जे ‘थीम म्युझिक’ आहे ते वेस अँडरसन यांनी त्यांच्या ‘द दार्जिलिंग लिमिटेड’ या २००७ सालच्या चित्रपटात वापरलं आहे.’’ हे ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. कारण त्यांना याबद्दल काहीच कल्पना नसावी. ज्याला रे यांचा चालताबोलता ज्ञानकोश मानला जातो त्यालाच रे यांच्या सांगीतिक क्षमतेबद्दल ही किमान माहिती नसावी, ही विसंगती इतकी जाणवली, की तिथल्या तिथे मी लेख लिहिण्याचं ठरवून टाकलं.

रे यांचं कलात्मक व्यक्तिमत्त्व दोन संस्कृतींनी बनलेलं होतं, याचं मूळ प्रामुख्यानं त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत आहे. रे यांची कलात्मक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता ही अर्धी भारतीय आणि अर्धी पाश्चात्त्य होती. (संगीताच्या संदर्भात ती जास्त प्रमाणात पाश्चात्त्य संवेदनशीलतेकडे झुकते, असा आरोप कधीकधी त्यांच्यावर केला जातो). त्यांचे चरित्रकार अ‍ॅन्ड्रयू रॉबर्टसन यांच्याकडे रे यांनी ‘‘मी ५०% भारतीय आहे आणि ५०% पाश्चिमात्य आहे,’’ अशी कबुली दिली होती. रे यांच्या कलेतील या मोहक द्वैताचा शोध त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये घेता येतो.

रे यांचा जन्म एका ब्राह्मोसमाजी कुटुंबात झाला. या कुटुंबाला विस्तृत सांस्कृतिक वारसा होता. (ब्राह्मोसमाजी कुटुंब वेदपठण संपल्यानंतर डेव्हिड यांच्या साम्स (स्तोत्रांचं) गायन करतात, हे सांगताना माझा एक बंगाली मित्र कधीच कंटाळत नाही). त्यांच्या कुटुंबाला विज्ञान, साहित्य आणि संगीतात सखोल रस होता. ‘संदेश’ या लहान मुलांच्या प्रतिष्ठित आणि अतिशय लोकप्रिय मासिकाची स्थापना त्यांचे प्रतिभा संपन्न आजोबा उपेंद्रकिशोर यांनी केली होती. रे यांचे वडील सुकुमार आणि ते स्वत: असे दोघेही त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत त्या मासिकाचं संपादन करत होते. रवींद्रनाथ टागोर यांचे त्यांच्या कुटुंबांशी मत्रीचे संबंध होते. टागोर अनेक वेळा रे कुटुंबीयांच्या घरी जात असत. उपेंद्रकिशोर यांना त्यांनी व्हायोलीन वाजवण्यासाठी प्रेरित केलं होतं. ते अतिशय छान व्हायोलीन वाजवायचे. १९२३ साली सुकुमार जेव्हा जवळजवळ मृत्यूशय्येवर होते तेव्हा स्वत:ची ९ उत्फुल्ल, आनंदी गाणी टागोर यांनी स्वत:च्या आवाजात त्यांच्यासाठी गायली होती.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, रवींद्रसंगीत आणि बंगाली लोकगीतांचे रे स्वत: खूप शौकीन होते. या तिघांचाही त्यांनी आपल्या चित्रपटात सढळ हस्ते वापर केला आहे. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचे ते फार मोठे ज्ञानी होते आणि त्यावर त्यांचं उत्कट प्रेम होतं, याची अनेकांना कल्पना नसेल. म्हणून लेखाच्या यापुढच्या भागात, तुलनेनं कमी माहीत असलेल्या रे यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाबद्दल मी जरा विस्तृत लिहिणार आहे.

कुठल्याच प्रकारच्या संगीताचं औपचारिक शिक्षण रे यांनी घेतलं नव्हतं. पण कुठलीही धून ते सहजगत्या गुणगुणू शकायचे किंवा शिट्टीवर वाजवू शकायचे. पियानो ते व्यावसायिक सहजतेनं उत्तमरीत्या वाजवत असत. स्वत:च्या सांगीतिक रचना वाद्यवृंदातील वादकांना ते पियानोवर वाजवून दाखवत असत. रे यांना बॅरीटोन (मध्यखर्ज सप्तकातील आवाज) आवाजाची देणगी होती. मोझार्ट यांच्या सेराग्लिओ या ऑपेरातील ऑसमिन या पात्राच्या तोंडची गाणी (Aria) ते त्यांच्या मित्रांना म्हणून दाखवत असत. मोझार्ट यांचाच दुसरा एक ऑपेरा ‘द मॅजिक फ्लूट’मधील पापाजेनो या पात्राची गाणी किंवा जगप्रसिद्ध इटालियन रचनाकार वेर्दी यांच्या ‘Requiem’ मधील लॅक्रिमोसा हा भाग मित्रांना गुणगुणून दाखवत असत. रे यांच्या ‘शाखा-प्रशाखा’ या सिनेमात प्रशांत नावाचं एक पात्र आहे. हे पात्र बीथोव्हनच्या संगीतानं झपाटलेलं असतं. ही भूमिका सौमित्र चॅटर्जी यांनी केली आहे. या सिनेमात बीथोव्हन यांच्या व्हायोलीन कन्चेर्तोच्या पहिल्या मूव्हमेंटमधील एक तुकडा प्रशांत म्हणताना दाखवलं आहे. हा तुकडा रे यांनी गायला आहे. आणि आपली बंगाली संस्कृतीची मुळं किती घट्ट आहेत हे दाखवण्यासाठीच म्हणून की काय त्यांनी ‘आगंतुक’ या त्यांच्या शेवटच्या सिनेमात कृष्णाची विविध नावं असलेलं एक कीर्तनसुद्धा गायलं आहे.

पाश्चात्त्य अभिजात संगीताची त्यांना उत्कट आवड होती आणि त्याबद्दलच त्यांचं ज्ञानही प्रचंड होतं. रे जेव्हा ९-१० वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या मामाच्या घरी बीथोव्हन यांचा व्हायोलीन कंचर्तो ऐकला. तेव्हापासून पाश्चात्त्य संगीताचं जे वेड त्यांना लागलं ते आयुष्याच्या अखेपर्यंत कायम होतं. या संगीतानं ते इतके झपाटले गेले की, नंतरच्या आयुष्यात त्यांनी पाश्चात्त्य संगीताबद्दल जे जे काही हाती मिळेलं, ते ते वाचलं आणि ऐकलं. हे वेड केवळ बीथोव्हनच्याच रचना ऐकणं किंवा केवळ त्याच्याबद्दलच वाचणं इतकंच मर्यादित राहिलं नाही. दोन वर्ष ते शांतीनिकेतनमध्ये राहिले. तिथे त्यांना इंग्रजी शिकवायला एक जर्मन ज्युईश प्रोफेसर होते. त्या प्रोफेसरांचा स्वत:चा संपन्न असा खासगी संग्रह होता. तो त्यांनी रे यांना खुला करून दिला. ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी होती. तिचा पुरेपूर वापर करत त्या काळात त्यांनी पाश्चात्त्य संगीताची भरपूर श्रावणभक्ती केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रे आणि त्यांची पत्नी बिजोया बर्लिन रेडियो लावून हेडन आणि बाख यांच्या रचना अनेकदा ऐकत असत. बी.बी.सी. (लंडन) यांनी मोझार्टच्या डॉन जिओवानी या ऑपेरावर माहितीपट तयार करण्यासाठी रे यांना ऑफर दिली होती, परंतु काही कारणपरत्वे त्यांनी ती नाकारली. पण पाश्चात्त्य संगीतावरील त्यांच्या ज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता होती याची ही गोष्ट निदर्शक आहे. बीथोव्हन हा त्यांचा सर्वात आवडता रचनाकार होता. त्याचा एक अर्धपुतळा त्यांच्या पियानोवर नेहमी विराजमान झालेला दिसे. त्याखालोखाल मोझार्ट हा त्यांचा आवडता रचनाकार होता. फिल्म संगीताच्या बाबतीत रशियन रचनाकार सेग्रेई प्रोकोफिव्ह यांना ते आपला गुरू मानत. (प्रोकोफिव्ह यांनी आयझेन्स्टाइन यांच्या ‘अलेक्झांडर नेव्स्की’ आणि ‘इव्हान द टेरिबल’ या दोन चित्रपटांना संगीत दिलं होतं.)

(क्रमश:)

शब्दांकन : आनंद थत्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:10 am

Web Title: music composer satyajit ray lokrang sangto aika article abn 97
Next Stories
1 या मातीतील सूर : इये मराठीचिये नगरी
2 खेळ मांडला.. : कसोटी क्रिकेटची कसोटी!
3 स्वत:ची ओळख होण्याचे वर्ष
Just Now!
X