दीनानाथ दलालांचं ‘फॉरेस्ट’ नावाचं जलरंगामधलं एक चित्र मी पाहतो आहे. दोन मोठ्ठाले झाडांचे तपकिरी-लाल बुंधे. त्या वृक्षांच्या वरचा शाखा-पानांचा पसारा चित्रात मावत नाही इतके अवाढव्य बुंधे आणि त्या दोन वृक्षांमधून डोकावणारं, आत आत पसरलेलं पिवळं-मातकट अरण्य. ते अरण्य रॉकचंच असणार. हिरव्या रंगाचा स्पर्शही नसलेलं ते धूळभरलं, जमिनीत पक्कं रुतलेलं रॉकचं अरण्य. एकदा का आपण त्या अरण्यात पाऊल टाकलं, की त्यामधले अनेक फाटे आपल्याला दिसू लागतात. पहिला आद्य फाटा रॉकच्या जन्मापासूनचा. बीटल्स, जीमी हेंड्रिक्स यांनी रॉकची वैशिष्टय़ं त्या काळात पक्की करून टाकली. व्यासपीठावर असणार एक गायक. तो गोड प्रेमगीत गाणार नाही. कधी कधी तर तो किंचाळणार. कुत्र्यासारखं भुंकत गाणार. (खरोखरीच त्या गायन शैलीला ‘बार्किंग’ स्टाइल म्हटलं जातं.) त्याच्या शेजारी उभा असणार तो रिदम गिटारवादक. तालाचं आवर्तन तो चोख सांभाळणार. तिकडे उभा असणार लीड गिटारवादक. सुरांचा प्रवाह तो ठरवणार. मागे ड्रम्स आणि सिंबलच्या पसाऱ्यात टोपी घालून बसणार तो दणकट बाहूंचा ड्रमर. आणि या साऱ्या वाद्यांमधून जी तडतड लाही फुटेल, तिला वजन प्राप्त करून देणार तो बेस गिटावादक! खर्जामधली त्याची गिटार साऱ्या स्वरचित्राला ठाशीव करीत जाणार. रॉक कंपूंची ही मूळ चौकट साठीच्या दशकात पक्की झाली. अजूनही रॉकच्या मैफलीत प्रधान असतात ते हेच लोक. अ‍ॅकॉर्डियन किंवा ट्रम्पेट वाजवणारा कलाकार रॉकमध्ये आज दिसू शकतो; पण तरी तो तसा उपराच! सिंथेसायझरनं पॉप गाण्याचा जसा नाद घडवला तसा रॉकचा अद्यापी घडवलेला नाही. रॉक हे खरंतर मैफिलीचं, प्रत्यक्ष वादनाचं-गायनाचं गाणं आहे. त्याचं स्टुडिओमध्ये कितीही चांगलं मिक्सिंग केलं तरी ‘लाइव्ह’ मैफिलीची सर त्याला येत नाही. हे थेट आपल्या शास्त्रीय संगीतासारखं. सावनी शेंडेचं ‘मनाओ रूत हेमंत’ हे सी.डी.वर कितीही छान वाटलं तरी मैफिलीत प्रत्यक्ष ऐकताना ते कित्येक पटीनं अधिक भावतं. कधी कधी दोन विरुद्धधर्मी संगीतप्रकार एखाद्या गोष्टीपुरते किती एकसारखे असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. शास्त्रीय संगीतासारखीच ‘उपज’ अंगाची मांडणी पुष्कळदा रॉकच्या गिटारीमध्ये आढळते. बघता बघता तो गिटारवादक अनपेक्षित स्वरांचा, नादांचा भरणा मैफिलीमध्ये करतो, गायकही क्षणभर चकतो. मग ते गाणं नव्या सुरांपर्यंत विस्तारतो. पण हे साम्य इथेच संपतं. रॉकचे चाहते बोंबलत असतात! हाच शब्द त्या चाहत्यांना साजेसा आहे. तेही बेभान होत नाचतात. त्याहून जास्त म्हणजे जोरात किंचाळत गायकामागोमाग गातात. त्यातले पुष्कळसे गाणं ऐकत असतात आणि नसतात. कधी अमली पदार्थाचं सेवन प्रेक्षकांमध्ये सुरू असतं; कधी झिंगल्यानंतरचे प्रमाद. एका समाजशास्त्रीय सर्वेक्षणानुसार, केवळ ४५ टक्के माणसं रॉकच्या मैफलीमध्ये निखळ गाणं ऐकायला म्हणून जातात. पुष्कळदा बाकीची मंडळी ड्रग्ज आणि प्रणय उपभोगण्याकरता तिथे जातात. पण आपण जेव्हा रॉक ऐकतो तेव्हा हे सारं विसरून ऐकू शकतो. रॉकमध्ये ‘ऐकण्यासारखं’ असं काही आहे. पॉप गाण्याइतकं ते तकलादू, वरवरचं संगीत नाही. रॉकमध्ये मुख्य ऐकायची असते ती गिटार! गिटार हा त्या मैफिलीचा खरा ‘गायक’ असतो. इलेक्ट्रिक गिटार ही साध्या गिटारपेक्षा पुष्कळ वेगळी वाजते. अनेक तऱ्हांनी इलेक्ट्रिक गिटार ही विद्युतस्फुरणं निर्माण करणारी आहे. तिचा आवाज साध्या गिटारपेक्षा कर्कश असतो खरा; आणि सुरुवाती सुरुवातीला तो कानांना बोचूही शकतो. पण मग हळूहळू त्याची सवय होते. सवयीचं आवडीत रूपांतर होतं. (आणि आवडीचं व्यसनात रूपांतर होण्याचा धोका रॉकच्या अरण्यात सदाच असतो.)
गिटारसोबत ऐकू येतो तो ड्रम्सचा कडकडाट. तबल्याहून तो कडक आहे आणि पुष्कळदा रॉकमध्ये तर तो अतीजलद गतीनं वाजल्यानं अजूनच कडक वाटू शकतो. (प्रत्यक्षामध्ये असा ताल निर्मिण्यासाठी लवचीक बोटांची आवश्यकता असते.) मग- मागाहून ऐकायचं असतं खुद्द गाणं. त्याचे शब्द हे सहसा अपशब्दच असतात आणि जगाशी भांडण करतानाचा त्या शब्दांना वास असतो. ती गायनशैली कधी विव्हळल्यासारखी असते, कधी आक्रमक. पण बव्हंशी रॉक गायक दणकटपणे गातात. शिव्या उच्चारताना त्या गळय़ांना विशेषसं स्फुरणं येतं. आणि मग हे सारं एकेकटं अनुभवून एकवटायचं असतं मनात. वरती खर्जामधली गिटार त्यावर लपेटायची असते आणि मग रॉक गाणं ऐकल्याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. (आवड-निवड- नावड त्याच्यापुढची!)
खेरीज रॉकची वळणं, फाटे ठाऊक असतील तर त्या आस्वादाला ती सहाय्यक ठरते. पहिला फाटा साठीच्या दशकातल्या अस्वस्थेचा. मग अवतरलं ‘आर्ट रॉक’ किंवा ‘प्रोग्रेसिव्ह रॉक’. पिंक फ्लॉइडची गाणी आपल्या इथे पुष्कळजण ऐकतात. प्रोग्रेसिव्ह रॉकचा तो एक प्रणेताच! नावाला जगणारं ते ‘प्रोग्रेसिव्ह रॉक’ नवे प्रयोग करणारं होतं. त्याच्या कविता या कधी फँटसीला जवळ जाणाऱ्या असत, तर कधी पुरेशा अ‍ॅबस्ट्रॅक्ट! त्याच सुमारास बहुधा ‘हार्ड रॉक’ आणि ‘सॉफ्ट रॉक’ अशी स्थूल विभागणी झालेली असणार. मेलडीवर भर असणार सॉफ्ट रॉकमध्ये आणि आक्रस्ताळ्या ठेक्याचं हार्ड रॉक! मग कधी रॉकचा एखादा फाटा जॅझच्या दिशेनं गेला, कधी फोक्च्या आणि ‘फोक-रॉक’, ‘जॅझ-रॉक’ असे प्रकार तयार झाले.
तिसरा महत्त्वाचा टप्पा आला सत्तरीत ‘मेटल’ रॉकचा! मेटल हे वेगळंच रसायन आहे आणि दोन आठवडय़ांनी आपण भेटू तेव्हा पुऱ्या तयारीत राहा- मी हिंसेचं थैमान मांडणारं ‘मेटल’ तुमच्या भेटीला आणणार आहे. ‘पंक-रॉक’ हे खास ब्रिटिश अपत्य त्याच सुमाराचं. ‘सेक्स पिस्तोल’, ‘क्लॅश’ यांसारख्या नावांमधूनही त्या कंपूचं गाणं किती अलंकरणविरहित असेल हे ध्यानी येतं. रॉकचा पाचवा फाटा होता ‘स्टेडिअम् रॉक’चा. मोठाली मैदानं भरून रसिक गोळा होत होते आणि गन्स अँड रोजेझ्सारखे उग्र रॉक बँड्स मैफल डोक्यावर घ्यायचे. रॉकचा अजून एक फाटा १९९०च्या आसपास फुटला- खरं म्हणजे नावारूपाला आला, तो ‘अल्टरनेटिव्ह रॉक’चा! हे रॉक DIY- Do it Yourself तत्त्वावर घरोघरी गॅरेजेसमध्ये तयार झालं होतं. या कंपूंचा भांडवलशाही रेकॉर्ड कंपन्यांशी छत्तीसचा आकडा होता. स्वत: अल्बम निर्मून, लोकांपर्यंत पोचवून, गाजवूनही दाखवले या मंडळींनी. ‘निर्वाना’ या बँडचा ‘नेव्हर माइंड’ हा अल्बम असाच गाजला. पारंपरिक विपणनला त्या कंपूनं विरोध दाखवला आणि तरी त्यांची कला गाजली. पबमध्ये फुलणारं ‘इंडी रॉक’ तयार झालं आणि त्या अरण्यात अजून एक फाटा निघालेला दिसला.
मी मघाशी सांगितलं का, त्या दलालांच्या आशयघन चित्रामध्ये अरण्याच्या द्वारापाशी एक खोपटं किंवा देऊळही आहे. आणि निळय़ा रंगामधली काही माणसंही तिथे आहेत. रॉकच्या अरण्याचा विस्तार बघून आपणही असेच द्वाराशी स्तिमित होऊन उभे आहोत. मध्येच ‘गन्स अ‍ॅन्ड रोजेझ्‘चे सूर येताहेत.
kImmigrants and fagots; They make no sense to me…
Like start some Mini- Iran or spread some fucking disease.k
‘निर्वासित अन् समलिंगी यांचं आपल्याला काही कळत नाही..
वसतात इथे मिनी-इराण; पसरवतात साले भलते रोग; नाही?’
सम्यक विचाराचा अभाव असलेलं हे गाणं अमेरिकेची उदार प्रतिमा आपसूक तोडतं. निदान पुष्कळ अमेरिकनांना काय वाटतं, हे उघडपणे सांगत आहे आणि अरण्याच्या दाराशी थांबलेलं आपलं निळं मन एकाच वेळी धास्तावत आहे आणि कुतूहलानं भारून जातं आहे!