राष्ट्रीय स्तरावरच्या वजनदार नेत्याच्या लेकीच्या घरी पाहुणचार झोडण्याचा योग आला. सुरुवातीला चहा आला. लेकीच्या पतिदेवांनी दर्पोक्ती केली, ‘इतमिनानसे पिओ. इस में एक भी चीज देसी नहीं है.’
मी गोंधळलो. त्यांनी खुलासा केला, ‘टी सेट, चहापत्ती, साखर, दूध सर्व इंपोर्टेड आहे.’
‘आणि पाणी?’
‘सॉरी! पाणी इथलंच आहे. पण मिनरल वॉटर आहे.’
रात्रीच्या भोजनात दही आलं. वाटीत नाही; दह्य़ाचा अख्खा प्लॅस्टिकचा जार आला. अर्थातच इंपोर्टेड! नेताकन्या म्हणाली, ‘आमचं नियमितपणे फॉरीनला जाणं होतच असतं. रोजच्या वापरातल्या वस्तू सोबतच घेऊन येतो.’
मी दह्याच्या जारवरचं लेबल वाचलं. इनग्रेडिअंट्स या सदराखाली दहा जिन्नस छापले होते. मॉडिफाइड कॉर्न स्टार्च, जिलेटिन, सायट्रिक अ‍ॅसिड, ट्रायकॅल्शिअम फॉस्फेट, अ‍ॅस्परटेम, पोटॅशिअम सॉब्रेट, एसल्फेम पोटॅशिअम, रेड ४०, व्हिटॅमिन ए अ‍ॅसिटेट, फिनाइलॅलेन.
आमच्या घरगुती दह्यामध्ये फक्त दोन इनग्रेडिअंट्स असतात- दूध आणि विरजण. बस्स! इथं प्रथमच ह्या इतक्या अगम्य रासायनिक घटकद्रव्यांनी अलंकृत केलेलं श्रीमंत योगर्ट चाखलं. त्यानंतर कधीतरी एकदा गप्पांच्या ओघात मी ही गोष्ट सांगितली. माझी नवविवाहित पुतणी फिसकारली, ‘सो व्हॉट! आम्हीसुद्धा मॉलमधून विकतचंच योगर्ट आणतो.’
ताज्या िलबू सरबताचा घोट घेत तिच्या काकीनं फटकारलं, ‘का? तुला घरी लावता येत नाही विरजण? नॅचरल जिन्नस तब्येतीला चांगले.’
‘ई! मी नाही काकूबाईसारखे असले किचकट उद्योग करत. घरी दही लावल्यावर कधी आंबटढाण होऊन जातं तर कधी ते सेटच होत नाही. त्यापेक्षा विकतचं रेडिमेड योगर्ट उत्तम. मुख्य म्हणजे कितीही दिवस राहिलं तरी खराब होत नाही.’
मी म्हटलं, ‘खराब होत नाही. कारण त्यात ढीगभर प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् घातलेले असतात. प्रवासात वगरे ठीक आहे. पण घरी का?’
‘त्यात प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् असले म्हणून काय झालं? ते डेंजरस असते तर सरकारनं त्यांच्यावर बंदी घातली नसती का? मी तर हल्ली आलं-लसूण पेस्ट, किसलेलं खोबरं, चिरलेला कांदा, टोमॅटो पेस्ट वगरेंची रेडिमेड पाकिटंच आणते. खूप टिकतात. फॉरीनसारखी रेडिमेड चपात्यांची पाकिटं मिळत नाहीत अजून, पण येतील लवकरच. इट्स ओन्ली अ मॅटर ऑफ टाइम!’
पुतणीनाथ घटाघटा कोक ढोसत बरळला, ‘कन्विनियन्स फूड्सचा जमाना आहे हा. इन्स्टंट सूप्समध्येही चिक्कार व्हरायटी आल्या आहेत. पालक पनीर, चना मसाला, आलू मटार वगरे कितीतरी तयार पदार्थही मिळतात. आमच्या फ्रीझमध्ये ही पाकिटं पडलेली असतात. मायक्रोवेव्हमध्ये गरम केली की झालं.’
‘अरे पण, आता तुझ्या हातातला कोकच घे. त्यात काय काय असतं ते माहीत आहे का तुला?’ असं म्हणून मी लगेच मला आलेली एक ई-मेल वाचून दाखवली. त्यात कोकमधल्या रसायनांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची यादी होती. कोकभक्त खदाखदा हसला. त्यानं त्या अपेयाचे मला माहीत नसलेले आणखी चार अपाय सांगितले आणि नवीन बाटली तोंडाला लावली. मी हतबुद्ध होऊन माझी ऑरेंज ज्यूसची बाटली उघडली.
वरिष्ठ नागरिकांच्या अड्डय़ावर हा विषय निघाला तेव्हा अन्नप्रक्रिया उद्योगातले एक अग्रणी म्हणाले, ‘प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्बरोबर दुष्मनी असण्याचं कारण नाही. पूर्वीपासून लोणची, पापड आणि मुरांबे वर्षभर टिकावे म्हणून मीठ, तेल आणि साखर यांचा वापर केला जातोच की! पण या वस्तू कमी प्रमाणात आपल्या पोटात जातात. मुद्दा आहे तो निरनिराळ्या रसायनांचा मुबलक वापर केलेले खाद्यपदार्थ आता प्रचंड प्रमाणात भारतीय आहारामध्ये आले आहेत हा. ते पाहिलं की आरोग्याची काळजी वाटते.’
आमच्यातले एक आहारतज्ज्ञ उत्साहात पुढे सरसावले, ‘आरोग्याविषयी बोलायचं तर फळ तोडून ते लगेच त्याच झाडाखाली बसून खाणं हे सर्वात उत्तम! ते जमत नसलं तर बाजारातून ताजी फळं आणून खावीत आणि ते स्थलकालाच्या बंधनामुळे शक्य होत नसलं तरच प्रक्रिया केलेली फळं आणि फलपदार्थ खावेत.’
विषण्णपणे मान हलवून उद्योगपती म्हणाले, ‘निसर्गाचं वरदान लाभल्यामुळे आपल्या देशात अगणित प्रकारची फळं आणि भाज्या मुबलक प्रमाणात आणि बारमाही पिकतात. पण चांगले रस्ते, वातानुकूलित मालवाहनं आणि पुरेशी शीतगृहं नसल्यामुळे ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत ती खराब होतात. म्हणून पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आमच्यापकी काहींनी केंद्र सरकारकडे तगादा लावून अन्नप्रक्रियेकरता स्वतंत्र खातं निर्माण करून घेतलं. पण दुर्दैवाची गोष्ट ही की अजूनही भारतात हजारो टन फळं आणि भाज्या कोणाच्याही पोटात पडण्याऐवजी नासून जातात.’मी विचारलं, ‘मग पाव शतकात अन्नप्रक्रिया क्षेत्रात काय प्रगती झाली?’
‘प्रगती अशी झाली की ताजी फळं आणि भाज्या यांच्यापेक्षा मदा आणि बेसन वापरून बनवलेले दीर्घकाल टिकणारे रेडिमेड पदार्थ प्रचंड प्रमाणात तयार व्हायला लागले. तुम्ही दर खेपेला नीट निरखून पाहिलंत तर मॉलमध्ये अशा जंकफूडनं अधिकाधिक जागा काबीज केलेली दिसेल. घरी शिजवलेला दुधी हलवा किंवा हलवायाकडचा गाजर हलवा धडपणे आठवडाभरही टिकत नाही, पण फूडस्टोअरमधून आणलेल्या हलव्याच्या बॉक्सला तब्बल चार महिन्यांचं शेल्फ लाइफ असतं. ही किमया रासायनिक (इनग्रेडिअंट्स) परिरक्षकांची!’
‘खरं आहे. साध्या भेळेचं उदाहरण घ्या. हल्ली ती घरी न बनता रेडिमेड पॅकमधून दीर्घायुष्याचं वरदान घेऊन घरोघरी येते. लहर लागल्याक्षणी गोड, तिखट आणि आंबट चटण्यांमध्ये कालवलेल्या चटपटीत भेळीचा कार्यक्रम साजरा होऊ शकतो. बालक खूश. पालक खूश.’
उद्योगपती पोटतिडकीनं म्हणाले, ‘या अन्नपदार्थाना मार्केटिंगतज्ज्ञांनी ‘कन्विनियन्स फूड’ असं एका दृष्टीनं चपखल असं नाव दिलंय खरं. पण वेळ वाचवण्याच्या सोयीसाठी केमिकल प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्, अ‍ॅसिडिटी रेग्युलेटर, अँटी-ऑक्सिडंट, एमल्सिफायर, स्टॅबिलायझर, सिंथेटिक फूड कलर, आर्टििफशिअल फ्लेविरग सबस्टन्स या नावांनी किती रासायनिक द्रव्यं पोटात अनवधानानं सारली जातात याचा हिशेब कोणी ठेवत नाही. तेव्हा हे जिन्नस खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकानं त्यांच्या वेष्टणावरचे इनग्रेडिअंट्स वाचलेच पाहिजेत.’
घरी गेल्यावर मी रेडिमेड ज्यूसची बाटली फ्रीझमधून काढली. लेबल पाहिल्यावर बहिर्गोल िभग शोधून काढलं. ते चष्म्यावर धरून लेबलावरचा सूक्ष्म मजकूर वाचला आणि बायकोला म्हटलं, ‘हा ऑरेंज ज्यूस घेतल्यावर माझा घसा का खवखवतो ते आता मला कळलं.’
तिथून बाण सुटला, ‘ऑरेंज ज्यूसच हवा तर माझ्यासारखा ताज्या संत्र्यांचा रस काढून का नाही घेत?’
..तर सध्या मी बाल्कनीत टांगलेल्या तुळशीच्या रोपाखाली बसून संत्री सोलून खातो.