News Flash

स्वीय साहाय्यक

आम्ही पत्रकार. म्हणजे ज्ञानगुणसागर आमुच्यामुळेच तर तिन्ही लोक उजागर असा आमुचा दृढ विश्वास!

| October 5, 2014 01:09 am

आम्ही पत्रकार.
म्हणजे ज्ञानगुणसागर
आमुच्यामुळेच तर तिन्ही लोक उजागर
असा आमुचा दृढ विश्वास!
परंतु वाचकांस (रतिबाच्या, स्टॉलवरल्या, स्कीममधल्या धरून सर्व) असे वाटते की खर्डेघाशी सोपी!
म्हणजे टाकला एक आर्टीआय, जमविली माहिती. त्यात पेरले दोन कोट, काढल्या चार बुलेट आणि पॉइंटर, की झाली बातमी!
आता रोज रोज काय कोणी आर्टीआय टाकत नसते. आणि बातम्या तर द्याव्याच लागतात खंडीभर बारा पानी पेपरात! मग धरा सूत्रे! विश्वसनीय, अधिकृत, माहीतगार सूत्रे! आणि द्या झाले ठोकून – की या मतदारसंघात यांचे पारडे जड आणि म्हणा पुढे – की निकाल काय लागेल ते निकालानंतरच कळेल!
पण वाचकहो, इतुके सोपे नसते ते!  
लेख, सदर, झालेच तर स्फूट हे लिहिणे तर त्याहून कठीण. उचलली लेखणी आणि लावली कागदी असे नसते ते. तेथे अभ्यासुनी प्रकटावे लागते. किमानपक्षी गुगलावे कसे आणि काय याचे ज्ञान तरी तेथे लागतेच!
पण वाचकांचे सोडा, दस्तुरखुद्द नमोसाहेब मजकुरांचाही आजवर तसाच समज होता, की पत्रकारिता म्हणजे काय किस झाड की घटक-पत्ती! परवाचे दिशी मात्र त्या समजाचा सुफडा अगदी साफसाफ झाला!
त्याचे असे झाले की, न्यूयॉर्क मुक्कामी साहेबमजकूर असे थकलेभागले बसले होते. खासकरून जबडय़ाचे स्नायू दुखू आले होते. बोलण्याचे काही विशेष नाही. ते काम साहेब झोपेतही करू शकतात! परंतु हसण्याचे काय? उपाशीपोटी सतत हसून पाहा एकदा म्हणजे समजेल तोंड कसे दुखते ते! तशात साहेबांना हसण्याची फारशी सवयसुद्धा नाही. पण तिकडे न्यूयॉर्कमध्ये स्साला जिकडे पाहावे तिकडे शहा आणि पटेलभायच! हसून ओळख नाही दाखवली तर पुढल्या टायमाला कोण साधा खाकरा पण नाय विचारणार!
साहेबमजकूर गरम पाण्याने घसा आणि बर्फाच्या पिशवीने जबडा असे एकसमयावच्छेदेकरून शेकवत होते. तोच त्यांचा सचिव सांगत आला, की ते वॉिशग्टन पोस्तवाले म्हणतात की मजकूर कमी पडतोय. काही तरी द्या, म्हणताहेत.
साहेबमजकुरांनी एवढे कार्यक्रम केले. संयुक्त राष्ट्रांत भाषण केले. त्याआधी सेंट्रल पार्कात जाऊन चक्क इंग्रजीतून भाषण केले. का की तेथील वार्ताहरांना उगाच भाषांतराचे काम नको! तरीही यांना मजकूर कमी पडतो. यांना काय दुसऱ्या पेडन्यूज मिळत नाहीत काय?
पण साहेब म्हणजे दयाघन! समोरचे कागद ओढले. पालथी मांडी घातली आणि म्हणाले, ठीक आहे. अध्र्या तासाने या. एक लेख लिहून देतो.
पण लेख लिहिणे म्हणजे का सोपे काम?
साहेबमजकुरांची सुरुवात बरी झाली. दहशतवाद, डेवलपमेन्ट, शौचालय असे सगळे मुद्दे लिहून झाले. आता पुढे काय?
झाले! मनात आणील तर एका दिवशी दहा नव्या घोषणा देईल, २० नवी कलमे जाहीर करीन अशी ज्यांची क्षमता, त्या साहेबांचेही विचारचक्र अडले.
तिकडे वॉिशग्टनला निघायची वेळ झाली तरी लेख पूर्ण होईना. अखेर भारत व अमेरिका हे जागतिक पातळीवरील स्वाभाविक सहकारी आहेत हे लक्षात घेऊन बराकजी ओबामांनी सूत्रे हाती घेतली.
आणि दुसऱ्या दिवशी बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त बायलाइनने वॉिशग्टन पोस्टमध्ये विशेष लेख प्रसिद्ध झाला!
तर सांगायचा मुद्दा काय, की पत्रकारिता म्हणजे सोपी गोष्ट नाही. पत्रकार हा कसा धीमंतच हवा! अगदी आमुच्यासारखा!
(आता आम्हांस अणुमात्र अक्कल नाही असे आमुच्या कचेरीतील सहकाऱ्यांसह हिचे मत आहे. पण आपण त्यांना तेवढे मतस्वातंत्र्य तर दिले पाहिजेच ना? मग?)
तर असे आम्ही विचक्षण, परखड, निíभड विचारवंत असूनही परवाच्या त्या लोकसत्तेतल्या बातमीचा अर्थ काही आम्हांस अद्याप लावता आलेला नाही.
तशी बातमी साधीच आहे हो. नेहमीचीच.
म्हणजे राष्ट्रवादीच्या कृपेने सरकार पडले. राज्यात राष्ट्रपती राजवट आली. मंत्र्यांचे लाल दिवे गेले. चेंबरे आणि अँटीचेंबरे गेली. तसेच स्वीय साहाय्यकही गेले. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? झाले ते नियमानुसारच झाले.
पण आम्हांस त्याबाबत काही म्हणायचेच नाहीये.
आमचे परमलाडके नेते मा. ना. आर. आर. पाटील, मा. ना. सुनील तटकरे, मा. ना. जयदत्त क्षीरसागर, मा. ना. नितीन राऊत प्रभृती यांच्याकडे सुमारे १० वष्रे हे स्वीय साहाय्यक होते. यावरही आमुचा अजिबात आक्षेप नाही. कोणास स्वीय साहाय्य घ्यायचे हा अखेर ज्याचा त्याचा प्रश्न.
आमुचा सवाल एवढाच आहे, की –
मंत्र्यांकडे हे जे डझनभर स्वीय साहाय्यक होते, ते सगळेच्या सगळे जनावरांचे डॉक्टर होते, ते का?
मंत्र्यांना पशुवैद्यांची अशी रोजच्या रोज काय बरे गरज भासत असावी?
तुम्हांस सांगतो, विचार करून करून आमच्या दोन्ही मेंदूंची शंभर शकले होऊन आमच्याच पायाशी पडतील की काय, असे वाटू लागले आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2014 1:09 am

Web Title: personal assistant
Next Stories
1 गोंधळ
2 फोनसंघर्ष
3 आचारसंहिता
Just Now!
X