News Flash

रमण रणदिवे – चिंतनशील गजलकार

कवी गजल, गीत, कविता किंवा अन्य कोणत्याही काव्यप्रकारात काव्यसृजन करो, पण जेव्हा त्याचे अधिष्ठान दार्शनिक चिंतन असते, तेव्हा त्यातून साकारणारे विचार-कल्पना शाश्वत मूल्ये घेऊन येतात.

| October 12, 2014 01:11 am

कवी गजल, गीत, कविता किंवा अन्य कोणत्याही काव्यप्रकारात काव्यसृजन करो, पण जेव्हा त्याचे अधिष्ठान दार्शनिक चिंतन असते, तेव्हा त्यातून साकारणारे विचार-कल्पना शाश्वत मूल्ये घेऊन येतात. या दिशेने प्रवास करणाऱ्या रमण रणदिवे यांच्या लेखनाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने विशेष लेख.
मराठी पद्य वाङ्मयात एकाच वेळी गजल, गीत अन् कविता या तिन्ही काव्यप्रकारांत समान ताकदीने सृजनरत असलेले जे मोजकेच गज़्‍ालकार, कवी आहेत, त्यात रमण रणदिवे हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. या काव्यप्रकारांवर रणदिवे यांचे नितांत प्रेम आहे अन् तेदेखील रणदिवे यांना वश झालेले आहेत. किंबहुना त्यांच्या प्रेमातच पडले आहेत.
मात्र यापलीकडेही रणदिवे यांची ओळख आहे.  शास्त्रीय संगीताची सखोल जाण असणारे गायक, संगीतकार, दाद देणारे रसिक श्रोता व वाचक, नवोदित गज़्‍ालकारांचे सहृद मार्गदर्शक अन् ख्रिश्चॅनिटीचे तत्त्व आचरणात आणणारा एक कुटुंबप्रमुख अशी विविध व्यक्तिमत्त्वे रणदिवे यांच्यात सामावलेली आहेत.
त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत शांताबाई शेळके म्हणतात, ‘रमण यांच्या धर्माचा मुद्दाम उल्लेख करावा असे मला वाटते. याचे कारण त्यांच्या भाववृत्तीत या धर्माचे (ख्रिस्ती धर्माचे) काही सुंदर विशेष पूर्णपणे मुरलेले आहेत.’ रणदिवे कुटुंबाने भाववृत्ती आचरणातही मुरवली आहे. एक प्रसंग या संदर्भात इथे नमूद करणे अनुचित होणार नाही. प्राजक्ता पटवर्धन या नवोदित गज़्‍ालकार कवयित्रीच्या गजलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ पुण्यात होता. मी व सावनी शेंडे या गज़्‍ालसंग्रहावर बोललो. मला मुंबईला परतायचे होते. त्यामुळे भाषण आटोपल्यावर लगेच हॉल बाहेर पडलो. शेजारच्या एस. एम. जोशी सभागृहात राम जेठमलानींचे भाषण होते. गर्दी तुफान असल्याने मी बाजूच्या वाटेने बाहेर पडलो. अंधार व घाईमुळे ठेचकाळून पडलो. तोंडाला व हाताला जबरदस्त मार लागला. त्यावेळी रणदिवे, त्यांचा मुलगा अन् सावनी शेंडे त्वरित धावून आले. सावनीने आपल्या गाडीतून आम्हाला हॉस्पिटलला नेले. जखमांवर टाके घातल्यानंतर निखिल व नीलेशसह रणदिवे यांनी हॉस्पिटलचे बिल देऊन मला गाडीतून शिवनेरीत बसविले. कार्यक्रमास चिरपरिचित बरेच होते. पण मदतीला सावनी अन् रणदिवे कुटुंबच आले. एवढेच नव्हे तर जखमा भरेपर्यंत ते माझी विचारपूस करीत होते.
रणदिवे यांचे वडील स्व. प्रल्हाद शांतवन रणदिवे हे भजनाचार्य म्हणून संबोधले जात. ते भक्तिकाव्य लिहीत असत.
रणदिवे यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण पं. यशवंतबुवा मराठे यांच्याकडे घेतले. ते स्वत: उत्तम हार्मोनियम वाजवतात. त्यांचा मुलगा निखिल सिंथेसायझर, नीलेश तबला अन् नितीश व्हायोलीन वाजवतो. रणदिवे आपल्या या परिवारासह गज़्‍ाल व भजन गायनाचे कार्यक्रम करतात.
१९६५ पासून रणदिवे यांनी काव्यलेखनास सुरुवात केली. पहिली रचना समरगीत होते. त्यांचा पिंड गेय काव्याचा असल्याने ते छंदबद्ध लिखाण करीत. जेव्हा सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह त्यांच्या वाचनात आला, तेव्हा ते गज़्‍ालेच्या प्रेमातच पडले. भटांची जेव्हा प्रत्यक्ष भेट घडली तेव्हा रणदिवे यांनी आपली एक गज़्‍ाल त्यांना ऐकवली, त्याच गज़्‍ालचा मतला असा..
हसवून चेहऱ्याला फसवून लोक गेले
आयुष्य टाचलेले उसवून लोक गेले
हा मतला भटांना फारच भावला. पुढे भटांनी रणदिवे यांना मार्गदर्शनही केले. एका कविसंमेलनात भटांनी रणदिवे यांची ओळख ‘महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गज़्‍ालकार’ अशी करून देत ‘गज़्‍ालेचा वारसा हा कवी समर्थपणे पुढे नेईल’ असे जाहीर केले.
गज़्‍ालकार हा मूलत: उत्तम कवी हवा हे रणदिवे यांच्या कविता वाचताना, गज़्‍ाल ऐकताना जाणवतं. मूलत: छंदोबद्ध लिखाणाकडे कल असल्याने, कवितेतील आशयगर्भतेचा अनुभव असल्याने व गीतसृजन व संगीताच्या ज्ञानामुळे शब्दकळेत कर्णमधुर गेयता अंगभूत असल्याने रणदिवे यांना गज़्‍ाल तंत्र व मंत्र अवगत करण्यासाठी फार कष्ट वा अवधी लागलाच नाही. त्यांच्या गज़्‍ालेतील शेर एकाच वेळी कविता अन् गीतांशी स्वरसंवाद साधतात. म्हणजेच त्यात लयात्मक अर्थगहनता उमलते. उदाहरणार्थ- खालील तरल शेर बघा-
तू चेहरा फुलांनी का झाकतेस राणी?
आता कुठे गुलाबी झाली सुरू कहाणी
तुझ्या डोळ्यात स्वप्नांच्या नदीला पूर आलेला
सुखाच्या उंच लाटांनी किनारा चिंब न्हालेला
कळेना लाजताना हा कसा रागावला चाफा
पुन्हा रागावतानाही जरा भांबावला चाफा
कसा मेंदीचा रंग निळ्या गगनात कळेना
कुणी चोरला चंद्राचा तळहात कळेना
यातील रणदिवे यांची भावनात्मक अनुभूती वाचकांना प्रेयस सौंदर्यानुभव देते. त्यांच्या रचनात क्वचित गंधस्मृती (नॉस्टेलजिया) देखील आढळते. त्या संदर्भात ते म्हणतात-
डोहात स्मृतींच्या हळव्या हलकेच उतरलो तेव्हा
तरताही आले नाही, बुडताही आले नाही
रणदिवे यांची गज़्‍ाल वा कविता जिथे दु:ख व्यक्त करते तेव्हा ती व्यक्तीचे नव्हे तर समष्टीचे दु:ख रेखाटते. शोषितांचे सांकेतिक प्रतिनिधित्व करते-
मी जगाचे ओठ झालो बोलतो सारे खरे
दु:खितांचे दु:ख माझ्या अक्षरातून पाझरे
यासाठी ते कवितेला विनवणी करतात
रोज नव्या अनुभवात घडव मला
ये कविते जीवनास भिडव मला
ये कविते जीवनास भिडव मला
परक्यांचे दु:ख आपले मानणारा विरळाच. याच विरळ जनात रणदिवे यांचा अंतर्भाव होतो. एका निराधार, निर्धन, लेकुरवाळ्या विधवेचा पराभूत विचार रणदिवे किती समर्थपणे शब्दबद्ध करतात!
बरे-वाईट जिवाचे आता करावे वाटते,
दीन लेकरांची माया पाय माघारी ओढते.
गज़्‍ालमध्ये प्रामुख्याने आढळणारी आत्मप्रौढी अन् तुच्छतावाद रणदिवे यांच्या काव्यात आढळत नाही. त्यांच्या लिखाणात, बोलण्या-वागण्यातही सुसंस्कृत लीनता आहे. त्यामुळे त्यांचा मित्र-शिष्य परिवारही मोठा आहे. ते जसे आपले संगीत गुरू मराठे यांच्या सत्शीलतेबद्दल भरभरून बोलतात, तसेच त्यांच्याकडे गज़्‍ाल शिकणाऱ्या नवोदित गज़्‍ालकार अथवा माझ्यासारखे मित्र मित्राबद्दलही बोलतात.
सानंद आदराने माथा जिथे झुकावा
शिष्यास सर्व देई ऐसा गुरू असावा
या व्याख्येवर स्वत: रणदिवे यथार्थपणे उतरतात.
रणदिवे यांचा मूळ पिंड सश्रद्ध ख्रिस्ती माणसाचा. विठ्ठलनिष्ठ वारकऱ्यांचीच आर्तता त्यांच्या येशुप्रेमात आकंठ भरली आहे. ‘थिटे शब्द माझे’ या कवितेत येशूला क्रुसावर टांगून खिळे ठोकण्यात आले, तो प्रसंग किती हृदयद्रावक शब्दात ते मांडतात बघा-
त्रयस्थापरी हा उभा सूर्य येथे
जिथे आर्त टाहो रडे पोरका
म्हण रक्त ताजे अभागी क्रुसाला
खिळ्यांच्या गळ्याशी फुटे हुंदका
‘ऋतू फुलांचा अन् संप्रधार’ (विचार) या काव्यसंग्रहात रणदिवे यांच्या येशू अन् मेरी तथा ख्रिस्ती विचारप्रणालीवरील कविता उद्बोधक आहेत.
क्रूस हा ताजे कुणाचे रक्त येथे मागताहे?
ही सुखी गर्दी बघ्यांची यात कोणी ख्रिस्त नाही.
या कविता एक धर्माच्या नसून त्या प्रतीकात्मक रूपाने मानव, मानवी जीवन व मानवता यांचे चिंतनात्मक अनुबंध शोधते. ते म्हणतात-
जो देव मानतो मी माणूस नाव त्याचे
प्रत्येक माणसाच्या तो अंतरी असावा
रणदिवे यांची गीते गेयतेसह आशयनिष्ठ आहेत अन् कविता लयनिष्ठ आहेत. गीताची एक झलक पाहा-
मानवा क्षणभर तू इथला
अवचित येता निरोप वरचा, होशिल तू तिथला.
अन् या कवितेच्या ओळी बघा-
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
फुले निखळुनी पडती, तरीही झाड सारखे फुलते का?
तरल सकारात्मक विचार हा रणदिवे यांच्या समग्र काव्याचा गाभा आहे. अवतीभवतीच्या नैराश्यजनक परिस्थितीने त्यांचे कवी हृदय हेलावते, व्यथित होते. तेव्हा त्यातून काही सखेद उद्गार निघणे स्वाभाविक आहे. पण लगेच विवेकाने त्यांना मूळ प्रकृतीवरील ओळी लिहिण्यास बाध्य करते. कवी आपले काव्यसृजन गज़्‍ाल, गीत, कविता किंवा अन्य कोणत्याही काव्यप्रकारात करो, पण जेव्हा त्याचे अधिष्ठान दार्शनिक चिंतन असते, तेव्हा त्यातून साकारणारे विचार-कल्पना शाश्वत मूल्य घेऊन येतात. रणदिवे यांचे सृजन याच दिशेने प्रवास करीत आहे.
आपल्या तरल लावण्याने व लयबद्ध सौंदर्याने मंत्रमुग्ध करण्याचे अद्भुत सामथ्र्य रणदिवे यांच्या या काव्यमोहिनीत आहे. अजातशत्रू व गुणग्राहक रणदिवे हे सत्त्वगुण विचारसरणीचे अनुसरण करणारे आहेत. त्यांचे हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे काव्यातूनही प्रतििबबित होतात अन् तेही
मूल्यऱ्हासांच्या या युगात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 1:11 am

Web Title: raman randive contemplative gazalkar
Next Stories
1 शोध : महेशचा आणि माझा!
2 महेशदा : आठवणींचा फ्लॅशबॅक!
3 मंगळ अमंगळ न उरला..
Just Now!
X