‘लोकरंग’मधील (२७ डिसेंबर) जन-आंदोलनांविषयीचे दोन्ही लेख वाचले. खरं तर संसदीय लोकशाही प्रणालीत जनआंदोलनांची आवश्यकताच भासू नये. कारण संसदेच्या दोन्ही सभागृहांत व संसदेच्या विभिन्न समित्यांमध्ये चर्चा करून लोकप्रतिनिधी लोकहिताचे निर्णय घेऊ शकतात व तसे त्यांनी ते घ्यावेत, हेच अपेक्षित असतं. परंतु गेल्या ५०-६० वर्षांचा इतिहास हे दर्शवतो की आंदोलनांतून पुढे येणारे नेतेही ‘लोकप्रतिनिधी’ न राहता राजकारणी व सत्ताकारणी होतात आणि मग समस्यांचं निराकरण दूरच राहतं.

– शाम आमडेकर, पुणे</strong>

‘किशोर’ आणि भाषिक कौशल्य

‘लोकरंग’मधील (१० जानेवारी) किशोर पुरवणी खूपच छान आहे. माझी एक आठवण यानिमित्ताने सांगावीशी वाटते. लहानपणी आपण सर्व ‘च’ची भाषा शाळेत बोलायचो. ‘चलातू चयका चरायचेक चहेआ.’ साधारणपणे बऱ्याच जणांना ही भाषा यायची. परंतु साधारण ७८-८० सालातल्या ‘किशोर’च्या दिवाळी अंकात अशीच एक वेगळी भाषा सांगितली होती. ‘तुर्फुर्माला कार्फार्माय कर्फर्मार्याच..’ असे एक वाक्य होते. त्यावरून सुट्टीभर मी तसे बोलायचा सराव केला. शाळा सुरू झाल्यावर वर्गात मैत्रिणींशी त्या नवीन भाषेतच बोलू लागले. कशी बोलायची ते मी सांगणार नाही. पण माझे बोलणे ऐकून तुम्ही प्रयत्न करा, असे मी सांगितले. रेणुका म्हणून माझी सख्खी मैत्रीण होती. आम्ही एकाच बेंचवर बसायचो. तिच्याशी मी सतत याच भाषेत बोलायचे. त्यामुळे तिनेपण ही भाषा लगेच आत्मसात केली. आणि मग काय, ती आमची दोघींची विशेष भाषा झाली. दिवसभर आम्ही त्याच भाषेत बोलायचो. शिवाय एखादी गोष्ट कोणाला कळू नये असे वाटत असेल तर ही आमची भाषा आम्हाला वरदानच वाटे. अशा भाषा बोलणे हे खरे तर एक भाषिक कौशल्य आहे. त्या वयात आमचे ते कौशल्य इतरांपेक्षा खूपच चांगले होते. त्यामुळेच अतिशय सफाईदारपणे आम्ही ती बोलत असू. त्यामुळे इतर मुलींनाही आमचा हेवा वाटत असे. खरंच तेव्हा ‘किशोर’ ही दिवाळीतील मेजवानीच असे. घरात २-३ भावंडे असल्याने तो वाचायला पण आई-दादा वेळा ठरवून देत. खरंच, ‘लोकरंग’मुळे त्या आठवणी ताज्या केल्या.

– डॉ. नीलिमा गटणे, राजगुरू, नाशिक.