१५ मार्चच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘यमक आणि गमक’ या सदरातील ‘बाई, सांभाळ कोंदण’ हा दासू वैद्य यांचा लेख वाचला. लेखकाने स्त्रीदेहातील नैसर्गिक बदल- म्हणजे ऋतुप्राप्ती या विषयावर अतिशय lok03संवेदनशीलपणे लिखाण केले आहे. यापूर्वीही त्यांचे ‘गोष्टी लिहिणाऱ्याची गोष्ट’, ‘लेखकाची आत्महत्या’ इत्यादी लेख उल्लेखनीय होते. दासू वैद्य साधाच विषय अतिशय हळुवार पद्धतीने उलगडत नेतात. सामान्य माणसाच्या मनाला निश्चितच ही गोष्ट भिडते.
जुन्या अभ्यासक्रमात दासू वैद्य यांची ‘तूर्तास’ कवितासंग्रहातून घेतलेली ‘भीती मेंदूत आरपार’ नावाची कविता होती. विद्यार्थ्यांना ही कविता शिकविताना हिंसकता धारण करणारे बालचेहरे आठवायचे. त्यांच्या हातातली खोटी बंदूक केव्हा खरी होईल याचा नेम नाही. कवीची ही शंका क्षणभर मलाही खरी वाटायची.

झकास ‘कटिंग’
‘कटिंग’ हा दासू वैद्य यांचा लेख माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन गेला. केस कापण्याच्या क्षुल्लक विषयावर वेगळ्या धाटणीने लेखन करण्याची ही पहिलीच ‘केस’ असावी. पोत्यावर बसून केस कापणे ते केशकर्तनालय, सलून, स्पा ते जावेद हबीब हा केसकापणीचा प्रवास मनोरंजक आहे. लेखाशी संबंधित निलेश जाधव यांचे चित्रही अतिशय बोलके होते. गावगाडय़ातील न्हावी हा गावाने दिलेल्या बलुत्यावर आपला उदरनिर्वाह करीत असे. गावातील सगळ्या खबरीही त्याच्याकडे असत. ‘रिकामा न्हावी भिंतीला तुंबडय़ा लावी’ ही म्हण आजच्या पिढीला कळणं अवघडच आहे. त्याच्यासोबतच धोकटी, वस्तरा, हजामत, फणी या शब्दांची ओळख नव्या पिढीला झाली.
केस कापतात म्हणजे ‘जसा काय याचा कोणी मेंदू’च काढून घेतात की काय!’ ही लेखकाची कोटी खूपच आवडली. गावगाडय़ातून हद्दपार झालेल्या कोंडमा मामांना लर्तमानात आणल्याबद्दल लेखकाला मन:पूर्वक धन्यवाद. एकूणच कटिंगची भट्टी झक्कास जमली होती.            
– श्रीनिवास सातभाई, औरंगाबाद</strong>