|| सुभाष अवचट

स्वप्ने तरल असतात. त्यांना गुरुत्वाकर्षणाचे नियम नसतात. डोळे मिटले की स्वप्ने सुरू होतात. त्यात आपण कोठे जातो? आपण कोणाला किंवा आपल्याला कोण भेटते? पूर्वी ही स्वप्ने मूकपटासारखी ब्लॅक अँड व्हाइट असायची. आता ती कलरफुल असतात म्हणे! स्वप्नातील या अनोळखी व्यक्तींशी तुमचा काय संवाद होतो? ते कोठल्या प्रदेशातील असतात? तो संवाद तुम्हाला ऐकू येतो का? स्वप्नात स्थळ-काळाच्या, सरहद्दींच्या तारांच्या मर्यादा नसाव्यात. एक पारंपरिक असा दृढ समज चालत आलेला आहे, तो हा की, पहाटेची स्वप्ने खरी ठरतात. पण स्वप्नात पहाट, दिवस, रात्र अशा प्रहरांचे घोळ नसतात. झोपेतून उठले की स्वप्ने, त्यातल्या घटना, प्रदेश, व्यक्ती नेमक्या आठवतात का? भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत ही स्वप्ने देतात का? लहान मुले स्वप्नात हसतात. माझा खंड्या नावाचा कुत्रा झोपेत हसायचा. त्याला स्वप्नात काय दिसत असेल? काही माणसे एकदम दचकून उठतात. त्याला वाईट स्वप्ने म्हणतात. वाईट स्वप्ने पडू नयेत म्हणून झोपायच्या आधी प्रार्थना करण्याचीही प्रथा आहे.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

अनेक शतके स्वप्न या विषयावर चिंतन होत आले आहे. स्वप्नाबद्दलच्या स्वत:च्या कुतूहलापोटी अनेक ग्रंथ, थिअरीज् बाहेर आल्या. हिप्नोटाइज करण्यापासून ते एक्स-रे काढून मेंदू आणि स्वप्ने शोधण्याचा प्रयत्न झाला. दलाई लामांना लहानपणी स्वप्न पडले. त्यांच्या मॉनेस्ट्रीजच्या अंगणात काढलेल्या सुरेख रांगोळ्या घोड्यांच्या टापांनी विस्कटल्या गेल्या. या स्वप्नाचा अर्थ शत्रूचे आक्रमण होणार असा वर्तवला गेला. झालेही तसेच. त्यांच्यावर चीनने भीषण हल्ला केला. ही स्वप्नाची कथा इतिहासात नमूद झालेली दिसते. तिबेट, चीन आणि त्यावेळच्या युरोपमधील अनेक  साम्राज्यांत अशा स्वप्नांचे अर्थ काढून भविष्यात होऊ शकणाऱ्या घटनांचे विवेचन करणाऱ्या स्त्रियांना राजदरबारी मान असे. स्वप्ने ही चाहूल देतात का? कॉन्शस, सब-कॉन्शस यात लपलेली मनाची ही वैयक्तिक दृश्ये असतात का? हे शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेक पातळ्यांवर चालूच आहे. त्यात मृत्यू, जीवनातल्या दडपलेल्या महत्त्वाकांक्षा, अनेक छोट्या-मोठ्या गरजांचा हा संग्रह तरंगत असावा. मला त्या पराकोटीच्या शास्त्रीय, दुर्बोध संशोधनाचे फारसे आकर्षण नाही. मला त्या स्वप्नातल्या अनोळखी गावाचे, त्यात वाहणाऱ्या प्रकाशाचे, आकारांचे, तरंगत चालणाऱ्या स्त्री-पुरुषांचे, कोठेही जमीन सोडून उभे असणाऱ्या डोंगर, झाडे, घरे आणि त्या गावातल्या गल्ल्याबोळांतून फिरणाऱ्या माझे- जो माझा मलाच दिसत नाही, मी तेथे असूनही तेथे नाही… अशा तरल स्वप्नांची गंमत वाटते. त्यामुळे मी दचकून वगैरे उठत नाही. ते स्वप्न संपू नये असे वाटते. अथवा झोपेच्या आधी मला प्रार्थना करायची वेळ कधी आली नाही. त्या स्वप्नातल्या गावात मी विदाऊट रिझर्वेशन पोहोचलेलो असतो. मी कधीही पाहिले नाही असे पेंटिंग कुठे दिसते का, या अधांतरी शोधात. तेथे असूनही नसावा.

जीवन ही मनाबरोबर घडत जाणारी एकमेकांची कहाणी आहे. येथे येणे आणि जाणे हे सूत्र आहे. काहीतरी मिळवणे आणि तेच हरवणे, हरवलेले परत मिळवणे, हा काही क्षणांचा खेळ आहे. त्यात दु:ख नव्हे, तर पश्चाताप असतो. हळहळ, दुरावा, विस्मरण असते. ती ट्रॅजेडी नसते. जंगलाला जंगलच सावरते! जंगलातही असेच खेळ चालू असतात. मुलांचे संगोपन, त्यांचे रक्षण, भुकेसाठी वणवण, दुष्काळ, स्वत:चा बचाव, रक्षण, बंदुकीच्या गोळीचे भय, वणव्याची होरपळणारी आग, महापूर हे त्यात आलेच. त्यांचे सव्र्हायव्हल हे जंगलच सांभाळते. आपणही कळपात राहतो. हा खेळ येथेही चालतो. फक्त निसर्गाने मेंदू हा आपल्याला बोनस दिलाय. मेंदूबरोबर स्वप्नेही जुळ्या मुलांसारखी बरोबर आलीच. जीवन-मृत्यूचा, हार-जीतीचा हा खेळ युगानुयुगे चालत राहणारच.

पिकासो म्हणायचा, जुने ते मोडा आणि तेच परत नवीन पद्धतीने जोडून उभे करून दाखवा. या घडामोडीत स्वप्नांचा प्रवाह अखंड चालूच राहतो. तो भेदभाव करीत नाही. यात कधी सुन्या सुन्या मैफिली असतात, तर वैयक्तिक स्वभावाप्रमाणे सावरणाऱ्या प्रार्थनेच्या प्रतिमाही एकामागे एक येत-जात असतात. स्वप्ने ही खासगी मालमत्ता राहत नाही. ती सार्वभौम विहरत असतात. शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा शोध या स्वप्नापोटी घेतला असावा. लेखकांनी या स्वप्नांच्या कहाण्यांना साहित्यात रूप दिले. कवींनी कल्पनेचे पंख दिले. या अ‍ॅबस्ट्रॅक्ट स्वप्नांना वास्तवात आणण्याची ही धडपड चालूच राहिली. श्रीमंतीची, नवसांची स्वप्ने सकाळच्या प्रकाशात विरघळून जातात. या प्रतिमांना तुमच्यात लपलेल्या प्रतिभेच्या बंद दरवाजाची कडी-कुलपे उघडून तुम्हाला प्रवेश मिळवायचा असतो. कलावंत याच कडीच्या आधारावर अलौकिक विश्व तयार करतात. याला स्वप्नरंजन म्हणायचे! आता हे गुपित राहिले नाही. विज्ञानाने पाठपुरावा केला तरी स्वप्नातल्या या ऊर्जेचा एक्स-रे अजून निघालेला नाही. विश्व तयार करणाऱ्याने काहीतरी राखून ठेवलेच आहे. नाहीतर कीर्तनातली ही खिरापत त्याने येणा- जाणाऱ्यांना वाटली असती की!

पेंटिंग पूर्ण व्हायच्या बेतात आले की वाटते, हे तर मी पूर्वी पाहिले आहे. त्यापूर्वीच ते का दिसत नाही? त्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रवास हा करायला लागतो. ते अधांतरी फॉम्र्स तुमच्या भोवती सतत फिरत असतात. कधीतरी क्षणभर त्याची प्रचीती येते आणि जाते.

 

‘‘अचानक या अनोळखी गावात आलो खरा

पण मला जाणवतंय

मी पूर्वी कधीतरी इथे येऊन गेलोय…

मी तिला सांगितलं,

बघ, हे वळण घेतलं की लागेल एक छोटी गल्ली

एव्हाना साऱ्या सावल्या सरकत सरकत

जुन्या विटांच्या भिंतीपाशी एकत्र झाल्या असतील,

डावीकडच्या तिसऱ्या घराच्या दगडी भिंतीत बंद असेल एक खिडकी

लपवलेल्या चेहऱ्यासारखी,

गल्लीच्या टोकापासल्या बुटक्या घरातून बाहेर पडेल

भुरं मांजर

दबकत, पावलांचा कणमात्र आवाज न करता ते

चालत जाईल गल्लीतील अंथरलेल्या शांततेवरून

समोरच्या घरात,

मला वाटतंय, पलीकडे पडकी भिंत सावरीत नक्कीच उभं असणार

वृद्ध लिंबाचं झाड.

एक घर, त्या शेजारचं गेरूनं रंगवलेलं दार आहे.

त्याला चढून जायला तीन दगडी पायऱ्याही तिथे आहेत,

त्याच्या उंबऱ्यावर उभं राहून, पायऱ्यांवरून उंच उडी मारून

या गल्लीतल्या धुळीतनं धुम्म पळत गेलं

असावं माझं बालपण ते.

अर्थातच माझ्यावर तिचा विश्वास बसला नाही,

तेही साहजिकच.

माझाही यावर विश्वास नाही.

 

स्वप्नांना लॉजिक असावं-नसावं. ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या जॉन स्टाइनबेकच्या कादंबरीत पानापानांत ही स्वप्नं लपलेली आढळतात. व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशाच्या गोष्टींत ती तुमच्यापाठोपाठ माळरानावर चालतात. पृथ्वी थिएटरच्या कॅफेत घुटमळणाऱ्या परप्रांतातून आलेल्या, उधार कपडे घालून लांब वाढवलेल्या केसांच्या तरण्याबांड मुलांच्या डोळ्यांत हिरो बनण्याची स्वप्ने तरळत असतात. आणि इथेच या बॉलीवूडमध्ये सुपरस्टार होऊन साम्राज्य करणाऱ्या राजेश खन्नाची क्रेझ धुळीला मिळते. त्याच्या मृत्यूपर्यंत तो किंग लियरसारखा त्याच स्वप्नात राहिलेला हताश हिरो सर्वांनी पाहिला आहे. स्वप्नातही एक स्वप्न असते. स्वप्नात दृष्टान्त झाला किंवा मिळाला अशा कथा आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक पोथ्यांमध्ये चमत्कारांनी भरलेल्या आहेत. त्या लोकांना आवडतात. त्याचे पुरावे लोक मागत नाहीत. स्वप्नात देव येतात आणि मग गावात मंदिरे उभी राहतात. त्याच मंदिराच्या पायऱ्यांवर गांजलेली माणसे माथा ठेवतात. त्या श्रद्धेवर जीवन जगायला आधार मिळतो. मृत व्यक्तीशी स्वप्नात संवाद झाला, असं सांगणारा एक काळही होऊन जातो. ही वैयक्तिक स्वप्नांची कहाणी जगभरची आहे. या स्वप्नांनीच फॅन्टसीचे युग निर्माण केले.

आणि अठराशे नव्याण्णव साली ‘इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’ या सिग्मंड फ्रॉइडच्या लेखाने सारे जग बदलून गेले. स्वप्नांच्या या दुनियेकडे पाहण्याचे नवीन मार्ग मोकळे झाले. लिहिताना स्वत:वरच रागवून फाडून चुरगळून फेकलेल्या कागदाच्या बोळ्यात फ्रॉईडने स्वप्ने शोधायला शिकवले. या त्याने लिहिलेल्या निबंधानंतर जगाला समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वप्नवत कल्पनांनी मानसशास्त्र आणि कलेत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. या मानसशास्त्रज्ञांना कलेतलं घंटा कळत नाही, ही भूमिका इतिहासातल्या अनेक चित्रकार, दिग्दर्शक, अभिनेते, लेखकादींनी वारंवार प्रकट केली आहे. कला आणि कलावंताचे मन जाणून घ्यायला फक्त परमात्माच काही उत्तरे देऊ शकतो. हा कट्ट्यावर मिसळ खाऊन चर्चा करण्याइतका उथळ विषय नाही. हे संदर्भ क्रिटिक्सच्या संदर्भातही जगभर आहेत. पण त्याविषयी तुम्हाला वाचायला तुडुंब पुस्तके उपलब्ध आहेत.

अनेक शतके चित्रकलेत प्रयोग होत आले आहेत. अनेक अडचणी चित्रकारांपुढे  होत्या. मुख्य म्हणजे चित्रातले परस्पेक्टिव्ह त्यांना सापडत नव्हते. डोळ्यांत हे परस्पेक्टिव्ह मावते. मी येथे आहे, पुढे झाडी आहे, नंतर शेती, त्यात काम करणारे शेतकरी, नंतर टेकडी, त्यावरचे चर्च, त्यापाठी झाडीच्या पलीकडचे डोंगर आणि त्यावरचे आकाश. हे इन्फिनिटीपर्यंतचे दृश्य चित्रात आणण्याचे प्रयत्न होत होते. परंतु ते दाखवताना त्यांना एकात एक गुंतलेली, रचलेली ठळक प्रतिमा दाखवून हे परस्पेक्टिव्ह तयार करावे लागत असे. जसे आपल्या मोगल आर्टमध्ये दिसते. पण त्या चित्रांत खोली नव्हती. त्यावेळी कॅमेरे नसल्याने हे डेप्थ ऑफ फिल्ड तयार करण्याचे प्रयत्न झाले. वरमीर या चित्रकाराने पहिल्यांदा ते चित्रात आणले. एका भिंतीसमोर विणकाम करीत बसलेल्या चित्रात ते त्याला जमले. त्याने साधा पिनहोल कॅमेरा तयार करून हे साधले असावे असा रिसर्च आहे. आउट ऑफ फोकस अशी जर बॅकग्राउंड दाखविली, की हे परस्पेक्टिव्ह त्याने साधले आणि हा प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न होता तो गुरुत्वाकर्षणाचा. जमिनीवर घडणारी दृश्ये, त्यावर मागे-पुढे उभी असलेली झाडे, डोंगर, अगदी युद्धे असतील; नाहीतर समुद्रातील गलबते, वादळ, सूर्योदय, सूर्यास्ताच्या दृश्यात हे गुरुत्वाकर्षणाचे नाते सांभाळावे लागत असे आणि त्या चौकटी डोईजड होऊ लागल्या. मनमुक्त कल्पनेच्या आविष्कारांनाही या बंधनाच्या बेड्या होत्या. पण इथेच या फ्रॉईडच्या निबंधाने आधार मिळाला आणि स्वप्ने अवतरली. या स्वप्नानेच सर्रिअलिझमचा जन्म झाला. त्याचा नायक होता साल्वोदार दाली! ‘द पर्सिस्टंट्स ऑफ मेमरी’ या त्याच्या पेंटिंगने कलेला झटकन् नवीन वळण दिले. त्याने आयुष्यभर त्याच्या स्वप्नातल्या इतिहासातील घटनांच्या अनेक कल्पना पेंटिंगमध्ये घेतल्या. तो सर्रिअलिझममध्येच वावरायचा. त्याने एक चमत्कारिक आकाराची उंच खुर्ची तयार केली होती. अंघोळ करून नागडा त्या खुर्चीत ओल्या अंगाने, हातात एक चमचा घेऊन तो बसे. जमिनीवर एक मोठी थाळी ठेवलेली असे. तो डोळे मिटे. त्याला डुलकी येई. काही क्षण तो झोपेत असताना तो चमचा त्याच्या हातातून निसटून खालच्या थाळीवर पडे. त्या आवाजाने तो उठे. एवढीच त्याची झोप असे. तो कधीही झोपेत झोपू शकला नाही. केवळ जागे होणे, या त्याच्या प्रयोगाने कल्पनाशक्ती आणि स्वप्नांचे राज्य वाढवले आणि ते त्याच्या चित्रांत आणले. वितळणारी घड्याळे हे त्याचे उदाहरण आहे. सर्रिअलिझम काही काळ टिकला. चित्र पाहताना अचानक धक्का मिळतो, पण परत तो शांत होतो. त्यामुळे पुन्हा चित्र पाहताना ती मजा येत नाही. नो रिपीट व्हॅल्यू. पण या स्वप्नांच्या थिअरींनी अनेक मोठे चित्रकार या कर्मठ विचारधारेतून मुक्त झाले.

सेझान त्यापैकी एक. त्याला ‘फादर ऑफ मॉडर्निझम’ म्हणतात. एकाच चित्रात अनेक परस्पेक्टिव्ह त्याने आणले. त्याने नवीन फॉम्र्स ह्युमन बॉडीज्ना दिले. तसाच मार्क शगाल हा एक चित्रकार होता. त्याचा आयुष्यभराचा विषय ‘प्रेम’ हा होता. खेडेगावातून तरंगत येणारी त्याची प्रेयसी बघताना त्याने गुरुत्वाकर्षणाचे नियम तोडण्याची इजाजत घेतली. त्यामागे स्वप्नांचीच मोकळीक होती. त्यानंतर या स्वप्नांच्या शिडीवरून चढत व्हॅन गॉग, मातीस, क्ले, पिकासो, मार्क रॉथको चढत गेले आणि त्यांनी जगाला अलौकिक प्रतिभेचे दर्शन दिले.

स्वप्ने तुमचे ग्रामर बदलण्याची दृष्टी देतात. शांताबाई शेळके गाण्यातून स्वप्नातल्या गावात नेतात. स्वप्नामधून स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गातात. स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नातच वेध घेतात.

दोन हजार दहाला ‘इन्सेप्शन’ नावाची याच स्वप्नाचा आधार घेऊन तयार झालेली अद्भुत फिल्म मी पाहिली. त्यात लिओनार्डो दी कॅपरिओ हा नट आहे. दुसऱ्याच्या स्वप्नात जाऊन सारी कॉर्पोरेट सिक्रेट्स चोरून आणायची, हे यातले सूत्र होते. स्वप्नातल्या अनेक प्रतिमांचा आविष्कार फिल्ममधून पाहताना आपण थक्क होतो.

गेली पाच-सहा दशके मला याच क्रिएटिव्हिटीची संगत आहे. तरीही माझ्या या स्वप्नातल्या रस्त्यावर मला अजून शोधायचेच आहे. त्यात थकवा तर नाहीच, पण कोणती रिग्रेट्सही नाहीत. या प्रतिमांचे कुतूहल मला जागे ठेवते आहे. माझं एक पेंटिंग आहे. पांढरी भिंत, त्यावर दाटलेलं आकाश, भिंतीला टेकून ठेवलेली शिडी आणि पांढऱ्या भिंतीत पिवळ्या प्रकाशातली उघडी खिडकी. मला सतत वाटते, पेंटिंगमधील शिडीवरून खिडकीतून उतरून समुद्राच्या किनाऱ्यावर दूर फिरायला गेलोय मी एकटा…

हे स्वप्न आहे ,की स्वप्नात मला पडलेले दुसरे स्वप्न हे आहे, मला माहीत नाही.

Subhash.awchat@gmail.com