रशियन राज्यक्रांतीला २०१८ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. जनमानसावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या जगातील काही राज्यक्रांत्यांपैकी ही एक क्रांती. रशियन राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने अनिल राजीमवाले यांनी ‘न्यू एज’ साप्ताहिकात एक लेखमाला लिहिली होती. या लेखांचा महत्त्वपूर्ण संक्षिप्त अनुवाद म्हणजे ‘रशियन क्रांतीचे शतक’ ही पुस्तिका. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दिवंगत नेत्या शांता रानडे यांनी या लेखांचा अनुवाद केला आहे व लोकवाङ्मयगृह  प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे.

या लहानशा पुस्तिकेत रशियन क्रांतीचा धावता आढावा घेण्यात आला आहे. या क्रांतीमागचा विचार, त्यामुळे समाजवादी राज्यव्यवस्थेचा घातला गेलेला पाया, लेनिनची सशस्त्र उठावांमाग्ील व्यूहरचना, क्रांतीनंतर काही वर्षांनी या राज्यव्यवस्थेचा अंत कसा झाला,  इ. बाबींची संक्षिप्त, पण महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. लेनिन या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक विचारप्रवाह तसेच समज-गैरसमज, क्रांतीबद्दल (त्यातल्या सशस्त्र उठावांबद्दल) समज-गैरसमज आहेत. विशेषत:  क्रांतीसाठी हिंसक मार्ग अवलंबला गेला – हा त्यातला एक प्रमुख आक्षेप. अशा प्रकारचे अनेक गैरसमज दूर होण्यास तसेच रशियन राज्यक्रांतीची मूलभूत समज येण्यासाठी ही पुस्तिका मदत करते. सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करून श्रमिक जनतेच्या हाती सत्ता देण्याचा विचार, मार्क्‍सवादाला अकादमिक चच्रेतून बाहेर काढून समाजवादी राज्यव्यवस्थेसाठी अधिक शास्त्रीय कृतीकार्यक्रमाचे महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी तसेच त्यातील दोष, त्रुटी यांवरचे भाष्य महत्त्वाचे आहे, मात्र ते त्रोटक आहे. रशियन क्रांतीच्या अस्ताबाबत अधिक तपशील आले असते तर पुस्तिकेची उपयुक्तता आणखी वाढली असती. एकंदर लहानशा अनुवादित पुस्तिकेच्या मर्यादित अवकाशात क्रांतीची पूर्वपीठिका, क्रांतीदरम्यानचा इतिहास, क्रांतीची वैशिष्टय़े राजीमवाले यांनी सुलभतेने मांडली आहेत. रशियन राज्यक्रांतीबाबत असलेल्या प्रस्थापित धारणांपलीकडे जाऊन या क्रांतीची नेमकी ओळख होण्यासाठी ही पुस्तिका अतिशय उपयुक्त आहे.

  • ‘रशियन क्रांतीचे शतक,’
  • अनिल राजीमवाले,
  • अनुवाद – शांता रानडे, लोकवाङ्मय गृह
  • पृष्ठे- ४०, किंमत- ३५ रुपये.