रेखा देशपांडे  – deshrekha@yahoo.com

सत्यजीत राय यांच्या ‘अपूर संसार’मधल्या तरुण अपूपासून सौमित्र चॅटर्जी यांचा एक कलाकार आणि माणूस म्हणून आत्मशोध सुरू झाला. जो पुढे वैविध्यपूर्ण सिनेमे, नाटकं, नियतकालिकाचं संपादन, चित्रकारिता, कविता अशा बहुआयामी माध्यमांतून निरंतर जारी राहिला. माणसाचं जगणं हाच कलेचा स्रोत मानणारे सत्यजीत राय आणि सौमित्र चॅटर्जी यांच्यातलं अद्वैत म्हणूनच तर चिरंतन होतं.

सौमित्र चॅटर्जी यांचं जाणं हे केवळ एका लोकप्रिय फिल्मस्टारचं जाणं नव्हतं.

भद्रलोक ते सर्वहारा, बुद्धिजीवी ते श्रमजीवी, एकमेकांचे राजकीय विरोधक असे हजारो लोक सौमित्र यांच्या महायात्रेत एक होऊन सामील झाले होते, तेही कोविडकाळात. (बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीपीएमचे बिमान बोस हे एरवीचे कट्टर राजकीय विरोधक या अंत्ययात्रेत एकत्र चालत निघाले होते.) ही फिल्मस्टारच्या अंत्ययात्रेतली उत्साही गर्दी नव्हती. रवींद्रसंगीताच्या गंभीर, उदात्त सुरांची साथ देत हे हजारो लोक अतिशय सुसंस्कृत संयमानं आपल्या बंगाली संस्कृतीच्या एका जिवंत प्रतीकाला अखेरचा निरोप द्यायला निघाले होते. बंगाली अस्मिता मुख्यत: पोसली गेली आहे ती सांस्कृतिक जीवनसत्त्वांवर. त्यामागे केवळ राजकीय अभिनिवेश नाही, याचंच हे प्रतीक होतं. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातून गांभीर्य, ऋजुता, सौजन्याचाच प्रत्यय येत राहिला, जे बडय़ा स्टारच्या तोऱ्यात हस्तिदंती मनोऱ्यात राहू शकले असते; पण ज्यांना सामान्यांत सामान्यपणे जगण्यातच ‘कम्फर्ट झोन’ सापडला होता आणि जे त्या जगण्याच्या अनुभवातूनच आपल्या कलेची मशागत करत राहिले अशा सौमित्र चॅटर्जी यांना साजेसा असाच हा निरोपाचा सोहळा होता.

सर्वात पहिलं प्रेम त्यांच्यावर बंगालचंच नव्हे तर भारताचं, जागतिक सिनेमाच्या रसिकांचंही बसलं ते सत्यजित राय यांचा अपू म्हणून, हे खरं आहे. सौमित्र चॅटर्जी म्हणताच मनात पहिली प्रतिमा उमटते ती ‘अपूर संसार’मधल्या अपूची आणि पाठोपाठ मनाची दारं उघडून वादळासारखा आत दाखल होतो तो ‘चारुलता’चा अमल. स्वप्नाळू, राजस तरुण. तो कथांच्या संदर्भात बोलायचं झालं तर होता अनुक्रमे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातला (अपूर संसार) आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटातला (चारुलता), चित्रपट-निर्मितीच्या काळाच्या संदर्भात बोलायचं तर तो १९५९ ते १९६४ या अवधीतला. पण तरीही तो तसाच राहिला- त्यापुढच्या प्रत्येक दशकातल्या तरुणात. तरुण स्वप्नांनी काळानुरूप वेष बदलला तरी त्यांचा आत्मा तोच राहतो. ‘‘जग ही तर आत्मकथा, ही कादंबरी नाही होऊ शकत.’’ असं म्हणणाऱ्या मित्राला ‘‘व्हाय नॉट’’ असं जोरात विचारतो ‘अपूर संसार’मधला होतकरू लेखक अपू. जगणं हाच कलेचा स्रोत होय, ही अपूची धारणा आणि तीच होती राय आणि सौमित्र यांचीही धारणा. त्यामुळेच त्याचा अपू इतका खरा ठरतो. अपूनं असंख्य चाहत्यांवर कित्येक दशकं गारूड केलंय. अपू ट्रायोलॉजी शिकवण्यात कायम रंगून जाणारे सिनेमाचे शिक्षक सतीशबहादुर यांनी आपल्या मुलाचं नाव अपूर्व ठेवलेलं आठवतं. अलीकडेच ‘बीइंग विथ अपू’ या अशोक राणे यांच्या डॉक्युमेंटरीत अपूचं हे गारूड उकलण्याचा प्रयत्न आहे.

अपू हे बंगालच्या प्रबोधन पर्वाचं अपत्य. तर सत्यजित राय, सौमित्र चॅटर्जी ही उत्तर-प्रबोधन पर्वाची अपत्यं. सुशिक्षित, साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, संवेदनशील, परंपरेचा आदर करतानाच नवविचारांना सामोरी जाणारी. टागोर युगात रुजलेल्या संवेदनशील बौद्धिकतेचे संस्कार त्यांच्यावर झालेले. स्वत: सौमित्र हे बंगाली साहित्याचे एम. ए.चे विद्यार्थी. नाटकं, कवितावाचन अशा उपक्रमांत रमलेले. कॉफी हाऊसमध्ये नेहमी जाणं-येणं. तिथे कला आणि साहित्यक्षेत्रांतल्या माणसांशी मैत्री होत होती. सत्यजित राय यांच्या साहाय्यकाने नेमका हा युवक हेरला आणि ते त्याला घेऊन राय यांच्याकडे गेले. त्यांना पाहताक्षणीच राय म्हणाले, ‘‘हा कॉलेजमधल्या अपूपेक्षा मोठा आहे. राय तेव्हा ‘पथेर पांचाली’च्या सीक्वेलची- ‘अपराजितो’-ची तयारी करत होते. ‘अपराजितो’मध्ये भूमिका केली नाही तरी सौमित्र ‘अपराजितो’च्या लोकेशनवर चित्रीकरणाच्यावेळी सातत्याने हजर असत. ‘जलसाघर’च्या चित्रीकरणावेळी देखील ते जात. एकदा पॅक-अप झाल्यानंतर ते निघत असताना राय यांनी त्यांना थांबवलं. त्यांची छबी विश्वास (बंगालचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते आणि ‘जलसाघर’मधील जमीनदार) यांच्याशी ओळख करून देत म्हणाले, ‘‘हा माझ्या ‘अपूर संसार’चा नायक.’’ त्यावेळी सौमित्र यांना कळलं की ‘अपूर संसार’मधल्या अपूच्या भूमिकेसाठी आपली निवड झाली आहे. ‘अपूर संसार’ हा त्यांचा पहिला चित्रपट. अपूच्या दोन शॉट्सदरम्यान अपू काय करत असेल याची कल्पना करून ती ते लिहून काढत. ही टिपणं त्यांनी राय यांना दाखवली असता राय यांनीही त्यांना प्रोत्साहन दिलं. सौमित्र यांची अभ्यासाची त्यांनी स्वत:च विकसित केलेली ही पद्धत होती. त्यातून व्यक्तिरेखेचा ते किती, कसा विचार करत हेच दिसून येतं. सौमित्र अपूच्या कुडीत इतके चपखल बसले की अपू म्हणजे सौमित्र हे समीकरण त्यांच्या प्रेक्षकांच्याही मनात पक्कं  बसलं. पण हा प्रवास इथेच थांबत नाही. अपू या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून सौमित्र चॅटर्जी या तरुणाचा आत्मशोधच सुरू झालेला आहे. आणि आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आपण सौमित्र यांच्या ज्या भूमिका, जो अभिनय अपर्णा सेन (परोमितार एक दिन – २०००), सुमन घोष (पोदोख्खेप – २००६, बसु पोरिबार – २०१९), सौविक मित्र (पुनश्च – २०१४) , शिबोप्रशाद मुखर्जी- नंदिता रॉय (बेला शेषे – २०१५, प्राक्तन- २०१६, पोस्तो- २०१७), अतनु घोष (मयूराक्षी – २०१७), संदीप सरकार (दश माश दश दिनेर गोल्पो – २०१९), सुदेष्णा रॉय- अभिजित गुहा (श्राबोणेर धारा- २०२०) वगैरे नव्या पिढीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून पाहात आलो आहोत त्या भूमिका म्हणजे सौमित्र चॅटर्जी यांच्या सातत्यानं चाललेल्या आत्मशोधाचंच फलित होय. आणि विरोधाभास वाटेल, पण त्यामुळेच ते केवळ अपू राहिले नाहीत. तर अपूच्या पलीकडे बरेच काही ते होते. अपूमधल्या असंख्य शक्यता सौमित्र चटर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रत्यक्ष उतरल्या असंही म्हणता येईल. सत्यजित राय यांच्या चरित्रकार मारी सेटन यांच्याजवळ सौमित्र यांनी स्वत:चा अर्धाअधिक शोध आपल्याला अपूमध्येच लागल्याची कबुलीदेखील दिलेली आहे.

‘फेलूदा’ची व्यक्तिरेखा लिहिताना राय यांनी स्वत:च्या काही धारणा, काही स्वभाववैशिष्टय़ं तिच्यात पेरली होती, ते आव्हान नेमकं लक्षात घेऊन पेलताना फेलूदाचा चेहरा बनले सौमित्र. राय यांच्या १४ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. जागतिक सिनेमात दिग्दर्शक आणि त्याचा प्रिय अभिनेता अशा (उदा. फेलिनी- मारिओ मास्त्रियानी, कुरोसावा- तोशिरो मिफुने..) जोडय़ा अनेकदा आढळतात. हे केवळ दिग्दर्शकाच्या कामाशी त्यांचे सूर सोयिस्करपणे जुळतात म्हणूनच नव्हे, तर अनेकदा तो अभिनेता दिग्दर्शकाचा आल्टर ईगो बनून गेलेला असतो, त्याच्या संवेदनशीलतेत दिग्दर्शकाच्या संवेदनशीलतेचं प्रतिबिंब पडतं म्हणून. सत्यजित राय आणि सौमित्र चॅटर्जी हे असं अद्वैत तयार झालं ते यामुळे. तरीही राय यांच्या अपूच्या पलीकडे ते बरेच काही होते म्हणूनच एकीकडे ते जागतिक सिनेमात तोशिरो मिफुने आणि मारिओ मास्त्रियानीच्या तोडीचे अभिनेते ठरले, तर दुसरीकडे अभिनेत्यापलीकडचं व्यक्तिमत्त्व म्हणून जनमानसात ठसले.

‘अपूर संसार’नंतर त्यांनी राय यांच्या ‘समाप्ती’मध्ये ‘अमूल्य’ साकारला. नायक असूनही ट्रॉली ढकलणं, कॅमेरा उचलून नेणं, रिफ्लेक्टर धरून उभं राहणं अशी कामंही ते सेटवर करत. राय यांच्या चित्रपट-निर्मितीतल्या अशा गुंतणुकीतून सौमित्र चॅटर्जी घडत होते. तपन सिन्हांच्या ‘झिंदेर बंदी’ (‘प्रिझनर ऑफ झेंदा’ या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या कथेवरून शरदेंदु बंद्योपाध्याय यांनी लिहिलेल्या बंगाली कादंबरीवर आधारित) मधला खलनायक मयूरबाहन हे प्रथमच एक वेगळंच आव्हान होतं. त्यात नायक होता त्यावेळचा बंगालचा सुपरस्टार उत्तमकुमार. सौमित्र यांनी तोवर जेमतेम चार चित्रपटांतून कामं केली होती- राय यांचे ‘अपूर संसार’, ‘देवी’, ‘तीन कन्या’मधला ‘समाप्ती’ आणि तपन सिन्हांचा ‘क्षुधित पाषाण’. अजून त्यांच्यातली वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची क्षमता लोकांपुढे आलेली नव्हती. त्यामुळे ‘झिंदेर बंदी’चं बंगाली सिनेमाच्या इतिहासात वेगळं महत्त्व आहे. ‘झिंदेर बंदी’बरोबरच बंगाली प्रेक्षकांनी विचार करायला सुरुवात केली की श्रेष्ठ अभिनय कुणाचा ठरला.

राय यांच्या ‘अभिजान’मधला सौमित्र यांचा नरसिंह हा रांगडा ट्रक-ड्रायव्हर अपूच्या प्रतिमेच्या अगदी दुसऱ्या टोकाचा होता. मात्र चिदानंद दासगुप्ता आणि अँड्रय़ू रॉबिन्सन या समीक्षकांनी सौमित्रसारख्या मृदू व्यक्तिमत्त्वावर नरसिंहाचं रांगडं व्यक्तिमत्त्व लादून राय यांनी चूक केली असं मत मांडलं आहे. त्याउलट स्वत: सौमित्र या चित्रीकरणादरम्यान मेकअपमध्ये टॅक्सी चालवण्याचा सराव करत असताना रस्त्यावरच्या एका माणसाने ड्रायव्हरला पाहून ‘साला पंजाबी का बच्चा’ अशी शिवी दिल्याचा गमतीदार प्रसंग वर्णन करत आपल्या मेकअपच्या परिपूर्णतेची साक्षही दिली आहे.

‘चारुलता’मधल्या अमलच्या भूमिकेची तयारी करताना, या व्यक्तिरेखेची पाश्र्वभूमी काय असेल, कथेतल्या  दृश्यांव्यतिरिक्त इतर वेळी ही व्यक्तिरेखा काय करत असेल याची डायरी ते लिहीत असत. कथा टागोरांच्या काळातली, अमलचं हस्ताक्षर त्या काळाचा फील देणारं असलं पाहिजे हा राय यांच्यातल्या परफेक्शनिस्टचा आग्रह. आपण ते वळण गिरवायचा सहा महिने सराव केला, तसंच आपलं प्रत्यक्ष वय अमलपेक्षा दहा वर्षांनी अधिक होतं, अमलला शोभणारा कोवळा आवाज असावा म्हणून व्हॉइस ट्रेनिंगही घेतल्याचं सौमित्र सांगतात.

‘अशनि संकेत’मधील गंगाचरणची भूमिका राय यांच्या चित्रपटांतून त्यांनी केलेल्या तोवरच्या भूमिकांहून खूपच वेगळी आहे. सौमित्र हे केवळ मध्यमवर्गीय सुसंस्कृत बंगाली व्यक्तिरेखाच रंगवू शकतात आणि सत्यजित राय यांच्या चित्रपटाबाहेर ते वेगळं असं काही करू शकत नाहीत हे समीक्षकांचे आरोप खोडून काढणारी सौमित्रची महत्त्वाची भूमिका म्हणजे ‘संसार सीमान्ते’या तरुण मुजुमदार दिग्दर्शित चित्रपटातील अघोरची. ‘अभिजान’मधल्या ट्रक ड्रायव्हरसारखे लोक आपण बरेच पाहिले होते, पण एखाद्या चोराशी कधी ओळख झाली नव्हती. त्यामुळे अघोरची भाषा तोंडी खेळवण्यासाठी आणि त्याच्या पाश्र्वभूमीत स्वत:ला बसवण्यासाठी आपण भक्ती मल्लिक यांच्या ‘ओपराध जोगतेर शब्दकोश’ आणि ‘ओपराध जोगतेर भाषा’ या कोशांचा अभ्यास केल्याची मनोरंजक माहिती ते देतात. ‘घरे बाइरे’मधल्या देखण्या, प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या संदीपमध्ये कावेबाजपणा पेरणं हेही त्यांच्या ऋजुतेकडे पाहता आव्हानच होतं आणि ही भूमिका म्हणजे सौमित्र यांच्या अविस्मरणीय भूमिकांपैकी एक ठरली.

त्यांनी मृणाल सेन (आकाशकुसुम), अजोय कार (सात पाके बांधा), तपन सिन्हा (क्षुधित पाषाण, झिंदेर बंदी), अगदी २०२० पर्यंत नव्या पिढीच्या दिग्दर्शकांबरोबरही (वर यापैकी काहींचे उल्लेख आलेले आहेत.) कामं केली आणि याचवेळी विलक्षण ताकदीनं रंगभूमीवर किंग लियर साकारत राहिले. सौमित्र चॅटर्जी आणि उत्तमकुमार हे समकालीन. बंगालमधली दोघांची लोकप्रियता सारखीच. पण दोघांच्या प्रतिमांचे पोत भिन्न होते. ‘लोकांपासून अंतर राखून राहिलं तरच आपलं स्टारडम टिकतं,’ असा सल्लाही उत्तमकुमार यांनी सौमित्र यांना दिला होता. पण सौमित्र यांच्यातल्या अभिनेत्याची जात वेगळी होती. सामान्य होऊन जगताना त्यांना कधी कोलकात्यातल्या पब्लिकच्या गर्दीचा त्रास झाला नाही. शिवाय या जगण्यातून त्यांना अभिनय समृद्ध करणारे घटक मिळत गेले. उत्तमकुमार यांना पडला तसा मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या मोठय़ा मार्के टचा आणि ग्लॅमरचा मोहदेखील त्यांना पडला नाही. आणि तरीही किंवा त्यामुळेच प्रादेशिकता ते वैश्विकता असा त्यांचा प्रवास झाला. जागतिक सिनेमात त्यांचं स्थान निर्माण झालं ते बंगाली चित्रपटांतून.

सौमित्र चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वीपासूनच रंगभूमीवर सक्रिय होते आणि अखेपर्यंत राहिले. ते बंगाली रंगभूमीवरील एक महत्त्वाचे, प्रयोगशील आणि यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक पाश्चिमात्य नाटकांची भारतीयकरणं करून बंगालीत सादर केली आहेत. ‘मला स्वतंत्र नाटकाची कथा बांधता येत नाही म्हणून मी रूपांतरं करतो,’ असं ते प्रांजळपणे म्हणत. बंगालचे प्रसिद्ध रंगकर्मी शिशिरकुमार भादुडी या पूर्वसुरींचा आपल्यावरचा प्रभाव त्यांनी कायम मानला. १८ र्वष ‘एखोन’ (ईक्षण) या साहित्यविषयक नियतकालिकाचं संपादन ते करीत होते. काव्य-लेखन, निबंध-लेखन याबरोबरच साहित्यकृतींचे अनुवाद करण्यातही ते रमत. पेंटिंग, कविता-लेखन, कविता-वाचन हे इतर कला-प्रयत्न आपल्या अभिनयासाठी पूरक ठरतात असं त्यांचं आत्मनिरीक्षण असे. माझ्या व्यवसायाला (अभिनय) मदत करणारा हौशी प्रयत्न असंच ते आपल्या पेंटिंगचं वर्णन करत. सिनेमा आणि नाटक या दोन माध्यमांचा वेगवेगळा आणि एकत्रित असा दोन्ही प्रकारे विचार त्यांनी केलेला दिसतो. राय यांचे कला-दिग्दर्शक बन्सी चंद्रगुप्त यांच्या कामाच्या निरीक्षणाचा उपयोग आपल्याला नाटय़-दिग्दर्शन करताना, नाटकाच्या नेपथ्याची कल्पना करताना कसा होतो यासंबंधातलं त्यांचं आत्मनिरीक्षण वाचनीय आहे. बारीक बारीक तपशील पेरण्याच्या राय आणि बन्सी चंद्रगुप्त यांच्या हातोटीचा ते आवर्जून उल्लेख करतात आणि नाटय़-निर्मितीची सगळी अंगं समर्थपणे पेलण्याचं शिक्षण त्यातूनच आपल्याला मिळाल्याचं नमूद करतात. जी नाटकं चालली नाहीत ती का चालली नाहीत याचंही परखड विश्लेषण करतात.

सौमित्र यांनी न पटलेली गोष्ट कधी केली नाही, की सोयीसाठी आपली राजकीय (मार्क्‍सवादी) भूिमका कधी बदलली नाही. अभिनेता म्हणून पुरस्कार, सन्मान त्यांना अनेक मिळाले यात नवल नाही. दादासाहेब फाळके पुरस्कार, फ्रान्सचा लेजियन ऑफ ऑनर, पद्म पुरस्कार आणि अनेकांची जंत्री मोठी होईल. पण सौमित्र चॅटर्जी या जंत्रीपलीकडे पोचलेलं अस्तित्व होतं- सांस्कृतिकतेचं बहुआयामी प्रतीक. म्हणूनच बंगालनं या प्रतीकाला निरोप दिला तो आगळ्यावेगळ्या सुसंस्कृत शैलीत.