स्त्रीभ्रूणहत्येच्या दाहक वास्तवाशी सध्या वेगवेगळ्या पद्धतीने सामना केला जातो आहे. लोकमानस बदलण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्ते या कठोर वास्तवाशी झगडत आहेत. भूमिगत सोनोग्राफी केंद्रं, पैशासाठी आपल्या पेशाशी तडजोड करण्याची काही डॉक्टरांची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगाच हवा या आपल्या समाजातल्या पारंपरिक आग्रहाला आजही असलेली सामाजिक मान्यता यामुळे हा लढा खूपच विषम परिस्थितीमधला आहे. न दिसणाऱ्या पण बलाढय़ शत्रूशी होणारी लढाई ही एकप्रकारे अंधारात वार केल्यासारखीच, पण तरीही ती लढायचीच असते. आज ना उद्या हे अंधारातले वार घाव ठरतील आणि परिस्थिती बदलेल या उमेदीने ती लढायची असते. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या पुस्तकाकडे याच भूमिकेतून पाहायला पाहिजे.
हा संपूर्ण कथासंग्रह स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर म्हणजे लेखकाच्याच शब्दात सांगायचं तर थीम बेस्ड् आहे. लक्ष्मीकांत देशमुख हे संवेदनशील सरकारी अधिकारी आहेत. त्यांचे यापूर्वीचे ‘पाणी’ तसंच ‘नंबर वन’ हे दोन कथासंग्रहही थीम बेस्ड् होते. देशमुख २००९ मध्ये कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्या काळात तिथे त्यांनी ‘सेव्ह द बेबी गर्ल-कन्या वाचवा’ हा उपक्रम राबवला होता. आता इतर अनेक जिल्हे, राज्ये हा उपक्रम स्वीकारण्याच्या मार्गावर आहेत. दोन वर्षे या अभियानात काम करताना त्यांना जे अनुभव आले, त्या अनुभवांवर आधारित आठ कथा या संग्रहात आहेत.
मध्यंतरी बीडमध्ये काही स्त्रीभ्रूण फेकून दिलेले आढळले होते. त्याविषयीच्या बातम्या सगळ्यांनीच वाचल्या. पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांची संख्या सतत घटत आहे, याची आकडेवारीही सतत मांडली जात असते. पण या बातम्या आणि आकडेवारीमागची जितीजागती माणसं कोण, ती कसा आणि काय विचार करत असतात, त्यांचं आयुष्य कसं असतं ते या कथा पुढे आणतात. म्हणूनच ‘माधुरी व मधुबाला’, ‘इमोशनल अत्याचार’, ‘लंगडा बाळकृष्ण’, ‘धोकादायक आशावादी’, ‘पोलिटिकल हेअर’ या कथांमधून पुढे येणाऱ्या व्यक्तिरेखा हे आपल्या समाजातलं धगधगतं वास्तव आहे.
मुलगाच हवा हा आग्रह पारंपरिक तसंच अशिक्षित समाजाकडून होत असणार हा समज या कथा पार धुळीला मिळवतात. शेवटच्या भागात या प्रश्नाचा आवाका मांडणारे तीन माहिती तसंच अभ्यासपूर्ण असे परिशिष्टरूपी लेख आहेत.
लेखकाने प्रस्तावनेत आपण या पुस्तकात ललित आणि ललितेतर अशी जोड का घातली आहे याची चर्चा करताना कलावादाचा मुद्दा अगदी थोडक्यात उपस्थित केला आहे आणि कथा आणि लेख एकाच पुस्तकात मांडणं याची इष्टनिष्टता ठरवणं वाचक तसंच समीक्षकांवर सोडून दिलेलं आहे.
‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ – लक्ष्मीकांत देशमुख
मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे -१६४, मूल्य-१६० रुपये.