दिवस-रात्रीचा क्रम जसा अविरतपणे सुरू असतो तसंच तंत्रज्ञानही अविरतपणे कार्यरत असतं. काही वर्षांपूर्वी चाळीतल्या एखाद्याच घरात असलेल्या दूरध्वनीने हळूहळू घरोघरी ठाण मांडलं. त्याचं कौतुक सरतंय- ना सरतंय तोच मोबाइलने मानवी जीवनात शिरकाव केला. या भ्रमणध्वनीची भूल पडत असतानाच त्याची जागा स्मार्टफोनने घेतली आणि जगच बदलून गेलं. पुढे टॅब्लेट, टॅब, फॅब्लेट असे एकेक अवतार घेत स्मार्टफोन आता ‘परिधानक्षम’ (वेअरेबल) गॅझेटच्या रूपात लोकांच्या अंगाखांद्यावर खेळू लागला आहे.
ही सगळी प्रगती गेल्या दशकभरातली. जगासह भारतातही जवळपास एकाच वेळी नोंदवली गेलेली. पण या साऱ्यांनी तंत्रज्ञानाला मानवी जीवनाचं अंग बनवून सोडलं. तंत्रज्ञानाची घोडदौड इथेच थांबलेली नाही. अमेरिकेत शिकागोमध्ये दरवर्षी भरणाऱ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो या मेळय़ावर नजर टाकली तरी नव्या वर्षांत आपला कोणत्या तंत्रज्ञानाशी सामना होणार आहे, याचा अंदाज येतो. जगभरातील १६०० हून अधिक कंपन्यांची आगामी उत्पादने आणि योजना या प्रदर्शनात मांडण्यात येतील. या प्रदर्शनात काय काय पाहायला मिळेल, हे सांगणं अवघड आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या वक्राकार टीव्हीची संकल्पना पुढे नेऊन एलजीकडून वक्राकार मॉनिटर सादर केले जाऊ शकतील. सॅमसंगने अगदी गुंडाळी करता येईल अशी स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनची तयारी चालवली आहे. याशिवाय ‘स्मार्ट होम’ या संकल्पनेला धरून अनेक उत्पादने यंदा पाहायला मिळतील. ‘फोर के’ तंत्रज्ञानातही नवे बदल अनुभवता येतील. ‘सीईएस’मधील उत्पादनं ही २०१५ ची ‘झांकी’ असतील. मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा झपाटा पाहिला तर २०१५ च्या अखेरीस ते कुठे पोहोचलेलं असेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण गेल्या काही वर्षांपासून चर्चिलेल्या गोष्टी यंदा नक्कीच सामान्यांपर्यंत पोहोचलेल्या असतील.
स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात महिन्यागणिक होणारा बदल या वर्षीही कायम राहील. पण मोठा आकार, अधिक स्पष्टता, अधिक सुविधा आणि कमी किंमत हे यशाचं सूत्र कंपन्यांना जपावं लागेल. पाच इंची स्मार्टफोनना टक्कर देणारे सहा इंची ‘फॅब्लेट’ ग्राहकांची अधिक पसंती मिळवत आहेत. त्या जोडीनेच आता लवचीक किंवा वाकवता येणारे स्मार्टफोन बाजारात आपली जागा बळकट करतील. एलजी आणि सॅमसंग या कंपन्यांनी गेल्या वर्षी अशा ‘फ्लेक्सिबल’ फोनची झलक दाखवली होतीच. या वैशिष्टय़पूर्ण गोष्टी वगळता स्मार्टफोनच्या क्षेत्रात अंतर्गत हार्डवेअरमधील सुधारणेपलीकडे फार काही होण्याची शक्यता दिसत नाही. कारण यावर्षी बाजाराचं सर्वाधिक लक्ष ‘वेअरेबल गॅझेट्स’च्या निर्मितीकडेच असेल.
स्मार्टवॉचच्या निर्मितीने २०१४ हे वर्ष गाजवलं. पण त्या वर्षांचा बराचसा काळ या उपकरणाच्या विकास आणि संशोधनात गेला. यंदा मात्र ही गॅझेट्स तुम्हा-आम्हापर्यंत पोहोचताना दिसतील. आपल्या हालचाली टिपून त्याची नोंद ठेवणारी (अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर) ही उपकरणे २०१५ मधील सर्वात लोकप्रिय असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यातच अ‍ॅपलचं ‘स्मार्टवॉच’ या गॅझेटना बाजारात केंद्रस्थानी आणेल.
पण या उपकरणांची जागा केवळ दंडापुरती मर्यादित राहणार नाही. डोळ्यांवर चढवता येणाऱ्या गुगल ग्लाससारखी अनेक स्मार्टग्लासेस या वर्षांत येऊ घातली आहेत. डोळ्यांवर चढवल्यानंतर वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारे ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ (व्हीआर) हेडसेट्स गेमिंगच्या क्षेत्रात नवीन ट्रेंड रुजवत आहेत. हार्डवेअरचा आकार जसजसा लवचीक आणि पातळ होत जाईल, तसतसं परिधानक्षम गॅझेटचे प्रकारही वाढत जातील. पण ही प्रगती येथेच थांबत नाही. येत्या काळात अंगावरचा शर्ट, मोजे किंवा ड्रेसदेखील ‘स्मार्ट’ झालेला दिसेल. ‘ई टेक्स्टाइल’च्या नावानं हे तंत्रज्ञान विकसित होत आहे. ते २०१५ मध्ये नवा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. असे ‘स्मार्ट कपडे’ अनेक ठिकाणी उपयुक्त ठरतील. लढाईवर असलेल्या सैनिकांचे निश्चित स्थळ सांगणे असो की एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तदाब, मधुमेह यांवर लक्ष ठेवणे असो, वा तापमानानुसार शरीराला थंड किंवा गरम ठेवणे असो, हे स्मार्ट कपडे तंत्रज्ञानाला नवी उंची गाठून देतील.
त्रिमितीय मुद्रण (थ्रीडी प्रिंटिंग) गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. पण २०१५ हे वर्ष त्याच्या प्रत्यक्ष उपयोगाचे ठरेल. ‘गार्टनर’ या माहिती तंत्रज्ञानातील संस्थेच्या एका अहवालानुसार, २०१५ मध्ये थ्रीडी मुद्रणाच्या किमती तब्बल ९८ टक्क्यांनी घटतील. त्यामुळे इमारतीचे आराखडे, मोठमोठय़ा प्रकल्पांचे नकाशे, कृत्रिम मानवी अवयव, यंत्रांचे सुटे भाग निर्माण करण्यासाठी थ्रीडी प्रिंटिंग हा सहज-सोपा उपाय ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कंपन्यांचा उत्पादनखर्च कमी होईलच; शिवाय वेळही वाचणार आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) : गेल्या वर्षांत औत्सुक्याचा विषय बनलेलं हे तंत्रज्ञान आपल्या अचाट कामगिरीसाठी यावर्षी सज्ज होईल. अनेक वस्तूंना इंटरनेटशी जोडून त्यांना स्वयंचलित वा नियंत्रित करण्याला ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणता येईल. एलजी कंपनीने गेल्या वर्षी ‘सीईएस’मध्ये एक रेफ्रिजरेटर सादर केला होता. हा रेफ्रिजरेटर केवळ पदार्थाचं तापमान नियंत्रित करत नाही, तर फ्रीजमधील प्रत्येक पदार्थाचं मोजमापही करतो. उदा. दूध संपल्याची आठवण करून देणे, कोणत्या भाज्या किती प्रमाणात आहेत याची माहिती पुरवणे, इत्यादी. घरातल्या प्रत्येक वस्तूशी असा ‘स्मार्ट’ संवाद साधण्याची सुविधा देणारे हे तंत्रज्ञान २०१५ मध्ये बाजारात नक्की येईल. वैद्यकीय, वाहतूक, बांधकाम, ऊर्जाबचत, पर्यावरण संरक्षण अशा अनेक क्षेत्रांत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या साह्याने आमूलाग्र विकास घडवता येईल. ‘एबीएस रिसर्च’ कंपनीच्या अंदाजानुसार, येत्या सहा वर्षांत ३० अब्जाहून अधिक उपकरणे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’शी जुळलेली असतील. ही सगळी उपकरणे आपल्या स्मार्टफोनशी जोडली जातील आणि स्मार्टफोनवरूनच त्यांना कार्यान्वित/ खंडित करता येईल.
स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया अशा विविध माध्यमांतून वापरकर्त्यांच्या माहितीचा गुप्त खजिनाच कंपन्यांसमोर खुला झाला आहे. ही माहिती नवनवीन ग्राहक जमवण्याच्या प्रयत्नांत असलेल्या कंपन्यांना पुरवली जात असते. त्यातून माहिती पुरवणाऱ्या कंपन्यांना बक्कळ मोबदलाही मिळतो. पण २०१५ मध्ये ही माहिती एखाद्या व्यवसायाचं भांडवल ठरेल इतपत या क्षेत्रात उलाढाल होणार आहे. वापरकर्त्यांच्या माहितीचं वर्गीकरण करून, त्यानुसार दर आकारून ते विकण्याचा धंदाच तंत्रज्ञान क्षेत्रात रुजू होण्याची शक्यता आहे. अर्थात हे सारं होत असतानाच वापरकर्त्यांची माहिती गुप्त ठेवण्यासाठीचं तंत्रज्ञानही विकसित होईलच. मात्र, आज जागतिक बाजारपेठेत ग्राहक कमावण्याची स्पर्धाच इतकी तेजीत आहे, की माहितीच्या विक्री व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही.    ठ