09 August 2020

News Flash

स्पेक्ट्रॉस्कोपी

माणसाच्या मनातील भावनांची जर स्पेक्ट्रॉस्कोपी केली तर मिळणाऱ्या रिझल्टच्या एका टोकाला प्रेम असेल, तर दुसऱ्या टोकाला राग.

| August 3, 2014 01:08 am

माणसाच्या मनातील भावनांची जर स्पेक्ट्रॉस्कोपी केली तर मिळणाऱ्या रिझल्टच्या एका टोकाला प्रेम असेल, तर दुसऱ्या टोकाला राग. प्रकाशाची तिरीप लोलकामधून जावी आणि त्याचे सात रंगांत पृथक्करण व्हावे, तशीच ही अवस्था. एकाच तारेला ताण देऊन तिची कार्यान्वित लांबी वेगवेगळ्या िबदूंवर खंडित केल्यास वेगवेगळ्या ध्वनिलहरी उत्पन्न व्हाव्यात आणि त्यांना आम्ही ‘श्रुती’ म्हणून संबोधावे, तसाच हा प्रकार. भावनांची तार एकच; टोके मात्र दोन.
प्रेम बघताचक्षणी बसावे आणि कधी कधी रागही दृष्टीस पडताच यावा. प्रेम अथांग, तर राग अनावर व्हावा. प्रेमापुढे इतर गोष्टी फिक्या पडाव्यात, तर रागापुढे इतर बाबींचे रंग उडावेत. प्रेमात भान हरपावे, तर रागात भान सुटावे. दोहोंचाही अतिरेक आततायी, मर्यादा ओलांडणारा आणि क्लेशकारक ठरावा. एखादे असे कृत्य मग हातून घडावे- ज्याच्याबद्दल पश्चाताप करण्याची वेळ यावी.
प्रेमाची परिणती हव्यासात होते. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर मालकी हक्क गाजविण्याची वृत्ती जागृत होते. प्रेमातून अपेक्षा जाग्या होतात. त्याने/ तिनेही आपल्यासाठी अमुकतमुक करावे असे वाटणे म्हणजे अपेक्षांना पालवी फुटणे. हे बांडगुळ पुढे असे काही वाढते, की मूळ वेलीचा जीव घुसमटायला लागतो. मग ती व्यक्ती तशी वागली नाही की अपेक्षाभंगाचे दु:ख, निराशा पदरी येते. नराश्यातून आपण फसविले गेल्यासारखे वाटते आणि मग राग येऊ लागतो. प्रेमातून राग हा असा निर्माण होतो. तो निर्माण झाला, की स्पेक्ट्रॉस्कोपीचा आलेख पूर्ण!
प्रेम आणि राग या दोन्ही भावनांना मर्यादा नसतात. म्हणून आपण आयुष्यात प्रयत्नपूर्वक प्रेमाची निवड करावी. ते आयुष्य सुंदर करते. जगण्याला अर्थ आणि अस्तित्वाला परिमाण देते. पण आज जगण्याची पंचाईत अशी झालीय की, काय वापरावयाचे आणि कशावर प्रेम करायचे, याची आपली गल्लत झाली आहे. आपण माणसे वापरतो आणि वस्तूंवर प्रेम करतो. वास्तविक पाहता हे उलटे असावयास हवे. जगात वावरताना आपण शब्द विचारपूर्वक वापरावयास हवेत. कारण विचारांचे शब्द बनतात आणि शब्दांचे बाण. शब्दांना कृतीची साथ मिळते, म्हणून कृतीवर नजर ठेवावयास हवी. कृतींमधून सवयी लागतात. सवयींमधून संस्कृती घडते, चारित्र्याचा उदय/अस्त होतो आणि चारित्र्याने सटवाई आपला मळवट भरते.
प्रेम आणि राग या दोन्हीही भावना आपल्या दोन डोळ्यांसारख्या असतात. जन्मभराच्या सख्ख्या शेजारी. त्या एकत्र फडफडतात, एकत्र आयुष्य जगतात आणि एकत्रपणेच आयुष्याला अर्थ देतात. १९९० च्या दशकात केट बुशने गायलेल्या ‘Love and anger’ गाण्याच्या पंक्ती होत्या..
It lay buried here. It lay deep inside me
It’s so deep I don’t think I can speak about it.
भूतकाळ आणि भविष्यात गुरफटू नका. अतिविचाराला बळी पडू नका. संयमाने वर्तमान सावरा. प्रेम आणि राग यांची गल्लत करू नका. त्यांना एकाच वेळी थारा देणे म्हणजे विषप्राशन करून निरोगी राहिल्यासारखे होईल. आणि नकारात्मक भावना या जात्याच अधिक सशक्त आणि रेंगाळणाऱ्या असतात. तेव्हा त्यांत गुरफटून न जाता त्या तणाप्रमाणे लवकरात लवकर उपटून टाकणे, हेच श्रेयस्कर. अन्यथा अनर्थ ओढवतो, हेच खरे.
..हा लेखांक मनात रेंगाळला याचे कारण- माझे फेसबुकस्नेही अरिवद कुलकर्णीनी पाठविलेला एक उतारा. कालच घेतलेल्या नव्या चकचकीत गाडीला एक गृहस्थ पॉलिश करत होता. तेवढय़ात त्याचे लक्ष त्याच्या सहा वर्षांच्या मुलाकडे गेले. एका अणकुचीदार दगडाने तो नव्या गाडीच्या दरवाज्यावर काहीतरी खरवडून कोरत होता. गृहस्थाचा राग अनावर झाला. जिच्यावर त्याचे अतोनात प्रेम होते त्या नव्या गाडीवर स्क्रॅचेस? मुलगा असला म्हणून काय झाले? हातातल्या वेताच्या छडीने त्याने मुलाचा हात फोडून काढला. इतकी फ्रॅक्चर्स झाली, की बोटांची पेरे तळहातापासून अलग झाली. तीन बोटे काढावी लागली. रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर मुलाने बाबाला विचारले, ‘‘बाबा, माझ्या तळहाताला परत बोटे कधी फुटतील?’’ बाबाचा शोक अनावर झाला. हुंदके देत तो बाहेर आला. पोर्चमध्ये ती गाडी उभी होती. दरवाज्यावर मुलाने खरवडले होते.. ‘‘Daddy, I love you.’’ बाबाने आत्महत्या केली.
..स्पेक्ट्रॉस्कोपी आलेखनाच्या टोकाकडून माघारी फिरण्यात तो अपयशी ठरला होता.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2014 1:08 am

Web Title: spectroscopy 2
Next Stories
1 या माझ्या लाडक्या देशात..
2 शिडी आणि केळी
3 ‘ऐ चिकणे, जरा सुनो’
Just Now!
X