‘मॅडम, वॉचमन गाडी पार्क करू देईल ना तुमच्या सोसायटीत?’
‘हो, देईल की.’
‘ठीक आहे. पाच-दहा मिनिटांत पोचतो आम्ही तुमच्याकडे.’
नाशिकहून निघाल्यापासून संदीपचा हा आठवा फोन होता. माझ्याच एका रुग्णाच्या सांगण्यावरून तो माझ्याकडे येत होता. नाशिकमध्ये स्वत:चा लघुउद्योग असलेल्या संदीपला, गेली चार-पाच वर्षे सर्दीचा खूप त्रास होत होता, एवढीच माहिती होती मला त्याच्याबद्दल!
अपेक्षेप्रमाणे दहा मिनिटांत तो सपत्नीक येऊन हजर झाला. माझ्या केबिनमध्ये शिरल्यावर, आजाराची चर्चा करण्याऐवजी त्यानं पहिला प्रश्न विचारला, ‘मॅडम इथे जवळपास कुठे प्लॅस्टिकचे कॅन मिळतात का हो? मोठे? १६ लिटरचे?’
(वैद्यांना लोक काय विचारतील याचा नेम नसतो. रुग्णांना तोंड उघडण्याची संधी फक्त वैद्यासमोरच मिळते ना?!) ‘म्हणजे माझं तुमच्याशी बोलून होईपर्यंत माझी मिसेस (पक्षी बायको/पत्नी) कॅन घेऊन येईल. जरा र्अजट आहे.’ संदीपनं पुस्ती जोडली.
मला असं दुकान जवळपास असल्याचं काही स्मरेना. मी म्हटलं, ‘तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी होलसेल मार्केट हवं असेल, तर ते इथून लांब आहे.’ संसाराचं रहाटगाडगं चालवण्यासाठी १६ लिटरचा कॅन, र्अजटरीत्या कुणी घेतल्याचं मी तरी आजपर्यंत बघितलं नव्हतं.
‘नाही नाही. आम्हाला एकच कॅन पाहिजे. आमच्याबरोबर नेहमी असतो. पण आत्ता येतानाच्या प्रवासात तो फुटला. आता जाताना प्यायच्या पाण्याची पंचाईत होईल ना?’ संदीपनं मला थोडक्यात परिस्थिती समजावून सांगितली.
‘इतकंच ना? मी मावशींना सांगते ना, तुम्हाला दोन बाटल्या भरून द्यायला.’ मी तोडगा काढला.
‘तसा आमच्याकडे पाच लिटरचा एक कॅन आहे. पण तो मिसेसला लागतो. मला १६ लिटर पाणी लागतं.’ संदीप म्हणाला. हा काय आंघोळीसाठीपण पाणी घेऊन फिरतो की काय, असा विचार मनात चमकला. हसू दाबत मी गंभीरपणे विचारलं, ‘इथूनच परस्पर कुठे फिरायला जाणार आहात का चार-पाच दिवसांसाठी?’ हा खरं तर चोंबडेपणा होता; पण वैद्यांनी तो करावा. संदीपच्या बाबतीत तरी मला तो उपयुक्त ठरला.
‘छे, छे! आम्हाला एका दिवसाला एवढं पाणी लागतं.’ संदीपचं निरागस उत्तर.
‘काय? प्यायला? एका दिवसात १६ लिटर पाणी?’ बंदुकीच्या गोळीसारखे माझे प्रश्न एकामागोमाग एक सुटले.
‘हो.!!!???’
‘कशाला? कुणी सांगितलं? आणि कधीपासून चालू केलाय हा उपक्रम?’
‘कुणी कशाला सांगायला पाहिजे? भरपूर पाणी प्यावं असं वाचतो ना आम्ही सगळीकडे. पाच वर्षांपासून पाणी वाढवायला सुरुवात केली. गेल्या वर्षी १६ लिटरवर येऊन थांबलोय.’ संदीपनं फुशारकीनं सांगितलं.
‘अहो, मग हेच तुमच्या आजाराचं महत्त्वाचं कारण आहे.’ मी निश्चयपूर्वक म्हणाले. इतका वेळ उभ्यानं संवाद करणारा संदीप, माझ्या या वाक्याच्या धक्क्यानं आधी खुर्चीवर बसला. आता आश्चर्यचकित व्हायची त्याची पाळी होती. ‘काय? पण आजपर्यंत मला कुणीच कसं सांगितलं नाही हे? उलट सगळेजण सांगतात खूप पाणी प्यायला?!’
‘कोण सांगतं?’ मी शांतपणे विचारलं.
‘अहो, तिकडे पाश्चात्त्य देशांमध्ये किती संशोधन झालंय या विषयावर?!’
संदीपनं माझं ‘अज्ञान’ दूर करण्याचा एक प्रयत्न केला.
‘बरोबर ना? पाश्चात्त्य देशात! म्हणजे थंड हवामानात. जिथे लोक पाणी मुळातच खूप कमी पितात. कधी कधी तर अजिबात पीत नाहीत. केवळ मांसाहार आणि मद्यपान करतात. यामुळे मलावष्टंभ/ कॉन्स्टिपेशन ही त्यांची सामान्य समस्या आहे. त्यासाठी त्यांना ‘भरपूर पाणी प्या’ असा सल्ला दिला जातो. तेव्हा कुठे ते दिवसाला दोनशे-तीनशे मिलि पाणी पितात. तिकडे जी संशोधने होतात ना, त्यासाठी त्यांच्याकडच्याच सगळ्या गोष्टी प्रमाण मानल्या जातात हो.’ खरं तर संदीपसारख्या शिक्षित व्यक्तीसाठी मी दिलेली माहिती नवीन नव्हती. पण विचार? तो आम्ही करणंच सोडून दिलंय. पाश्चात्त्यांच्या चष्म्यातूनच जग बघायचं ठरवलं की आपल्या मेंदूला कुलूपच लागतं आपोआप!
‘बापरे, म्हणजे आपण असं नसतं करायचं?’ संदीपचा गोंधळलेला प्रश्न.
‘कशाला करायचं? आपल्या देशाचा विस्तार मुख्यत: उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात झालाय. पाश्चात्त्य देशांइतकी थंडी आपल्याकडे जवळजवळ नसतेच. त्यामुळे तहान लागून आपण दिवसभरात एक-दीड लिटर पाणी तसेही पीत असतो. आपल्या शाकाहारी पदार्थामधून, चहा-ताक-आमटी- रस्सा भाजी, इ.मधूनही आपल्या पोटात पाणी जातं. आणखी पाणी पिण्याची काय गरज?’ माझे हे मुद्दे पटण्यासारखेच होते. पण एकदम हार कशी मानणार? म्हणून संदीपनं विचारलं, ‘पण मग पोट साफ कसं होणार?’
‘पोट साफ न होणं ही पाश्चात्त्यांची समस्या आहे हो. त्यांचा अतिरेकी मांसाहार, मद्यपान, बेकरीचे पदार्थ, जलपानाचा अभाव ही त्याची कारणं आहेत. त्यांच्या समस्या आपण आपल्यावर कशाला ओढवून घ्यायच्या? आणि आपलं पोट म्हणजे काय ड्रेनेजचा पाइप आहे का? वरून पाणी ओतलं की झाला साफ, असं नसतं हो.’
प्रश्नोत्तरांचा हा साचा, सगळ्याच वैद्यांच्या पुण्यशाळेत ठरलेला असतो. संदीपसारखे कित्येक ‘तोतया अगस्ति’ आज आपल्याकडे तयार झालेत आणि वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त होऊन, आरोग्याच्या शोधात ते दवाखाना-दवाखाना फिरत असतात. अगस्ति मुनींची गोष्ट वेगळी होती हो. त्यांनी अख्खा समुद्र प्यायला, पचवला आणि योग्य वेळी उत्सर्जितही केला. त्यांची क्षमताच अफाट! असं सांगितल्यावर माझ्या एका रुग्णेनं यावर आक्षेप घेतला होता.
‘असं कसं? पाणी कधी पचवावं लागतं का?’
वस्तुस्थिती अशी आहे की, तोंडातून अन्ननलिकेवाटे पोटात जाणारी कुठलीही गोष्ट ‘पचवावीच’ लागते. अगदी औषधसुद्धा! भरमसाट पाणी पिणं हे पचनशक्ती कमी करणारं आहे. चुलीतल्या अग्निवर पाणी ओतलं तर तो विझतो की नाही? पोटातल्या अग्नचंही तसंच असतं.
आपण शाळेत जे शरीरशास्त्र शिकलो त्या भाषेत सांगायचं तर जास्त पाणी प्यायल्यानं पोटातले पाचकस्राव विरल (डायल्यूट) होतात आणि भराभरा पुढे वाहून जातात.
‘मॅडम, तुम्ही एकीकडे म्हणता की आपलं पोट म्हणजे ड्रेनेज पाइप नाही. आणि तुम्हीच म्हणता की, पाचक स्राव वाहून जातात. हे कसं?’ रुग्ण आपली सगळी तर्कशक्ती, वैद्यांना पेचात पकडण्याच्या प्रयत्नातच वाया घालवतात. दुर्दैवानं, आपण जे जीवशास्त्र शिकलो, त्याच्या आधारे- पण योग्य तर्क लावून विचारच करत नाही आपण. पाचक स्राव कुठे, मल कुठे? तोंडाने प्यायलेल्या पाण्याचा प्रभाव कुणावर जास्त होणार?
‘छे, छे! जास्त पाणी प्यायल्यानं वगैरे काही सर्दी होत नसते.’ एका संगणकतज्ज्ञानं तर हातवारे करत माझं बोलणं अक्षरश: उडवून लावलं.
‘बरं, मग कशाने होते?’ प्रॅक्टिसमध्ये संयम आपोआप वाढतो तो असा.
‘किटाणू, जीवाणू, बॅक्टेरिया यांनी होते.’ तज्ज्ञांचं तज्ज्ञ उत्तर.
‘ते तुमच्यापर्यंत कसे येतात?’ माझा पुन्हा प्रश्न.
‘हवेतून.’
‘तुमचे सहकारी, कुटुंबीय, शेजारीपाजारी आणि तुम्ही असे सगळे एकाच हवेत श्वास घेता ना? की तुमची श्वास घेण्याची हवा वेगळी आहे?’
‘म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला?’
‘नाही म्हणजे त्यांना सर्दी होत नाही आणि तुम्हालाच का होते?’ संगणक तज्ज्ञांसाठी माझा हा प्रश्न यॉर्कर ठरला. त्याचं उत्तर अर्थात मलाच द्यावं लागलं. ‘कारण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आपण शरीरात त्या विशिष्ट जीवांना अनुकूल वातावरण तयार करून दिलेलं असतं.’
‘पण आयुर्वेदात सांगितलंय ना सकाळी उठून भरपूर पाणी प्यावं म्हणून?’
हा एक बाण मात्र बहुतेक सगळ्यांचा चुकून बरोबर लागतो.
‘हो ना! तुम्ही किती वाजता उठता?’
‘सात वाजता उठतो. साडेसात वाजता बरोब्बर तीन लिटर पाणी पितो मी.’
‘अहो, आपण डोळे उघडतो त्या वेळेला ‘सकाळ’ म्हणत नाहीत. आयुर्वेदच पाळायचा तर सुरुवातीपासून पाळायला हवा. सूर्योदयापूर्वी किमान दोन तास म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठायला हवं त्यासाठी.’
थोडक्यात काय, पाण्यावरून जगातलं तिसरं महायुद्ध व्हायचं तेव्हा होऊ दे; सध्या मात्र वैद्यकीय क्षेत्रात या पिण्याच्या पाण्यावरून मतांचं महायुद्ध सुरू आहे, हे खरं. आपले सुश्रुताचार्य सांगतात, ‘पिबेत् स्वस्थोऽपि अल्पश:।’ म्हणजे निरोगी मनुष्यानंसुद्धा कमीच पाणी प्यावं. निरोग्याला इतकं रेशनिंग, तर रोग्याला किती असेल बघा.
आपण किती खावं, किती प्यावं हे खरं तर इतके किचकट विषय नाहीत हो. आपण काही तराजू, दुधाचं माप, कॅलरी मोजायचं यंत्र असं घेऊन जेवायला बसत नाही ना? भूक लागणं आणि तहान लागणं या जाणिवा निसर्गानं दिल्यात की आपल्याला! पण आपण आपल्या शरीराचं ऐकतोच कुठे? आगगाडीनं प्रवास करताना, बाहेर कुठलं स्थानक आलंय हे फलाटावरच्या फलकावर न बघता, आपल्या भ्रमणध्वनीत शोधायची सवय लागली आहे आपल्याला. हातच्या कंकणाला आपल्याला आरसाच लागतो आजकाल. आपल्या शरीराच्या सूचना आणि आक्रोश आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. नेटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आपण आपले खाण्या-पिण्याचे नियम ठरवतो. ही ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’ नाही का? आपल्या साध्या-सोप्या-हितकर-आरोग्यकर अशा नैसर्गिक जाणिवा आपण हरवत चाललोय.
आपली ही अतक्र्य आणि अतिरेकी ‘वैज्ञानिक अंधश्रद्धाच’ आपल्याला अनारोग्याच्या (आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीला विनाशाच्या) खाईत लोटतेय.
‘सावधान मानवा.’
(भाग १)

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Helper wanted in momo shop salary
मोमोच्या दुकानात हवाय मदतनीस, जाहिरात होतेय व्हायरल, पगाराचा आकडा पाहून प्रत्येकाला हवी आहे ही नोकरी
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO