News Flash

१९४५ : सुएझ कालवा

मोरेश्वर काशीनाथ पिटकर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोस्टल सेवेत असताना ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सुभेदार मेजर’ या हुद्दय़ावर कैरोला पाठवले होते.

| August 25, 2013 01:01 am

मोरेश्वर काशीनाथ पिटकर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोस्टल सेवेत असताना ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सुभेदार मेजर’ या हुद्दय़ावर कैरोला पाठवले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सुएझ कालव्यातील प्रवासाचं वर्णन करणारं सुंदर पत्र लिहिलं होतं. ६८ वर्षांपूर्वी लिहिलेले हे पत्र..
सुएझचा कालवा जगातील आठ आश्चर्यापकी एक! तो आमच्या बोटीने तारीख १३ नोव्हेंबर १९४५ रोजी रात्री ओलांडला. आमची बोट जरी सुएझ बंदरात दुपारी येऊन पोचली होती तरी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तिला कालव्यात शिरण्याची परवानगी मिळाली नाही. साडेपाच वाजता सुएझ बंदरातील पायलट बोटीवर चढला. दोन लहान होडय़ा खलाशांसह बोटीच्या दोन्ही बाजूंस लटकावल्या गेल्या आणि मग बोट चालू झाली. बोटीचा वेग ताशी फक्त पाच मैल असल्याने बोट मुंगीच्या पायाने चालल्यासारखी वाटत होती. कालव्याच्या तोंडाशी ‘तौफिक’ नावाचे बंदर आहे. तेथील बांधलेले धक्के, लहान लहान बंगले व आखीव रस्ते बोटीच्या वरच्या डेकवरून आणखीनच लहान- म्हणजे खेळातल्या नमुन्याप्रमाणे दिसत होते. सूर्य साडेपाचलाच मावळला होता. पण शुद्ध अष्टमीचे चांदणे असल्याने आजूबाजूचा देखावा अस्पष्ट का होईना, पण दिसत होता. तौफिक बंदराच्या तोंडाशी बॅरेन डी. लेसेप्सचा- ज्याने हा कालवा बांधण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले त्याचा- मोठा पुतळा आहे. पाच-दहा मिनिटांत आमची बोट नसíगक तौफिक बंदर मागे टाकून मनुष्यनिर्मित जलमार्गात शिरली. कालव्याच्या दोन्ही बाजूंस वाळूच्या बारीक बारीक टेकडय़ा असलेल्या वाळवंटाखेरीज काहीही दिसत नव्हते. मागे सुएझ व तौफिक बंदरातील दिवे लहान लहान होत चालले होते. या ठिकाणी कालव्याच्या दोन्ही बाजू दगडांनी बांधून काढलेल्या दिसत होत्या. खणून काढलेल्या कालव्याची रुंदी १५० फूट व खोली ३०-४० फूट असावी. आमची बोट १०,८०० टन वजनाची, अडीच हजार उतारू व माल घेऊन जाणारी- म्हणजे मध्यम प्रतीची होती. तरीसुद्धा तिच्या बाजूने दुसरी बोट जायला कालव्यातून मार्ग नव्हता. पाण्यामध्ये तरत्या लोखंडी गोळ्यावर लाल व हिरव्या रंगांचे दिवे अंतराअंतराने बसविलेले दिसत होते. त्यापकी लाल रंगाचे आफ्रिकेच्या बाजूस व हिरवे आशियाच्या बाजूस होते.
ऐन लढाईच्या धामधुमीत या कालव्यावर पुष्कळ वेळा बॉम्बहल्ले झाले होते व शत्रूच्या विमानांनी पाण्यात सुरुंग टाकले होते. त्या हल्ल्यांत सापडलेल्या बोटींचे काही भाग आफ्रिकेच्या किनाऱ्यावर मधूनमधून दिसत होते. कालव्याच्या आफ्रिकन किनाऱ्यावर अधूनमधून लाकडी सिग्नल स्टेशने दिसत होती. त्यात असणारे कॅनॉल कंपनीचे लोक येणाऱ्या-जाणाऱ्या बोटींना पुढील मार्ग खुला असल्याबद्दल दिवसा निशाणांनी व रात्री निरनिराळ्या रंगांच्या दिव्यांनी खुणा करून कळवीत असतात. चुकून समोरासमोर जर दोन बोटी आल्या, तर अशा ठिकाणी एक बोट धक्क्याला लावून दुसरीला वाट देण्याचीही सोय केलेली आहे. सुएझ बंदरात ज्या दोन लहान होडय़ा बोटीच्या बाजूस लटकावल्या होत्या, त्या अशा प्रसंगी खाली सोडून बोटीचा दोरखंड किनाऱ्याला बांधण्याच्या कामी उपयोगी पडतात. अशा तऱ्हेची १५ स्टेशने कालव्याच्या किनाऱ्यावर आहेत. अशा रीतीने आमची बोट १० वाजेपर्यंत पुढे गेल्यावर समोर मोठा वाढलेला पाण्याचा विस्तार व दूर किनाऱ्यावर विजेच्या दिव्यांच्या रांगा दिसू लागल्या. सुएझ सोडल्यापासून जेवणाच्या वेळेखेरीज आम्ही डेकवरच होतो. माझ्याबरोबर मुंबईचे एक अँग्लो-इंडियन मि. मॅक्लीन- ज्यांनी एका इटालियन बाईशी लग्न करून आता अलेक्झान्द्रियाला आपले घर केले आहे, तेही होते. मि. मॅक्लीन हे निरनिराळ्या बोटींवर थर्ड इंजिनीअर म्हणून काम करीत असतात. त्यामुळे या कालव्यातून जाण्याचा त्यांना पुष्कळ वेळा योग आला होता. समोरील देखाव्यासंबंधी आम्ही त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, ‘‘आता आपली बोट ‘बिटरलेक’ नावाच्या खाऱ्या पाण्याच्या मोठय़ा सरोवरात शिरत आहे. कालवा खणण्याचा त्रास वाचवावा म्हणून तो अशा तीन सरोवरांतून नेलेला आहे. त्यापकी हे पहिले ‘लिटिल बिटरलेक’! त्याला जोडूनच दुसरे ‘ग्रेट बिटरलेक’ अगर ‘अप्पर सरोवर’ व कालव्याच्या मध्यावर ‘लेक टिमसाह’ म्हणजे ‘मगरींचे सरोवर’ अशी आहेत. समोर दिसणाऱ्या विजेच्या रांगा म्हणजे इटालियन युद्धकैद्यांच्या बराकी आहेत,’’ अशी माहिती त्यांनी दिली. इटलीवर पाण्यातून हल्ला करण्याच्या मोहिमेची पूर्वतयारी व सरावही याच सरोवरात केला गेला होता. दोन्ही सरोवरांची लांबी मिळून अंदाजे ३०-४० मल असावी.
रात्रीचे साडेअकरा वाजून गेले तरी आमची बोट सरोवरातच होती. आता झोप यायला लागली म्हणून पुढील देखावा पाहण्याचे सोडून आम्ही आपापल्या केबिनमध्ये जाऊन निजलो. पण स्वस्थ झोप कुठली लागायला? मनात विचार येतच होते, की जर बोट दिवसा या कालव्यातून गेली असती तर आपल्याला सर्व कालवा पाहावयास मिळाला असता. पण तेवढे आपले नशीब नाही. म्हणून डोळे मिटले. मग मात्र झोप केव्हा लागली ते समजलंही नाही. पण मनात मात्र कालवा पाहण्याची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे सकाळी साडेचारलाच जागा झालो. शौच-मुखमार्जन व दाढी उरकून युनिफॉर्म चढवला आणि पुन्हा डेकवर जाऊन हजर झालो तो सकाळचे साडेपाच वाजले होते. बोटीच्या समोर तेलाच्या मोठय़ा मोठय़ा टाक्या असलेले एक बंदर दिसत होते. हवेत पेट्रोल व इतर खाणीतील तेलाचा वास पसरला होता. दहा-पंधरा मिनिटांत बोट सुएझ कालव्याच्या दुसऱ्या तोंडाशी म्हणजे ‘पोर्ट सद’ येथे येऊन पोचली. या ठिकाणी बोटीने तेल, पाणी व ताजा भाजीपाला यांचा भरणा करून घेतला. कैरोला जाणारे उतारू या ठिकाणी उतरले. मीही त्यांच्याबरोबर तराफ्यात उतरलो. मनात सारखे येत होते की, बोट जर दिवसा कालव्यातून आली असती तर सबंध कालवा डोळ्यांनी पाहावयास मिळाला असता. परंतु सर्वच गोष्टी मनाप्रमाणे कशा घडणार! तराफ्यातून धक्क्यावर उतरून हातगाडीवर सामान घालून हमालाबरोबर रेल्वेस्टेशनवर गेलो. स्टेशन जवळच होते. या ठिकाणी इजिप्तचे लोक पहिल्यांदाच जवळून पाहावयास मिळाले. शहराचा थोडासा भागही दिसला. स्टेशन तितकेसे चांगले नाही. आपल्या इकडील कल्याण स्टेशनासारखे वाटले. प्लॅटफॉर्म मात्र दोनच होते. साडेबाराला कैरोला जाणारी गाडी सुटली. गाडी आपल्या इकडील गाडीपेक्षा जराशी अरुंदच वाटली. शहराच्या बाहेर पडल्यावर गाडी सरळ कालव्याच्या बाजूने मागे जात होती. कालवा दिवसा पाहण्याची तीव्र इच्छा अशा रीतीने परमेश्वराने पुरी केली. पोर्ट सदपासून उलट मागे ५०-६० मलांपर्यंत कालव्याला समांतर अशी गाडी गेली व ‘इस्मालिया’ स्टेशनपासून उजव्या बाजूला कैरोकडे वळली. दिवसा जो कालव्याचा भाग पाहिला तो सर्व खणून आणि बांधून काढलेला होता. आतून जाणाऱ्या बोटी आता आम्ही आगगाडीतून पाहत होतो. कालव्याला समांतर अशी एक डांबरी सडक थेट सुएझपर्यंत गेलेली आहे व बाजूने नाईल नदीचा एक गोडय़ा पाण्याचा कालवाही सडकेप्रमाणेच जाताना दिसला. या कालव्यामुळे पोर्ट सद, इस्मालिया वगरे शहरांना व कॅनॉल कंपनीच्या ठिकठिकाणी असलेल्या सिग्नल स्टेशनांवरील लोकांना गोडय़ा पाण्याचा पुरवठा होतो. अशा रीतीने या जगप्रसिद्ध कालव्याचा जवळजवळ दोन-तृतीयांश भाग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावयास मिळाला.
पश्चिमेकडील युरोपियन लोकांना िहदुस्थानचा शोध लागल्यापासून भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडणारा दुवा तयार करण्यासंबंधी बरेच दिवस काळजी लागून राहिली होती. पुष्कळांनी तसे प्रयत्नही केले होते. नेपोलिअन बोनापार्ट याच्याही मनात नाईल नदीतून तांबडय़ा समुद्रात जाण्याचा मार्ग काढण्याची कल्पना होती, असे म्हणतात. पण ते कार्य फर्डिनांड-दी-लेसेप्स याच्या हातून पार पडायचे होते. त्याने हा कालवा खणण्याची कल्पना १८५४ मध्ये पहिल्यांदा इजिप्तचा व्हाइसरॉय मोहम्मद सद पाशा याला पेश केली. १८५६ मध्ये कालवा खणण्यास परवानगी मिळून कामाला प्रत्यक्ष सुरुवात १८५९ मध्ये ‘सुएझ कॅनॉल कंपनी’ फ्रान्समध्ये स्थापन होऊन करण्यात आली. १७ नोव्हेंबर १८६९ या दिवशी कालव्याचा उद्घाटन समारंभ करण्यात येऊन त्या दिवशी भूमध्य समुद्रातून तांबडय़ा समुद्रात इंग्लिश व इतर युरोपियन राष्ट्रांच्या बोटी मोठय़ा समारंभाने पहिल्यांदाच या कालव्यातून गेल्या. या कालव्याची एकंदर लांबी १२५ मल आहे व त्यापकी तीन-चतुर्थाश भाग खणून काढलेला आहे. खणून काढलेल्या भागापकी निम्मा भाग दगडांनी बांधून काढलेला व बाकीचा समुद्रसपाटीच्या खाली असल्याने तसाच सोडलेला आहे. कालवा खणण्यासाठी सुरुवातीला ३० कोटी रुपये खर्च आला. या कालव्यामुळे सुमारे तीन लाख वस्तींची तीन मोठी शहरे उदयास आली. पकी पहिली दोन म्हणजे पोर्ट सद व इस्मालिया ही कॅनॉल कंपनीच्या नोकरांना राहण्यासाठी मुद्दाम वसवली गेली व सुएझ- जे एकेकाळी एक लहानसे खेडे होते, ते आता मोठे शहर बनले. या कालव्यामुळे दोन खंडे तुटली, दोन समुद्र जोडले गेले आणि आजपर्यंत हजारो बोटींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाचा प्रत्येकी चार हजार मलांचा फेरा वाचला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2013 1:01 am

Web Title: suez canal 1945 and moreshwar kashinath pitkar
Next Stories
1 जलविज्ञानाची प्रवाही कहाणी
2 सांगोपांग मास्टर दत्ताराम
3 असण्याची सर्जनशील ग्वाही
Just Now!
X