04 March 2021

News Flash

ओ मितवा रे..

तुला वाटेल- आपलं नेहमीचं मराठमोळं संबोधन टाळून हे काय नवीन खूळ काढलंय?

सॅबी परेरा

माय डियर फ्रेंड दादू..

तुला वाटेल- आपलं नेहमीचं मराठमोळं संबोधन टाळून हे काय नवीन खूळ काढलंय? पण मी काय म्हणतो- दिवस, महिने, वर्ष आपण इंग्लिश मानतो, व्हॅलेंटाइन डेपासून किस डे, हग डे असे सगळे बरे-वाईट इंग्लिश दिवसही साजरे करतो. खायला-प्यायला बर्गर, पिझ्झा, सॉसेजेस, कॉकटेल, मॉकटेलसारखे पाश्चात्त्य पदार्थ खातो. इतकंच काय, तर टॉयलेटमध्येही आपण इंग्लिश कमोडशिवाय बसत नाही. ३१ डिसेंबर हा इंग्लिश वर्षांचा शेवटचा दिवस आपण जितक्या जोशात साजरा करतो, तितक्या जोशात तर खुद्द इंग्रजसुद्धा करत नसतील. या सगळ्या सेलिब्रेशनला इंग्लिश पेय घेतल्याशिवाय आपलं पान (आणि आपणसुद्धा!) हलत नाही, तर सांगायचा मुद्दा हा की, आज फ्रेन्डशिप डे असल्याने काल संध्याकाळी काही मित्र भेटले आणि त्यामुळे रात्रीपासून माझ्यावर इंग्लिशचा थोडासा प्रभाव आहे. तू मला आणि या पत्रातील माझ्या इंग्लिशला समजून घेशील अशी आशा आहे. बाय द वे.. गप्पांच्या ओघात विसरायच्या आधीच विश करून घेतो.. हॅप्पी फ्रेन्डशिप डे!

दादू, असा कुठलाही विशेष दिवस आला की मी त्या विषयाच्या आठवणीचं कपाट उघडतो आणि उघडताच आपल्या वाटय़ाला आलेल्या एक-चतुर्थाश कपाटातूनही बायकोच्या साडय़ा बदाबदा खाली पडाव्यात तसा आठवणींचा खच पडू लागतो.

या वर्षी फ्रेन्डशिप डेच्या दुसऱ्याच दिवशी नागपंचमी आलीय. हा निव्वळ योगायोग आहे की आपल्या पक्षातून इतर पक्षात पक्षांतर करणारा आजचा फ्रेंड हा उद्याचा नाग ठरू शकतो असा दैवी इशारा आहे, हे जाणत्या राजाला विचारून घ्यायला हवं.

यार दादू, काही लोक भूतकाळाच्या स्मरणरंजनातून- म्हणजेच नॉस्टेल्जियातून बाहेर यायला तयारच नसतात. त्यांना भूतकाळातलं सगळंच चांगलं आणि वर्तमानकाळातलं सारं काही वाईट दिसतं. त्यांच्या लेखी आमच्या काळातलं बालपण, आमच्या काळातले खेळ, आमच्या काळातली शाळा, आमच्या काळातले कष्ट, आमच्या काळातले प्रेम, आमच्या काळातले मित्र, एका लायनीत शेताच्या बांधावर उभारून धार मारायची स्पर्धा, कनातीखालून घुसून बिनतिकिटाचे पाहिलेले सिनेमे, चुना लावलेल्या दगडाखाली लपवलेलं गुलाबी पत्र, आमच्या काळातली धम्माल.. अशा भूतकाळातल्या सगळ्याच गोष्टींना सोन्याचा वर्ख असतो आणि वर्तमानकाळ मात्र कामचलाऊ बेन्टेक्सचा असतो. अशा भूतकाळाच्या चिखलात रुतलेल्या एका मित्राशी आम्ही बोलत असताना ऑफिसमधील एक तरुण सहकारी त्याच्या लहानपणीचं काहीतरी सांगू लागला तर माझा हा मित्र त्याला अडवत म्हणाला, ‘‘असेल रे, पण तुमच्या काळातल्या नॉस्टेल्जियाला आमच्या काळातल्या नॉस्टेल्जियाची सर नाही!’’

याउलट, माझा एक मित्र असा आहे की तो नेहमी भविष्यात नॉस्टेल्जिया एन्जॉय करता यावा अशा प्रकारे वर्तमानकाळ जगत आलाय. शाळेत असतानाच तो मला म्हणायचा की, भविष्यात आपण म्हातारे झाल्यावर आठवून आठवून आपल्या बालपणीच्या मत्रीबद्दल कढ काढता येतील असं काहीतरी आत्ताच करायला हवं. त्याच्या नादी लागून मी आमची स्वतची नारळाची बाग असूनही इतरांचे नारळ चोरले आहेत, मास्तरांची टिंगल करून फटके खाल्ले आहेत. त्याच मित्राबरोबर भाडय़ाच्या सायकलवर केलेली लॉंग ड्राइव्ह मोठेपणी लक्षात राहावी म्हणून जाणूनबुजून लाइटच्या खांबाला सायकल ठोकली आहे. मोठेपणी इतरांना सांगण्यासाठी आपल्याकडे अतरंगी आठवणी असाव्यात म्हणून असा खूप मूर्खपणा त्याने लहानपणी केलेला आहे आणि माझ्याकडूनही करवून घेतलेला आहे. तसं पाहिलं तर प्रत्येकाला मूर्खपणा करण्याचा जन्मसिद्ध अधिकार असतोच; पण माझ्या या मित्रासारखे काही लोक या अधिकाराचाही वाजवीहून अधिक गैरफायदा घेतात असा डाऊट मला येऊन राहिलाय.

कधी कधी मला असं वाटतं की, मित्र असण्यापेक्षा मत्रिणी असणं खूप चांगलं. मी हे असं का म्हणतोय हे तू स्वतच्या आयुष्याकडे वळून पाहिलंस तर तुलाही पटेल. म्हणजे बघ- आपण नापास झालेलो असतो, किंवा आपली नोकरी गेलेली असते, किंवा नुकताच ब्रेकअप झालेला असतो, अशा वेळेला आपले मित्र येतात आणि आपण कसे गाढव आहोत हे आपल्यालाच शिव्या देऊन शिकवतात. आपल्या अपयशावर जोक करतात. मोठमोठय़ाने हसतात. आणि शेवटी म्हणतात, ‘‘चल.. दारू पीते है.’’ अशा मित्रांपेक्षा मैत्रीण हजारपट बरी. ती येते, आपला हात हातात घेते आणि परीक्षेचा पेपरच कसा आऊट ऑफ सिलॅबस होता, बॉसला आपली किंमत कशी कळली नाही, किंवा ती गर्लफ्रेंडच कशी आपल्याला सूट होत नव्हती.. अशी आपली समज काढते. काहीतरी हलकंफुलकं बोलून आपल्याला हसवू पाहते. आपले अश्रू पुसण्यासाठी तिचा ४० स्क्वेअर मिलीमीटरचा रुमाल पुढे करते. आपला मूड चांगला व्हावा म्हणून एखादं भारीपैकी चॉकलेट  हातावर  ठेवते आणि श्रद्धा कपूरसारखा ‘आता रडेल की मग रडेल’ असा केविलवाणा चेहरा करून ‘टेक केअर’ म्हणत निघून जाते.

मत्रिणीचा विषय निघालाय म्हणून सांगतो.. माझ्या एकंदर चम्या दिसण्यावरून आणि धांदरटपणावरून तुला पटणार नाही, पण कॉलेजला असताना माझी एक गर्लफ्रेंड होती. मामला तसा सीरिअस होता. मी तिला माझा ‘पर्मनंट पासवर्ड’ बनवू इच्छित होतो, पण तिनं आपली ‘ओटीपी’ची लक्षणं दाखवली आणि मला दगा देऊन माझ्याच जवळच्या मित्राबरोबर पळून गेली. ती पळून गेली यापेक्षा माझ्याच मित्राबरोबर पळून गेली याचं मला जास्त दुख झालं होतं. तुला खरं सांगतो दादू, संध्याकाळच्या कातरवेळी आजूबाजूला कुणीच नसताना अगदी एकटा बसलेलो असताना मला खूप आठवण येते रे.. त्या मित्राची! त्याच्याबद्दल खूप वाईटही वाटतं. कुणीतरी (म्हणजे मीच!) म्हटलेलं आहेच की, वाटणं- मग ते मनातलं असो की पाटय़ा-वरवंटय़ावरचं- ते व्यवस्थित ठेचता नाही आलं तर डोळ्यातून अश्रू काढल्याशिवाय राहत नाही!

फ्रेन्डशिप डेला सोशल मीडियावर शुभेच्छांचं अंबरनाथ-वांगणी झालेलं असताना मला मात्र माझ्या चार वर्षांपूर्वी अकाली गेलेल्या जीवलग मित्राची आठवण येत राहते. अंगणातून बुलेटवर कुणी जात असल्याचा आवाज आला की मी कान टवकारतो. रस्त्यावर बाजूने सिल्व्हर कलरची इनोवा गाडी गेली की नकळत माझी मान ड्रायव्हर सीटवर कुणाला तरी शोधू लागते. गेलेली व्यक्ती परत येणार नाही हे माहीत असूनही माझं मन त्याच्या आठवणींच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतं. तुला सांगतो दादू, ‘मसान’ सिनेमातला हिरो त्याच्या प्रेयसीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर जे नातंच उरलं नाही त्याची खूण तरी का बाळगावी, या विचाराने आपल्या हातातली एंगेजमेंटची अंगठी नदीत फेकतो आणि लगेच अंगठी शोधण्यासाठी पाण्यात उडीही मारतो, अगदी तशीच गत झालीये माझी. कुणीतरी कधीच परत येणार नाही, हे सत्य पचवणं खरंच खूप अवघड असतं रे!

लोक म्हणतात की, मित्र हा असा शनी आहे की त्याची साडेसाती कधी संपतच नाही. मला काही ते पटत नाही. मी असेही मित्र पाहिलेत, जे अगदी बालवाडीपासून माझ्या सोबत होते; पण पुढे कॉलेजला गेल्यावर आमची बोलीभाषा सोडून अचानक बँड्रा बुद्रुकचे रहिवासी असल्यासारखे इंग्लिश बोलायला लागले आणि आमच्यापासून अंतर ठेवून वागायला लागले. असो. चालायचंच! हे बघ दादू, मी काय म्हणतो, निदान इतरांची मनसोक्त निंदानालस्ती, टिंगलटवाळी आणि गॉसिपिंग करण्यासाठी तरी प्रत्येकाकडे किमान एक ‘बेस्ट फ्रेंड’ असावा.

बेस्ट फ्रेंड कसा असावा, तर हिंदी सिनेमातील दीपक तिजोरीसारखा! कधी तो आपली पोलिसाची नोकरी धोक्यात घालून ‘वास्तव’मध्ये रघू आणि डेढफुटय़ाला मदत करतो, कधी ‘खिलाडी’मध्ये मरेस्तोवर मार खाऊन अक्षयकुमारला मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करायला मदत करतो. ‘आशिकी’मध्ये राहुल आणि अनु एकत्र यावेत म्हणून धडपड करतो. असा दीपक तिजोरीसारखा स्वत: मागे राहून तुम्हाला पुढे ढकलणारा मित्र असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच!

आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की, मी एक नशीबवान माणूस आहे. मला तुझ्यासारखा मितवा मिळाला आहे. (इंग्लिशमधल्या ‘फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइड’ यासाठी किती सुंदर मराठी शब्द आहे ना रे हा! मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाडय़ा.. मि-त-वा!) पण असे आपली वाट पाहणारे, आपल्याला योग्य वाट दाखवणारे मित्र सगळ्यांनाच मिळत नाहीत रे. बऱ्याच लोकांना तर वाट लावणारेच मित्र भेटतात याचं वाईट वाटतं. असो.

तर दादू, तुला आणि आपला हा आरटीआयच्या कक्षेबाहेर असलेला पत्रव्यवहार नेमाने आणि प्रेमाने चोरून वाचणाऱ्या सर्वाना मत्री दिनाच्या हार्दकि शुभेच्छा..

हॅप्पी फ्रेन्डशिप डे!

तुझा फ्रेन्डीन्डीड..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 8:15 pm

Web Title: tapalki article by sabi perera mpg 94 2
Next Stories
1 आतलं गाणं
2 गोव्याच्या अंतस्तराचा उभा छेद
3 रशियन राज्यक्रांतीचा रंजक आढावा
Just Now!
X