नागनाथ बळते

भारती निरगुडकर संपादित ‘तपोनिधी’ हा ग्रंथ महत्त्वाचा असून यात अ. का. प्रियोळकर पुरस्कारप्राप्त आणि मराठी साहित्य व संस्कृतीविषयक मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याविषयी संशोधनपूर्ण लेख संकलित करण्यात आले आहेत.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

अ. का. प्रियोळकर यांच्या कुटुंबियांनी मुंबई विद्यापीठाला जी देणगी दिली आहे, त्यातून प्रतिवर्षी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून मराठीतील हयात असलेल्या एका संशोधकाला, संशोधनाच्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ संशोधकांच्या कार्याचा परिचय आजच्या पिढीला आणि वाङ्मयप्रेमींना व्हावा म्हणून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.

या ग्रंथात अ. का. प्रियोळकर, दु. का. संत, वि. भि. कोलते, श्री. रं. कुलकर्णी, रा. चिं. ढेरे, गंगाधर मोरजे, वि. रा. करंदीकर, गं. ब. ग्रामोपाध्ये, म. रा. जोशी, म. वा. धोंड, कॉम्रेड शरद पाटील, गंगाधर पाटील, द. दि. पुंडे, मा. ना. आचार्य, गो. मा. पवार, सु. रा. चुनेकर, अरुण टिकेकर, विजया राजाध्यक्ष, यू. म. पठाण, तारा भवाळकर, अरुणा ढेरे, रा. शं नगरकर, म. सु. पाटील, उषा मा. देशमुख या मान्यवर संशोधकांच्या कार्याचा आणि मराठी साहित्य संस्कृतीला असलेल्या योगदानाचा परिचय करून देण्यात आला आहे.

या ग्रंथातील सु. म. तडकोडकर यांचा अ. का. प्रियोळकर यांच्यावरील लेख अत्यंत मोलाचा आहे. मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग आणि

अ. का. प्रियोळकर या दोन्ही घटकांना मराठी भाषा आणि संस्कृती या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे स्थान आहे. प्रामुख्याने प्रियोळकरांचे योगदान मराठी भाषा आणि साहित्याच्या इतिहासाला अनेक अर्थाने उपयुक्त आहे. ‘मराठी दोलामुद्रिते’ आणि printing Press in Indial (Its beginning and early developments) या ग्रंथांची निर्मिती म्हणजे ज्ञानाच्या स्थिर आणि मुद्रित परंपरा सिद्ध करण्याचाच मोठा प्रयत्न होता. अलीकडच्या काळातील वाचकाला अ. का. प्रियोळकरांविषयीचे भान या ग्रंथातील लेखामुळे येईल.

स्त्रीजीवनविषयक विचारसंकल्पनांची मांडणी करणारे दु. का. संत आपल्या ‘मराठी स्त्री’ या ग्रंथात स्त्रीजीवनाच्या वैचारिक व मूल्यात्मक उत्क्रांतीचा आढावा घेतात. साहित्य संमेलने, साहित्यिक प्रश्न, वाङ्मयीन विद्वत्ता आदी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. साहित्य हे मानवी मन-बुद्धीचा आणि पर्यायाने संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याने, तिचा अंतिम हेतू मानवी जीवनाचे श्रेय साफल्य असल्याचे मत दु. का. संत यांनी मांडले. वसाहतकाळाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या अखेपर्यंतच्या महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व वाङ्मयीन वाटचालीचे चित्र वि. भि. कोलते यांनी मांडले. त्यांच्या आत्मचरित्रात ज्ञातिग्रस्त व अस्मिता हितसंबंधाचे चित्रही उमटलेले आहे. शिवाय त्यांनी संत साहित्यात त्या त्या काळातील राजकीय प्रतिबिंबही कसे उमटले आहे याचा शोध घेतला. ‘महात्मा रावण’ हे वि. भि. कोलते यांचे प्रसिद्ध संशोधनपर लेखन नवविचाराला चालना देणारे आहे. या लेखनामध्ये कोलते मानवी जीवनाचा अज्ञात असलेला सांस्कृतिक इतिहास पुढे आणतात. ‘रावण’ हा गोंड आदिवासींच्या अनेक सम्राट राजांपैकी एक असून, गोंडांच्या मडावी गोत्राचा तो पूर्वज असल्याचे मत त्यांनी मांडले. मानवी सत्तेच्या सांस्कृतिक राजकारणात या राजाचे विकृतीकरण केले गेले का? असा प्रश्न हा ग्रंथ वाचल्यानंतर येतो. या लेखनाच्या सुरुवातीलाच त्यांनी एका संस्कृत श्लोकांचा आधार घेऊन जे विवेचन केले आहे ते महत्त्वाचे आहे. रावणाचे यश कमी करून रामाला जे कीर्तीशिखरावर पोहचवले आहे ते पाहिल्यानंतर वाल्मिकीचे सामर्थ्य लक्षात येते. म्हणून राजे लोकांनी कवींची निंदा करू नये; अन्यथा ते एखाद्या थोर व्यक्तीची कीर्ती धुळीलादेखील मिळवतील आणि एखाद्या सामान्य माणसालाही कीर्तीशिखरावर चढवतील, अशी शक्ती कवीजवळ असते, असे ते सूचित करतात.

श्री. रं. कुलकर्णी यांनी केलेले संशोधनात्मक लेखन नवनवीन प्रमेये मांडणारे आणि साहित्याचे सांस्कृतिक अनुबंध गृहीत धरून केलेले आहे. वाङ्मयाच्या इतिहासात साहित्याच्या बरोबरीने संबंधित समाजाचा वाङ्मयीन, राजकीय, सांस्कृतिक इतिहास आणि भूगोल आदी संदर्भ महत्त्वाचे असतात, याविषयीचा कृतिशील आग्रह त्यांनी धरला. एवढेच नव्हे, तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे आणि साहित्यनिर्मितीच्या संदर्भातील परिवर्तने यांचा परस्परसंबंध तपासणे व त्यांच्यातील आंतरक्रिया तपासून नवसिद्धांतांची मांडणी करीत वाङ्मयेतिहासाची पुनर्रचना करणे ही श्री. रं. कुलकर्णी यांच्या अभ्यासाची दिशा आहे. तर रा. चिं. ढेरे यांचे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती याविषयीचे मूलगामी संशोधन अत्यंत उपयुक्त आहे.

बहुधार्मिक भारतीय समाज एकत्र नांदायचा असेल तर त्याच्या धार्मिक घटकांमध्ये संवाद चालू राहिला पाहिजे. महाराष्ट्रीय हिंदू समाज आणि महाराष्ट्रीय ख्रिस्ती समाज यांच्यात संवाद प्रस्थापित व्हावा असे वाटत असेल, तर एकोणिसाव्या शतकातील संवादाचा धागा आपण हाती घेतला पाहिजे असे गंगाधर मोरजे यांनी ख्रिस्ती अभ्यासातून सुचवलेले आहे. गं. ब. ग्रामोपाध्ये यांनी संत साहित्य, पेशवे दप्तरातील मराठी भाषा, बखरी यांचा अभ्यास केला. म. रा. जोशी यांनी संहिता निश्चितीचा अखंड ध्यास घेतला. म. वा. धोंड यांनी एक सर्जनशील समीक्षक कसा असावा याचा वस्तुपाठ त्यांच्या लेखनातून समोर ठेवला. सत्यशोधक चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातिअंताचा लढा, तसेच मार्क्‍सचे वर्गीय तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधून नवी अन्वेषण दृष्टी निर्माण करीत अब्राह्मणी साहित्यविचार कॉम्रेड शरद पाटील यांनी मराठीत रुजवला.

याशिवाय, गंगाधर पाटील यांचे समीक्षा आणि समीक्षाविषयक विविध सिद्धांताच्या क्षेत्रातील योगदान, द. दि. पुंडे यांचे वाङ्मयेतिहासाच्या क्षेत्रातील योगदान, मा. ना. आचार्य यांचे मध्ययुगीन आणि अर्वाचीन साहित्याच्या क्षेत्रातील योगदान, गो. मा. पवार यांचे वि. रा. शिंदे यांच्या जीवन कार्यासंदर्भातील संशोधन, सु. रा. चुनेकर यांचे साहित्यसूचीच्या क्षेत्रातील योगदान, अरुण टिकेकर यांचे एकोणिसावे शतक आणि शिक्षण या क्षेत्रातील, विजया राजाध्यक्ष यांचे कवितेच्या क्षेत्रातील योगदान,

यू. म. पठाण यांचे फार्सी मराठी अनुबंधविषयक लेखन, तारा भवाळकर यांचे लोकसंस्कृतीच्या संदर्भातील स्त्रीवादी संशोधन, शिवाय अरुणा ढेरे आणि रा. शं. नगरकर यांच्याही कार्याचे योगदान या ग्रंथातून वाचकांच्या लक्षात येते.

अलीकडच्या काळात मराठीमध्ये संपादित होणाऱ्या ग्रंथांची मांदियाळी पाहता ‘तपोनिधी’ या ग्रंथाचे मूल्य अनेक अर्थाने नजरेत भरते. प्राचीन मराठी साहित्य, अर्वाचीन मराठी साहित्य, लोकसंस्कृती-लोकसाहित्य, ख्रिस्ती मराठी साहित्य, समीक्षाविषयक विविध सिद्धांत, संहितानिश्चिती आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लेखक-संशोधकांच्या कार्याचे मूलगामी चिंतन या ग्रंथात अनुभवता येते.

अ. का. प्रियोळकर आणि त्यांचे मराठी साहित्यातील कार्य लक्षात घेता, त्यांच्या साहित्यविषयक जाणिवांचे आणि भूमिकांचे विकसन या पुरस्कारप्राप्त लेखकांच्या लेखणीतून झाल्याचे दिसते. त्याचे भान ‘तपोनिधी’ वाचत असताना येते.

‘तपोनिधी’

– संपादन : भारती निरगुडकर

प्रकाशक- मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग आणि पॉप्युलर  प्रकाशन

पृष्ठे – ३३४, मूल्य – ३७५