|| शशिकांत पित्रे

गेल्या आठवडय़ात श्रीलंकेत एकाच वेळी अनेक ठिकाणी झालेले भीषण दहशतवादी हल्ले हे जागतिक इस्लामिक दहशतवादाचा भयाण चेहरा आहे हे स्पष्ट झाले आहे. खरे तर श्रीलंकेने तमीळ फुटीरतावाद्यांच्या रक्तरंजित दहशतवादाचा अनुभव काही वर्षांमागे घेतलेला आहेच. आता पुनश्च दक्षिण-पूर्व आशियात दहशतवादाचे थैमान सुरू होण्याचे हे संकेत आहेत.

निसर्गाने हातचे न राखता सृष्टीसौंदर्याची अमाप बरसात केलेल्या, आसवासारख्या आकाराच्या श्रीलंकेच्या ललाटी विधात्याने कायम आसवेच लिहून ठेवली आहेत का, असा प्रश्न पडावा अशा आठ आत्मघातकी स्फोटांनी हा लहानसर द्वीपकल्प २१ एप्रिल रोजी पुन्हा थरथरून गेला. यापूर्वी श्रीलंकेत झालेला स्थानिक तमिळांचा रक्तरंजित संघर्ष भारतीय शांतिसेनेचा सदस्य या नात्याने मला जवळून पाहण्याची संधी मिळाली. २ ऑगस्ट १९८७ ला खुद्द तिथल्या तमिळींचा नेता प्रभाकरनला गुप्तपणे चेन्नईहून जाफन्याला रवाना करण्याची जबाबदारी पार पडत असताना त्याची रोमांचकारी भेट झाली. त्यानंतर २००० सालापासून श्रीलंकेत भूसुरुंग निकामी करणाऱ्या भारतीय पूर्वसैनिकांच्या धर्मादायी संघटनेचे नेतृत्व करताना तब्बल दहा वर्षे त्या देशाचा उत्तर आणि पूर्व विभाग पालथा घातला. जवळपास दीड दशकाच्या या अनुबंधामुळे आपल्या या सख्ख्या शेजाऱ्याबद्दल एक आगळी आत्मीयता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. १८ मे २००९ ला प्रभाकरनची हत्या झाली तेव्हा मी श्रीलंकेच्या आग्नेय कोपऱ्यातील मन्नारमध्ये होतो. यापुढे तरी हा देश हिंसाचारातून मुक्त होईल अशी आशा त्या दिवशी प्रत्येक मनात अंकुरली होती आणि जखमेवर खपली धरली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटांनी ती जखम उकलून पुन्हा त्यातून रक्त भळभळून वाहू लागले आहे.

सुटय़ांमुळे एप्रिल महिना म्हणजे निसर्गरम्य श्रीलंकेत येणाऱ्या पर्यटकांसाठी सुगीचा काळ. पंचतारांकित हॉटेलं परदेशी पर्यटकांनी दुथडी भरून वाहत होती. २१ एप्रिल हा श्रीलंकेतील लोकसंख्येच्या सुमारे सहा टक्के हिस्सा असलेल्या ख्रिश्चनधर्मीयांसाठी ‘ईस्टर संडे’चा पवित्र दिवस. जागोजागी गिरिजाघरे भाविकांनी तुडुंब भरली होती. आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक सकाळी पावणेनऊ वाजल्यापासून पुढची २० मिनिटे निवडक पंचतारांकित हॉटेलं आणि चर्च कर्कश्श बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. सकाळी ठीक ८:४५ वा. पहिले तीन स्फोट झाले ते कोलंबो सागरतटावरील सेंट अँथनी चर्च व किंग्जबरी हॉटेल आणि बंदरनायके विमानतळाजवळील नेगोम्बोमधील सेंट सबॅस्टिअन चर्चमध्ये. एकाच वेळी. त्याने सारे शहर हादरून गेले. पाचच मिनिटांच्या अंतराने समुद्रतीरासमोरील पंचतारांकित सिनॅमन ग्रँड हॉटेलच्या प्रशस्त ब्रेकफास्ट दालनात एका आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला उडवले. त्यानंतर सात मिनिटांनी ८:५७ ला पंचतारांकित हॉटेल शांग्रीला स्फोटाने हादरले. आणि ९:०५ ला कोलंबोपासून कित्येक किलोमीटर दूर पूर्व किनाऱ्यावरील बॅटिकलोआमधील प्रोटेस्टंट इव्हॅन्जेलीकल झीओन चर्चमध्ये पुढचा स्फोट झाला. दुपारी पावणेदोन वाजता कोलंबोपासून थोडय़ा अंतरावर देहीवालामधील ट्रॉपिकल इनमध्ये आणखी एक स्फोट झाला. पण एवढय़ावरच त्या काळ्या रविवारची कत्तल संपणार नव्हती. सिनॅमन ग्रँड हॉटेलमध्ये मिळालेल्या धाग्यावरून डेमॅटोगोडा वसाहतीमध्ये चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून एका महिलेने आत्मघाती स्फोट केला. त्यात तिच्याबरोबरच तिची तीन लहान मुले आणि तपासासाठी गेलेले तीन पोलीस बळी पडले. नंतर त्या दिवसापुरते तरी मृत्यूचे हे भिंगुळवाणे व अमानुष थैमान संपुष्टात आले होते.

त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तीन गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. पहिली- हे षड्यंत्र प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीयांविरुद्ध- मग ते स्वदेशी असोत वा परदेशी, तसेच कॅथोलिक असोत वा प्रोटेस्टंट असोत- रचण्यात आले होते. दुसरी- ते सर्व आत्मघाती स्फोट (सुइसाइड बॉम्बस्फोट) होते आणि ते मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी केले होते, त्यात तमिळ टायगर्सचा हात असणे पूर्णत: असंभव होते. आणि तिसरी- त्या स्फोटांचे परिमाण, योजना आणि वेळापत्रक इतक्या उच्च दर्जाचे होते, की ते केवळ स्वदेशी नागरिकांचे काम नव्हते. त्यामागे परदेशी दहशतवादी तत्त्वांचा हात होता व या स्फोटांची योजना बरेच दिवस शिजत होती. प्रथम घोषित केली गेलेली मृतांची संख्या प्रत्यक्ष छाननीनंतर कमी करण्यात आली. या मृत्युकांडात एकूण २५३ जण बळी गेले. त्यात ४६ परदेशी नागरिकांचा आणि ४५ मुलांचा समावेश आहे. जवळपास ५०० लोक जखमी झाले.

श्रीलंका सरकार या सार्वत्रिक बॉम्बस्फोटांनी खडबडून जागे झाले. वास्तविक जवळजवळ तीन-चार दशकांच्या तमिळ स्वायत्ततेच्या संग्रामादरम्यान पराकोटीच्या दहशतवादास तोंड देण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. पण तरीही त्यांनी अक्षम्य घोडचुका केल्या. त्यानंतर मात्र राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. समाज माध्यमांच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली. सरकारी चक्रे वेगाने फिरू लागली आणि या भीषण कारस्थानाचे धागेदोरे उलगडू लागले.

सर्वात मोठा दैवदुर्विलास म्हणजे भारतीय गुप्तचर सूत्रांनी दिल्लीत पकडलेल्या एका संशयास्पद ‘इस्लामिक स्टेट’ दहशतवाद्याच्या तपासात श्रीलंकेतील झहरान हाशमी याच्या नेतृत्वाखालील ‘नॅशनल थौहीद जमाथ’ (एनटीजे) ही संघटना निकट भविष्यात ख्रिश्चन समाजाला लक्ष्य करण्यासाठी चर्च आणि पंचतारांकित हॉटेलांवर हल्ले चढवण्याची योजना राबवणार असल्याची माहिती मिळाली होती. भारतीय सूत्रांनी ही माहिती श्रीलंकेतील हेरखात्याला ४ एप्रिल रोजी दिली होती. लक्ष्यांमध्ये त्यांनी श्रीलंकेतील भारतीय दूतावासाचाही समावेश केला होता. याच इशाऱ्याची पुनरावृत्ती भारतीय सूत्रांकडून या हल्ल्यांच्या एक दिवस आधी- आणि एवढेच नव्हे तर दोन तास आधीसुद्धा करण्यात आली होती. दुर्दैवाने अंमळ ‘बाबूगिरी’ सोडून या इशाऱ्याची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी ही माहिती आपल्यापासून मुद्दाम दूर ठेवल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी केला. दोघांच्यात विस्तव जात नाही हे सर्वश्रृतच आहे. याच्याशी संबंधित सर्वच सूत्रांचा हा अक्षम्य अपराध आहे. असे अनेक ‘इंटेलिजन्स इनपुट’ वारंवार मिळत असतात आणि प्रत्येकाची दखल घेणे अवघड असते हे जरी मान्य केले, तरी या विशिष्ट माहितीची नि:संदिग्धता आणि पुनरावृत्ती या दोन गोष्टींमुळे तरी संबंधित सूत्रांचे लक्ष वेधणे अपेक्षित होते. त्यावर जर वेळीच कारवाई झाली असती तर सर्व अपराध्यांना रंगेहाथ पकडून अनेक जीव वाचवता आले असते. राष्ट्राध्यक्षांनी पोलीस प्रमुख पुजिथ जयसुन्दरा आणि संरक्षण सचिव हेमासिरी फर्नाडो या दोघांना राजीनामा देण्याचा आदेश जारी केला. २०१८ च्या घटनात्मक पेचानंतर श्रीलंका पोलीस खाते संरक्षण मंत्रालयाच्या हाताखाली देण्यात आले होते. त्यामुळे ते खुद्द राष्ट्राध्यक्ष सिरीसेनांच्या अधिक्षेत्रात येते.

एनटीजे ही स्थानिक मूलतत्त्ववादी संघटना मौलवी झहरान हाशमी चालवत होता. परदेशी दहशतवाद्यांशी त्यांचे लागेबांधे होते. सिंहली बौद्धधर्मीयांशी त्यांच्या वारंवार चकमकी झडल्या होत्या आणि मूर्तिभंजनाच्या आरोपात त्यांना पूर्वी पकडण्यातही आले होते. धर्मातरे घडविण्याच्या आरोपात अटक टाळण्यासाठी भारतातून पलायन करणाऱ्या झाकीर नाईकच्या संपर्कात मौलवी हाशमी होता आणि त्याची हाशमीने जाहीर स्तुती केली होती. एनटीजेचा श्रीलंकेतील मुस्लीम संघटनांनी २०१६ मध्ये जाहीर निषेध केला होता आणि मूलतत्त्ववाद पसरवण्याचे आरोप त्यांच्यावर केले होते. एनटीजेबरोबर ‘जमीयथुल मिलाथु इब्राहिम’ या संघटनेवरही दहशतवादाच्या आरोपावरून सिरीसेना यांनी बंदी घातली होती. २१ एप्रिलचे सर्व नऊ  बॉम्बर्स एनटीजेचे सदस्य होते आणि त्यांच्यापैकी आठ जणांची ओळख पटली आहे. हे सर्व श्रीमंत कुटुंबांतील आणि सुशिक्षित होते. त्यांची ‘इस्लामिक स्टेट’चा खलिफा अबू बकर अल्-बघदादीवर निष्ठा होती. या बॉम्बर्सचा एक व्हिडीओ ‘अमाक’ या प्रसारमाध्यमाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. शांग्रीला हॉटेलवर खुद्द झहरान हाशमी आणि ३३ वर्षीय इन्शाफ अहमद इब्राहिम या दोघांनी, सिनॅमन ग्रँड हॉटेलवर ३१ वर्षीय इलहाम अहमद इब्राहिम (इन्शाफचा भाऊ) याने आणि ट्रॉपिकल इनवर ३६ वर्षीय अब्दुल लथीफ जमील मोहम्मद याने हल्ला चढवला. डेमॅटोगोडा वसाहतीत आपल्या तीन मुलांसकट स्वत:ला स्फोटकांनी उडवणारी स्त्री इन्शाफची पत्नी होती. दहशतवाद्यांची जंत्री अजून बाकी होती. भक्कम माहिती मिळाल्याने श्रीलंका लष्कर आणि स्पेशल टास्क फोर्सचे एक शोधपथक २६ एप्रिलला पूर्व श्रीलंकेच्या अम्पारा जिल्ह्यतील कल्मुनाई परगण्यातील सैन्थामरूथू या गावात पोहोचले होते. अचानक एका घरात तीन प्रचंड स्फोट ऐकू आले. तीन आत्मघाती बॉम्बर्सनी आपल्याबरोबर सहा मुलांसह इतर नऊ  कुटुंबीयांना स्फोटकांनी उडवले होते. त्यात एकूण सोळा लोक ठार झाले. आत्मघाताची ही मालिका त्यानंतर थांबली आहे. परंतु हे दहशतवादी आणखी काही हल्ले चढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्रीलंकेत सर्वत्र जागरूकता पाळण्यात येत आहे.

परंतु श्रीलंकेतील हा नरसंहार आता संपुष्टात आला आहे अशी चुकीची समजूत करून घेता कामा नये. किंबहुना, श्रीलंकेतच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियात अशा संभाव्य एल्गारांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीलंकेतील हल्ला म्हणजे यंदाच्या १५ मार्चला न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथे मशिदींमध्ये एका ख्रिश्चन माथेफिरूने केलेल्या रक्तपाताचा प्रतिशोध होता, हा सर्वत्र व्यक्त होणारा कयास विवादास्पद आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी अचूक वेळी केलेल्या या हल्ल्यांची योजना काही एका महिन्यात तयार होऊ  शकत नाही. हे जर मान्य केले तर अशा आणखी काही योजनांचे आराखडे आतापावेतो पार पाडण्यासाठी विवक्षित आत्मघाती गटांकडे याआधीच पोहोचले असतील आणि ते निकट भविष्यात अमलात आणले जातील असे अनुमान करणे चुकीचे ठरणार नाही.

या आगीत तेल ओतण्याचे काम २९-३० एप्रिल रोजी हाती आलेल्या एका खळबळजनक वृत्ताने केले आहे. ‘इस्लामिक स्टेट’चा म्होरक्या अबू बकर अल-बघदादी हा २०१६ मध्ये मारला गेला अशी बातमी मिळाल्यावर साऱ्या जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु त्याचा एक नवीन व्हिडीओ ‘अल-बुरकान’ या इस्लामिक स्टेटच्या अधिकृत प्रसारमाध्यमाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात बघदादीने श्रीलंकेतील ईस्टर हल्ले हे सीरियामधील अल-बघुझ फकवानीमधील पराभवाचा सूड असल्याचा दावा केला आहे. अल-बघुझ फकवानी हा ‘इस्लामिक स्टेट’चा सीरियातील शेवटचा बालेकिल्ला होता आणि तो अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘कोअ‍ॅलिशन फोर्सेस’नी गेल्या मार्चमध्ये काबीज केला होता. ‘शत्रूला झिजवून मारण्याची आमची रणनीती (बॅटल ऑफ अ‍ॅट्रिशन) आहे, जिहाद ‘निर्णय दिवसा’पर्यंत (जजमेंट डे) चालू राहील,’ असे विधान त्याने केले आहे. या व्हिडीओच्या सत्यतेचा पडताळा घेतला जात आहे, हे अलाहिदा. परंतु बघदादीचा हा इशारा गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. दक्षिण आशियातील सर्वच देश हे काही अंशी सहजसाध्य आणि संवेदनशील लक्ष्ये असल्यामुळे सर्वच सुरक्षा यंत्रणांनी जागरूक राहणे अपरिहार्य आहे.

श्रीलंकेतील या हल्ल्याचे धागेदोरे उलगडून त्यातील शेवटच्या सूत्रापर्यंत पोहोचणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्याचे लागेबांधे भारतातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या समुद्रतटानिकट भागात सापडत आहेत. हाशमीच्या भारतातील सहयोग्यांचा माग लागतो आहे. केरळातील पलक्कडमधून रियास अबुबकर ऊर्फ अबू दुजाना याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याद्वारा अबू इसा आणि अबू खालिद या दोन ‘इस्लामिक स्टेट’मध्ये दाखल झालेल्या भारतीय युवकांचा श्रीलंकेतील हत्याकांडाशी असलेल्या संभाव्य संबंधाबद्दल कसून तपास करण्यात येत आहे. ही फक्त काही नावे. ‘इस्लामिक स्टेट’च्या कचाटय़ात सापडून मूलतत्त्ववादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनेक तरुणांचा छडा लावणे हे गवताच्या गंजीत टाचणी शोधण्यासारखे असले तरी ते अपरिहार्य आहे.

दक्षिण आशियातील दहशतवादाचा अड्डा म्हणजे पाकिस्तान. उपखंडातीलच नव्हे, तर साऱ्या जगातल्या बहुतांशी दहशतवादाचे मूळ पाकिस्तानात आढळून येते. श्रीलंकेतील ईस्टर हल्ल्यांचे पाकिस्तानातील मादक पदार्थाच्या व्यापाऱ्यांशी संबंध असण्याची शक्यता वर्तवणारा एक मतप्रवाह पुढे आला आहे. अफगाणिस्तानच्या सान्निध्यामुळे ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान हे एक अभयारण्य झाले आहे. त्याची झळ भारताला खचितच लागणार आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा या गंभीर धोक्याला सामोऱ्या जाण्यासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे. मालदीवमधील २०० तरुण ‘इस्लामिक स्टेट’मध्ये भरती झाले आहेत. त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ प्रचंड प्रमाणात तेलश्रीमंत देशांकडून धर्मकार्याच्या नावावर येत आहे. त्याचे स्रोत गोठवणे हे सर्व दक्षिण आशियाई राष्ट्रांचे पहिले उद्दिष्ट होणे अत्यावश्यक आहे. अशी जागृती केवळ ‘सार्क’सारख्या संघटनांद्वारेच येऊ शकते. पण ते इतके सहजसाध्यही नाही.

सहा-सात दशकांपूर्वी श्रीलंकेत मुख्य स्रोतापासून उत्तर आणि पूर्व भागातील तमिळ जनता दुरावली गेली आणि फुटीरवादाचे बीज पेरले गेले. बंदुकीच्या नळीमार्गे आपले हक्क प्राप्त करण्याच्या ईष्र्येने जन्म घेतला आणि सळसळत्या रक्ताची तरुणाई चळवळीची सूत्रधार झाली. त्यातून निर्माण झाला तो अमानवी दहशतवाद, तमिळ वर्चस्वासाठी यादवी शिरकाण, कोणत्याही तडजोडीस नकार, एलम्चा दुराग्रही अट्टहास आणि वंशहत्येचा नंगानाच. या विषमतेच्या ज्वालांमधून उठलेल्या भेसूर दहशतवादी क्रांतीचा प्रणेता वेलुपिल्लई प्रभाकरन याची २००९ साली हत्या झाल्यावर हा आगडोंब शमला होता. परंतु आज तीच श्रीलंका एका नव्या मूलतत्त्ववादावर आधारित अमानुष हत्याकांडाच्या उंबरठय़ावर असहायतेने उभी आहे. हा अमानवीय धर्मविग्रह त्या द्वीपातील जनतेत एक नवी अभेद्य भिंत उभी करू नये, हीच प्रार्थना!

shashipitre@gmail.com