News Flash

पुस्तक परीक्षण : स्त्रीचे माणूसपण अधोरेखणाऱ्या कथा

आपल्या भवतालच्या परिघातूनही तो आपल्यासारखीच माणसे आणि त्यांचा आधार शोधताना दिसतो.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा भानू

माणूस हा सर्जनशील लेखकांच्या कुतूहलाचा विषय आहे. माणसाच्या मनाचा थांग लावायचा प्रयत्न प्रत्येक लेखकाने आपापल्या परीने आजवर केलेला आहे, परंतु तो लागणे अजूनही शक्य झालेले नाही. तरीही- किंवा कदाचित त्यामुळेच या विषयाबद्दलची उत्सुकता नित्य वाढतेच आहे. माणूस आणि त्याचे मनोव्यापार यांचा शोध घ्यायचा प्रयत्न  करणाऱ्या लेखकांत सुकन्या आगाशे यांचाही समावेश होतो. त्यांच्या ‘थंड हवेचे ठिकाण’ या नव्या कथासंग्रहातील  बहुतांश कथांमध्येही हाच विषय प्रामुख्याने केंद्रस्थानी दिसतो. आगाशे यांचा हा तिसरा कथासंग्रह. आधीच्या संग्रहांप्रमाणेच माणूस आणि त्याचा भवताल हा मुख्यत: त्यांच्या  कथांचा गाभा आहे. त्यांच्या कथांमधील माणूस हा वर्तमानाला भिडणारा आहे. आपल्या भवतालच्या परिघातूनही तो आपल्यासारखीच माणसे आणि त्यांचा आधार शोधताना दिसतो. अर्थात त्यांच्या कथामधला माणूस ही स्त्री असणे आणि तिच्या दृष्टीतून कथा उलगडणे हेही स्वाभाविकपणेच म्हणता येईल. या संग्रहातील कथांचे दोन भाग पडतात. स्त्रीचे जगणे, तिचा स्वत:ला आणि इतरांना ओळखायचा प्रवास यावरच्या कथा एकीकडे, तर समूहाचे रेखाटन करणाऱ्या कथा दुसरीकडे!

स्वत:च्या मनाप्रमाणे जगणाऱ्या, आयुष्य आखलेल्या ‘थंड हवेचे ठिकाण’मधली मनू  आणि ‘संग नि:संग’तली गार्गी या दोन स्त्रिया. पण त्या आयुष्यापासून फटकून वागणाऱ्या नाहीत. त्यांनाही माणसांची ओढ आहे, मदत करायची आस आहे. त्यामुळेच श्याम आणि इला या अगदी परक्या माणसांनाही त्या माया लावतात, समजून घेऊ पाहतात. इलाची व्यक्तिरेखाही गार्गीच्या पावलावर पाऊल ठेवणारी आहे. स्वतंत्र, काहीशी कोषात राहणारी, स्वाभिमानी, पण तितकीच प्रेमळ! मनू आणि गार्गी श्याम आणि इलाला खूप काही देऊन जातात. तेही कुठल्याही अभिनिवेशाशिवाय! तरुण वयात नवऱ्याच्या मृत्यूने एकटी पडलेली, नंतर सगळ्या इच्छा बाजूला ठेवून दोन्ही मुलांना वाढविण्यात  गुंतलेली आणि मग जगायचंच विसरलेली शांता ‘उतारावरून’मध्ये भेटते. प्रत्येकाला त्याचे असे आयुष्य आहे, ते जगायचा अधिकार आहे, हे मुलांमुळेच जाणवल्याने ‘फ्री बर्ड’ झालेली ही कथानायिका आपल्या आजूबाजूलाही सहज दिसू शकणारी. तितकीच मनाला मोहवते ती मृत्यूची चाहूल लागलेली, पण त्याला ताठपणे सामोरी जाणारी ‘देहचिया गाव आलिया’मधली अनुया. या कथेतील मोहन हे तिच्या मित्राचे पात्रही खूप लोभस उतरले आहे. या सगळ्यांच्या अगदी विरुद्ध आहेत ‘ऐलतीरी पलतीरी’मधल्या निरुपमा आणि ‘रात्र पहिली’मधील निर्मला. कोषात राहिलेल्या आणि आयुष्याला खऱ्या अर्थाने सामोऱ्याच न गेलेल्या या दोघी. आयुष्य वेगळ्या पद्धतीने पुढे येऊन उभे ठाकते तेव्हा स्वतंत्रपणे त्याचा विचारच करू न शकणाऱ्या या व्यक्तिरेखांची शोकांतिका अटळ ठरते.

या पुस्तकातील ‘मुळे आणि पारंब्या’,‘पुन्हा हॅर्टा’,‘ इला आणि नेव्हिल यांचे आदर्श लग्न’, ‘इतिहासातील मुलीस’, ‘कपोत संवाद’,  ‘जागल्या’ या कथा एकतर भूतकाळात डोकावतात किंवा मग स्त्रीप्रधानतेचा विषय ओलांडून वेगळ्या दिशेने जातात. या कथांचा स्वतंत्रपणे विचार केला तर त्याचा परिणाम वेगळा होतो. पण कथासंग्रहात त्यांची वाट अगदीच निराळी आहे. कथासंग्रह हा सर्वसाधारणपणे विषय, आशय किंवा यापलीकडे काहीतरी साधर्म्य असलेल्या कथांचा असतो असे मानले तर या उल्लेखिलेल्या कथा अगदीच उपऱ्या वाटतात आणि काहीशा पुस्तकाचा प्रभाव कमी करतात असे वाटते. अर्थात वेगळा प्रयोग म्हणून असे काही केले असल्यास गोष्ट वेगळी. अर्थात स्त्रीचे माणूसपण रेखाटताना लेखिकेची लेखणी अधिक प्रभावी, प्रवाही व जवळची वाटते, हेही खरे!

सुकन्या आगाशे यांची भाषा खूप सहज आहे. शब्दबंबाळपणा टाळून नेमके लिहिण्याची त्यांची हातोटी आहे- जी वाचकाला आकर्षति करते. मानवी भावबंध कसे जुळतात आणि कसे तुटतात याबद्दलचे त्यांचे निरीक्षणही नेमके आहे. या पुस्तकाचे सतीश भावसार यांनी केलेले मुखपृष्ठ मनोवेधक आहे.

‘थंड हवेचे ठिकाण’- सुकन्या आगाशे,

ग्रंथाली, पृष्ठे- २२५, मूल्य- २५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:33 am

Web Title: thand haveche thikan book review abn 97
Next Stories
1 भूलोकीच्या स्वर्गाची सफर
2 पडसाद :यात लव्ह जिहाद आहेच कुठे?
3 कूटचलनाची चाल!
Just Now!
X