पत्रकारितेत मी १९७१ साली प्रवेश केल्यापासून प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीसाठी वृत्तसंकलन केले आहे. या दीर्घ प्रवासात विविध पक्षांच्या, विविध स्तरांवरील नेत्यांना भेटायचा, त्यांच्या बरोबर प्रवास करण्याचा योग आला. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, शंकरराव चव्हाण, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते यांचा सहवास लाभलेले क्षण आजही आठवणीत ताजे आहेत.
आणीबाणीनंतर आलेले जनता सरकार लवकरच कोसळले आणि १९८०ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. इंदिरा गांधींचा पुणे आणि ठाणे जिल्ह्यांचा दौरा जाहीर झाला. त्या काळात इंदिराजी महाराष्ट्रात तरी ‘नकोशा’ होत्या. जनाधार नसलेले रामराव आदिक, नासिकराव तिरपुडे, श्यामकांत मोरे आदी तथाकथित नेते त्यांच्या पक्षात होते. सर्व मातब्बर ‘निष्ठावान’ यशवंतराव चव्हाणांसोबत होते तर शरद पवार यांनी ‘पुलोद’चा संसार सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली होती. अशा काळात तो दौरा ‘कव्हर’ करण्याची संधी मला लाभली, कारण वार्ताहर म्हणून मी नवखा समजला जायचो आणि बहुतेक ज्येष्ठ वार्ताहर मुंबईतच ठाण मांडून होते.
तेव्हा सुरक्षेचा बडेजावही नसे. इंदिराजींबरोबर पोलिसांची एक जीप आणि माध्यम प्रतिनिधींची एक जीप एवढाच लवाजमा होता. एकामागून एक सभा घेण्याचा त्यांचा सपाटा आमची दमछाक करणारा ठरला. वातानुकूलित वाहन तोपर्यंत आम्ही आतून पाहिलेही नव्हते. त्यामुळे शिरुर शहरात रसिकशेठ धारिवाल यांच्या राजेशाही इमल्यात इंदिराजी भोजनासाठी थांबल्या तेव्हा आम्हाला हायसे वाटले. समोरचे विविध पदार्थ पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. पण आमचा आनंद क्षणभंगुर ठरला.
 अनपेक्षित कलाटणी
इंदिराजींनी फक्त (मोजून) दोन काजू खाल्ले, पेलाभर फळाचा रस घेतला आणि पुढच्या दौऱ्यासाठी त्या सज्ज झाल्या. मात्र आमचे पडलेले चेहरे पाहून काय बिनसले असावे हे त्यांनी क्षणार्धात ताडले.
‘‘आप खाईये, मैं रुकती हूँ,’’ असे त्या म्हणाल्या. पण इंदिराजींचा खोळंबा करून आम्हाला जेवण करणे शक्यच नव्हते. हेसुद्धा त्यांना समजले आणि त्यांनी आग्रह करून आम्हाला खाण्यास भाग पाडले. त्या वेळेचा वापर करून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला, आमच्याबरोबर वार्तालाप केला आणि दौरा पुन्हा सुरू झाला.
वास्तविक आमची फिकीर करण्याची इंदिराजींना काहीच गरज नव्हती. त्यामुळे या प्रसंगातून त्यांच्या सहृदयतेचे अनोखे दर्शन आम्हाला घडले. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मी घेतलेला आणखी एक धडा म्हणजे नेत्यांची भाषणे, त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि प्रत्यक्षात होणारे मतदान यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. इंदिराजींच्या त्या दिवशीच्या सभांना माफक म्हणता येईल एवढीच गर्दी होती. भाषणेही एकाच छापाची होती. परंतु मतदारांवर त्यांचा होत असलेला परिणाम जोखण्यात आम्ही अयशस्वी ठरलो हे सिद्ध झाले, कारण मतदारांनी त्यांना निर्विवाद कौल दिला आणि इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या.
याउलट अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा प्रचंड गर्दीत झालेल्या पाहिल्या, लोकांचा प्रतिसाद पाहिला आणि नंतरच्या निकालांनी भाषणांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत याचे प्रत्यंतरही आले.
शरद पवार यांचे अनेक दौरे मी कव्हर केले. त्यातील एका दिवसाची आठवण. तो दिवस होता ११ ऑक्टोबर २००४. पवारांबरोबर दिवसभर राहण्याचा योग आला. पुण्यातून हेलिकॉप्टर सकाळी साडेआठच्या ठोक्याला रवाना झाले. पहिली सभा पावणेनऊ वाजता भोर येथे होती. काँग्रेसचे उमेदवार आणि पवारांचे कट्टर विरोधक     अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी. पवार आपल्या विरोधकांचा काटा काढणार अशी चर्चा तेव्हा चालू होती. पवारांच्या भाषणाने हा सारा अपप्रचार धुऊन काढला. हेलिकॉप्टर लगेच सासवड मतदारसंघाकडे रवाना झाले.
हातातले कागद चाळत असताना अचानक पवारांनी बाजूचे हेडफोन्स कानाला लावले आणि वैमानिकाला काही सूचना दिल्या. त्यांचे बोलणे हेलिकॉप्टरच्या घरघराटात आम्हाला ऐकू आले नाही. परंतु हेलिकॉप्टरने दिशा बदलल्याचे लक्षात आले. सासवडची सभाही जंगी झाली. नंतर साहजिकच आम्ही पवारांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘पायलटच्या सूचनांमध्ये चुकून पुरंदर किल्ला असा उल्लेख झाला होता. मी तेवढीच दुरुस्ती केली.’’ पवारांना महाराष्ट्र आपल्या तळहाताप्रमाणे माहीत आहे, असे म्हटले जाते. त्याचा अक्षरश: प्रत्यय आम्हाला आला.
दौंडच्या रंजना कुल यांना त्यांचे पती सुभाष कुल यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. रंजना कुल यांनी पती गेल्यानंतर स्थानिक सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवला होता. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘‘घरातून कधीही बाहेर न पडलेली स्त्री संधी मिळाल्यास तिचे कसे सोने करते याचे हे उत्तम उदाहरण आहे.’’
या मतदारसंघात विरोधकांकडून दहशत आणि अन्य साधनांचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार हेलिपॅडपासून सभास्थानापर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या दोन मिनिटांच्या अवधीत पवारांनी ऐकली होती. आवाज चढवून सभेत पवार म्हणाले, ‘‘माझ्या कानावर काही तक्रारी आल्या आहेत. उद्याच मी इथे पुन्हा येणार आहे. कोण दादागिरी करतो तेच मला बघायचे आहे.’’ या एका वाक्याने वातावरण पालटले आणि घोषणांचा धुरळा उडाला. रंजना कुल प्रचंड बहुमताने जिंकल्या.
दिवसभरात पवारांनी ठरलेल्या सात सभा घेतल्या. प्रत्यक्ष सभा, हेलिकॉप्टरचा प्रवास, हारतुरे असा प्रत्येक सभेला एक तास दिलेला असे. मात्र सरासरी ५५ मिनिटांतच सारे आटोपत असे, एवढे काटेकोर नियोजन असे. मधेच त्यांनी आमच्या जेवणाचीही व्यवस्था केली.
पवारांच्या तोंडावर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली होती. थोडा वेळ बोलले की गालाच्या आतल्या बाजूला रक्तस्राव होई. तसेच काही खाणेही शक्य नव्हते. त्यांची अवस्था पाहून आमच्या अंगावर काटा आला. मात्र पवारांनी कोठेही आपल्या दुर्बलतेचा प्रचारकार्यावर परिणाम होऊ दिला नाही. वाटेत थोडाफार फळांचा रस हाच काय तो त्यांचा आहार. शेवटची सभा बारामतीला होताच पत्रकार परिषद आणि नंतर कार्यकर्त्यांबरोबर खलबते. दरम्यान फायलींवर सह्या करणे चालूच होते.
पवारांसारखा अथक काम करणारा दुसरा नेता माझ्या पाहण्यात नाही. मात्र गोपीनाथ मुंडेही श्रम करण्यास कमी पडत नाहीत, पण त्यांचे वेळेचे नियोजन हा स्वतंत्र विषय आहे. मुंडे यांच्या पहिल्या संघर्ष यात्रेपासून मी त्यांच्यासोबत वृत्तसंकलन केलेले आहे. अगदी तळागाळातील माणूसही त्यांच्यापर्यंत कसा सहज पोचू शकतो, याचा मी साक्षीदार आहे.
मुंडे यांच्या १९९६च्या निवडणुकांमधील एका प्रचार दौऱ्यातील हा हृदयस्पर्शी प्रसंग आहे. मुंबई-सोलापूर-लातूर असा हा दौरा ठरला होता. पहिली सभा पुण्यात, तेथून पंढरपूर, पुढे सोलापूर आणि अखेर लातूर असा कार्यक्रम होता. माझ्याबरोबर ‘लोकप्रभा’चे प्रतिनिधी होते. पुण्याहून हेलिकॉप्टर निघताना मी महेशला सहज म्हणालो, ‘‘विठ्ठलाचे दर्शन झाले तर काय बहार येईल.’’
माझे बोलणे मुंडे यांनी ऐकले असेल अशी शक्यताही आम्हाला जाणवली नाही. पंढरपूरचा नियोजित कार्यक्रम संपताच तीन-चार शासकीय गाडय़ा धाड्धाड् करीत हजर झाल्या. ‘‘चला, बसा गाडीत,’’ एवढेच मुंडे म्हणाले. आम्हाला काही समजेना, कारण त्यांच्या दिनक्रमात पंढरपुरात दाखवलेला एकमेव कार्यक्रम पार पडलेला होता. तथापि आम्ही गाडीत बसलो आणि काही क्षणांतच उलगडा झाला. आमची गाडी विठ्ठल मंदिराच्या पायरीला टेकली आणि मुंडे मिस्कीलपणे हसले. गृहमंत्री येणार म्हणून काही मिनिटांसाठी आमच्या दर्शनाची खास सोय करण्यात आली होती. आम्ही विठ्ठलाला दंडवत घातला आणि मुंडे यांचे दोन्ही हात कोपरांपासून जोडून आभार मानले. विठ्ठल आम्हाला पावला त्यांच्यामुळेच. तेव्हापासून मुंडे यांच्या कालनियोजनाबद्दल बोलताना मी दोनदा विचार करतो.
निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांच्या अंगात कसला संचार होतो हे रहस्यच आहे. तरीही एवढय़ा व्यापातून ते प्रत्येकाची काळजी घेण्याचे अवधान बाळगतात, यातच त्यांच्या यशाचे गमक आहे अशी माझी पक्की धारणा आहे.