News Flash

दोन कविता आणि दोन कवी

कविता आणि कवी या उभयतांच्या अस्तित्वाची डोळस जाण येण्याच्या खूप आधी, म्हणजे वयाचं पहिलं दशकं गाठण्याआधीच, दोन अर्वाचीन मराठी कवी माझ्या आयुष्यात प्रवेशले आणि तेही

| March 17, 2013 01:01 am

कविता आणि कवी या उभयतांच्या अस्तित्वाची डोळस जाण येण्याच्या खूप आधी, म्हणजे वयाचं पहिलं दशकं गाठण्याआधीच, दोन अर्वाचीन मराठी कवी माझ्या आयुष्यात प्रवेशले आणि तेही प्रत्येकाच्या एकेकच कवितेतून.. गंमत म्हणजे त्या दोन्ही कविता प्रथम मला भेटल्या, त्या केवळ श्रवणाद्वारे.. कारण आधी मी खूप दिवस त्या कविता ऐकत होतो ती गाणी म्हणून, ज्याला आज आपण ‘भावगीत’ म्हणतो. तेव्हाची माझी मनोवस्थाच अशी होती, की स्वरच अधिक चटकन पोहोचायचे आणि शब्द हे केवळ त्या स्वरांचं वाहन असायचं. त्यांची स्वतंत्र जाणीव खूप हळूहळू उमगत गेली. अशा या परिस्थितीत त्या गाण्याचे मूळ जन्मदाते कवी ही स्वयंभू भूमिका कुठून ध्यानात येणार? पण जसजसे गाण्यातले भाव हृदयाला भिडू लागले, तशी शब्दांची जाणीव स्पष्ट होऊ लागली आणि मग जेव्हा कवितेचं स्वतंत्र अस्तित्व वेगळं उमटू लागलं, तसं कवी हे वेगळं मूलभूत अस्तित्व अधोरेखित होऊ लागलं आणि त्याचं एक स्वतंत्र अवकाश माझ्या अंतरंगात साकार होऊ लागलं..
ज्या दोन कवींबद्दल मी बोलतोय त्यातले पहिले होते, कविवर्य कुसुमाग्रज.. स्वरांच्या पंखांवरून माझ्याकडे आलेली त्यांची ती पहिलीवहिली कविता, नेमकी कुठल्या क्षणी माझ्या आयुष्यात प्रविष्ट झाली ते मला सांगता येणार नाही. कारण जिथपासून मला माझ्या अस्तित्वाचं भान आलं तेव्हाही, ती कविता जणू माझ्यासोबत होतीच. याचा अर्थ अगदी नेणतेपणापासून ते शब्द आणि स्वर नकळत माझ्या कानावर पडत होते. ते शब्द होते, ‘मी काय तुला वाहू?..’
वेगवेगळ्या संदर्भात या भावगीताविषयी मी यापूर्वीही लिहिलं आहे. पण तेव्हा गजानन वाटवे यांची ती स्वररचना होती, सदारंगीनी भैरवीत ती गुंफली होती आणि अगदी प्रथम मी ती ऐकली ती माझ्या आईकडून, या सर्व तपशिलांना महत्त्व देऊन केलेलं ते लेखन होतं. आज मात्र निखळ कविता म्हणून तिचं माझं जुळलेलं अबोध नातं उकलायचा मी प्रयत्न करणार आहे. आमचं हे नातं सुरू झालं. ज्या क्षणी स्वरांवेगळी करून मी ती संपूर्ण कविता पाहू आणि अनुभवू लागलो त्या क्षणापासून..

मी काय तुला वाहू ?
तुझेच अवघे जीवित-वैभव.. काय तुला देऊ?
नक्षत्रांच्या रत्नज्योती.. तुझिया ओटीवरी झळझळती
दीप रवींचे घरी तुजपुढती.. वात कशी लावू..? ..
चतुर फुलारी वसंत फुलवीत..
तुजसाठी सुमसंचय अगणित
कशी कोवळी अर्धसुगंधित.. कळी करी घेऊ?
एकच आहे माझी दौलत.. नयनी जो हा अश्रू तरंगत
मानवतेचे ज्यात मनोगत.. तोच पदी वाहू..
मी काय तुला वाहू?
ती कविता समजण्याच्या प्रक्रियेत, तेव्हाच्या बालवयाला साजेसा पहिला प्रश्न मनात आला, तो म्हणजे, ‘मी काय तुला वाहू’ असं कोण कुणाला म्हणतंय?.. मग ध्यानात आलं की कवी आपल्या भोवतीच्या विश्वाच्या विराट पसाऱ्याच्या निर्मात्यालाच उद्देशून हे म्हणतो आहे. हे कळण्याचा तो क्षण हा एका अर्थी साक्षात्काराचाच होता. कारण विश्वाचा विशाल पट प्रथमच मनचक्षूंसमोर जणू साक्षात उलगडत गेला. अगणित नक्षत्रांच्या झळझळत्या रत्नज्योती, सूर्यमालांचे कोटी लखलखते दिवे आणि त्यामध्ये अविरत फिरणाऱ्या अवाढव्य कालचक्रात साजरे होणारे ऋतूंचे देखणे सोहाळे.. बाप रे बाप! आजवर घराच्या कोनाडय़ातील देव्हाऱ्यात, नाही तर देवळाच्या काळोख्या गाभाऱ्यात कोंडलेला देव जणू मुक्त होऊन आभाळभर व्यापला होता. किंबहुना ‘देव’ ही भावभोळी कल्पना विस्तारून तिचं रूपांतर ईश्वरीयतेच्या विशाल संकल्पनेत पाहता पाहता संक्रमित झालं होतं. आणि तरीही या साऱ्याचा मध्यबिंदू होता, तो कवी, समर्पित थेंब आणि त्यात साठलेलं अखिल मानवजातीचं हे मनोगत.. ‘मी काय तुला वाहू?’
तेव्हा हे इतकं सगळं स्वच्छपणे जाणवलं नसेलही.. पण आज कळतं की एकूणच. ईश्वरीयता आणि आस्तिक-नास्तिकता हा तत्त्वविकार, विराट विश्वरहस्याबद्दलची अनावर ओढ, आपलं कणभर आणि क्षणभंगुर अस्तित्व आणि तरीही आपल्यापुरतं का होईना पण या विराट चक्राचा मध्यबिंदू बनलेलं आपलं भाग्यवान माणूसपण, या सर्व गोष्टींचं भान असलेली जी वैचारिक बैठक स्वत:मध्ये क्षणोक्षणी जाणवते, ती तिथपासूनच बांधली गेली असावी. कारण या जाणिवांच्या खुणा माझ्या काव्यविश्वात जागोजागी विखुरलेल्या दिसतील. अर्थात डोळस नजरेला.
या एका कवितेतून कवी कुसुमाग्रज हा भावबंध निर्माण झाला.  आणि पाठोपाठ एक-दोन वर्षांतच आणखी एक कविता एका सिद्धहस्त कवीसहित माझ्या आयुष्यात प्रविष्ट झाली. तिचे शब्द होते, ‘ज्ञानदेविच्या, मराठियेच्या नगरीतून हिंडून, आणिले टिपुनी अमृतकण..’ ही कविताही मला भेटली ती चोख गाणं म्हणूनच. विलिंग्डन कॉलेजात प्रथम वर्षांत शिकणाऱ्या श्रीकांत मोघ्यांना कवी गिरीश ह्य़ांच्या घरी ऐन तिशीतील पु.ल. देशपांडेंच्या अवर्णनीय मैफलीचा लाभ झाला. त्यातून त्यांनी जी अफलातून चिजांची पोतडी घरी आणली त्यामध्ये हे सुंदर गीत होतं आणि त्याचे कवी होते, ग. दि. माडगूळकर. हे नाव मी प्रथमच ऐकत होतो. हे गाणं मी ऐकलं आणि तत्काळ आत्मसातही केलं. तोपर्यंत मला स्वर-विलासाच्या पैल जाऊन त्या गाण्यातली कविता पाहायचा छंद लागला होता आणि ती कविता सकस अर्थपूर्ण असल्याखेरीज त्या शब्दांना लगडलेल्या संगीताचा आस्वाद घेणं मला अशक्य होऊ लागलं होतं.
हे गाणं मला आवडलं याचं कारण त्याची चाल वेधक होतीच. पण त्याहून अधिक ती कविता विलक्षण प्रासादिक आणि अर्थपूर्ण होती. शिवाय तिच्यातून येणारे भाव आणि त्यातून व्यक्त होणारा नवविचार मनाला भावणारा होता. तुकोबांची गाथा त्यांच्या हितशत्रूंनी इंद्रायणीत बुडवली आणि नंतर साक्षात इंद्रायणीने ती पुन्हा तुकोबांना अर्पण केली. या भावभोळ्या कथेला एक नवा अन्वयार्थ त्या कवितेत दिला होता. तुकोबांच्या गाथेचे कागद नदीत बुडालेच. पण दरम्यान त्यांचे अभंग लोकमानसात खूप खोल रुजले होते. त्या लोकगंगेतून ती गाथा पुन्हा नव्यानं सिद्ध झाली. हा नवा भावार्थ त्या गीतातून फार प्रत्ययकारी होऊन प्रवाहित झाला होता.

रानात पेरिती कृषिक बियाणे नवे
पेरिती तुक्याच्या अभंग-गीतासवे
अन्नब्रह्म होऊनी विनटतो म्हणून नारायण
अणिले टिपूनी अमृतकण..
अंगणी घालिती सुवासिनी जई सडे
त्या तिथं तुक्याची वाणी कानी पडे
कान उभारून ऐकत राही गोठय़ातील गोधन
आणिले टिपूनी अमृतकण
लोटता गावच्या वाटा अंत्यजगण
गातात तुक्याचे देवासी भांडण
तुका म्हणे ते म्हणत रंगती सेवाधर्मी जन
आणिले टिपूनी अमृतकण
ती देहू-आळंदी, देवाची पंढरी
दुमदुमे तुक्याच्या नामाच्या तोडरी
घरोघरी ही अभंगवाणी झाली वृंदावन
आणिले टिपूनी अमृतकण..
नादात िहडले कानांचे मधुकर
आणिले वेचुनी अक्षर अन अक्षर
तुमचा तुम्हा कुंभ वाहिला.. सूर्या निरांजन
आणिले टिपूनी अमृतकण..
नंतर मग कळलं की ‘तुका म्हणे आता’ या पुलंच्या पहिल्यावहिल्या नाटकासाठी गदिमांनी हे नितांतसुंदर गीत लिहिलं होतं. कवी म्हणून झालेल्या माझ्या घडणीत पुढे जुन्या-नव्या खूप मोठय़ा कवी-परंपरेचा मौल्यवान सहभाग आहे. पण नेणतेपणातून जाणतेपणात येत असताना, कुसुमाग्रज आणि गदिमा हे अत्यंत मातबर कविद्वय माझ्या आयुष्यात कायमचं सामावलं. मौज म्हणजे हे दोघेही प्रचंड लोकप्रिय.. पण त्यांच्या या दोन कविता मात्र तुलनेनं अप्रसिद्ध आहेत. पण म्हणूनच कदाचित माझ्या भावविश्वात त्या इतक्या विरघळून गेल्या असाव्यात. खरं तर दोन्ही भावगीतंच.. पण त्यातून कवितेच्या दोन शाखा आणि त्यांच्यातील साम्य-भेद यांचं अत्यंत मूलगामी दर्शन मला झालं. ‘मी काय तुला वाहू’ ही खरं तर आत्मनिष्ठ कविता, पण तरीही तिला गीतपण सहजपणे लगडलं होतं. याउलट ‘आणिले टिपूनी अमृतकण’ हे एका नाटकासाठी मागणीवरून निर्माण झालेलं उपयोजित गीत होतं. पण त्याच्या अंतर्यामी एक शुद्ध कवितातत्त्व सामावलं आहे..
गढूळ सांकेतिक पूर्वग्रहाविना कवी-मन इतकं निर्मळ कसं राहिलं, याचं आता नवल वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:01 am

Web Title: two poems and two poets
टॅग : Kavita Sakhi,Poem,Singing
Next Stories
1 कीर्तन-ऋण
2 अनिकेत.. निरंजन
3 नाते काळोखाचे ..
Just Now!
X