News Flash

‘आम्हास आम्ही पुन्हा पहावे’

अशा जीवघेण्या आपत्तीत माणसं जरा नीट वागायला लागतात. त्यांना कसला तरी साक्षात्कार होतो आणि माणुसकीची किंमत कळायला लागते अशी मांडणी बऱ्याचदा केली जाते.

एका न दिसणाऱ्या विषाणूची दहशत आहे सगळीकडे. त्यानं सर्वाना जेरबंद करून टाकलंय. कोणत्या शहरातली परिस्थिती काय आहे याकडे लोक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

आसाराम लोमटे – aasaramlomte@gmail.com

अशा जीवघेण्या आपत्तीत माणसं जरा नीट वागायला लागतात. त्यांना कसला तरी साक्षात्कार होतो आणि माणुसकीची किंमत कळायला लागते अशी मांडणी बऱ्याचदा केली जाते. आताही ते सांगितलं जातंय. हा काळ ओसरल्यानंतर माणसं एकमेकांना समजून घेतील? एक-दुसऱ्याचा अवकाश मान्य करतील? मानवी जगण्यातल्या श्रेष्ठतम मूल्यांना अधोरेखित करतील? परस्परांना जपतील? जगण्या-वागण्यातून हे सारं सिद्ध करतील?

एका न दिसणाऱ्या विषाणूची दहशत आहे सगळीकडे. त्यानं सर्वाना जेरबंद करून टाकलंय. कोणत्या शहरातली परिस्थिती काय आहे याकडे लोक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या विषाणूने आपल्या शरीराचा ताबा घेऊ नये यासाठी प्रत्येकाची मनोमन धडपड सुरू आहे. याआधी सारं काही नेहमीसारखंच सुरळीत होतं. अचानक सगळं बदलत गेलं. गेल्या काही दिवसांत वेगाने घडामोडी घडत गेल्या. शाळा-महाविद्यालयांना सुट्टय़ा, शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद, त्यानंतरची टाळेबंदी आणि देशातल्या सर्वच स्तरांत घेतली जाणारी धास्ती. ‘इस शहर में हर शक्स परेशान सा क्यूं है..’ असे वाटायला लावणारी. हे सारे बदल धाडधाड करत प्रचंड असं काहीतरी अंगावर यावं तसे होत गेले. हे असं कधीच झालं नव्हतं. तुमच्याच आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरी बसा.. हे सातत्याने सांगितलं गेलं. एरवी लोकसहभाग म्हणजे सक्रियता अथवा रस्त्यावर उतरणं. पण इथे तर आपण आपल्या घराबाहेर न पडणं म्हणजेच लोकसहभाग अशी नवीच व्याख्या अस्तित्वात आली. कोणावर तरी मात करणं यातच सौख्य सामावलं असण्याच्या आपल्या अंगभूत प्रवृत्तीला ‘जनता संचारबंदी’नंतर वेगळेच धुमारे फुटलेले पाहायला मिळाले. या खडतर काळात आपल्यासाठी कष्टणाऱ्यांविषयीची कृतज्ञता थेट मिरवणुकीच्या आणि सामूहिक विजयश्री खेचून आणल्याच्या पातळीवर उतरली. त्याचबरोबर पुढचे आणखी काही दिवस घरातच राहायचे आहे याची खात्री पटल्यानंतर अनेकांची जीवनशैलीच बदलली. दैनंदिन कर्तव्यं पार पाडण्याचा आखलेला दिनक्रम सैल झाला. ‘घर हे बंदिशाळा’ समजून कालहरणाचे नाना मार्ग धुंडाळले गेले. घरातल्या घरातच कोणी गाऊ लागला, कोणी नाचू लागला, कोणी चित्रं काढू लागला. अनेकांना नव्या रेसिपींचा शोध लागला. गृहकृत्यदक्ष असल्याचे प्रासंगिक पुरावे जो-तो समाजमाध्यमांवर देऊ लागला. या देशात एवढे गायक, कलावंत, बल्लवाचार्य, चित्रकार आहेत हे पहिल्यांदाच समोर आलं. हे ‘कलागुणपर्व’ आणखी किती काळ चालणार आहे याबाबत कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही.

हिंदीतले प्रसिद्ध कादंबरीकार विनोदकुमार शुक्ल यांच्या ‘नोकर की कमीज’ या कादंबरीतली पहिलीच ओळ आहे : ‘कितना सुख था कि हर बार घर लौटकर आने के लिए मैं बार बार घर से निकलूंगा.’ यातून घराची आपल्या भावविश्वातली जागा त्यांनी निश्चित केलीय. सध्या घरातच असणाऱ्या किती जणांना हा अनुभव येत असेल, कुणास ठाऊक. ‘नुसत्या भिंती नकोत, तर तिथं प्रेम, जिव्हाळा असावा..’ असं म्हणत आजवर घराचं वर्णन केलं गेलं. घर म्हणजे मायेची उब, जगरहाटीत दमल्यानंतर विसाव्याचे ठिकाण असं म्हटलं जातं. पण आता घरी परतण्यासाठी आधी घराबाहेर तर पडावे लागेल ना! पण तोच मार्ग बंद झालाय. घराबाहेर पडायचं नाही, तर मग दिवस कसा घालवायचा? घरात वेगवेगळे पदार्थ करून झालेत. कधी ‘करून पाहू’, तर कधी ‘पाहून करू’ असं म्हणत बरंच काही करून झालंय. बेडशीटवर फुलं किती, डाळिंबात दाणे किती, वाटीभर आमटीत मोहऱ्या किती, ‘धडकन’ गाण्यात तो शब्द किती वेळा आलाय.. असं सगळं मोजून झालंय. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिकटॉक, यूटय़ुब, ट्विटर.. आणखी काय काय! एकाचा कंटाळा आला की बोटं आपोआपच दुसरीकडे वळतात. त्यात आणखीन दिवसातून अनेकदा वीस ते चाळीस सेकंदांपर्यंत हात धुऊन झालेत.

अशावेळी घरात बसलेली माणसं माध्यमांवर पाहत आहेत की सगळेजण आपल्यासारखे निवांत नाहीत. महानगरांमधून आपल्या गावी जाण्यासाठी वाहनतळांवर प्रचंड गर्दी झालेली आहे. अशी फाटकी माणसं रस्त्यावरही दिसू लागली आहेत. ती जिवाच्या कराराने धावताहेत. हे शहर आता आपल्याला जगवेल, जिवंत ठेवील ही आशाच मावळलीय त्यांची. दूर कुठंतरी एखाद्या ठिपक्यासारखा त्यांना त्यांचा गाव दिसू लागलेला आहे. डोक्यावर गाठोडी आणि लहान लेकरांना कडेवर घेऊन वाट तुडवत ही माणसं निघाली आहेत. रस्त्यावर सन्नाटा पसरला आहे. वातावरणात भीती आहे. कशाची..? मरणाची?  हो. ती तर असतेच. मर्ढेकर म्हणाले तसं..

‘जरा असावी मरणाचीही

अमोघ आणिक दुबळी भीती

जरा आतडय़ांमधून यावी

अशाश्वताची कळ ओझरती’

..ही अशाश्वततेची कळ ओझरती नाही, गडद आहे. ही कळ उरात घेऊनच तर माणसं निघाली आहेत. पोटात अन्नाचा कण नाही, प्यायला घोटभर पाणी नाही. पायातलं बळही आटून गेलंय. दिल्लीहून निघालेल्या माणसाला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधल्या आपल्या गावी जायचंय. मुंबई-पुणे-नाशिकच्यांना  कोकण, यवतमाळ, वर्धा, धुळे, नांदेड, परभणीपर्यंत पोहोचायचंय. गावात पोट भरत नाही म्हणून अनेकांनी कधीकाळी शहरात धाव घेतलेली. गाव सन्मानानं जगू देत नाही, हा सल असणारेही अनेक होते. अशा माणसांचे लोंढेच्या लोंढे रस्त्याने दिसू लागलेत. एका फटक्यासरशी कोणताही आवाज न करता एखाद्या वस्तूने निकामी व्हावं, तसं ही माणसं बेदखल झाली.  ‘आपण सगळ्या सूचना पाळत आहोत, घराच्या बाहेरही निघत नाही आणि ही माणसं अशी रस्त्यावर का फिरत आहेत? यांनी कुठेही खपावं. पण हे लोक स्वत:ही नीट जगत नाहीत आणि इतरांनाही सुखानं जगू देत नाहीत..’ असं म्हणत घरातल्या घरात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणारे लोक जागच्या जागीच तळमळत आहेत. प्रशासनालाही भीती वाटू लागते या लोकांमार्फत  विषाणू सगळीकडे पसरला तर..? आणि मग त्यांना रस्त्याच्या कडेला बसवलं जातं. आग विझवणाऱ्या पाइपमधून फवारणी केली जाते. त्यांच्यावर सॅनिटायझर फवारलं जातं.. जोरदार मारा केला जातो. चालून चालून थकलेले जीव अंगाचं मुटकुळं करून हा मारा चुकवण्याचा, त्याच्या तडाख्यातून वाचण्याचा प्रयत्न करतात. पण हा मारा सोसणाऱ्या लहान लेकरांचं काय? या सगळ्यांच्या चुरचुरणाऱ्या डोळ्यांचं काय? त्यांच्या भिजलेल्या गाठोडय़ांचं काय? यावर विचार करायचा की नाही? ही माणसं आहेत, हे तरी मान्य आहे का आपल्याला?

आपलं घर ही सर्वात सुरक्षित जागा असं जेव्हा शासन-प्रशासन, माध्यमं सांगू लागतात तेव्हा दक्षिण महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्यांची धडधड चालू असते. साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे तिच्या कच्च्या मालाची- म्हणजेच उसाची वाहतूक आंतरराज्य किंवा जिल्ह्य-जिल्ह्यत रोखली जाऊ नये असे आदेश काढले जातात. ज्या अर्थी वाहतूक चालू आहे त्या अर्थी ऊसतोड चालू आहे. प्रत्येक फडात ऊसतोड करणारे मजूर आहेत. या महामारीच्या बातम्यांनी त्यांच्या जिवाचा थरकाप उडतोय. त्यांनाही गाव गाठायचाय. पण हंगाम संपेपर्यंत थांबलं पाहिजे, अशी कारखान्यांची सक्ती आहे. गाळप संपण्याआधी गेलात तर पैसे मिळणार नाहीत असं बजावलं गेलंय. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचं काय? याबाबत कोणत्याच उपाययोजना करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. ‘घरातच राहा’ असं कानीकपाळी ओरडून सांगितल्यानंतरही ज्यांना घरात राहता येत नाही अशी ही माणसं आहेत. पण पुन्हा प्रश्न तोच.. ती मुळात माणसं आहेत हे मान्य आहे का आपल्याला?

जे रस्त्याने चालले आहेत त्यांच्यापैकी अनेकांनी चिल्यापिल्यांसह दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पार केलंय. नकाशात कुठेच ठळकपणे न दिसणाऱ्या आपल्या गावी त्यांना परतायचंय. आता परत कधीच यायचं नाही असं ठरवून यातल्या काहींनी आपला गाव सोडलेला. तसं यातल्या अनेकांचं गावात तरी असं काय आहे? बूड टेकायला जागा आणि तोडकंमोडकं छप्पर! गेल्या कित्येक वर्षांत ते शाकारलेलं नाही.. पण तरीही त्यांना तिथवर पोहोचायची अदम्य इच्छा आहे. जगण्याची लालसा माणसाला आवेग देते, दमवते, पुन्हा उभं करते. या वाटा सगळ्यांनाच गावांपर्यंत घेऊन जातील का, हे सांगणं अवघड आहे. काही गावांनी तर जणू आपल्याभोवती खंदक खोदून येणाऱ्यांच्या वाटा अडवल्या आहेत, रस्त्यातच दगड घातले आहेत. जे गावाच्या दिशेनं पायी चालत आहेत त्यातल्या किती जणांनी उपाशीपोटी चालताना दम तोडला आहे याच्या बातम्या आता येऊ लागल्यात. उद्या ही संख्याही मोजली जाईल. शहरांतून गावात पोहोचलेल्या माणसांकडेही विश्वासानं पाहिलं जात नाहीये. हवेत भीतीचा संचार झालेला आहे. खरं तर या सगळ्यांना गावातच हाताला काम मिळालं असतं तर ती शेकडो किलोमीटर दूरवर पोट भरण्यासाठी कशाला आली असती? गावातून ती उखडली गेली आणि शहरांनी त्यांना सुपात धान्य पाखडून फोलपट फेकून द्यावं तसं बाहेर फेकून दिलं. आता येणाऱ्या काळात त्यांचे पुढचे दिवस आणखी दुष्कर असणार आहेत. हाताला काही काम नाही, येणाऱ्या धान्याची वाट पाहायची. या काळात घरातल्या कोणाचं आजारपण उद्भवलं तर खिशात दमडीही नाही. देशभरातल्या अशा लाखो लोकांचं विस्थापन कसं हाताळायचं, त्यांना सुरळीतपणे त्यांच्या गावापर्यंत कसं नेऊन पोहोचवायचं, हा प्रश्नच धोरणकर्त्यांच्या खिसगणतीत नव्हता. जेव्हा हे सारे भुकेले तांडे रस्त्यावर दिसायला लागले तेव्हा महानगरांमध्ये तळाशी असलेलं हे जग भयाण चित्राच्या रूपानं वर आलं. फेसाळणाऱ्या सप्तरंगी बुडबुडय़ाखाली असलेला सगळा गाळ ढवळून वर आला. या माणसांनी इमारती बांधल्या, पूल बांधले, घाण साफ केली, कागद-काच-पत्रा वेचला, शहरं लख्ख आरशासारखी स्वच्छ ठेवली.. सर्व प्रकारची कष्टप्रद कामं करणारी ही असंघटित कष्टकरी माणसं आज निमुटपणे एखादा कागद चुरगळून फेकून द्यावा तशी बाजूला पडलीत.

..या विषाणूची धास्ती कधी कमी होईल ते माहीत नाही. सर्व जीवनव्यवहार सुरळीत कधी होईल ते सांगता येत नाही. अशावेळी घरात असणं स्वाभाविकच आहे. सुरक्षिततेसाठी आवश्यकसुद्धा! मात्र, व्यक्ती ही समाजाचा घटक आहे आणि आपण समाजशील प्राणी आहोत याचा विसर पडणारे आपण सर्व जण अशा काळात वावरतो आहोत, की जणू आपण एकएकटे स्वतंत्रपणे एकेका बेटावर राहतो आहोत. आता जगण्याच्या भीतीने झालेलं हे विलगीकरण या क्षणी आवश्यक असलं तरी अनेकांनी हे तत्त्व यापूर्वीच अमलात आणलंय. आता एकांत खायला उठत नाही, त्याचबरोबर तो ‘येणे सुखे रूचे’ असाही राहिलेला नाही. साधनांनी माणसं एकमेकांशी जोडलेली असली म्हणजे माणूस म्हणून ती एकमेकांशी जोडलेली असतीलच असा निष्कर्ष काढता येत नाही. माध्यमांनी जग जोडले गेल्याचा आभास दिसतो, पण प्रत्यक्ष तो तसा असतो असंही नाही. याउलट, या साऱ्या ‘जोडणी’तून आपला व्यवसाय चालवणाऱ्या असंख्य कंपन्यांच्या वसाहती इथे नांदताना दिसतात. आपला एकांतसुद्धा जणू कोणाची तरी बाजारपेठ झालेला आहे. तो घालविण्याची सगळी साधनं व्यक्ती म्हणून सदासर्वकाळ आपल्याला उन्नत करणारीच असतील असं नाही.. माणूस म्हणून समृद्ध करणं ही जरा त्यापुढची गोष्ट झाली.

अशा जीवघेण्या आपत्तीत माणसं जरा नीट वागायला लागतात. त्यांना कसला तरी साक्षात्कार होतो आणि माणुसकीची किंमत कळायला लागते अशी मांडणी बऱ्याचदा केली जाते. आताही ते सांगितलं जातंय. हा काळ ओसरल्यानंतर माणसं एकमेकांना समजून घेतील? एक-दुसऱ्याचा अवकाश मान्य करतील? मानवी जगण्यातल्या श्रेष्ठतम मूल्यांना अधोरेखित करतील? परस्परांना जपतील? जगण्या-वागण्यातून हे सारं सिद्ध करतील? कोणावर तरी विजय मिळविण्याचं हपापलेपण आणि त्यासाठी ओरबाडून प्राप्त केला जाणारा आनंद या प्रवृत्तीचा र्निवश होईल? या सगळ्या प्रश्नांचं औसुक्य आहेच. त्यांच्या उत्तरासाठी मात्र काही काळ जावा लागेल. तोवर घरातल्या घरात आपणच आपल्याला तपासत राहू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 1:02 am

Web Title: understanding ourselves one more time dd70
Next Stories
1 लॉकडाऊन काळातल्या तुटक नोंदी
2 रात्रंदिन युद्ध… (चीन)
3 गाफील शासनाची अटळ परिणती (अमेरिका)
Just Now!
X