|| डॉ. आसावरी उदय बापट

बर्मा ऊर्फ म्यानमार.. भारताच्या निकटतम शेजाऱ्यांपकी एक. बुद्ध धर्माची परंपरा जपणारा देश. लोकमान्य टिळक ज्या मंडालेच्या तुरुंगात होते, जिथे नेताजी सुभाषचंद्रांची सुवर्णतुला केली गेली, जिथला थिबा राजा भारतात कोकणातील रत्नागिरीत तुरुंगवासात होता अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाबींमुळे भारताच्या खूप जवळचा असलेला देश म्हणजे म्यानमार. इथले अनेक सण भारतीय सणांशी जवळीक साधतात. म्यानमारमधील आपल्याकडच्या धुळवडीशी साधम्र्य साधणारा असाच एक सण म्हणजे ‘तिज्या’! आपल्याकडे पाणी आणि रंगांची धुळवड असते, तर इथे केवळ पाण्यानेच हा सण खेळला जातो.

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

पौराणिक संदर्भ

इथे नववर्षांचा प्रारंभच मुळी ‘तिज्या’ या सणाने होतो. हा काळ ‘डगा’ या म्यानमारच्या शेवटच्या महिन्यापासून ते ‘डगो’ या वर्षांच्या पहिल्या महिन्यातील संक्रमणाचा काळ असतो. दरवर्षी १३ एप्रिल या तारखेला तिज्याची संध्याकाळ असते. मुख्य सण १४, १५ आणि १६ एप्रिल या तीन दिवशी साजरा केला जातो. पाचव्या दिवशी- म्हणजे १७ तारखेला म्यानमारचे नववर्ष असते. बर्मी मान्यतेनुसार तिज्याच्या पहिल्या दिवशी तज्यामिन् म्हणजे इंद्र पृथ्वीवरील सदाचार आणि अनाचार याची पाहणी करण्याकरता येतो. दुसऱ्या दिवशी तो साऱ्या नगरीचे भ्रमण करतो आणि तिसऱ्या दिवशी अमरावतीला परत जातो. या सणामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. आपल्याकडील गणपतीच्या मस्तकाशी साधम्र्य सांगणारी ही कथा आहे. या कथेनुसार, तज्यामिन् (इंद्र) आणि अर्स (ब्रह्मदेव) हे दोन देव गणितातील एक कूट सोडवायला बसले होते. कोणाचे उत्तर योग्य, हे ठरवण्याचा अधिकार कवलामिन् नावाच्या ऋषींना देण्यात आला होता. ज्याचे उत्तर योग्य तो दुसऱ्याचे मस्तक छाटेल अशी विचित्र अट ठरली. ऋषींच्या मते, तज्यामिन्चे उत्तर योग्य असल्याने त्याला अर्सचे मस्तक छाटायचे होते. पण अर्स पिंडला सर्वश्रेष्ठ देव! त्याचे मस्तक जमिनीवर पडल्यास पृथ्वी भस्म होईल, आकाशात उडाल्यास आकाश फाटेल आणि पाण्यात पडल्यास पाणी आटेल अशी भीती वाटल्याने त्याने देवतेला ते मस्तक जपून ठेवण्यास सांगितले. त्याच वेळी ब्रह्मदेव मस्तकविरहित असणे योग्य नव्हे म्हणून इंद्राने महापिंगला हत्तीचे मस्तक कापून ते ब्रह्मदेवाच्या धडावर लावले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे एक नाव ‘महापिन्ने’ असे पडले. हे मस्तक एका देवतेच्या हातून दुसऱ्या देवतेच्या हातात देण्याचा काल म्हणजे म्यानमारचे नववर्ष!

ऐतिहासिक संदर्भ

बर्मी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला हा सण बर्मी राजांच्या राजसभेतसुद्धा साजरा केल्याचे संदर्भ सापडतात. पगा राजवंशातील अंतिम राजा नरातीहापती (१२५४-८५) याने आपल्या प्रासादापासून इरावडी नदीपर्यंत एक कालवा काढला होता. तिज्या सणाच्या वेळी राजा व त्याचा मंत्रिपरिवार तेथे एकमेकांवर पाणी उडवण्याचा खेळ खेळत असत.

आधुनिक संदर्भ

चार दिवस चालणाऱ्या या जलक्रीडेत तरुण-तरुणींचा फार मोठा सहभाग असतो. तरुणी तरुणांवर पाणी उडवतात. जागोजागी पाणी उडवण्यासाठी चबुतरे उभे केले जातात. याशिवाय ट्रक, टेम्पोंतून पाणी वाहून नेण्यासाठी छोटय़ा नावा केल्या जातात. त्यातून पाणी नेले जाते. जलक्रीडेचा हा कार्यक्रम सकाळी सहा ते दुपारी बारा आणि पुन्हा दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो. संध्याकाळी नृत्य, नाटय़, संगीतादी कार्यक्रम जागोजागी होतात. एकमेकांवर पाणी उडवण्याच्या या कार्यक्रमाला ‘अटा ये’ म्हटले जाते. ‘अमृत’या शब्दाचा अपभ्रंश ‘अटा’ आणि ‘ये’ म्हणजे पाणी. त्यामुळे ‘अटा ये’ म्हणजे ‘अमृत जल’ असा याचा अर्थ होतो. अत्यंत उत्साहात हा जलोत्सव साजरा केला जातो. सारा म्यानमार पाच दिवस या सणात अगदी बुडून गेलेला असतो. नागरिकांना सार्वत्रिक सुट्टी असते आणि लोक जलक्रीडेत मग्न असतात. आपले सण आणि परंपरा अभिमानाने साजरे करणाऱ्या म्यानमारमधील तिज्या पाहणे हा एक आनंददायी अनुभव आहे.

bapat.asawari@gmail.com