‘I HAD NEVER BEEN A COLLECTOR…
UNTIL I LATCHED ON TO A BOOKMARK.’
LAUREN ROBERTS,
‘BOOKMARKS : A PERSONAL PASSION’
आपल्यापैकी अनेकांना वेळोवेळी हा अनुभव येत असतो. आपण पुस्तक वाचत असतो. त्यात काही अडथळा येतो. पुस्तक बाजूला ठेवून उठावं लागतं. मग पुस्तक मिटण्यापूर्वी आपण खुणेसाठी हाताला मिळेल ती वस्तू जवळ करतो. ट्रेनचं तिकीट, जाहिरातीचा तुकडा, एखादा जुना फोटो, चष्मा किंवा अगदी एखादं लहानसं पुस्तकसुद्धा! कारण वाचत असलेलं पुस्तक बंद न करता तसंच पालथं ठेवायचं तर सुरेख बांधणी असलेल्या त्या पुस्तकाचा कणा (SPINE) दुखावण्याचा, त्याचे मणके खिळखिळे होण्याचा धोका lr22संभवतो आणि वाचत असलेल्या पानाचा कोपरा दुमडायचा तर त्याला पडलेली कायमस्वरूपी घडी एखाद्या चिरंतन कलंकासारखी आपल्याला छळत राहते.
म्हणूनच हा मनस्ताप टाळण्यासाठी एखाद्या आटोपशीर साधनाची गरज भासू लागली. माझ्यापुरतं बोलायचं तर घरातील कागदाचा प्रत्येक लहान-मोठा तुकडा माझ्यासाठी खुणेचं साधन असतो. मात्र आज मी एकाहून एक आकर्षक बुकमार्कस् पाहतो, माझ्या संग्रहात ठेवतो तेव्हा त्यांच्याविषयी कुतूहल जागृत होतं. ही कल्पना कधी आणि कोणाला सर्वप्रथम सुचली असेल? त्याचं सुरुवातीचं स्वरूप कसं होत असेल? आजपर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला असेल? साहजिकच, विचारचक्र सुरू होतं. जुन्या आठवणी ताज्या होतात. मन त्यांच्या विचारांत रमतं. आज, ‘थँक यू कार्ड्स’ आणि शुभेच्छा कार्डाची रेलचेल पाहायला मिळते. त्यातील वैविध्य तर निव्वळ अविश्वसनीय. सर्व बऱ्यावाईट प्रसंगांसाठी आज कार्डस् उपलब्ध आहेत, ती देखील सर्व भाषांमध्ये! चाळीसएक वर्षांपूर्वी मात्र याउलट परिस्थिती होती. तेव्हा ‘वकील’नी छोटी ‘थँक यू कार्ड्स’ (NOTELETS) आणि बुकमार्कस्  बाजारात आणले होते. ‘चिमणलाल’ यांनीही हॅण्ड-मेड् पेपरचे बुकमार्कस् आणि टेबल स्टेशनरी सादर केली होती.’ यातील काही आजही माझ्या संग्रही आहेत. एरवी आपल्याकडे या आघाडीवर फारशी उत्सुकता दिसत नव्हती.
कुतूहलापोटी बुकमार्कस् च्या जन्मकथेचा मागोवा घेतला असता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. त्यांचं अस्तित्व, त्यांचा इतिहास हा पुस्तकांच्या आजवरच्या वाटचालीशी, विकसनप्रक्रियेशी निगडित आहे. बुकमार्कस् वापरात असल्याचा उल्लेख मध्ययुगीन काळात आढळत असला तरीही अगदी प्राचीन काळातही त्यांचा वापर केला जात होता हे उघड आहे. पॅपिरस (PAPYRUS) या पाण्यात वाढणाऱ्या झाडाच्या जाड lr23बुंध्यापासून तयार केलेला कागद प्राचीन काळी इजिप्तमध्ये वापरला जात असे. आपली वाचनभूक भागवण्याचा हा एकमेव पर्याय त्या काळी जिज्ञासूंना उपलब्ध होता. या कागदाचे लेखपट – गुंडाळय़ा (SCROLLS) काही वेळा चाळीस मीटरहून अधिक लांबीचे असत. त्याच सुमारास व्हेलम (VELLUM) पासून तयार केलेले सर्वाधिक पुरातन चापसदृश (CLIPTYPE) बुकमार्कस् मध्ययुगीन भिक्षुविहारांमध्ये सापडले आहेत. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, प्राचीन इजिप्तमधील लेखपट वाचतानाही हे चापसदृश बुकमार्कस् वापरण्यात येत असावेत.
मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धात तेराव्या आणि पंधराव्या शतकांदरम्यान ‘इन्कनाबुला’ (INCUNABULA) नामक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्येही भिक्षुविहारांशी संबंध दर्शवणारे प्राचीन बुकमार्कस्  सापडले आहेत. ते बहुधा कोकराच्या त्वचेपासून (LAMBSKIN) तयार करण्यात येणाऱ्या व्हेलमपासून केलेले असावेत. सुरुवातीचे हे बुकमार्कस् सरळ धाग्याच्या अथवा चापसदृश स्वरूपात तयार केले गेले असले तरीही त्यामध्ये एका चक्राकार फिरणाऱ्या  सुविकसित चकतीचाही समावेश आहे.
पीटर कोम्स्टर याने तेराव्या शतकात लिहिलेल्या ‘हिस्टोरिया स्कोलास्टिका’ (HISTORIA SCHOLASTICA) या प्रबोधनात्मक हस्तलिखितात- जे आज ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रहात आहे, एक वेगळाच बुकमार्क आहे. ‘पानाच्या कडेला उभा छेद घेऊन एक लांब पट्टी तयार करण्यात आली आहे, जी छेदाच्या वरील भागातून सरकवून बुकमार्कसारखी वापरता येते.
ब्रुनेईच्या शाही वस्तुसंग्रहालयात भारतात तयार झालेला हस्तिदंती बुकमार्क असून त्यावर भौमितिक lr24छिद्ररेषांनी केलेलं सुशोभीकरण आहे. सोळाव्या शतकातील हा बुकमार्क खासकरून कुराण पठणादरम्यान वापरला जात असे.
ख्रिस्तोफर बार्कर या कापड व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने १५८४ मध्ये महाराणी एलिझाबेथ हिला सिल्कपासून तयार केलेला बुकमार्क भेट म्हणून दिला होता. महाराणीने या व्यापाऱ्याला बायबलच्या छपाईचा विशेषाधिकार (PATENT) दिला होता. १६३२च्या सुमारास असाच एक सिल्कचे गोंडे आणि वीण लावून तयार केलेला व खासकरून बायबलसाठी वापरला जाणारा वैशिष्टय़पूर्ण बुकमार्क ‘ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन बायबल सोसायटी’च्या संग्रहात आहे.
अठराव्या-एकोणिसाव्या शतकांदरम्यान सर्वसाधारणपणे आढळणारे बुकमार्कस् सिल्कच्या एक सेंटिमीटर रुंदीच्या रिबनच्या स्वरूपात होते. हे पुस्तकाच्या कण्याच्या वरील बाजूस जोडून ते पुस्तकाच्या खालील बाजूने बाहेर दिसण्याइतपत लांब असत. खासकरून पुठ्ठाबांधणीच्या जाडजूड संदर्भग्रंथांमध्ये अशा प्रकारचे बुकमार्कस् आजही पाहायला मिळतात.
व्हिक्टोरियन काळात (१८५० ते १९००) स्त्रिया आपल्या मुलींना भरतकाम शिकवत असत. या कलेतील आपलं नैपुण्य सिद्ध करण्यासाठी मुलींनी कॅनव्हासवर बुकमार्कस्चे नमुने तयार करणं अपेक्षित होतं. अशा प्रयोगांच्या माध्यमातून बरेच बुकमार्कस् तयार होत; जे बायबल आणि इतर प्रार्थनापुस्तिकांमध्ये वापरले जात. हे घरगुती बुकमार्कस् बहुधा भरतकाम केलेल्या रिबनच्या तुकडय़ांचे किंवा जलरंगांनी सुशोभित केलेल्या कार्डपेपरपासून तयार केले जात असत.
याच सुमारास, सुटय़ा स्वरूपातील आणि म्हणूनच संग्रह करता येण्याजोगे बुकमार्कस् आले. त्यांचा सुरुवातीचा संदर्भ मेरी रसेल यांच्या ‘RECOLLECTIONS  OF A LITERARY LIFE’ (१८५२) या ग्रंथात सापडतो. त्या म्हणतात, ‘आय हॅड नो मार्कर अ‍ॅण्ड द रिचली बाऊण्ड व्हॉल्यूम क्लोजड् अ‍ॅज इफ इन्स्टिंक्टिव्हली.’ विशेष म्हणजे त्यांनी मार्कर हे संक्षिप्तीकरण वापरलं आहे. अर्थात, आधुनिक काळात ‘बुकमार्क’ हेच संबोधन प्रचलित आहे.
इंग्लंडमधील सिल्क उद्योगाचं केंद्र असलेल्या कोव्हेन्ट्री येथे १८६०च्या दरम्यान यंत्रावर विणलेले बुकमार्कस् तयार होऊ लागले. १८६१ मध्ये जे अ‍ॅण्ड जे कॅश यांनी राजवधूच्या स्मरणार्थ विशेष बुकमार्कस् तयार केले होते. कोव्हेन्ट्रीचे थॉमस स्टीव्हन्स या क्षेत्रातील अग्रणी होते आणि असं समजलं जातं की, त्यांच्याकडे बुकमार्कस्चे निरनिराळी नऊशे नमुने होते. ‘स्टीव्हनोग्राफ’ या नावाने ओळखले जाणारे हे बुकमार्कस् १८६२च्या सुमारास बाजारात आले होते. व्हिक्टोरियन काळात सिल्कचे विणलेले बुकमार्कस् विशेष लोकप्रिय होते आणि स्टीव्हन्सकडे जवळजवळ प्रत्येक प्रसंगासाठी व उत्सवासाठी विशिष्ट बुकमार्कस् होते.
१८८० नंतर मात्र विणलेल्या सिल्क बुकमार्कस्चं उत्पादन कमी होत त्याच्या जागी कार्डपेपरवर छापलेले lr20बुकमार्कस् मोठय़ा प्रमाणावर येऊ लागले. पुस्तकांच्या वाढत्या संख्येसोबत त्यांची संख्याही वाढली आणि आपसूकच त्यातील वैविध्येही! विमा कंपन्या, प्रकाशक आणि इतर व्यावसायिकांनी या सहज लाभणाऱ्या प्रसिद्धीचा पुरेपूर लाभ घेतला. पॉलिक्रोमॅटिक छपाई केलेले सुबक ‘स्मृती’ मार्कर्स भेटवस्तू म्हणूनही विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले.
त्यानंतरच्या शंभर-सव्वाशे वर्षांत लंडन ब्रिजखालून बरंच पाणी वाहून गेलं. छपाईतंत्रात लक्षणीय बदल होत गेले. शिक्षणाचा प्रसार होत गेला. साहजिकच पुस्तकांची संख्याही वाढली. मग या स्पर्धेत बुकमार्कस् कसे मागे राहतील? त्यांनीही झेप घेतली. सुप्रसिद्ध लेखकांचे उद्धृत असलेले, नक्षीकाम केलेले अक्षरश: शेकडो प्रकारचे बुकमार्कस् आज उपलब्ध असून त्यावर वाचकांच्या उडय़ा पडत आहेत. बुकमार्कस्चा अभिमानपूर्वक संग्रह करणारे रसिक वाचक आहेत.
आकाराने छोटय़ा असलेल्या या बुकमार्कस्ची महती इतकी मोठी आहे, की त्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत. अशाच एका पुस्तकातील उद्धृत या लेखाच्या सुरुवातीस दिलं आहे. त्यांच्यावर सुरेख कविताही लिहिल्या गेल्या आहेत. डंकन बाअ्ल (DUNCAN BALL) यांची ‘बुकमार्क’ ही साधी-सोपी, सुटसुटीत कविता बुकमार्कविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा, कौतुक दर्शवते.
बुकमार्क्सविषयीच्या पुस्तकांबाबत पुन्हा केव्हा तरी विस्ताराने लिहावं लागेल. तूर्तास आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो. ‘धनंजय’ आणि ‘चंद्रकांत’ ही दोन लोकप्रिय हिवाळी वार्षिके आणि राजेंद्र प्रकाशनचे सर्वेसर्वा असलेले माझे दिवंगत मित्र राजेंद्र कुलकर्णी नेहमीच नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या विचारात गढलेले असत. मुखपृष्ठाच्या कागदाचा एरवी कचऱ्यात जमा होणारा भाग ते आकर्षक बुकमार्कस् तयार करून घेण्यासाठी वापरत असत, पुस्तकांसोबत देण्यासाठी! मात्र, ‘बुकमार्क ’ या इंग्रजी शब्दाऐवजी त्यांना ‘स्मृतिपर्ण’ हा गोंडस मराठी शब्द अधिक प्रिय होता. आपल्याकडे याला आता ‘वाचनखूण’ असंही संबोधलं जातं.
फ्रँक रॉबर्टस यांनी बुकमार्कस्वर तात्त्विक भाष्य केलं आहे. ते म्हणतात :
‘सोशिकपणा ही तशी कठीण बाब आहे. मात्र, बुकमार्कस्नी ती आत्मसात केली आहे. डागाळल्यावर, जीर्ण झाल्यावरही ते आपलं कर्तव्य विनातक्रार बजावत असतात. ‘दे आल्सो सव्‍‌र्ह, हू स्टॅण्ड वेट्’ हे इंग्रजीवचन ते खऱ्या अर्थाने सार्थ करतात. कोणत्याही परिस्थितीत सैनिकासारखे उभे राहतात आणि जेव्हा आपल्याला डुलक्या येऊ लागतात, तेव्हा ते जागता पहारा ठेवतात. त्यांच्या या शांतवृत्तीत आपल्यासाठी वस्तुपाठ आहे. कायम चिंताग्रस्त असणाऱ्या, कपाळावर सतत आठय़ा घेऊन वावरणाऱ्या आपण थोडं थांबून, विचार करून आपल्या स्वभावात सोशिकपणा आणायला हवा. कारण आपण ज्या सत्याचा ध्यास घेतो, ते पुस्तकांच्या पानांवर नसून ते ‘पानां’मध्ये असतं, हे सत्य एखाद्या तत्त्ववेत्याप्रमाणे, बुकमार्कस् आपल्या मनावर ठसवतात.’
खरं आहे! कितीही अडचणी आल्या, दु:खाचे डोंगर कोसळले तरीही आपण ठाम उभं राहायला हवं, स्थितप्रज्ञासारखं. धीरगंभीर, अविचल. आपलं कर्तव्य मनोभावे पार पाडत. अनिश्चिततेने ग्रासलेल्या आपल्या आयुष्यात बऱ्यावाईट आठवणींचे बुकमार्क येत असतात. कधी आप्तमित्रांच्या रूपाने, तर कधी पुस्तकांच्या स्वरूपात! ते आपल्याला धीर देतात. दिलासा देतात. जगण्याची नित्यनवी उमेद देतात. ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ या गीतोपदेशाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या बुकमार्कस् स्थान, त्यांचं असणं महत्त्वपूर्ण आहे. जितकं पुस्तकांसाठी, तितकंच आपल्या आनंदी जगण्यासाठीही! कारण..
.. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आपला प्रवास म्हणजे जणू आपल्या अस्तित्वरूपी पुस्तकांचं अखंड वाचन! मात्र, कोलमन
याने म्हटल्याप्रमाणे, इथे बुकमार्क येतो तो या पुस्तकाच्या शेवटी आणि तो असतो, ‘स्मृतिस्तंभ : मृत्यूचा बुकमार्क.’ खरंच!