गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात झाडी बोली बोलली जाते. या बोलीचे वऱ्हाडी बोलीशी साम्य आहे तसेच हिंदीभाषिक प्रदेशामुळे या भाषेचाही प्रभाव काही प्रमाणात आहे. हिंदीतील अनेक शब्द, प्रमाण मराठीतील शब्द या बोलीत वापरले जात असले तरी या बोलीची म्हणून स्वतंत्र शब्दसंपदा आहे. तिच्या वैशिष्टय़ांची आणि अर्थप्रवाहीपणाची साक्ष ती देते.
झाडीपट्टीतील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरातील लोक प्रामुख्याने मराठीभाषी आहेत. याभागात झाडीबोली बोलली जाते. हा भूभाग पूर्वी मध्यप्रदेशात असल्यामुळे येथील अद्यापही हिंदी भाषेचा अंशत: प्रभाव असल्याचे दिसून येते. शब्द आणि उच्चार हिंदी मिश्रित आहेत. घरात आल्यावर मराठी व घराचा उंबरठा पार केल्यावर हिंदी भाषा बोलली जाते. मध्य प्रदेशातील बालाघाट, भिलाई, जबलपूर या हिंदी भाषी शहरांत काही प्रमाणात मराठी बोलली जाते. कारण विदर्भातून बहुतेक मराठी भाषी लोकांनी कामधंद्यासाठी मध्यप्रदेशात स्थलांतर केलेले आहे. या परिसरात पूर्वी विस्तीर्ण जंगलं पसरलेली होती. त्यामुळे नजीकच्या वऱ्हाड वा तत्सम भागातील लोक झाडीपट्टीला ‘झाळी’ आणि येथील लोकांना ‘झाडप्या’ म्हणतात, अर्थात गमतीने!
झाडीबोलीत ‘तो जाऊन राह्य़ला’, ‘येऊन राह्य़ला’ असे बोलतात. तसेच ‘मले’ (मला), ‘तुले’ (तुला), ‘कायले’ (कशाला) असे शब्द-प्रयोग केले जातात. काही प्रयुक्त होणारे शब्द असे आहेत- कुठे- कोठी, उद्या- सकारी, रोग-बेमारी, ऊन-तपन, ताप-बुखार, बाजार-बजार, कशाला- कायले. का?- काहून? या बोलीत ‘ळ’ ऐवजी ‘र’ वापरला जातो, जसे- डाळभात- दारभात, शिवीगाळ, गारी, पळाला- पराला, दिवाळी- दिवारी, पोळा- पोरा, आभाळ- अभार, डोळा- डोरा इत्यादी.
याशिवाय नित्य व्यवहारातील बोलणंही वेगळ्या वळणाचं व वैशिष्टय़पूर्ण आहे. मुला-मुलीचं लग्न लागलं- ‘नवरा नवरीचा ढेंढा लागला.’ ‘ढेंढा’ याचा अर्थ अद्यापही कळला नाही. मुलीला समजून देताना आई म्हणते, ‘माय माझे, असी करू नोको’, तसेच मुलाला नात्यातील एखादी बाई म्हणेल, ‘अरे, माझ्या लेकाच्या लेका’, पंगतीचं जेवण असेल तर ‘सैपाक सांगीतला’, पाऊस येत आहे हे वाक्य ‘पानी येऊन राह्य़ला’ असं म्हणतात. एखाद्याला काम सांगताना, ‘हा काम करू घेजो’, ‘पानी भरून ठेवजो’ असं बोललं जातं. स्त्री असेल तर म्हणेल, ‘आता मी सैपाक करतो’ ‘मी बजारात जातो’. ‘गेला होता’साठी ‘गेल्ता’, ‘आला होता’साठी ‘आल्ता’ (जोडाक्षर) असं बोललं जातं. यावरून झाडीपट्टी व वऱ्हाडातील बोलीभाषेत बरंच साम्य असल्याचं दिसतं.
गाडीचा उच्चार ‘गाळी’ आणि पळालीचा ‘पराली’ असा आहे. म्हणजे बोलताना ‘ड’ ऐवजी ‘ळ’ आणि ‘क’ ऐवजी ‘र’ वापरले जाते. ग्रामीण भागात गोंदिया गावाचा उच्चार ‘गोंदय़ा’ असा आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर जुनं प्रचलित पण विस्मरणात गेलेलं गाणं असं आहे-
गाळी आली, गाळी आली गोंदय़ाची
बायको पराली, चिंध्याची।
झाडीपट्टीतीलच मध्यप्रदेशातील डोंगरगड येथे भाविकांचे महादेवाच्या दर्शनासाठी गोंदिया- भंडारा जिल्ह्य़ातून भक्तांचे जत्थेचे जत्थे जातात. त्यास ‘महादेवाचा पोहा’ म्हणतात. तेथे उंच पर्वतशिखरावर जुन्या काळातील महादेवाचं मंदिर आहे. हळद-गुलाल चेहऱ्याला फासलेले भाविक दर्शनाकरिता जाताना सामूहिकरित्या जल्लोष करतात.
गडावर गड रेऽ अन्ं या देवाऽ
महादेवाले जातो गाऽ अन् या संभू राज्याऽऽ
एक नमन कवडा, पारबती, हर हर महादेवऽऽ
शेवटी असा जयघोष करतात. ‘एक नमन कवडा’ म्हणजे एक कडवं झालं. पार्वती-महादेव या दोघांना नमन असो, बहुतेक असा भावार्थ असावा. येथे ‘नमन’ शब्द प्रमाण मराठीतून आला आहे.
नुकतीच दिवाळी सरल्यावर गावोगावी गॅसबत्तीच्या उजेडात येथील लोककला दंडार कोंबडा आरवते तोपर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत असायची. पौराणिक पात्र विस्कटलेल्या भरजरी रेशमी वेशभूषेत असायचे. तेथील एक गाणं अजून आठवतं.
टार बाई टुऱ्याची डंडार,
कुकडू जाईल पल्याड..
‘टार’ म्हणजे ‘टाळ’, ‘टुऱ्या’ म्हणजे ‘दांडय़ा’, ‘कुकडू’ म्हणजे ‘कोंबडी’, ‘पल्याड’ म्हणजे ‘पलीकडे’. गाण्याचा भावार्थ असा- ही आहे टाळ आणि दांडय़ाची दंडार, हा नाद ऐकून कोंबडी पलीकडे होईल पसार!
विदर्भात पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. म्हणून बैलांची पूजा करतात. त्या दिवशी बैल शर्यतीत पळतात. बैलांचा सण असला तरी ‘गाय खेलली’ (खेळली) किंवा ‘खेलेल’ (म्हणजे खेळणार) असं म्हणतात.
तसेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यातून ‘धसाडी’ (उंचपुरी धिप्पाड) मारबतची (एक राक्षसीण) गावातील रोगराई व इतर अनिष्ट काढण्याच्या समजुतीने, वाजतगाजत मिरवणूक काढतात. त्यावेळेस लोक आरोळी ठोकतात-
इडा पीडा राई रोग खासी खोकला,
घेऊन जाय वोऽ मारबतऽऽ
यात इडा (केलेली करणी), पीडा (ताप), राईरोग (रोगराई), खासी (खोकला) अशा हिंदी मिश्रित शब्दांचा समावेश आहे.
होळीच्या काही दिवस अगोदर चांदण्या रात्री हातात हात घट्ट गुंफून दोन मुली चक्राकार फुगडी खेळतात. कोकणातील झिम्मा झिम्मा फुगडीशी याचं साम्य आहे. फुगडी जेव्हा ‘हार-जीत’च्या चरमसीमेवर येते, तेव्हा खेळताना दमलेल्या स्वरात समोरच्या मुलीला दुसरी मुलगी म्हणते-
हारलीस गे हारलीस गे,
भावाले नवरा केलीस गे।
येथे हार झाली, त्यासाठी ‘हारलीस’ असा शब्द आहे. केलीस, गेलीस, बोललीस असे बोलले जाते. ‘गे’ हा शब्द ‘ग’ (म्हणजे अगं) साठी वापरला जातो. संतवाङ्मयातसुद्धा ‘गे’ हा शब्द वारंवार येतो. ‘भावाला’ या शब्दात प्रमाण मराठीतल्या शब्दाऐवजी ‘भावाले’ असे बोलले जाते. या फुगडीच्या खेळात समोरच्या मुलीला हरवण्याकरिता हा प्रेमाने डिवचण्याचा प्रकार आहे. शेवटी एकीचा तोल सुटतो अन् दमल्याभागल्यावर खेळ संपतो.