मंगल कातकर

आपलं जगणं सुस करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरप्रणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे.

article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो.

गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे.

जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे.

डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत.

‘खुजाबा’, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस,
पाने- १८७,
किंमत- ३३० रुपये.