महावीर जोंधळे
शब्दांच्या पलीकडचा अर्थ सांगणारी कविता लिहिणाऱ्या कवी डॉ. सुहास जेवळीकर यांचा ‘पानं पिवळी पडत चालली असताना’ हा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. त्याच्या जाण्यानंतर डॉ. सुरेंद्र जोंधळे आणि राम दोतोंडे या कवीमित्रांनी तो संपादित केला आहे.शब्दांच्या पलीकडचा अर्थ सांगत सांगत वाचकांना तळाशी घेऊन जाणारा हा वाङ्मय व्यवहारी माणूस तशी त्याची ओळख चिंतनगर्भ कवी म्हणूनच मराठी कवितेत होती. शब्दांची आणि चिंतनाची खासी सोबत घेऊन त्याची लेखणी स्वत:चा वेगळा ठसा सातत्याने कवितेत उमटवीत होती. प्रतीके व प्रतिमांच्या वेगळ्या जातकुळीतून आपल्यासमोर ती येतच होती. ती स्मरणबीजे पेरीत असली तरी त्याला असलेले मूल्यभान प्रभावी ठरते. आपल्याला व्यक्तिवादापासून वेगळं ठेवून विमुक्त करण्याचा प्रयत्न करते.
पोळलेला हात
उकळणाऱ्या
पाण्याचं पातेलं
किंवा तापलेला तवा
चिमटय़ाच्या
भरवश्यावर बिनधास्त
तोलून धरणाऱ्या
बाईच्या हाताला
एकदिवस
चिमटाच पोळला
चुकून,
शेगडीजवळ राहिलेला.
खऱ्याखुऱ्या वास्तवाला कवेत घेण्याचा या कवितेचा बाज आहे. वेगवेगळ्या रूपकांतून तो येतच राहतो. संवेदना जेव्हा वाचकांना जाग्या करतात तेव्हा ही कविता वेगवेगळा अर्थ, संदर्भ देत राहते. त्यातून वर्तमान स्पष्टपणे आपल्या पंक्तीत येऊन बसतो. हस्तिदंती मनोऱ्यात बसून चिकित्सा करणाऱ्यांना एक प्रकारे जागतेपणाचा इशारा देऊन जातो. मनातील भावना आत्मनिष्ठ ग्लानीला दूर सारून स्वछंद वादाला फिरकूही देत नाही. अशा वेळी शब्दांच्या व्यक्तित्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची स्पष्ट जाणीव यातून होते.
काहीच बोलत नाही बाई तपासणीच्या वेळी
दवाखान्यात
कधी शांतपणे,
कधी ओरडून,
तर कधी खेकसून
वारंवार करूनही प्रश्नांचा भडिमार
बाई उच्चारत नाही
ओठातून एकही शब्द..
विषण्ण होणाऱ्या भावकल्लोळातून मूकवेदना जखमा करून जाणाऱ्या मांज्यासारख्या काचत जातात. मनाचा सरळ प्रवास अवघड करतात. इथं कवीचं अनुभूतीचं अनुभवणं त्याचं आगळं रूप घेऊन येतं. त्याचं कारण उघड आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना आकलनाची आणि आस्वादाची रूपेच वेगळी असतात, ती धरून आणलेली नसतात. तर आशयाला अधिक सार्थ करणारी असतात. ती चिंतनीय असतात.
श्रावणातल्या धुवांधार
वर्षांवाच्या तडाख्यानं
अधिकच मजबूत केले
आपले बुंधे. मग कितीही
घोंघावली वादळं
कोसळल्या विजा, हादरली जमीन
तरीही कोलमडलो नाही आपण
डॉ. सुहासच्या कवितेला ‘स्वत्व’ आहे, मूल्यधारणा विषण्ण करून सोडते. वर्तमानाची जाणीव करून देत असताना कवी भूतकाळ मदतीला घेतो, तो कवितेतील सुसंवादाच्या मदतीनं. जीवनदृष्टी जेव्हा कवितेतून निर्णायक टप्प्यावर येते तेव्हा कवितेचा खरा पोत लक्षात यायला मदतच होते. जीवन जगत असतानाची सचेतनवृत्ती शब्दांच्या माध्यमातून अभिजात होत जाते. मानवी जीवनाचं भान कसं उपयुक्त असतं आणि प्रतिभावंतासाठीही विचारशील असतं हे अभ्यासकांच्या लक्षात आणून देणारी ही कविता आहे. हा केवळ मर्मग्राही चिंतनाचा भाग नसून, खरा आनंद देणाराही आहे. त्याची प्रत्येक कविता मनुष्यजीवनाच्या वेगळ्या अनुभूतीचे दर्शन देत जाते. मानवी उदात्ततेविषयी जागर घालणं हा त्याचा ध्यासच असावा. म्हणून डॉ. सुहासची कविता ‘झोतशरण’ कधी होत नाही. कोणतीही तडजोड करीत नाही. जे अनुभवतो तेच कवितेतून रोखठोकपणे मांडतो. मूल्यसंघर्ष हाच कवितेचा गाभा आहे आणि त्यावरच त्याचा भर आहे.
डॉ. सुहासच्या कवितांचे विषय चराचरातले प्राणी, पक्षी, झाडे, फुले, वेली, आकाश, चांदणे, अथांग निळे पाणी आणि सर्व काही प्रेम, प्रेमी, विरह, आनंद आणि जीवनाची मुशाफिरीही! जगण्याची आस आहे व तितकीच ओढही. काय पाहावे आणि स्वछंदपणे हिंडावे वाटते. निसर्ग सन्मुखता व माणूस सन्मुखता त्याच्या मते सांगण्याची गोष्ट नसते, तर ती समजावून घेण्याची असते. समाजजीवनातील एकंदर वातावरणाचा तो पुष्कळसा परिपाक असतो, याची खात्रीही कवी देतो आणि निष्कर्षांच्या टोकावर आणून ठेवतो. सत्य सांगणाऱ्या माहात्म्यापेक्षा असत्याचा जयजयकार करणाऱ्यांना नेहमीच मूल्यऱ्हास आवडत असतो. विचार आणि कृतीतील अंतर दाखविणारी ही कविता समोरच्या भिंतीवरच लिहिण्यासारखी आहे, जी समोर बघून चालणाऱ्यांनाही आपली वाटेल. या कवितेकडे इच्छाशक्तीचा भाग म्हणूनही बघता येईल. कवीच्या मनात आलेल्या गोष्टी सहजतेने सांगणे हा त्याचा मूळ स्वभाव. मूलत: आत्मशोधासाठी अशा पद्धतीची कविता डॉ. सुहासनी लिहिलेली असावी असे वारंवार हा संग्रह वाचत असताना वाटत राहते. पण ती अप्रत्यक्षपणे वाचकावरच काही संस्कार करीत जाते. जगताना- झगडताना जाणिवांची पाने पिवळी पडू लागतात तेव्हा आपोआप येत जाणारी सुन्न बधिरता टाळता येत नाही. कारण ती केव्हा भेटायला येईल ते कवीला सांगता येत नाही. डॉ. सुहास जेवळीकरांना खळखळून वाहणं आवडत होतं. शेवटच्या काळात हास्य करपू लागलं आहे, हे कळून येत असतानाही त्याच्याशी त्याने दुष्टता येऊ दिली नाही. त्याच्या कवितेचे आकलन झाल्यानंतर हा मुद्दा स्पष्ट होतो. मग कवीच्या मनातील नास्तिकता अधिकाधिक प्रखर होत जाते.
डॉ. सुहासच्या शैलीतून शब्द शेंदूर लावून येत नाहीत, ते येतात काळेभोर मेघ होऊन. एक काव्याचा वाचक म्हणून नक्की जे जाणवले ते नास्तिकतेबरोबरच निसर्गसौंदर्याचा उपासक म्हणूनच. त्याने कधीही बुळ्या चांगुलपणाची भलावण केली नाही.
‘पानं पिवळी पडत चालली असताना’ , – डॉ. सुहास जेवळीकर, ग्रंथाली प्रकाशन, पाने-९६, किंमत- २०० रुपये.