प्रफुल्ल शिलेदार
‘अ धांतर’ हे जयंत पवार यांचे मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरावे असे नाटक. या नाटकाने मराठी नाटकाची रंगभाषा बदलली. नाटकाच्या मध्यमवर्गीय चौकटीतून मराठी नाटकाच्या केंद्रस्थानी जगण्याचा थेट संघर्ष आणला. नाटक बौद्धिक चर्चात्मक होण्याचा किंवा कृतक प्रयोगात्मक होण्याचा धोकाही संपूर्णपणे टाळून त्यात चकित आणि सुन्न करणारा खदखदता जीवनरस ओतला. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे सामाजिक व राजकीय ताणेबाणे, पात्रांचे एकमेकांशी वागणे, नाटकातली भाषा, त्यातले प्रसंग हे सगळे जीवनाशी इतके थेट जोडलेले कसे राहू शकतात याचे नाट्यपूर्ण प्रत्यंतर ‘अधांतर’ने प्रेक्षकांना दिले. त्यामुळेच या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर रंगभूमीवरील तेंडुलकर-पालेकर यांच्यासारखे दिग्गज स्तंभित झाले आणि त्यांनी या नाटकाचे मोठेपण व अनन्यपण मोकळेपणाने मान्य केले.
‘अधांतर : भूमी आणि अवकाश’ या पुस्तकाचे राजू देसले यांनी केलेले संपादन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचा लेख खुद्द जयंत पवार यांचा ‘अधांतरचा जन्म’ हा आहे. यात नाटकाच्या निर्मितीची नव्हे तर जन्माची कथा त्यांनी सांगितली आहे. ‘वाळवी’ ही सत्त्याऐंशी साली लिहिलेली एकांकिका, त्यानंतर त्याचे ‘अजगर’ असे रूपांतर आणि अखेरीस एका मोठ्या प्रक्रियेतून १९९८ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘अधांतर’ असा हा प्रवास लेखकासाठी मानसिकदृष्ट्या किती त्रासदायक होता ते वाचून आपलंही मन व्याकूळ होतं. या नाटकाचा सुमारे दहा वर्षांचा लेखनाचा प्रवास लिहिताना जयंतने नाटकातली पात्रे कुठून आली, नाटकातील प्रसंगांची उलथापालथ कशी होत गेली, नाटकाची भाषा सापडल्यानंतर नाटकात एकदम जीव कसा आला हे विस्ताराने लिहिले आहे. नाटक लिहिण्याच्या अनुभवाबाबतचा एखाद्या नाटककाराने एवढा सूक्ष्म विचार करून प्रामाणिकपणे लिहिलेला असा लेख दुर्मीळ आहे म्हणून त्याचे महत्त्व आहे.
या ग्रंथात नाटकाच्या प्रयोगाच्या निर्मितीशी आतून जुळलेल्या मंगेश कदम, अनिल गवस, ज्योती सुभाष, संजय नार्वेकर, भारत जाधव अशा रंगकर्मींचे त्यांच्या अनुभवांवर आधारित लेख आहेत, तर विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, भालचंद्र नेमाडे, कमलाकर नाडकर्णी, शांता गोखले, वसंत आबाजी डहाके अशा एकूण चाळीस जाणकारांचे प्रयोग आणि संहितेबाबत लेख आहेत. या ग्रंथाचे एकूण संपादन संहितेभोवतीच झाले असले तरीही पुस्तकातील ‘अंतरंग’ या भागात प्रत्यक्ष प्रयोगाशी संबंधितांचे लेखन आले आहे. त्यामुळे सध्या जरी या नाटकाचे प्रयोग होत नसले, तरीही त्याबाबतच्या प्रत्यक्ष अनुभवांची समर्पक नोंद इथे येते. अनेक लेखकांनी, अभ्यासकांनी अधांतरबाबत जे विवेचन केले आहे त्यातून या नाटकाच्या संहितेकडे पाहण्याचे अनेक संदर्भबिंदू आपल्याला सापडतात. एका नाटकाकडे अनेक प्रकारे, अनेक अंगाने कसे पहिले जाऊ शकते याचा प्रत्यय आपल्याला या ग्रंथातून येतो.
माया पंडित यांनी ‘अधांतर’चा इंग्रजी अनुवाद ‘द नोव्हेअर पीपल’ या नावाने केला आहे. या ग्रंथातील लेखात नाटकाच्या काळातल्या आणि पुढे आजच्याही काळातल्या कुटुंबव्यवस्थेतील पडझडीचे नेमके चित्रण करणारे हे महत्त्वाचे नाटक असल्याची नोंद त्या करतात. या काळात कुटुंबव्यवस्थेत राहूनही व्यक्ती एका निबिड काळोख्या अवकाशात अधांतरी तरंगत राहतात आणि त्यातून पराकोटीची परात्मता व्यक्तीच्या वाट्याला येते, त्याचा भीषण अनुभव या नाटकात येतो असे मांडून या नाटकातून व्यक्त होणारा परात्मभाव त्या अधोरेखित करतात. या परात्मभावाची मुळे समाजाच्या वर्गीय रचनेत आणि भांडवली व्यवस्थेत असल्याचेही त्या नोंदवतात. अशी सूक्ष्म आणि मौलिक निरीक्षणे या ग्रंथातील लेखात आपल्याला दिसतात.
‘अधांतर’ हा जयंतच्या लेखकीय कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि या लेखनातून त्याचे लेखक म्हणून मोठेपण सिद्ध झाले आहे. ‘अधांतर’मधील धगधगत्या वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कथावस्तूबाबत, त्यातील आई किंवा नरू यांसारख्या पात्रांबाबत, ‘अधांतर’ला असलेल्या गिरणी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीबाबत, ‘अधांतर’च्या सार्वकालिकतेबाबत, त्यातील बहुपेडी जाणिवांबाबत, त्यातील प्रादेशिकता आणि मूल्यऱ्हासाबाबत, नाटकाच्या ऐतिहासिकतेबाबत आणि समकालीनतेबाबत, वास्तव आणि अद्भुताबाबत या ग्रंथात लिहिले गेले आहे. ‘अधांतर’ या नाटकाच्या आकलनाच्या आपल्या कक्षा विस्तारणारी आणि सोबतच त्या अनुषंगाने आपली नाटकाबाबतची समज वाढवणारी निरीक्षणे या ग्रंथातील लेखात आलेली आहेत. या नाटकाचे श्रेष्ठत्व लक्षात घेऊन ‘अधांतर’कडे पाहण्याचे सगळे विविध पैलू आपल्या संपादनाच्या व्याप्तीत येईल याची कटाक्षाने काळजी संपादक राजू देसले यांनी घेतली आहे त्यामुळे हा ग्रंथ मौलिक झाला आहे.
‘अधांतर : भूमी व अवकाश’, – संपादक – राजू देसले, लोकवाङ्मय गृह, पाने-४५२, किंमत-६०० रुपये.
shiledarprafull@gmail.com
