scorecardresearch

Premium

विशी..तिशी..चाळिशी.. : जन्मांतर

गीतामावशी : अगो बाई, रेळेकाका काही मला भेटले नाहीत कधी, पण अरिनच्या आणि माझ्या गप्पांमुळे मला माहिती आहेत तसे.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

डॉ. आशुतोष जावडेकर

माही : रेंज तुटली नेमकी. ही फोनची कंपनी फालतू झाली आहे. सारखे फोन कट होतात. हा, तर मी सांगत होते, तेजसमुळे त्याच्या बिल्डिंगमध्ये राहणारे रेळेकाकाही आमच्या चांगल्या ओळखीचे झाले. माझी फार इंटरॅक्शन नाही झाली, पण अरिनचं आणि त्यांचं चांगलं जमलं. आणि तेजस? तो तर त्यांचा मानसपुत्रच. रेळेकाका त्यांच्या खऱ्या मुलाकडे अमेरिकेत राहायला जातात काय, तिथल्या स्वच्छ हवेतही त्यांना कशाची तरी अ‍ॅलर्जी होते काय, आणि काल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट होतात काय! क्रिटिकल आहेत असं तेजस म्हणाला. बीपी खाली आहे आणि डॉक्टरांनी काहीही होऊ शकेल असं सांगितलं आहे. तेजसचा हे सांगणारा फोन आलेला तेव्हा तो जवळजवळ रडण्याच्या बेतात आलेला. त्याला मी सरळ माझ्या घरी बोलावलं आहे. नेमकी त्याची बायको माहेरी आहे- त्याच्या मुलासकट. एकटा पडणार तो. आपल्या घरी राहायलाच बोलावलं आहे मी त्याला. आई-बाबा आहेत आणि तूही आहेस. निदान चार माणसं असली की त्याला बरं वाटेल. आणि न जाणो, चुकून रेळेकाका गेले तर तेजससोबत मी असेन.. बरं, गीतामावशी, बाजारातून येताना नेसकॉफी आण. संपत आली आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

गीतामावशी : अगो बाई, रेळेकाका काही मला भेटले नाहीत कधी, पण अरिनच्या आणि माझ्या गप्पांमुळे मला माहिती आहेत तसे. कवितांचे लोभी आहेत म्हणे. अमेरिकेत मुलाकडे काही सुख लाभत नसणार. आमच्या गावातल्या माझ्या शेजारी राहणाऱ्या वीणेला तर तिची अमेरिकेतली सून राबवून घेते नुसती सुटीत वीणा तिथे गेली की. बाकी काका क्रिटिकल आहेत म्हणजे गंभीरच. बोलाव तू तेजसला. मी पोचते नेसकॉफी घेऊन. आणि अगं, माझं अमेझॉनचं कशिदा मटेरिअलचं कुरियर येईल मी येईस्तोवर, ते घेऊन ठेव. बाकी काही नको होऊ दे रेळेकाकांना. माझे यजमान गेले तेव्हाचं सगळं आठवलं..

अस्मित : आऱ्या.. अरे, डिस्टर्ब नको होऊस. होणार ते तुझे अमेरिकेतले काका बरे. तिथे बेस्ट असतात हॉस्पिटल्स. आणि नस्रेसही तिथल्या भारी असतात. काय काय करतात पेशंटना. मी बघतो ना फोनवर आलेल्या क्लिप्समध्ये.. अरे, चिडू नक्को. आणि मी हा ज्योक टाकलाय. तू टेन्शनमध्ये आहेस म्हणून रे साल्या.. तुझा फोनवरचा हा आवाजच सांगतोय.. म्हणून राव! आणि तू पाल्र्यात आहेस का पुण्यात? पुण्यात असशील तर सांग- मी निघतो. आत्ता नगर स्टॅन्डवरच आहे. निदान तुझ्याजवळ फालतू ज्योक टाकत राहीन.

अरिन : नरिमन पॉइंटवर आहे या क्षणी. कामाला आलेलो इथे फोर्टमध्ये. संध्याकाळी तेजसदाचा फोन आला तेव्हा डोकंच आऊट झालं. आत्ता इथे नरिमन पॉइंटवर चालताना लांबच्या समुद्राकडे बघताना वाटलं की- रेळेकाकांच्या बातमीने आपण इतके अस्वस्थ झालो यार. याचाच अर्थ की मी आणि ते क्लोज होतो.. आहोत. पण मग मला हे इतक्या क्लियरली आधी का नाही कळलं? अस्मित, मला जाम टेन्शन आलंय. अरे, काका इतकेही म्हातारे नाही आहेत. गेले ना ते, तर मी या समुद्राला सगळ्या शिव्या घालणार! आणि माझं जवळचं कुणी गेलं नाहीये रे अजून. आजी-आजोबा सगळे ठणठणीत आहेत. मित्र-मत्रिणी सुपरहेल्दी. कुणाचा अ‍ॅक्सिडेन्ट झालेला नाही. कुणी ड्रगची नशा करणारा माझ्या यादीत नाही. त्यामुळे मला ‘द एन्ड’ काय असतो हे माहीतच नाही. फक्त व्हिडीओ गेम्स आणि सीरियल्समध्येच पाहिला आहे मी मृत्यू. अ‍ॅण्ड आय अ‍ॅम गोइंग टू हेट इट..

तेजस : ऐक ना, मी नाही येत तुझ्या घरी. येस, मी ओके आहे अगं. काही बरं-वाईट झालं तर तुला कळवतोच.. च्यायला, किती फोन कनेक्शन कट होतंय.. हा, तर माही, मी सांगत होतो की थँक यू, पण मी येत नाही तुझ्या घरी. मी स्ट्रॉंग आहे अगं. एकदाच आजी गेली तेव्हा व्याकूळ होऊन रडलेलो ढसाढसा! जन्माचं रडून घेतल्यासारखा. नांदेडला गोदावरीमध्ये अस्थीविसर्जन करतानाही मी फुटलो होतो. वाटलं होतं की, आता माझ्या हातात आजीचा जो तुटकाफुटका, भाजलेला असा का असेना, अंश आहे हाडांचा- तोही आता माझ्या मुठीतून निसटला. आता मी पोरका झालो. मग मी बाबांकडे पाहिलेलं. त्यांची तर आई गेलेली. दु:खात असणारच तर ते. पण ते शांत होते अगं. सगळं आत लपवत. त्या दिवशी मी ठरवलं, की पुरुष असण्याचा हा संकेत मी पाळणार नाही. मला रडावंसं वाटलं तर मी रडणार. मग दुसऱ्या दिवशी माझी नांदेडची शाळेतली मत्रीण भेटायला आलेली. आता ती कवयित्री वगैरे झाली आहे फेमस. योगिनी सातारकर-पांडे तिचं नाव. आमच्या गप्पांमध्ये तिने तिच्या कवितेतली ओळ मला म्हणून दाखवली आणि मग मला का कुणास ठाऊक, शांत वाटलं. तसंही मी आणि माझे चाळिशीचे मित्र कुठे साले म्हातारे होईस्तोवर जगणार आहोत? स्ट्रेसने आमची पिढी साठीतच नाहीशी होणार बघ. तोवर धमाल जगून घ्यायचं असं मग मी ठरवलं. आपण भेटलो तिघे.. तू, मी आणि अरिन.. त्याच्या थोडी आधीचीच ही गोष्ट.. च्यायला, काय फोन कट होतोय मधेच.. माही, आपली लाइफलाइनही अशीच मधे कट झाली तर? आत्ताच तुला सांगतो : आय लव्ह यू. आय लव्ह अरिन.. आणि माझी बायको, माझा मुलगा. बस! बाकी नाही आहे कुणी माझ्या आत.. आत्ता हे बोलताना. बरं, ही ऐक योगिनीची कविता फोन ठेवण्याआधी..

हल्ली वारंवार विचार येतो

मी अचानक मृत्यू पावले तर काय होईल?

माणूस जातो म्हणजे नक्की काय?

पोकळी म्हणतात ती काय?

जाणवत राहते ती अनुपस्थिती, सवय की उणीव?

माही : अरिन, तू तुझ्या तेजसदाची काळजी करू नकोस. मी आहे इथे पुण्यात. मगाशीच त्याच्याशी फोनवर बोलले. हळवा झाला आहे तो थोडा. हे चाळिशीचे लोक एकदम मधेच हळवे होतात बघ. आम्ही ऑफिसमध्ये सगळे तिशीतले घोडे एवढय़ा कामाखाली असतो, की समोर मृत्यू आला तरी आधी गुगल नोटवर मेमो टाकायचा राहिला आहे हेच आठवेल! तुम्हीही प्रॅक्टिकल आहात. तुम्हाला जन्म आणि मरण हे जास्त नीट कळलं आहे असं कधी कधी वाटतं.

अरिन : चक्.. असं काहीही नाही आहे. फाटलीय माझी आत्ता माही! इथे नरिमन पॉइंटवर नुसत्या येरझाऱ्या घालतो आहे मी. अस्मितचाही फोन आलेला. लहान आहोत गं आम्ही. नुसती हाइट वाढली आहे. हे असलं डेथबिथ  झेपणार नाहीये मला, आम्हाला..

माही : हे नैसर्गिक असतं अरिन. सहज आलेला मृत्यू भाग्यशाली असतो. मी एवढीच प्रार्थना केली मघाशी की, रेळेकाका दुर्दैवाने जाणारच असतील तर विनायातना जाऊ देत. कोमा किंवा पॅरालिसिससारखं काही नको. अर्थात हे झालं माझं रॅशनल थिंकिंग. माणूस गेला की किती तुटतं, हे मी गीतामावशींमुळे पाहिलं आहे. अरिन, गौरी देशपांडे मला फार आवडते, तुला माहितीय. तिने एका पुस्तकात तिच्या लिहिलंय- ‘‘नेमक्या कुठल्या क्षणी मालविका गेली हे सुहासला नेमके कळले. एका क्षणी त्याच्या हातात मालविका होती आणि दुसऱ्या क्षणी तिथे कुणीच नव्हते!’’ फार भयानक असणार हे असं कुणीच नसणं. ..फोन पुन्हा कट  झालाच बघ.. तर असो. मी सांगत होते की.. यू टेक गुड केअर ऑफ युरसेल्फ.

तेजस : माही, अरिन, आधी दोघांना हा व्हॉइस मेसेज पाठवतो आहे. रेळेकाका संकटातून बाहेर आले, असं डॉक्टर म्हणालेत. जस्ट रेळेकाकांच्या मुलाचा मला फोन आला. त्याला रेळेकाकांनी मला मुद्दाम फोन करून कळवायला सांगितलं. त्यांना बाकी बोलायची शक्ती नाही, पण नाकात ऑक्सिजनची नळी असतानाही त्यांनी आधी मला त्यांची खुशाली कळवायला त्यांच्या मुलाला सांगितलं. यार, मी काय बोलू. येस, मी रडतोय यार. आणि तुमच्यासमोर काय तो संकोच! कुठल्या रक्ताने बांधले गेलो आहोत मी आणि रेळेकाका? नात्यापलीकडेही रक्ताची काहीतरी नाती असणार. त्या नात्यातलं रक्त मत्रीचं, आदराचं सत्त्व घेऊन उभं असणार. जसं आपलं सगळ्यांचं आहे. ‘देव-दिवाळीपर्यंत टेरेसमध्ये एक पणती लाव,’ असं सांगून बायको माहेरी गेलेली. मगाशी मी तशी पणती लावली. वारा वाहायला लागला. मी सारखा बघत होतो. मला पणती विझायला नको होती. मला आपला फोन मध्येच कट व्हायला नको होता. पण एकदम वाटलं की, आपणच विझलो तर एक समाधान असेल. आपण प्रेम एक्स्प्रेस केलं. आपण कर्तव्यं केली. अपराधीभाव मागे राहावा असं आपल्या जगण्यात काही नाही. आणि बोनस म्हणून आपल्याला माही आणि अरिन मिळाले. अजून काय हवं? मी योगिनीला सांगणार आहे की, तिने म्हटलं आहे तशी माणूस गेल्यावर अनेकदा केवळ अनुपस्थिती राहते, सवयच केवळ मोडते. फार झाल्यास उणीव जाणवत राहते. पण मी गेलो तर माझ्या पत्नीला, मुलाला, माझ्या आऱ्याला आणि माझ्या माहीला माझं त्यांच्या सगळ्यांवर असलेलं प्रेमही ते सगळे जिवंत असेपर्यंत जाणवत राहील. अजून काय हवं? अजून काय हवं जगण्याकडून?

माही : एकच टायपो सांगते : जन्मांतरीही जाणवत राहील आम्हाला तुझं प्रेम.

अरिन : कोई शक! येस, जन्मांतर.. अजून काय हवं?

ashudentist@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2019 at 04:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×