डॉ. चैतन्य कुंटे
कवी जयदेव, ‘गीतगोविंद’ आणि त्यातील अष्टपदी या संस्कृत साहित्य अभ्यासकांना आणि वैष्णव संप्रदायात चिरपरिचित आहे. भारतीय साहित्य, संगीत, नृत्य आणि वैष्णव परंपरा या सर्वातच गीतगोविंद हे काव्य मुकुटमणी मानले जाते. गीतगोविंदातील अष्टपदीस सर्व भारतीय अभिजात नृत्यशैलींच्या वस्तुक्रमात अनिवार्य स्थान आहे. हिंदुस्थानी संगीताच्या ग्वाल्हेर परंपरेने अष्टपदीला मानाचे स्थान दिले होते. भारतीय इस्लामी धर्मसंगीताच्या संदर्भात अमीर खुस्रोचे जे स्थान आहे, तेच स्थान वैष्णव धर्मसंगीत परंपरेत जयदेवाचे आहे. उद्याच्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णकाव्याचा शिरोबिंदू मानलेल्या अष्टपदीचे संगीतावलोकन करू. धर्मसंगीताकडून कलासंगीताकडे झालेला अष्टपदीचा प्रवास त्यातून उलगडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधा, कृष्ण व सखी अशा केवळ तीन पात्रांच्या संवादमय पदांतून राधामाधवांच्या विरहमीलनादी अवस्थांचे चित्रण गीतगोविंद काव्यात जयदेवाने केले आहे. या काव्यकृतीतल्या रचना ‘अष्टपदी’ म्हणजे आठ चरणांच्या आहेत. आठ सर्गात एकूण २४ प्रबंधांची नेटकी रचना असलेल्या या गेय शृंगारकाव्याच्या आरंभी कृष्णाच्या दशावतारांच्या स्तुतीचे पद आहे. नंतर वसंतऋतूत होणारे कृष्ण-राधेचे मीलनसंकेत, प्रतीक्षा, विरह, उपेक्षा, मानखंडना, विनवणी, अखेरीस मीलन अशी शृंगारकथा गुंफली आहे. त्यात शृंगारनायिकेचे अभिसारिका, खंडिता, विप्रलब्धा, स्वाधीनपतिका असे प्रकार मोहकपणे रंगवले आहेत.

भोजदेव व रामादेवी यांचा पुत्र जयदेवाचा जन्म केंदुबिल्व येथे झाला. बंगालमधील राजा लक्ष्मणसेन (११७६-१२०६) याच्या राजसभेत तो होता. स्वत: जयदेवानेच नमूद केलेल्या या माहितीखेरीज विश्वासार्ह ऐतिहासिक सत्य म्हणून नमूद करता येईल असे फारसे उपलब्ध नाही. भक्तमाल, जयदेवचरित अशा ग्रंथांतून पुष्कळ आख्यायिका प्रसृत झाल्या, शिवाय प्रांतीय श्रद्धाही बऱ्याच आहेत. ओडिशातील लोक मानतात की पुरीच्या जगन्नाथमंदिरात पद्मावती ही देवदासी नृत्य करीत असे, भगवद्कीर्तन करीत भटकणाऱ्या जयदेवाने तिच्याशी विवाह केला. हे युगुल पद्मावती राधारुपात, तर जयदेव कृष्णवेशात नृत्यगान करू लागले, त्यातूनच कदाचित ‘गीतगोविंद’ या नृत्य-गीत-काव्याची निर्मिती झाली.

जयदेव-पद्मावतीच्या प्रगाढ प्रीतीची आख्यायिकाही मनोरम आहे. राजासह जयदेव शिकारीला गेला असता राणीने पद्मावतीच्या प्रेमाची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी ‘जयदेव मारला गेला’ असे सांगताच पद्मावतीने प्राण त्यागला. जयदेव तिच्या कलेवरास कवटाळून ‘प्रिये चारुशीले’ ही अष्टपदी गाऊन विलाप करत असता कलेवरात पुनश्च प्राणसंचार झाला. म्हणून ही रचना ‘संजीवनी अष्टपदी’ म्हणून ख्यात आहे.

गुजरातेतील राजा शारंगदेव वाघेला याच्या अनहिलपट्टण येथील कृष्णमंदिराच्या दानलेखाचा (इसवी १२९१) आरंभच जयदेवाच्या दशावतार प्रबंधाने होतो आणि मंदिरात गीतगोविंदचे ‘प्रेक्षणक’ झाल्याचा उल्लेख आहे. भारताच्या पूर्वभागात निर्माण झालेली ही कलाकृती अल्पावधीतच पश्चिम भारतापर्यंत पोचली, रुजली याचा हा पुरावा आहे. गीतगोविंदाच्याच साच्यात पुढे अनेक काव्ये रचली गेली, मात्र गीतगोविंदाचे महात्म्य इतर कुणासही लाभले नाही. (मराठीत गदिमांच्या ‘गीतरामायणा’ला जे यश मिळाले ते नंतरच्या कृतींना लाभले नाही, तसेच!) १६व्या शतकात मिथिलेत अजून एक जयदेव कवी झाला, त्याच्या ‘रामगीतगोविंदम्’ला तुलनेने अधिक यश मिळाले व त्यातील रामाष्टपदी गायल्या गेल्या. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी कृष्णाष्टपदींपेक्षा ‘रामगीतिकाव्य’मधील रामवर्णनपर अष्टपदी गाणे पसंत केले. त्यांचे शिष्य पं. विष्णु दिगंबर पलुसकर, प्रशिष्य पं. विनायकबुवा पटवर्धन हेही रामाष्टपदी गात असत.

राधावल्लभ, सखीभावक, किशोरीभाज, सहजिया अशा संप्रदायांच्या भक्तिगीतांवर आणि विद्यापती, चंडिदास, कुंभनदास, नंददास, सूरदास इत्यादींच्या रचनांवर गीतगोविंदाचा प्रगाढ प्रभाव आहे. अष्टपदीला प्रतिसाद देत अनेक प्रांतीय भाषांत गोपीगीतांच्या रचना होऊ लागल्या. महाराष्ट्रातील संतकवींची गवळण गीते, पंतकवींची गोपीगीते, एवढेच काय रामजोशीसारख्या तंतकवींच्या लावण्यांत अष्टपदीचे प्रतिबिंब दिसते.

शारीर पातळीवरून किंचित वर जात आध्यात्मिक पातळीवर नेणाऱ्या प्रेमानुभवाचा, भक्तीचा आविष्कार चित्रित केल्याने मध्ययुगीन भारतीय समाजमनाला जयदेवाने आगळी भुरळ घातली. त्याने वापरलेले कलात्म साचे, मांडलेली रूपके पुढेही वारंवार वापरली गेली. शिवाय त्यात विलक्षण गेयता, नृत्यात्मकता आणि दृश्यात्मकताही असल्याने भारतीय कलासंविदेने अष्टपदी नाना प्रकारे आविष्कृत केली. मंदिरशिल्पांत, मध्ययुगीन लघुचित्रांच्या बव्हंशी सर्व प्रांतिक शैलींत गीतगोविंदाचे चित्रण झाले.

मध्ययुगात भारतभर पसरलेल्या आणि सर्वच प्रांतीय संस्कृतींवर प्रभाव टाकणाऱ्या वैष्णव संप्रदायाच्या उन्नयनाच्या प्रक्रियेत जयदेवाच्या या काव्याने जणू एका प्रेरकशक्तीचे कार्य केले. प्राचीन काळात राधेस विशेष महत्त्व नव्हते, मात्र कृष्णाच्याच तोलाने तिची प्रतिष्ठापना करण्याचे श्रेयही जयदेवाचेच! राधेला दिलेल्या या उच्चस्थानामुळे मध्ययुगीन भक्तिपरंपरेला राधेशिवाय कृष्णाचा उल्लेख अधुरा वाटू लागला. द्वैताद्वैत तत्त्ववादाच्या शुष्क वितंडात कुणाला जयदेवाच्या अष्टपदी म्हणजे प्रसन्न हिरवळ वाटते, तर कुणी त्यांना वेदसार मानले! रतिभावाचे ठळक चित्रण असलेले गीतगोविंद एक भक्तिकाव्य म्हणून वैष्णव संप्रदायात स्वीकारले जाणे हे मधुराभक्तीच्या वाढत्या प्राबल्याचे द्योतक आहे.

ओडिशा, बंगालमधील वैष्णव पंथात अष्टपदीगायनाचे विशेष महत्त्व आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिरातील पूजाविधीत जयदेवाच्या अष्टपदींचा समावेश झाला. तिथे सायंपूजेपासून शयनारतीपर्यंत अष्टपदींचे गायन, नर्तन नित्य चालते. केंदुलीच्या विणकरांनी विणलेली, अष्टपदी लिहिलेली वस्त्रे जगन्नाथमूर्तीसाठी ‘बडसिंगार वेश’ म्हणून मागवली जातात- इतके पूजनीय स्थान अष्टपदीस मिळाले आहे. पुष्टिमार्गाचे अध्वर्यू गोस्वामी विठ्ठलनाथ यांनी गीतगोविंदावर ‘रसपरिप्लुत’ टीका लिहिली आणि हवेलीतील नित्यसेवेत अष्टपदीचे गायन नेमून दिले. मणिपुरी संकीर्तन, केरळचे सोपान संगीत अशा सर्वच मंदिराश्रयी संगीतप्रणालींत अष्टपदी आवश्यक बनली. एके काळी महाराष्ट्रातील नारदीय कीर्तनकारही कीर्तनाच्या पूर्वरंगात अष्टपदी गात असत.

धर्मसंगीत म्हणून अष्टपदी मंदिरांत गातात, तेव्हा ती केवळ शृंगारकाव्य म्हणून गायली जात नाही. तिला स्तोत्राचे पावित्र्य प्राप्त होते! म्हणूनच पूर्ण आठही चरण गाणे तिथे अनिवार्य ठरते. अष्टपदी अर्धवट गाणे हे पाप मानतात. मुख्यत्वे झांझ वाजवत युगुलस्वराने अष्टपदी गायन होते. मंदिरांतील अष्टपदीच्या चालींत उद्ग्राह व पुढचे सर्व चरण यांची एकच सुरावट अशी स्वररचना दिसते. मंदिरपरंपरांत अष्टपदीचे हे रूप आजही अपरिवर्तनीय आहे. वैष्णव मंदिरांत त्यांचे विस्तारपूर्वक गायन होत नाही, कारण पूजाविधीच्या ठरावीक समयबंधनात ती पूर्ण करायची असते. मात्र मंदिरपरंपरांशी संबंधित नृत्यशैलींत अष्टपदी गायनाचे हे संकेत किंचित सैल झाले. इथे नृत्यानुग प्रस्तुती करताना सुरावटी अधिक स्वरशोभित असून नृत्यातील संचारी भावानुसार विस्तार करतात.

भोजाने शृंगारप्रकाशात ‘चित्ररागकाव्य’, म्हणजे विविध रागांत साभिनय गावे असे चित्रदर्शी काव्य म्हणून जो प्रकार नमूद केला आहे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अष्टपदी. एका प्रकारे, अष्टपदी हे ‘विस्ताराने गायचे संस्कृत भावगीत’ आहे! गीतगोविंदातील पदावली ही प्राचीन संगीतप्रणालीनुसार, आलीक्रम प्रबंधांचे उदाहरण आहे. सुकोमल, नादमधुर शब्दांची पुनरावर्तनात्मक गुंफण, छंदवृत्तांची लयबद्धता, प्रवाहित्व, तरलता, रसमय काव्यबंध यांमुळे अष्टपदी सहज गेय आहेत. गीतगोविंदात प्रत्येक प्रबंधासाठी रागतालाचा निर्देश केला आहे. त्यात मालवगौड, मालव, गुर्जरी, वसंत, रामक्री, गुणक्री, कर्नाटी, देशांक, वराडी, देशवराडी, केदार, भैरव, विभास असे राग आणि प्रतिमंठ,  रूपक, एकताल, यती व अष्टताल असे ताल नोंदले आहेत. अर्थातच, संगीतपद्धतींतील आधुनिक परिवर्तनामुळे या रागताल निर्देशानुसार आज अष्टपदीचे गायन होत नाही.

१९व्या शतकात ग्वाल्हेरच्या संगीतप्रेमी शिंदे सरकारांनी आपल्या दरबारी गायकांना फर्मावले, ‘तुमचे ख्याल, टप्पे, तराने हे शृंगारिक, प्राकृत गाणे उत्तमच आहे. पण काही भक्तिपर, संस्कृत गायनही सादर करावे.’ (इथे प्राकृत गायन म्हणजे केवळ प्राकृत भाषांतील पदगायन एवढाच अर्थ नाही- उन्मुक्त, धृष्ट, जोरकस असाही अर्थ आहे; आणि त्याच्या तुलनेत संस्कृत पदगायन म्हणजे तरल, सूचक, संयत अशी अपेक्षा होती.) दरबारातील प्रख्यात ख्यालिये हद्दू खाँ यांनी राजपुरोहित पंडितांशी मसलत केली. ‘गायनासाठी ‘गीतगोविंद’ मधील अष्टपदी सर्वात उत्तम’ असे पंडितांनी सांगितले. हद्दू खाँसाहेबांचे शिष्य बडे बाळकृष्णबुवा हे कीर्तनी परंपरेतील, संस्कृत जाणणारे असल्याने त्यांना या अष्टपदी स्वरबद्ध करण्यास सांगण्यात आले. आज ग्वाल्हेर परंपरेत गायल्या जाणाऱ्या चोवीस अष्टपदी या मुख्यत्वे बडे बाळकृष्णबुवांनी स्वरबद्ध केल्या आहेत. हस्सू खाँसाहेबांचे शिष्य वासुदेवबुवा जोशी यांनीही काही अष्टपदी स्वरबद्ध केल्या. ग्वाल्हेर घराण्यात बडा ख्यालाच्या स्वरूपातील दोन अष्टपदींखेरीज प्रामुख्याने छोटा ख्यालाच्या साच्यात या रचना गायल्या जातात. ठुमरी, टप्पा शैलीतही काही अष्टपदी आहेत. विशेष असे की संस्कृत न येऊनही तेव्हा खाँसाहेब मंडळीही अष्टपदी गात असत. ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँसाहेब तर स्वत:स ‘हुसेनी ब्राह्मण’ म्हणवत आणि त्यांना अष्टपदी गाण्यात मोठीच मौज वाटे! बडे गुलाम अली खाँसाहेबही ‘ललितलवंगलता’ ही अष्टपदी गायचे- संगीत नाटक अकादमीच्या संग्रहात त्याचे ध्वनिमुद्रणही आहे. (ही ‘अलिबाबाची सरकारी गुहा’ कधी उघडली तर अशी अनेक रत्ने बाहेर येऊ शकतील!)

अष्टपदीचे आठही चरण गाण्याचा धर्मसंगीतातील दंडक ख्यालियांनी काही पाळला नाही- ते बव्हंशी दोनच चरण स्थायी-अंतरा म्हणून गातात. ख्यालाइतकी विस्तृत नसला तरी अर्थानुलक्ष्यी विस्तार केला जावा अशी अपेक्षा असते. दुर्दैवाने गेल्या शतकाच्या काळात गायकांचे संस्कृत भाषेचे अज्ञान वाढते राहिल्याने ख्यालियांचे अष्टपदीगायन हे अर्थानुलक्ष्यी न राहता रागानुलक्ष्यी बनले. हळूहळू अष्टपदी व ख्याल यांच्या भेदरेषा धूसर बनल्या- ‘संस्कृत भाषेतील ख्याल’ असे त्याचे स्वरूप झाले. अर्थातच ‘तोंडवळणी’ नसलेल्या संस्कृतातील हा अष्टपदीरूपी ख्याल गाणे पुढे गवयांनी टाळले. मुस्लिम गवयांच्या रचनासंग्रहात अष्टपदीचे स्थान गौण होतेच, पण हिंदू गायकांनीही त्यांनाच अनुसरल्याने अष्टपदीसारख्या तरलसुंदर गीतप्रकाराचे आज हिंदुस्थानी कलासंगीताच्या मैफलीतून दुर्दैवी उच्चाटन झाले आहे. गेल्या ५०-६० वर्षांत हिंदुस्थानी संगीतातील अष्टपदी गायन नामशेष होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गायकांचे, श्रोत्यांचे संस्कृत भाषेचे अज्ञान व अलिप्तता.

‘न्यू ऑफरिंग्ज फ्रॉम पंडित रविशंकर’ अल्बममध्ये लक्ष्मी शंकरांनी गायलेली ‘रतिसुखसारे’, डॉ. अशोक दा. रानडे यांनी स्वरबद्ध केलेली ‘गीतिभान’मधील ‘धीर समीरे’ अशी अष्टपदीच्या निराळ्या आविष्कारांची विलोभनीय उदाहरणे आहेत. पंडित जसराज यांचा व्यावसायिक अल्बम किंवा बालमुरलीकृष्ण व किशोरी आमोणकर यांनी केलेले युगुलगान ही उदाहरणेदेखील नोंदवण्यासारखी असली तरी अष्टपदी आज मैफलींत अभावानेच पेश होते. नाही म्हणता पं. बाळासाहेब पूछवाले, जाल बालापोरीया, पं. जितेंद्र अभिषेकी, मालिनी राजुरकर, शरद साठे, नीला भागवत, इ. गायकांनी अष्टपदीला मैफलींतून थोडेबहुत जिवंत ठेवले.

पं. बाळासाहेब पूछवाले आणि पं. वसंतराव राजुरकर यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्यातील चोवीसही अष्टपदी शिकण्याचे भाग्य मला लाभले. या गुरुऋणातून उतराई होण्यासाठी मी दोन कार्यशाळांतून या सर्व रचना आजच्या पिढीतील गायकांच्या गळ्यात रुजवण्याचा यत्न केला. हे गायक मैफलींत अष्टपदी पेश करतील आणि पुन्हा हा ललितमधुर गानप्रकार हिंदुस्थानी संगीताच्या मंचावर उजळेल अशी आशा आहे. माझ्या शिबिरात शिकलेल्या रागेश्री वैरागकर या नासिकच्या गायिकेने त्यातील १४ रचना यूटय़ूबवर प्रकाशित केल्या आहेत- हे एक आशादायक चित्र आहे.

जाता जाता एक मननीय प्रसंग सांगतो.

वीस वर्षांपूर्वी अष्टपदीचा सांगीतिक वेध घेणारा एक विशेष कार्यक्रम मी केला होता. संस्कृतच्या जाणकार, नृत्यगुरू रोहिणी भाटे आवर्जून उपस्थित होत्या. नंतर त्यांनी मला घरी बोलावून कौतुक केलेच, शिवाय १९६०च्या दशकातील त्यांच्या ‘गीतगोविंद’ या नृत्याविष्काराच्या संगीताची ध्वनिफीतही ऐकवली. मी रोहिणीताईंना विचारले, ‘अष्टपदीवर असे पूर्ण नृत्यनाटय़ करूनही पुढे तुम्ही अष्टपदी पेश केली नाहीत. त्याचे कारण?’ रोहिणीताई मंदसे हसून म्हणाल्या, ‘या नृत्याविष्काराच्या वेळीच मला जाणवले की हा जयदेव आम्हा नर्तकांना काही बोलूच देत नाही! अष्टपदी स्वत:च इतकी अर्थसंपृक्त असते की पदातील शब्दांना अभिनित करणे एवढेच काम नर्तकाकडे उरते. काव्य वा संगीत नर्तनावर शिरजोर झालेले मला नर्तक म्हणून कसे चालावे? नर्तकाच्या आविष्काराला सूचक, पूरक ठरेल एवढेच सारगर्भित काव्य, संगीत हे कथकसाठी आदर्श असते. अर्थातच मी अष्टपदीवर नृत्य करणे पुढे थांबवले.’ रोहिणीताईंच्या या वक्तव्याने केवळ अष्टपदीच नव्हे तर काव्य, संगीत, नृत्य यांच्या अनुबंधाबद्दल एक आगळीच दृष्टी मिळते, नाही का!

keshavchaitanya@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antarnaad article by dr chaitanya kunte literature music dance ssh
First published on: 29-08-2021 at 00:33 IST