प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com

समुद्रातल्या ‘निशाणवाल्या माशा’विषयी तुम्ही ऐकलंय का कधी? नसेल ऐकलं तर सांगतो. डोक्यावर त्रिकोणी झेंडय़ाच्या आकाराचा कल्ला असलेला हा मासा असतो. त्याच्या डोक्यावर साधारणत: फूटभर लांब, निमुळत्या बारीक आकाराची काडीसारखी एक दांडी असते. त्या दांडीच्या टोकाला हे कल्ल्याचं निशाण फडफडत असतं. आमच्याकडचे स्थानिक मच्छीमार त्याच्या या निशाणी कल्ल्यावरून ‘निशाणवाला मासा’ असंच म्हणतात त्याला. शेवाळल्या पाण्याशी मिसळून जाणारा रंग. त्यामुळे चटकन् जाणवतही नाही त्याचं अस्तित्व. शेवाळात, चिखलात, गाळात कुठेही याचं साम्राज्य असतं. त्याच्या आसपास एखादा बारकासा मासा वा समुद्रातला एखादा जीव आला की निशाणवाल्याचं निशाण वेगाने फडफडू लागतं. त्या जीवाला वाटतं, काहीतरी भक्ष्य असावं फडफडणारं. तो फडफडणाऱ्या झेंडय़ाच्या मोहानं जवळ येतो. निशाणवाल्याचा एक डोळा असतोच त्याच्यावर रोखलेला. त्यामुळे सावज जवळ येताच टपून असलेला निशाणवाला त्याच्यावर झडप घालतो. क्षणार्धात त्याला गिळून टाकतो. नायनपट करतो.

आता तुम्ही म्हणाल, हे असले निशाणवाले मासे काय फक्त समुद्रात थोडेच असतात! तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य, भाबडय़ा जीवांना निशाण दाखवून भुलवणारे, मोहात पाडणारे, फार जवळ गेलो की आपल्या अस्तित्वावरच घाला घालणारे निशाणवाले आपल्या आसपासही नेहमी वावरत असतात. त्यांच्या निशाणांचे रंग वेगवेगळे असतात, आकार वेगवेगळे असतात. पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो. तुम्हाला भुलवून आपल्या कह्यत ओढायचं. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी तुमचा पद्धतशीर वापर करून घ्यायचा. आपला मतलब साधून घ्यायचा. काम झालं की तुम्हाला फेकून द्यायचं. होत्याचं नव्हतं करून टाकायचं.

हे असे वेगवेगळी निशाणं घेऊन डाव साधायला बसलेले अनेक जण गावागावांत. घराघरांत. प्रत्येकाच्या निशाणाचा रंग वेगळा. एकेका घरातसुद्धा दोन भाऊ दोन रंगांची निशाणं घेऊन एकमेकांचा घास घ्यायला टपलेले. रक्त एकच, तरी प्रत्येकाची अस्मिता वेगळी. खुन्नस वेगळी.

निशाणवाल्यांच्या कळपात सामील झालेली ही तरुण मुलं कोण असतात? कुणीतरी परब, गावडे, डेगवेकर, कदम, मोरे.. राहणार : भांडुप, चेंबूर, भायखळा, ठाणे! कधी अमक्यातमक्या निशाणवाल्यानं पुकारलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात डोकी फोडून घेतलेली. कधी देवादिकांची चेष्टा करणाऱ्या कुण्या नाटककाराला अद्दल घडवण्यासाठी म्हणून फलाण्या निशाणवाल्यांच्या चिथावणीवरून नाटय़गृहाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणताना सापडलेली. कधी त्याही पुढे जाऊन तथाकथित देशद्रोही, धर्मद्रोही, संस्कृतीद्रोही समाजसुधारकांच्या हत्येत संशयित म्हणून पकडली गेलेली. खरं तर ही आमचीच मुलं आहेत. इथल्याच मसुरे, भिरंवडे, माजगाव अशा मालवणी मुलखातल्या गावांतली किंवा सांगली-कोल्हापूर अशा भागांतल्या खेडय़ापाडय़ांतली. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबांतली. त्यातली काही गिरण्या बंद पडल्यानंतर बेकार झालेल्या गाववाल्यांची नेक्स्ट जनरेशन. वाडवडलांसारखं शेती, मासेमारी, छोटे-मोठे पारंपरिक उद्योग-व्यवसाय करणं म्हणजे आयुष्य बरबाद करणं अशी या पिढीची सोयीस्कर समजूत आहे. त्याऐवजी कुण्या भाई वा दादाचं निशाण खांद्यावर घेऊन झटपट सगळं पदरात पाडून घेणं, त्यासाठी संयम, विवेक, नैतिक-अनैतिक वा कसलाही विधिनिषेध न बाळगता वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी ठेवणं, एवढंच यांना ठाऊक आहे. बाप कुठेतरी होडकं घेऊन दर्यात वा कुणाच्या तरी कुणग्यात मजुरी करत राबतोय, आई परडय़ातलं किडूकमिडूक विकून आला दिवस कसाबसा साजरा करतेय आणि पोरं ह्य़ाचं- त्याचं निशाण खांद्यावर घेऊन बोंबलत फिरतायत, हे आजकाल गावोगाव दिसणारं चित्र झालं आहे.

निशाणवाल्यांनी गावागावांतच नव्हे, तर अगदी घराघरांतही फूट पाडली आहे. काय मिळेल तो भाकरतुकडा खाऊन कालपरवापर्यंत अगदी गरिबीतही गुण्यागोिवदाने एकत्र नांदणाऱ्या घराघरांत आजकाल एक विलक्षण अस्वस्थता भरून राहिलेली जाणवू लागली आहे. निशाणवाल्यांनी फेकलेल्या नव्या नव्या आमिषांच्याच दबक्या आवाजात चर्चा सुरू असतात. म्हणजे आता अमक्या गावात विमानतळासाठी जागा हवी आहे, तमक्यांना मायिनगसाठी डोंगर हवे आहेत, कुणाला रिफायनरीत, तर कुणाला अणुऊर्जा निर्माण करण्यात विकास दिसतो आहे. आणखी कुणाला कुठे किनाऱ्यावर पंचतारांकित हॉटेल उभं करायचं आहे. मग कोणाच्या किती जमिनी जाणार, कुणाचं नुकसान होणार, कुणाला घबाड मिळणार, नदी आटवली जाणार का, आंब्या-नारळीच्या बागायतीचं काय.. हेच विषय बायका-पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या बोलण्यात. जमिनी विकायच्या की विकायच्या नाहीत, यावरनंच गावात दोन तट पडलेत. जाणत्या गावकरांसकट काही जणांना वाटतंय, ‘आपल्या वाडवडिलांपासून पिढय़ान् पिढय़ा सांभाळलेल्या या जमिनी! त्या अशा कशा विकायच्या? आणि जमिनी दिल्यावर मिळालेले पैसे असे किती दिवस पुरणार आहेत आपल्याला?’ तर निशाणवाल्यांनी माथी भडकवलेल्या तरुण मुलांना वाटत होतं, ‘काय ठेवलंय त्या जमिनींमध्ये? असा नुसता भावनेचा प्रश्न करून पोटं भरणार आहेत का? आलेली संधी का नाकारायची? नाही तरी दिवसरात्र ढोरासारखं राबूनही काय असं सोनं पिकतंय या जमिनींत? त्यापेक्षा मिळतंय ते घ्यावं नि त्यातून दुसरं काहीतरी सुरू करावं.’

आमच्या गावातल्या गोविंद परबांच्या घरात हेच सुरू होतं. भावाभावांच्या भांडणाचं पर्यवसान शेवटी एकाने दुसऱ्याच्या अंगावर मारेकरी घालण्यामध्ये झालं होतं. त्या आधी कधीतरी एकदा गोिवद परबाचा थोरला पोरगा मला म्हणालेला, ‘मी हंय उनातानात घरासाठी राबतंय आणि आमचो धाकलो भाव बग.. बगूचो तेव्हा फुडाऱ्यांच्या पाठ्सून झेंडे नाचयत धावत असतां. हेरशी मग इलेक्शनच्या टायमाक्गावलेलो मोबाईल आणि गाडी घेव्न फुशारक्यो मारीत झोळत असतां गावभर.’ थोरल्याचं हे म्हणणं अगदीच चुकीचं म्हणता आलं नसतं. धाकला भाऊ काहीही कामधंदा न करता मजा मारतोय, ह्यच्यासकट ह्यच्या बायका-मुलांना मात्र आपल्याला पोसायला लागतंय.. हे भाऊ झाला तरी कसं काय मान्य करणार होता? पण यावर धाकटय़ाचं म्हणणं होतं, ‘तुला मी जड होतोय तर माझ्या वाटय़ाचा तुकडा देऊन टाक. आमचे सरपंचभाई म्हणतायत तसं मी विकतो मायिनगवाल्यांना. चार पैसे मिळतील. त्यातनं मस्तपैकी हॉटेल किंवा बार वगैरे काहीतरी सुरू करतो. मला का अडवतोयस माझ्या वाटणीच्या जमिनीपास्नं?’ हे असं ऐकलं की थोरल्याचं टाळकं सटकणं साहजिकच. ‘तुला पाहिजे तर तुझ्या वाटय़ाच्या तुकडय़ात राब आणि खा. पण माझा जीव गेला तरी वाडवडिलांची जमीन विकू देणार नाही,’ असं त्याचं म्हणणं. ही धुसफुस मग वाढतच गेली. दोन्ही बाजूंनी काडय़ा घालून चिथावण्या देणारे रिकामटेकडे लोक भरपूर. रोजच्या दिवसाची सुरुवात शिव्यागाळीनं व्हायची नि शेवट एकमेकांच्या अंगावर पाळकोयते घेऊन धावून जाण्यानं. शेवटी काय झालं! त्या कुठल्याशा निशाणवाल्यांसाठी काम करणाऱ्या धाकटय़ा भावानं आपल्या कार्यकर्त्यांना सांगून डाव साधला. थोरल्याला डोंगरातल्या चिरेखाणीत नेऊन पद्धतशीर अपघात घडवून आणला. कायमचा काटा काढला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होता होताच हा प्रकार घडला. धाकटय़ाने चलाखी करून निशाणवाल्या साहेबांना मध्ये घालून विधवा वहिनीला निवडणुकीचं तिकीट मिळवून दिलं. गाववाल्यांच्या सहानुभूतीच्या जोरावर निवडूनही आणलं. पुढच्याच काही दिवसांत त्याने दोघांच्याही वाटेच्या जमिनी मायिनगसाठी फुंकून टाकून मिळालेल्या पैशातून हॉटेलही सुरू केलं. हळूहळू गोिवद परबाच्या थोरल्या झिलाचं काय झालं, याबद्दल कुजबुजणारे लोक विसरूनही गेले. कुणाला सवड आहे जगण्याच्या धबडग्यात असली किरकोळ प्रकरणं लक्षात ठेवून गळे काढत बसायला? 

हे आमच्या गावातलं असं जरी मी म्हणत असलो तरी असले प्रकार आजकाल सर्रास बहुतेक गावागावांतून सुरू झाले आहेत. कुठल्याही निशाणवाल्या दादा, भाई वा साहेबांचे आदेश पाळत निवडणुकीच्या काळात सक्रिय होणाऱ्या, एरव्ही कुठे गावातल्या ह्यच्या त्याच्या भानगडी, गल्लीबोळातल्या क्रिकेटच्या स्पर्धा, सौंदर्यस्पर्धा, हा किंवा तो महोत्सव, ह्यची किंवा त्याची जयंती वा पुण्यतिथी असलंच काहीतरी करत क्रयशक्तीबरोबर आयुष्यही वाया घालवणाऱ्या तरुणांना कशाचंच काही वाटत नाहीये. शेतकऱ्यांना चिरडून मारलं जातंय, आपल्या बापानं रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकाला कवडीमोलाची किंमत मिळतेय, काळजावर दगड ठेवून स्वत:च्या हातानं सगळ्या पिकाचा सत्यानाश करावा लागतोय, पावसाळ्यात माशाच्या विणीच्या हंगामातही यांत्रिक बोटी नि अत्याधुनिक जाळ्यांच्या साहाय्याने दर्या खरवडून काढला जातोय, त्यामुळे मत्स्यदुष्काळाला निमंत्रण दिलं जातंय, आपल्या गावातील मच्छीमार बांधवांवर उपासमारीची पाळी येऊ लागलीय, मायिनग- प्रदूषणकारी प्रकल्प- हॉटेल व्यवसाय- महामार्ग या सगळ्या विकासाच्या नादात निसर्गावर घाला घातला जातोय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय.. यातलं काहीही यांच्यापर्यंत पोचत नाहीये. पोचलं तरी त्यांना त्याचं काही सुखदु:ख नाहीये. हाताशी स्मार्ट फोन नि बुडाखाली गाडी आल्यावर आयुष्याचं सार्थक झालं म्हणणाऱ्या गाववाल्यांना गावात ह्य- त्या मोबाइल कंपन्यांच्या नेटची रेंज मिळणं, ग्रामदैवताच्या देवळाला रंगरंगोटी होणं, घरापर्यंत गाडी जाईल एवढा रस्ता होणं- यापलीकडे दुसरा काही विधायक विकास असू शकतो हे गावीही नसतं. त्यामुळेच भावाभावांत, घराघरांत, जातीपातींत तेढ निर्माण करून आपल्याला झुंजवणारे, आज्या-पणज्यानं जपलेल्या आपल्या नद्या- डोंगर- झाडंपेडं सगळं ओरबाडून खात सुटलेले निशाणवाले भस्मासुर त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला वापरून घेतायत, मूठभर कण्यांचं आमिष दाखवून झुंजवत ठेवतायत, आपल्याला आपल्या गावासकट, शेतीवाडीसकट, जमीनजुमल्यासकट उद्ध्वस्त करतायत, आपलं नामोनिशाणच कायमचं मिटवून टाकतायत, हे ह्यंच्या बथ्थड होत चाललेल्या मेंदूत येणं अशक्यच आहे.

कालपरवापर्यंत याच तांबडय़ा मातीतल्या साध्याभोळ्या माणसांचं वर्णन करताना ‘त्यांच्या काळजात भरली शहाळी’ वगैरे सारखे भलतेच रोमँटिक शब्द वापरले जात असत, त्याचं आता आश्चर्य वाटत राहतं. कुठे गेली ती अबोली-सुरंगीच्या फुलांसारखी, फणसाच्या गऱ्यासारखी मायाळू, निरागस, गोड माणसं? परडय़ातल्या माडाचं एखादं साधं चुडतही कुणाला उचलू न देणारी शंकाखोर, चिकट वृत्तीची ही माणसं परक्या भूमीतून आलेल्या नफेखोर कंपन्यांना कसलाही संशय न घेता या- त्या विनाशक प्रकल्पांसाठी दारं उघडून घरात घुसू देण्याइतकी उदार कशी काय झाली? धूर ओकणाऱ्या चुलीपुढे डोळे पुसत, फुंकर मारत पेज रांधणारी एखादी गावकारीण एकदम एखाद्या पक्षाची निशाणी खांद्यावर घेऊन आपल्या आड येणाऱ्यांच्या तंगडय़ा तोडून ‘डिलिट करून टाकण्या’ची भाषा कुठे शिकली? कुठल्या डोंगरापलीकडून वाहत आले हे स्वार्थाचे, आत्मनाशाचे, बेफिकिरीचे आततायी वारे? 

समुद्रात निशाणवाले मासे असतात, तसेच बघता बघता आपला आकार बदलवून टाकून समोरच्याचा गोंधळ उडवणारे केंड मासेही असतात. वरकरणी दिसायला गोंडस, गरीब असलेले हे मासे खरं तर भलतेच हावरट, वखवखलेले आणि निर्दयी असतात. म्हावरं भरलेल्या जाळ्यांवर झुंडीनं ते हल्ला करतात. आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळी कुरतडून सत्यानाश करतात. शिवाय आणखी कसलासा विषारी काळसर-निळसर द्रव सोडून दर्याचं पाणीही नासवतात, प्रदूषण वाढवतात. खाण्यापेक्षा नुकसान आणि नासाडीच जास्त असते त्यांची. पण इतकं खाऊनही समाधानी नसलेल्या या माशांचं काय होतं शेवटी? बघता बघता त्याच फाटक्या जाळ्यांच्या तुकडय़ांत गुरफटून, आपणच नासवलेल्या त्या गढूळ पाण्यात फसून आयतेच ते निशाणवाल्यांच्या तावडीत सापडतात.. स्वत:च स्वत:चा घात करून घेतात.

ज्या मातीनं आपल्या आजवरच्या पिढय़ा जगवल्या, ज्या दर्याने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांनाच बाजार दाखवायची अवदसा आठवल्यावर आणखी काय होणार आहे दुसरं? कोणे एकेकाळी बारा-पाचाच्या देवस्कीला घाबरणाऱ्या, देवभोळ्या, मवाळ, तरीही शंकासुरासारख्या चिकित्सक, तरतरीत बुद्धीच्या आणि झाडामाडांना, गुरावासरांना जीव लावणाऱ्या संवेदनशील स्वभावाच्या गाववाल्यांना कधीतरी हे कळेल काय रे, रवळनाथा, महापुरुषा?