scorecardresearch

कलास्वाद : एका फिनिक्स पक्ष्याची भरारी

आण्णा बराच अबोल होता. मितभाषी. पण बोलू लागला की चित्रकलेच्या व्याख्येसहित त्यातील तत्त्वज्ञानही सांगत असे.

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail.com

हात आणि बोटे ही कलाकाराची आयुधे. कलाकृती आविष्कृत करण्यासाठी त्यांची गरज भासतेच. पण उद्या जर का त्या अवयवांनी बंद पुकारला तर..? सर्वसाधारण व्यक्ती हताश होऊन नियतीपुढे हार मानेल. पण अशी एक व्यक्ती होती- जिने नियतीवर विजय मिळवून स्वत:मधला मनस्वी कलाकार जिवंत ठेवला. एवढेच नव्हे तर एकापेक्षा एक सरस सर्जनशील कलाकृती आविष्कृत करून अमानुष नियतीवर विजय मिळवला. अविनाश गोडबोले हे त्या कलाकाराचे नाव!

गोडबोले यांचे नाव जरी अविनाश असले तरी आम्हा सर्व मित्रांना तो ‘आण्णा’ होता. आण्णा गोडबोले या नावानेच तो जे. जे. उपयोजित कलासंस्थेत प्रसिद्ध होता. आण्णा कॉलेजमध्ये आमच्या पुढे दोन वर्षे होता. एका कुटुंबाप्रमाणे असलेल्या या संस्थेत त्याकाळी सर्व शिक्षकवर्ग निष्णात होता. ज्यांच्या नावावरून संस्था ओळखली जात असे, असे हे शिक्षक होते. ज्या विद्यार्थ्यांत काही स्पार्क असेल त्याला त्याबाबतीत पुढे जाण्यास मदत करणारे असे हे गुरुवर्य होते. त्यातही षांताराम पवार हे अशा विद्यार्थ्यांचे खास गुरू असत. त्यामुळे आण्णाची त्यांच्याशी जवळीक झाली नसती तरच नवल!

प्रत्येक वर्षी परीक्षेत प्रथम येणारा आण्णा अंतिम वर्षीही अंतिम परीक्षेत सर्वप्रथम येऊन ‘फेलो’ म्हणून लागला आणि आमचे ‘गोडबोले सर’ झाले. पण आमच्या दोस्तीत कधी खंड पडला नाही. उलट, हक्काने आम्ही आमच्या प्रदर्शनाच्या कामात आण्णाची मदत घेत होतो. एखादा विषय कल्पनेच्या भरारीवर स्वत:च्या सृजनशीलतेची भर घालून इंद्रधनुच्या रंगांनी त्यावर साज चढवून कसा सादर करावा, हे आण्णाची चित्रे पाहून ध्यानात येई. पुढे आण्णा स्टाफवर आला. मीही त्यानंतर तेथेच स्टाफ म्हणून लागलो. तिथे आण्णाची संगत लाभली तीही पवार सरांसोबत. दोघांचीही वेव्हलेंग्थ एकच.

आण्णा व पवार सर बहुधा एकत्रच एकाच वर्गावर असायचे. त्यांच्या चर्चा व विद्यार्थ्यांना करेक्शन ही एक पर्वणीच असे. दुपारी जेवणाच्या सुटीत पवार सर, गोडबोले, मी व खांबेकर पवारांच्या केबिनमध्ये असायचो. तिथे इतर कोणतेही विषय नसत, तर फक्त कला विषयावरच बोलणे होई. कोणाचे कॅंपियन कसे झाले आहे, कोणाची नवीन इलस्ट्रेशन्स बाहेर आली आहेत, असे ज्ञान वाढवणारे विषय असत. हा नित्याचा प्रघात होता. आण्णा बराच अबोल होता. मितभाषी. पण बोलू लागला की चित्रकलेच्या व्याख्येसहित त्यातील तत्त्वज्ञानही सांगत असे. त्याचे वाचन प्रचंड होते. पवार सर उत्तम कवी होते. आण्णाही कविता करत असे. त्यावरही चर्चा होत असे. शासनाचीही बरीच कामे येत असत, तीही आम्हा सर्वाकडून केली जात असत. त्यात पवार आमचे क्रिएटिव्ह डायरेक्टर असत. आण्णाने स्वत:ची अशी खास चित्रशैली निर्माण केली होती. अत्यंत काव्यमय, अर्थपूर्ण अशी. पोस्टर कलर, कलर इंक, पेन्सिल, ऑइल पेंट अशा सर्वच माध्यमांतून तो कामे करीत असे. एके दिवशी पवार सरांनी आण्णाला बजावले, ‘‘आजपासून तू मला ‘सर’ म्हणायचे नाही. मी तसे तुला काहीच शिकवले नाही. तू जे काही कमावले आहेस ते स्वत:च्या  बळावर. म्हणून आता मी तुझा शिक्षक नाही. आता तू मला ‘षांताराम’ या एकेरी नावानेच संबोधायचे.’’ एका महान गुरूने तेवढय़ाच तुल्यबळ शिष्याला दिलेला हा मान होता.

आण्णाची बाहेरही व्यावसायिक कामे चालत असत. ती आम्हाला पाहायला मिळत. अशातच एक दिवस नवीन आलेले कला संचालक माधवराव सातवळेकर यांनी शिक्षकांची एक बैठक घेऊन शिक्षकांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवा असे सांगितले. त्याला कारणही तसेच होते. उपयोजित कलेचे शिक्षक पेंटिंगच्या शिक्षकाप्रमाणे प्रदर्शने भरवीत नाहीत, काम करीत नाहीत असे त्यांचे मत होते. या बैठकीत अर्थातच पवार सरांनी संचालकांचा समाचार तर घेतलाच; पण आम्हा सर्व शिक्षकांनाही त्यांनी प्रदर्शनासाठी कामे करायला लावली. त्यावर पवार सर स्वत: लक्ष ठेवून होते. यावेळी गोडबोलेने ‘बॉम्बे प्लास्टिक’ या कंपनीचे कॅलेंडर डिझाइन केले. इलस्ट्रेशन्स त्याने कलर इंक वापरून केली होती. प्रदर्शन मोठय़ा थाटात झाले. अनेक एजन्सीचे लोक पाहायला आले. त्यात त्या काळातील ‘एमसीएम’ या नावाजलेल्या एजन्सीचे अरुण कोलटकर आले होते. त्यांना आण्णाचे कॅलेंडर खूप आवडले. आणि आण्णा थेट ‘एमसीएम’मध्ये गेला. तेथे त्याची प्रतिभा बहरत गेली. ते दशक केवळ त्याचेच होते. पुढे ही एजन्सी बंद झाली. पण त्याच तोडीची ‘रीडिफ्युजन’ ही नवी एजन्सी सुरू झाली. आण्णाचे एक वलय निर्माण झाले, पण त्याची जेजेशी असलेली नाळ मात्र तुटली नाही. ८५ साली मी जेव्हा जेजेच्या शिल्पांजलीचा सुवर्णमहोत्सवी अंक काढला त्यावेळी त्याचे कव्हर मी आण्णाला करायला सांगितले. आण्णानेही त्यात ५० वर्षे गाठणारा मैलाचा दगड दाखवला.. तोही पेन्सिल या अर्थपूर्ण माध्यमाने. संस्थेच्या हीरकमहोत्सवात आपला मित्र अरुण काळेसोबत त्याने तो सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. मी ज्यावेळी देशस्तरीय शिक्षकांसाठी सेमिनार घेतले, त्यावेळी आण्णाला मी बोधचित्रांसाठी व्याख्यान देण्यास आमंत्रित केले होते. या काळात आण्णाने ‘घराणे’ या नावाचे पेंटिंग प्रदर्शन नेहरू सेंटरमध्ये भरवले होते. घराणे म्हणजे आण्णासहित त्याचा मुलगा, मुलगी, जावई अशा घराण्यातील सर्व कलाकारांनी तेथे हजेरी लावली होती.

आण्णाशी आपली मैत्री व्हावी, आपल्याला ते ओळखतात असे बऱ्याच लोकांना वाटत असे. प्रत्येक माणूस हा चित्रकार असतो, त्याला त्यातील अंतर्मनाची जाणीव व्हायला हवी, असे त्याचे सांगणे असे. आपण समाजाचे जे देणे लागतो, ते आपल्या कलेद्वारा काही प्रमाणात समाजाला द्यायला हवे, ही त्याची भावना असे. पुढे आण्णाने स्वतंत्रपणे कामे करण्यास सुरुवात केली. आण्णाने खूप दर्जेदार कामे केली. एअर इंडियासाठी त्याने रागदारीवर अप्रतिम पेंटिंग्ज केली. एवढेच नव्हे तर त्याला प्रत्यक्ष विमानांत चित्रे काढण्याची संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत प्रथमच काँग्रेस पक्षाने एक जाहिरात संस्थेची मदत घेऊन आपली निवडणूक प्रचार मोहीम आखली. ती जाहिरात संस्था होती ‘रीडिफ्यूजन’! आण्णाच्या त्या काळातील वैशिष्टय़पूर्ण शैलीतील बोधचित्रांनी केलेल्या जाहिराती खूपच गाजल्या. आण्णाने निरनिराळ्या माध्यमांतून अनेक प्रकारची कामे केली. जाहिरातींसाठी इलस्ट्रेशन्स केली. कॅलेंडर डिझाइन्स केली. लहान मुलांच्या पुस्तकांसाठी चित्रे केली. पण त्याच्यातील पेंटर त्याला खुणावत होता. जाहिरात कलेसोबतच आण्णांकडून अभिजात कला आविष्कृत होऊ लागली. आपल्या कारकीर्दीत आण्णाने खूप पारितोषिके मिळवली. कॅगचा ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कार त्याला मिळाला. २०१८ साली त्याच्या यशस्वी कलाकीर्दीबद्दल ‘चैत्र चाहूल’तर्फे त्याला रंगकर्मी सन्मान मिळाला.

पण एक दिवस उजाडला तो मात्र भयाण रूप धारण करून. घरी आल्यावर पायऱ्या चढता चढता आण्णाच्या पायामध्ये बधिरता जाणवू लागली. तसाच तो घरी पोचला. २१-२२ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ते दुखणे त्याने तसेच दुर्लक्षिले. त्याला वाटले, नेहमीप्रमाणे आपण बरे होऊ. डॉक्टरकडे जाण्यासही त्याने नकार दिला. त्याचा होमिओपॅथीवर जास्त विश्वास होता. पण त्याच्यात सुधारणा होत नाही हे पाहिल्यावर  त्याला लीलावतीमध्ये दाखल केले. झालेले नुकसान भरून निघणे शक्य नव्हते, पण पुढचा धोका टाळता येणार होता. त्याची उजवी बाजू निकामी झाली होती. उजवा हात आता काम करू शकणार नाही, पेन्सिल पकडू शकणार नाही, ही जाणीव त्याला झाली. फिजिओथेरपी सुरू झाली, पण चमत्कार झाला नाही. दरम्यान, आण्णा कामावर जाऊ लागला. उजवा हात थांबलाच होता. तो तोवर रंगीबेरंगी स्वप्ने पाहत होता, ती सत्यात उतरवीत होता. त्याला या वेदना शरीरापेक्षा मनाला जास्त होत होत्या. त्याच्या कुटुंबीयांनी आण्णाला डावा  हात वापरायला सांगितले. त्यांचे न्यूरो सर्जन डॉ. शिरीष हस्तक यांनी त्यांना जाणीव करून दिली की, स्ट्रोक म्हणजे काही जगाचा अंत नाही. तुमचा आवडता विषय पेंटिंग करण्यास आरंभ करा.

आणि येथेच आण्णाच्या आशा पल्लवित झाल्या. नियतीशी बेधडकपणे दोन हात करण्यास तो सरसावला. डाव्या हातात पेन्सिल, कुंचला आला आणि सौंदर्याची निर्मिती आविष्कृत होण्यास आरंभ झाला.. आणि नियती हरली. सुरुवातीला थोडा त्रास झाला. जणू पुन्हा नव्याने पेंटिंग करायला आरंभ करण्यासारखेच ते होते. मात्र, त्याचा मेंदू तल्लख होता. त्याची सर्जनशीलता, कल्पकता, सौंदयदृष्टी हे सर्व अबाधित होते आणि हेच आता आविष्कृत करायचे होते. आण्णाने पूर्ण वेळ पेंटिंगला दिला. आपण आपल्या स्ट्रोकवर कशी मात केली ते दर्शविण्यासाठी आण्णाने २५ पेंटिंग्ज केली. स्ट्रोकबद्दल इतरांच्या मनात जागृती निर्माण करण्याची त्याची इच्छा होती. स्ट्रोकने जरी त्याचे आयुष्य बदलले तरी त्याच्या कुटुंबीयांची साथ भक्कम होती. फिनिक्स पक्ष्याने राखेतून उठून उंच भरारी मारली होती. यादरम्यान आण्णाने मुंबई व दिल्लीत प्रदर्शने भरवली. आणि त्याला ब्राझीलहून एक खास आमंत्रण आले. अशाच प्रकारच्या कलाकारांकडून कामे करवून तेथे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सात-आठ पेंटर होते. पण स्ट्रोक आल्यावर पेंटिंग्ज केलेला आण्णाव्यतिरिक्त एकच पेंटर होता. बाकीच्यांनी आपली आधीचीच पेंटिंग्ज लावली होती. सर्वानी आपण कशा प्रकारे यावर मात केली याचे विवेचन केले. 

या काळात आण्णाला अतिशय खर्चीक, मानसिक, शारीरिक अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले. फिजिओथेरॅपी सुरू असेपर्यंत त्याला बरे वाटे. एकदा का ती थांबवली की पुन्हा त्रास सुरू होई. यादरम्यान त्याची पत्नी रतन हिने कधी सावली बनून, तर कधी ढाल बनून त्याला साथ दिली. त्यानंतर आण्णाने केलेल्या अनेक पेंटिंग्जपैकी काही पेंटिंग्जचे प्रदर्शन त्याने चर्चगेटच्या आर्ट गेट गॅलरीत भरवले. त्याचा मुलगा ययाती याने त्यात पुढाकार घेतला होता. उद्घाटनाच्या दिवशी आण्णाचे अनेक चाहते या दुग्धशर्करायोगाचे निमित्त साधण्यासाठी हजर होते. आण्णा व्हीलचेअरवरून त्यांचे स्वागत करीत होता. पुढे त्याचा चित्राविष्कार सुरूच राहिला. अगदी नाकाला प्राणवायूची नळी लावूनही पेंटिंग सुरू असे.  गोडबोलेने सगळ्या विपरीत परिस्थितीवर मात केली. त्याचे नित्याप्रमाणे जीवन सुरू झाले. आण्णाला प्राण्यांची खूप आवड होती. माझ्याकडे कधी आला तर आमच्या मार्शलशी (डॉबरमन कुत्रा) तो खेळत बसे. माझी जे. जे.मधील डीनची कारकीर्द यशस्वी करण्यात ज्यांनी मला मोलाची मदत केली, त्यामध्ये आण्णा एक प्रमुख होता. आण्णा कलाकार म्हणून उंचीवर होताच, पण माणूस म्हणूनही तो त्याहीपेक्षा मोठा होता. राखेतून भरारी घेतलेल्या या पक्ष्याने अलीकडेच १० मे रोजी पुन्हा आकाशात झेप घेतली.. ती पुन्हा कधीही न परतण्यासाठी!

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about artist avinash godbole paintings zws

ताज्या बातम्या