भरत गोठोस्कर
मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासाठी जग पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? माझ्या पालकांच्या पिढीसाठी हे बहुतेक अशक्य होते. कारणाशिवाय परदेशात प्रवास करणे परवडणारे नव्हते. कारण परकीय चलन, सीमाशुल्क इत्यादींवर सरकारने खूप निर्बंध लादले होते. अर्थव्यवस्थेचे उदारीकरण झाल्यानंतर आणि प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर गेल्या तीन दशकांत परदेशी प्रवास अधिक परवडणारा आणि सुलभ झाला. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी जग पाहण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे समूह पर्यटन (ग्रुप टूर्स). पण मला स्वत:च्या प्रवासाची योजना आणि बुकिंग स्वत:लाच करायला आवडते. म्हणजे पर्यटन उद्याोग मला FIT म्हणजे ‘फ्री इंडिपेन्डन्ट ट्रॅव्हलर’ या श्रेणीत धरेल. २०१० मध्ये मी आई-वडिलांना युरोप दाखवायचे ठरवले. फक्त मी आणि बायको असतो तर असेच हिंडलो असतो. पण आमच्यासह ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे सोपा मार्ग धरला – नियोजन, प्रवास कार्यक्रम आणि प्रवास व्यवस्था ‘आउटसोर्स’ केली. मुंबईच्या एका प्रख्यात ट्रॅव्हल कंपनीची ‘ऑस्ट्रिया – स्विस – पॅरिस टूर’ बुक केली. मला आणि माझ्या कुटुंबीयांना युरोपच्या इतिहासात आणि संस्कृतीत रस होता. कंपनीने आयोजित केलेले विविध गाइड्स खूप ज्ञानी होते, पण आमच्या सहप्रवाशांना त्या तपशिलांमध्ये फारसा रस नव्हता. काहींना खरं तर राग आला होता की त्यांना खरेदीसाठी जास्त वेळ मिळण्याऐवजी जगातील सर्वोत्तम संग्रहालयांपैकी एक असलेल्या ‘लूव्र’मध्ये वेळ ‘वाया’ घालवावा लागला. मला वाटले की, माझे कुटुंब आणि इतर दोघे या गटात ‘ऑड मॅन आउट’ होतो.
सहलीची व्यवस्था चांगली असली तरी मला दिवसरात्र भारतीय अन्न घ्यावे लागत असल्याने मी नाराज होतो. ऑस्ट्रियातील एका रात्री, मी आणि माझ्या पत्नीने टूरच्या खर्चात समाविष्ट असलेले भारतीय भोजन टाळण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी आम्ही जवळच असलेल्या एका इटालियन कुटुंबाने चालवलेल्या छोट्याशा ‘पिझ्झा जॉइंट’मध्ये गेलो. तिथे झालेल्या संवादातून आम्हाला स्थानिक संस्कृतीची उत्तम माहिती मिळाली.
मी स्वत: जगभर प्रवास केला तेव्हा मला जाणवले की, स्थानिकांना त्यांचा इतिहास, संस्कृती, वास्तुकला आणि कला तसेच पर्यटकांना दाखवण्यात खूप अभिमान वाटतो. दुर्दैवाने, आपल्या देशातील बहुतेक भागांत याचा अभाव आहे, तर भारतीय लोक इतर देशांना भेट देताना हे बारकावे क्वचितच समजून घेतात. त्यांना फक्त ‘साइटसीइंग’मध्ये रस असतो- ज्यातून त्यांना ‘इन्स्टाग्राम योग्य’ फोटो मिळतात. माझा मित्र दिवेश याला ‘पटेल पॉइंट्स’ म्हणतो – तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना घरी परतण्यासाठी फोटोंची एक टिक-ऑफ यादी. हे सोडले तर आणखी दोन गोष्टी भारतीय पर्यटकांना हव्या असतात, स्वस्तातली खरेदी आणि भारतीय जेवण.
खरं तर चूक त्यांची नाही. मी भारतात इतिहासकेंद्रित टूरला गेलो आहे आणि त्यातले काही इतके ‘शैक्षणिक’ होते की ऐकणाऱ्या काहींना डुलकी यायची. जवळजवळ एका छोट्या शहरातल्या सामान्य महाविद्यालयामधील कंटाळवाण्या व्याख्यानासारखे. आपण लोकांसाठी इतिहास की मनोरंजक करू शकत नाही? ‘टॉवर ऑफ लंडन’मधील ‘योमन वॉर्डर टूर्स’सारखे. मी बराच वेळ वाट पाहत होतो की कोणीतरी असा उपक्रम सुरू करेल. मग एके दिवशी जेव्हा कोणीही तयार दिसत नव्हते, तेव्हा मी विचार केला की, ‘मीच का नको?’अशा प्रकारे माझ्या ‘खाकी टूर्स’चा जन्म झाला.
माझ्या उपक्रमाचा उद्देश ‘सुरस आणि चमत्कारिक’ कथाकथनाचा वापर करून इतिहास, वास्तुकला, कला आणि संस्कृती जनसामान्यांकरिता समजण्यास सोपी करणे. आम्ही मुंबईत कमी ज्ञात असलेला भाग दाखवण्यासाठी मोफत वॉकिंग टूर सुरू केले आणि प्रतिसाद खूप छान मिळाला- एका मोफत वॉकसाठी, बाणगंगा येथे २०० हून अधिक पाहुणे आले. आज आमच्याकडे शहरात ७० हून अधिक वॉक आहेत, ज्यामध्ये ८० हून अधिक लोक आमच्यासाठी वॉक आयोजित करतात. पहिल्या वर्षी फक्त २० पाहुण्यांपासून ते गेल्या वर्षी २२००० हून अधिक पाहुण्यांपर्यंत आम्ही खूप मोठा पल्ला गाठला.
आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना आमच्या मुंबईतील टूरमध्ये सामील व्हायला आवडते याचे एक कारण म्हणजे, आम्ही या शहराचे त्यांच्या देशाशी आणि संस्कृतीशी असलेले संबंध दाखवतो. आमच्या वॉककरिता नियमित येणाऱ्या काही मुंबईकरांनी आम्हाला याच्या उलट करायची विनंती केली. त्यांनी आम्हाला विचारले की, ‘आम्ही त्यांना इतर देशांमधील भारताचे कनेक्शन का दाखवू शकत नाही का?’ त्यामुळे आम्ही मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय टूरवर घेऊन जाऊ लागलो. पण आम्ही ते आमच्या पद्धतीने केले. टूर ‘क्युरेट’ करण्याचा आमचा दृष्टिकोन इतर सामान्य टूरपेक्षा खूप वेगळा ठेवला.
पहिले म्हणजे कुठल्या देशात जायचे ते ठरवावे लागले. थायलंड, सिंगापूर आणि दुबईसारख्या सामान्य भारतीयांना आवडण्याऱ्या ठिकाणांना आम्ही जाणीवपूर्वक टाळले आणि आडवाटेवर जायचे ठरवले. (आम्ही कालांतराने कदाचित या ठिकाणांचे दौरे करूही शकतो, पण तेदेखील वेगळेच असतील.) आम्ही इजिप्त ते उझबेकिस्तान ते कंबोडिया अशा भारताशी मजबूत सांस्कृतिक संबंध असलेल्या देशांचे दौरे सुरू केले.
पहिले पाऊल म्हणजे आपण स्वत: देश समजून घेणे. म्हणून आम्ही प्रथम त्या देशावर विस्तृत वाचन करून त्याचे संशोधन करतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेट देतो. यामुळे आम्हाला ‘टूर’ अशा प्रकारे तयार करण्यास मदत होते की, आमच्या पाहुण्यांना त्यांच्या आणि भेट देत असलेल्या देशाच्या संस्कृतीतील समानता आणि संबंध समजतात. जसे पाककृती, राजकारण, भाषा, धर्म आणि इतर बाबी.
अनोळखी देशातदेखील आम्हाला आडवाटेवरच्या जागा दाखवायला आवडतात. म्हणूनच, आमच्या उझबेकिस्तान दौऱ्यात, आम्ही खिवा हे तटबंदिस्त शहर जोडले आणि आमचा कंबोडिया दौरा केवळ अंगकोर वाटवर केंद्रित नाही तर त्यात बॅटमबँग नावाच्या फ्रेंच निर्मित शहराचाही समावेश करतो. या शहरांतदेखील आम्ही अपरिचित स्थळे आवर्जून दाखवतो. आमच्या दौऱ्यात ताश्कंदला भेट देणे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय अपूर्ण आहे, ज्यांनी या शहरात शेवटचा श्वास घेतला. आणि कैरोमध्ये, आम्ही बॅरन एम्पेन पॅलेसपासून सुरुवात करतो, ज्याची हिंदू मंदिरासारखी स्थापत्यशैली पिरॅमिडच्या भूमीशी विसंगत आहेत.
आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या भारतीय प्रवाशांना सेवा देत आहोत ज्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ते फक्त प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन समाधानी नाहीत आणि त्यांना ते ज्या देशांना भेट देतात त्यांचा अद्भुत अनुभव हवा असतो. सहसा ते स्वत:हून प्रवास करतात, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. आता ते आम्हाला निवडतात कारण आम्ही त्यांना दिवसा सामायिक खर्चाचा फायदा देतो जसे हॉटेल्स, वाहतूक आणि तज्ज्ञ गाइड आणि संध्याकाळी स्थानिक संस्कृती आणि पाककृती अनुभवून स्वत: शहर तपासून पाहण्याचे स्वातंत्र्य.
म्हणूनच आम्ही आमची हॉटेल्स काळजीपूर्वक निवडतो. विमानतळाजवळील स्वस्त हॉटेल्स बुक करण्याचा मोह आम्ही टाळतो आणि शहराच्या मध्यभागी राहण्याची सोय करतो, शक्यतो हेरिटेज हॉटेलमध्ये, जेणेकरून आमचे पाहुणे चालत शहर हिंडू शकतात.
मुंबईतील आमच्या टूरमध्ये, आम्ही टुरिस्ट गाइड्सचा वापर करत नाही. त्याऐवजी आम्ही उत्साही नागरिकांना मुंबईचे राजदूत बनण्यासाठी प्रशिक्षण देतो. तसेच, आमच्या आंतरराष्ट्रीय टूरमध्ये आम्ही अशाच प्रोफाइलचे गाइड्स शोधतो ज्यांना त्यांच्या देशाचे सखोल ज्ञान आहे आणि ते त्यांना सोप्या भाषेत आणि मनोरंजक पद्धतीने समजावता येते.
भोजन हा आणखी एक पैलू आहे ज्याबाबत आम्ही तडजोड करत नाही. आमचा आग्रह हा असतो की आमच्या पाहुण्यांनी स्थानिक जेवणाचा आनंद घेतला पाहिजे. त्यात आमच्या पाहुण्यांना शाकाहारी पर्याय मिळतील याची आम्ही दक्षता घेतो. हो, हे शक्य आहे. आम्ही आमच्या टूर्समध्ये नवीन अनुभवदेखील समाविष्ट करतो. जसे की, इजिप्तमध्ये शिडाच्या होडीतून प्रवास करणे किंवा कंबोडियामध्ये बांबूच्या ट्रेनमध्ये बसणे.
परदेश प्रवास आता भारतीयांसाठी सोपा झाला आहे, जो आपल्या खर्च करण्याच्या क्षमतेचे लक्षण आहे. आपल्या पालकांच्या पिढीची प्रवासाची उणीव भरून काढण्यासाठी आपल्या पिढीने जोमात प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. आणि ज्या देशांबद्दल आपण पूर्वी ऐकलेही नव्हते अशा देशात जाण्याकरिता थेट फ्लाइट्स असल्यामुळे ही इच्छा सतत वाढत आहे.
शेवटी आयुष्य लहान आहे. आपण आपल्या मेहनतीने जमा केलेला पैसा आपण गेल्यावर आपल्या कोणत्याही उपयोगाचा नाही. आपली मुलेही आयुष्यात चांगली कामगिरी करत आहेत आणि आपण जग पाहण्याच्या आपल्या इच्छेमध्ये रमवू शकतो. म्हणूनच नवीन भारतीय पर्यटक उदयास येत आहेत, जो फक्त सेल्फी घेणाऱ्या, भारतीय जेवण खाणाऱ्या, खरेदीमध्ये रस असलेल्या आणि नेहमीच उशिरा येणाऱ्या देशातील आधीच्या पर्यटकापेक्षा खूप वेगळा आहे.
bhargo8@gmail.com
(संस्थापक, खाकी टूर्स आणि खाकी हेरिटेज फाउंडेशन)