हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील शहरांना बेचिराख करण्यासाठी अमेरिकेने पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर केला, त्याला या आठवड्यात ८० वर्षे पूर्ण होतील. या आठ दशकांत एकूण नऊ राष्ट्रे अण्वस्त्र सुसज्ज झाली. पुन्हा अणुबॉम्ब वापरण्यात आला नाही. उलट मोठ्या राष्ट्रांमध्ये शांतता राखणारे हत्यार म्हणून अण्वस्त्रे ‘निष्क्रिय’ राहूनही ‘सक्रिय’ बनली. पण या काळात जगभरात युद्ध, हिंसा यांच्या बळींची संख्या अणुसंहारापेक्षाही अधिकच राहिली. अण्वस्त्रसज्जतेला शांती-सामंजस्याचा मार्ग मानले, तरीही नरसंहाराच्या न थांबलेल्या बाबी अधोरेखित करणारी चर्चा…
हिरोशिमा हे नाव ऐकले की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते- अण्वस्त्रे. फार कमी शहरे अशा रीतीने एखाद्या गोष्टीशी जोडली गेली असतील. ६ ऑगस्ट १९४५ ला जपानमधील हिरोशिमा या शहरावर सकाळी सव्वाआठ वाजता अमेरिकेच्या विमानांनी ‘लिटिल बॉय’ नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्या बॉम्बचा विस्फोट झाल्यानंतरच्या काही मिनिटांतच हजारो लोक मृत्युमुखी पडले. संपूर्ण शहराचा विनाश झाला. त्या दिवशी जगाने अणुयुगात प्रवेश केला असे मानले जाते.

हिरोशिमानंतर तीनच दिवसांनी नागासाकी या शहरावरदेखील अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला. या दोन्ही बॉम्बमुळे सहा वर्षे चाललेले, कोट्यवधी लोकांचा बळी घेतलेले दुसरे महायुद्ध संपले. आता जग अणुयुगात येऊन बरोबर ऐंशी वर्षे झाली आहेत. गेल्या आठ दशकांत नऊ देशांनी अण्वस्त्रे मिळवली. इतर अनेकांकडे अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे. अण्वस्त्रे आल्यामुळे जग अधिक शांततामय झाले? की जगाचा विध्वंस करण्याची क्षमता असलेली ही शस्त्रे तयार करून मानवाने स्वत:चे अस्तित्व धोक्यात घातले? अण्वस्त्रे हा शाप की वरदान हा मुद्दा प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. हिरोशिमाच्या घटनेला ८० वर्षे होताना अण्वस्त्रे आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा विचार व्हायला हवा.

सन १८०० पासून प्रत्यक्ष युद्धात सुमारे तीन कोटी सत्तर लाख सैनिक मृत्युमुखी पडले अशी एक आकडेवारी दिली जाते. युद्धाच्या निमित्ताने नागरी वस्त्यांवर केलेले हल्ले, दुष्काळ, साथीचे रोग अशा कारणांमुळे मरण पावलेल्या नागरिकांची संख्या जोडल्यास हा आकडा कैक पटीने वाढेल. अणुयुगापूर्वीच्या, १८०० ते १९४५ या दीडशे वर्षांच्या काळात प्रामुख्याने दोन स्वरूपाची युद्धे झाली. पहिली- युरोपीय देशांनी वसाहती ताब्यात घेण्यासाठी केलेली आणि नंतर दोन- युरोपीय राष्ट्रांमधील संघर्षामुळे झालेली.

वसाहती ताब्यात घेण्यासाठी केलेल्या युद्धांमध्ये प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील नागरिक मरण पावले. या युद्धांमध्ये युरोपीय देशांची मनुष्यहानी खूपच कमी झाली. पण युरोपीय देशांनी आपापसांत केलेल्या युद्धांमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणावर युरोपीय नागरिकांचा बळी गेला. या युद्धांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ती प्रामुख्याने मोठ्या देशांमध्ये झाली. या दीडशे वर्षांच्या कालावधीतच पहिले (१९१४ ते १९१८) आणि दुसरे महायुद्ध (१९३९ ते १९४५) झाले.

नेपोलियनच्या नेतृत्वाखालील फ्रान्सने युरोप ताब्यात घेण्यासाठी लढाया केल्या आणि नंतर त्याच नेपोलियनचा पाडाव करण्यासाठी १८१५ मध्ये मोठा संघर्ष झाला. सन १८७०-७१ मध्ये फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातदेखील रणकंदन झाले होते. मोठ्या देशांमधील युद्धे सर्व अर्थांनी विनाशकारी असतात. बड्या देशांची आर्थिक, राजकीय आणि लष्करी ताकद खूप असते. त्यामुळेच त्यांची विध्वंस अथवा विनाश करण्याची क्षमता मोठी असते. सगळ्या जगाला मोठ्या देशांमधल्या संघर्षाचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात भोगावे लागतात. या फेऱ्यात मोठ्या देशांच्या आजूबाजूचे छोटे देशही खेचले जातात. अनेकदा ही युद्धे छोट्या देशांच्या भूमीवर लढली जातात. त्यामुळे मोठ्या देशांमधील ताण-तणाव कमी करणे आणि युद्धे टाळणे यासाठी काय करावे लागेल हा चर्चेचा विषय असतो.

अणुयुगाच्या आधीच्या कालखंडात राष्ट्राराष्ट्रांतील तंटे सोडवण्याचे काय मार्ग होते? एक- वाटाघाटीने प्रश्न सोडवणे. दोन- एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या मागण्या मान्य करणे आणि संघर्ष टाळणे. (दुसऱ्या महायुद्धापूर्वी हिटलरला रोखण्यासाठी त्याला हवे ते देऊन टाकू आणि युद्ध टाळू असे ब्रिटन आणि फ्रान्सला वाटले होते.) तीन- युद्ध करणे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. या तिन्ही मार्गांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांनी वाद-विवाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

अणुयुगात या तीन मार्गांच्या बरोबरीने चौथा मार्ग उपलब्ध झाला- अण्वस्त्रे. ज्या अण्वस्त्रांमुळे अपरिमित विनाश होतो त्याच अण्वस्त्रांमुळे युद्धे टाळलीही जाऊ शकतात. अण्वस्त्रे ही युद्धात वापरायची शस्त्रे नसून ते शक्तीचे आणि सामर्थ्याचे एक प्रतीक आहे. अण्वस्त्रांची अफाट विध्वंसक क्षमता पाहता मोठ्या देशांमध्ये अणुयुद्ध झाले तर सगळ्या जगाचा विनाश होईल हे स्पष्ट आहे. जर युद्ध इतके विनाशकारी असेल तर ते कोणालाच नको असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत दोन प्रमुख प्रश्न उपस्थित होतात. पहिला- मोठ्या देशांमधील युद्धे रोखावी कशी? दुसरा- जर युद्ध झालेच तर ते अण्वस्त्रांच्या वापरापर्यंत जाणार नाही याची दक्षता कशी घ्यावी?

आकड्यांच्या भाषेत

हिरोशिमा नागासाकीमधील १९४५ अखेरपर्यंत बळीसंख्या – २ लाख ४६ हजार

दुसऱ्या महायुद्धातील एकूण मृत्यूमुखी – ८.५ कोटी

शीतयुद्धानंतर १९८९ ते २०२४ या कालावधीत आफ्रिकेतील युद्धबळी – २० लाख

तब्बल १९ वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धातील मृत्यूमुखींची संख्या

या युद्धबळींचे काय?

● गाझासंघर्ष…

अगदीच ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २१ महिन्यांमध्ये इस्रायलहमास युद्धात पॅलेस्टाईनमधील ६० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर जवळजवळ दीड लाख लोक जायबंदी झाले. इस्रायलमध्ये दोन हजार नागरिकांचा बळी गेला.

● सुदान यादवीयुद्ध…

इस्रायलहमासइतके आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या चर्चेत नसलेल्या सुदानमधील यादवी युद्धात २०२३ पासून आत्तापर्यंत ६१ हजारांहून अधिक बळी गेले. ही आकडेवारी दीड लाखाहून अधिक असण्याची भीती व्यक्त केली जाते.

● काँगोमधील संहार…

दुसऱ्या महायुद्धाइतकाच संहारक म्हणून मानला जाणारा हा संघर्ष. १९९८ ते २००३ या काळापर्यंत त्यात ५४ लाख लोकांचा बळी गेला. युद्ध त्यानंतरचे भूकबळी आणि युद्धगुन्हेगारी या सर्वांचा एकत्रित परिणाम माणसांच्या हलाखीत दिसला.

● रवांडामधील नरसंहार…

ऑक्टोबर १९९० ते जुलै १९९४ या चार वर्षांत आफ्रिकेतील रवांडा देशातील यादवी युद्धात पाच ते दहा लाखांहून अधिक नागरिकांना ठार मारण्यात आले. कित्येक हजार तुत्सी टोळ्यांमधील महिलांवर बलात्कार करण्यात आले.

इतिहास आणि दृष्टिकोन…

अणुयुगाची सुरुवात झाली तेव्हा जगात दोन महासत्ता होत्या- अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. या दोन महासत्तांमध्ये १९४५ ते १९९१ या काळात शीतयुद्ध सुरू होते. दोन्ही देश आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि इतरांचा प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. या दोन देशांमधील स्पर्धेचे रूपांतर युद्धात झाले नाही याचे श्रेय बऱ्याच प्रमाणात अण्वस्त्रांना जाते. शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देश अनेकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते. दोन्ही देशांमधील तणाव खूपच वाढलेला होता. तरीही युद्ध झाले नाही, कारण या देशांकडे अण्वस्त्रे होती. पृथ्वीचा विनाश अनेकदा करता येईल इतकी अण्वस्त्रे या देशांकडे होती. एका टप्प्यावर अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडे तीस हजारांहून अधिक अण्वस्त्रे होती. १९६२ साली अमेरिकेच्या शेजारी असलेल्या क्युबाच्या निमित्ताने या दोन्ही महासत्तांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र तिसरे महायुद्ध झाले नाही याचे श्रेय अण्वस्त्रांना देता येईल.

क्युबाच्या पेचप्रसंगानंतर दोन्ही महासत्तांनी अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी आणि एकमेकांप्रति असलेला विश्वास वाढवण्यासाठी (ज्याला इंग्रजीत confidence- building measures म्हणतात) प्रयत्न करायला सुरुवात केली. याच बरोबरीने अमेरिका आणि चीन यांच्यातही तणाव होता. मात्र कोरियाई युद्ध सोडले तर अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध झाले नाही. अण्वस्त्रांनी एकमेकांशी युद्धे करण्यापासून या देशांना परावृत्त केले. याला इंग्रजीत डेटरन्स (प्रतिबंध) असे म्हटले जाते. जोपर्यंत हा आत्मप्रतिबंध टिकून राहील तोपर्यंत आण्विक शस्त्रे असलेल्या देशांमध्ये युद्धे होणार नाहीत. तो टिकून राहावा यासाठी आण्विक शस्त्रे असलेल्या प्रत्येक देशाला प्रयत्न करावे लागतात. त्यामध्ये तंत्रवैज्ञानिक प्रगती, राजकीय इच्छाशक्ती आणि लष्करी क्षमता हे तिन्ही घटक विचारात घ्यावे लागतात.

अण्वस्त्रांचे संरक्षण असल्याने रशियाच्या तुलनेत लहान आणि लष्करी बळाच्या बाबतीत दुबळ्या पश्चिम युरोपीय देशांवर रशियाने हल्ला केला नाही. जपान आणि दक्षिण कोरियासारख्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर लष्करीदृष्ट्या बलाढ्य, कम्युनिस्ट चीनने हल्ले केले नाहीत. अमेरिकेने पश्चिम युरोप आणि आशिया खंडातील देशांना अण्वस्त्रांचे असे कवच देणे याला नुक्लिअर अम्ब्रेला ( nuclear umbrella) असे म्हणतात. आशिया खंडात आणि युरोपात रशिया आणि चीनने हल्ले करू नयेत यासाठी अमेरिकेला डेटरन्स आणि नुक्लिअर अम्ब्रेला या दोन्हीचा आधार द्यावा लागतो. सन १९४५ च्या आधी जर सत्ता संतुलन इतके एका बाजूला झुकलेले असले तर मोठे देश लहान देशांवर हल्ले करून त्या देशांचा घास घेत असत. मात्र अण्वस्त्रांच्या संरक्षणामुळे हे जुने वर्तन काही प्रमाणात बदलावे लागले.

शक्तिप्रदर्शनाची ओढ आणि आकर्षण…

अण्वस्त्रांची अफाट विध्वंसक क्षमता पाहता अनेक देशांना आपल्या संरक्षणासाठी अण्वस्त्रे असावीत असे वाटले. अण्वस्त्रे आहेत हे पाहून इतर देशांना आपल्याला दबावात ठेवण्याची किंवा आपल्यावर हल्ला करण्याची हिंमत होणार नाही ही त्यामागची भूमिका. त्यामुळे १९५० च्या दशकात अण्वस्त्रे मिळवण्यासाठी चढाओढ लागली. अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकल्यापासून पुढील वीस वर्षांत सोव्हिएत रशिया (१९४९) , ब्रिटन (१९५२), फ्रान्स (१९६०) आणि चीन (१९६४) या देशांनी अण्वस्त्रे मिळवली.

१९९० च्या नंतर भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या तीन देशांनी आण्विक शस्त्रे मिळवली. इस्रायलने नेमकी कधी अण्वस्त्रे मिळवली याविषयी साशंकता आहे. मात्र सध्या जगात या नऊ देशांकडे अण्वस्त्रे आहेत. इतर अनेक देश (उदा : दक्षिण कोरिया) अणुऊर्जेचा वापर करत असल्याने जर राजकीय इच्छाशक्ती आणि लष्करी गरज असेल तर एक ते दीड वर्षाच्या काळात आण्विक शस्त्रे मिळवू शकतात. गेल्या पंचवीस वर्षांत अमेरिकेने इराकवर हल्ला केला (२००३) आणि त्या देशाला ताब्यात घेतले, लिबियाचे शासन उलथवून टाकले (२०११) आणि रशियाने युक्रेनवर हल्ला (२०२२) केला.

या तिन्ही देशांकडे अण्वस्त्रे नव्हती. (युक्रेनकडे असलेली सोव्हिएत रशियाची अण्वस्त्रे त्या देशाने १९९४ साली रशियाला देऊन टाकली. त्या बदल्यात ब्रिटन, अमेरिका आणि रशियाने युक्रेनला संरक्षणाची हमी दिली.) मात्र तीच अमेरिका अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाचे काहीही वाकडे करू शकली नाही. ही उदाहरणे पाहून जगभरातील अनेक देशांसाठी स्व-संरक्षणासाठी अण्वस्त्रांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे आणि अण्वस्त्रांचे आकर्षण अधिक वाढले आहे.

गेल्या काही काळातील घटनाक्रम पाहिला तर तीन महत्त्वाच्या युद्धांमध्ये ‘आण्विक शस्त्रे’ हा घटक केंद्रस्थानी आहे. २०२२ च्या उत्तरार्धात रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या फौजांचे क्रिमियावरचे नियंत्रण सुटेल असे दिसत होते. तसेच युक्रेनला अनपेक्षित अभूतपूर्व लष्करी विजय मिळेल असे वाटत होते. तेव्हा रशियाने आण्विक शस्त्रांच्या वापरासंबंधी सूतोवाच केले. त्यामुळे आण्विक शस्त्रांना या युद्धापासून बाजूला ठेवावे अशा स्वरूपाचा दबाव रशियावर आला. इस्रायलने आणि अमेरिकेने याच वर्षी इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांवर हल्ले करून त्या देशाला आण्विक कार्यक्रम राबवताच येणार नाही असे प्रयत्न केले.

या हल्ल्यांमुळे इराणकडे आण्विक शस्त्रे असायला हवीत असे मानणाऱ्या गटांना अधिक बळ नक्कीच मिळाले. नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला अण्वस्त्रधारी इराण पाहायला मिळू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात चार दिवसांचे युद्ध झाले. यालाही आण्विक शस्त्रांची किनार होती. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-इराण या दोन्ही संघर्षात केवळ एकच देश अण्वस्त्रधारी होता. मात्र भारत-पाकिस्तान संघर्षात दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे या संघर्षाकडे जग वेगळ्या नजरेने पाहते, असे असू नये. खरे तर अमेरिका-रशिया ताणतणाव आणि भारत-पाकिस्तान तंटा यात तसे पहिले तर काहीही वेगळे नाही. मात्र अमेरिका-रशिया संघर्षात तिथले राज्यकर्ते तर्कशुद्ध वागतील आणि भारत-पाकिस्तानातील राज्यकर्ते मात्र तसे वागणार नाही हे गृहीतक साफ चुकीचे आहे. पण पाश्चात्त्य देशांतील अनेकांना ते पटत नाही.

पण हिंसेचे काय?

आण्विक शस्त्रांमुळे जगभरातील हिंसा कमी झाली नसून उलट जग अधिक धोकादायक झाले आहे असे अनेकांना वाटते. हे गृहीतक मुळातच सदोष आहे. आण्विक शस्त्रांचा उपयोग नेमका कशासाठी केला जाईल याविषयी अवास्तव आणि अतिरिक्त कल्पना असल्यानेच अशी गृहीतके मांडली जातात. कोणतेही युद्ध हा हिंसेचा एक प्रकार आहे. याशिवाय राजकीय हिंसा, कौटुंबिक हिंसा, लैंगिक हिंसा, वांशिक हिंसा, सामाजिक आणि आर्थिक हिंसा, सरकारने केलेली हिंसा, संरचनात्मक ( structural) हिंसा असे हिंसेचे विविध प्रकार आहेत.

हिंसा करण्यामागील कारणांचा आढावा घेऊन असे वर्गीकरण केले जाते. अशा विविध स्वरूपाच्या हिंसक घटनांमुळे अण्वस्त्रांनी मारली गेलीत त्यापेक्षा अधिक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. हिंसेचे हे प्रकार जगभरात प्रत्येक देशात आणि समाजात वेगवगेळ्या प्रकारे दिसून येतात. अशा विविध स्वरूपाच्या हिंसेला आण्विक शस्त्रांनी कधीही पायबंद बसणार नव्हताच. एकुणात हिंसा कमी करण्यासाठी राजकीय व्यवस्थेत सुधारणा करणे, सामाजिक प्रबोधन करणे, आर्थिक विषमता कमी करणे, शिक्षण आणि रोजगार यांच्या संधी उपलब्ध करून देणे, शोषण कमी करणे, इ. मार्ग अवलंबले जातात. त्यामुळे या स्वरूपाची हिंसा आण्विक शस्त्रांनी रोखली जाईल असे वाटणे हेच मुळात चुकीचे गृहीतक आहे. त्यामुळे हाच प्रश्न थोडा वेगळ्या रीतीने विचारता येईल : आण्विक शस्त्रे आल्यामुळे नेमकी कोणत्या स्वरूपाची हिंसा कमी झाली?

अण्वस्त्रांमुळे गेल्या ऐंशी वर्षांत महासत्ता आणि मोठ्या देशांमध्ये संघर्ष झाले नाहीत. असे संघर्ष झाले असते तर त्याचे परिणाम साऱ्या जगावर होतात. मोठ्या देशांचे हितसंबंध जगभर असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात युद्ध करणे म्हणजे त्या हितसंबंधांना धक्का लावणे. समजा जर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात युद्ध झाले असते तर त्याचे परिणाम संपूर्ण युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड, काही प्रमाणात आफ्रिका यांना भोगावे लागले असते.

आताही उद्या जर चीन आणि अमेरिकेत युद्ध झाले तर असेच होईल. या दोन्ही देशांची मित्रराष्ट्रे, व्यापारी आणि लष्करी भागीदार, इ.जगभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांना या युद्धाचा मोठा फटका बसेल. याउलट अझरबैजान-आर्मेनिया यांच्यात २०२० मध्ये युद्ध झाले. त्याचा फटका कुणाला बसला? (थायलंड-कंबोडिया सध्या सुरू संघर्ष आपल्या वृत्त-माध्यमांतही तुरळक दिसतो इतका लहान) छोट्या देशांतील युद्धे मर्यदित असतात आणि त्यामुळे त्यांचे परिणामही कमी देशांवर होतात. मोठ्या देशांचे असे नसते. त्यामुळे मोठ्या देशांतील युद्धे रोखणे हे जागतिक शांततेसाठी जास्त महत्त्वाचे आहे! अण्वस्त्रे आल्यामुळे अशा संघर्षाला पायबंद बसण्यास मदतच झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अण्वस्त्रधारी देशांना अधिक जबाबदारीने वागावे लागते. आपण काय बोलतो आहोत आणि त्याचा काय अर्थ लावला जाईल याविषयी दक्ष राहावे लागते. त्यामुळे अण्वस्त्रे आल्यामुळे मोठ्या देशांची युद्धखोरी काही प्रमाणात तरी कमी होते. अण्वस्त्रांची ही उपयुक्तता आपण मान्य करणार आहोत की नाही? जर जागतिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचा डोलारा मोठ्या देशांवर अवलंबून असेल तर त्यांच्यामध्ये शांतता राहणे हे सगळ्या जगासाठी हिताचे असते. त्यामुळेच पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, अण्वस्त्रे हे जागतिक शांततेचे सर्वात मोठे हत्यार आहे!

sankalp.gurjar@gmail.com

(लेखक पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’मध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अध्यापन करतात.)