अरतें ना परतें.. : दर्या बांधुनी नेला बाई, सूर्य बांधुनी नेला गं..

गोष्टींची आता मनाला सवय झाली आहे.

प्रवीण दशरथ बांदेकर
‘पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला न जुमानता अमुकतमुक प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची फलाण्या लोकप्रतिनिधींची घोषणा.. कोकणातल्या जनतेला सर्वार्थाने विकासाची संधी.. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य.. औद्योगिकीकरणाला गती मिळणार..’

या बातम्या वाचताना त्यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे हे कळत नव्हतं. या गोष्टींची आता मनाला सवय झाली आहे. विरोधी पक्षात असताना आपणच ज्या प्रकल्पांना विरोध केला होता, स्थानिक जनतेच्या शेती-बागायतीचं नुकसान होईल, पर्यावरणाला हानी पोचेल असे प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही, असं ठणकावून सांगून हक्काने मतं मागितली होती, त्याच प्रकल्पाचं आता सत्ताधारी पक्षात गेल्यावर सोयीस्करपणे सगळं विसरून आपणच स्वागत करतोय, यात जनाची नाही, पण मनाचीसुद्धा काही लाजबिज या बोलघेवडय़ा लोकप्रतिनिधीना कशी वाटत नसेल, हे विचारणंही निर्थक बनलं आहे. विकास, रोजगारनिर्मिती, आधुनिकीकरणाला गती अशा शब्दांची भुरळ घालत ही मंडळी सामान्य लोकांचा सरळसरळ पोपट करू लागली आहेत. ज्यांना हे कळतंय, जाणवतंय, ती बुद्धिजीवी मंडळीसुद्धा कोण जाणे, कसल्या दबावापोटी शहामृगासारखी वाळूत तोंड खुपसून मुकाट बसली आहेत! कदाचित आपल्या अस्वस्थतेचं हेही एक कारण असू शकतं.

पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून होऊ घातलेल्या या रासायनिक प्रकल्पासाठी किनारपट्टीवरच्या खारफुटीच्या जंगलांचे कित्येक किलोमीटर लांबीचे पट्टेच्या पट्टे कुठल्याशा खाजगी कंपनीला दिले गेले होते. समुद्राच्या ्रपाण्यासकट किनारपट्टीवरच्या सगळ्या खाजण जमिनीही विकायला काढल्याच्या या वार्ता वाचत असताना अचानक मालवणच्या ज्ञानेश देऊलकर गुरुजींची आठवण झाली. गुरुजी बॅ. नाथ पै सेवांगणचं काम बघत असत. समुद्री पर्यावरणाशी संबंधित विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखनही त्यांनी केलं होतं. हातावर पोट असलेल्या, दर्यावर राबणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते हयातभर झटले. या मच्छिमार लोकसंस्कृतीशी संबंधित काही गाण्यांचं संकलनही त्यांनी केलं होतं. त्यातल्याच एका लोकगीतातली स्त्री म्हणत होती..

‘दर्या बांधुनी नेला बाई, सूर्य उचलुनी नेला गं

दाटला गं काळोख, माझा मोडला संसार..’

त्या दिवशी दिवसभर मी हेच शब्द गुणगुणत होतो. डोळ्यांसमोर किनारपट्टीवरच्या त्या खारफुटीच्या पाणवनस्पतींनी व्यापलेल्या खाजण जमिनी तरळत होत्या. उद्या इथं या जमिनींवर भर घालून समुद्र मागे हटवला जाईल. पर्यावरणाला गंभीर हानी पोहोचवणारा प्रदूषणकारी प्रकल्प इथे उभा राहील. भौतिक विकासाच्या स्वप्नांत हरवून गेलेल्यांना खारफुटीच्या संहारामुळे पर्यावरण नष्ट झालं काय, किंवा समुद्र आणि त्यातल्या मत्स्यजीवांसोबत माथ्यावरचा सूर्यही उचलून नेला काय; कशामुळे काय फरक पडत होता? आयुष्यभराचं नुकसान फक्त सामान्य जीवांचं होणार होतं. गुरुजींच्या संग्रही सापडलेल्या त्या स्त्रीगीतातून नेमकी हीच भावना प्रकट झाली होती.

खाडीकाठच्या खाजणांमधून पसरलेली खारफुटी, तिवर, चिपी, वेलावन अशा असंख्य पाणवनस्पतींची जंगलं म्हणजे शेकडो वैशिष्टय़पूर्ण मत्स्यजीवांची जन्मस्थानं. हजारो वर्षांपासून खाडीतल्या भरतीचं पाणी आणि त्यासोबत आलेला गाळ साचून साचून किनाऱ्यावर कायमची दलदल बनलेली असते. साचून राहिलेल्या या पाण्यामुळे तिथली माती कुजून जाते. भयंकर उग्र वास येत असतो तिला. तेच हे खाजण. हजारो वर्षांची ही दलदल पचवणारे जीव-जीवाणू तिथं उत्क्रांत होत असतात. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा जन्म अशाच भागात एकपेशीय जीवांच्या निर्मितीतून झाला असल्याचं म्हटलं जातं. कारखान्यांतून बाहेर फेकली जाणारी विषारी रसायने, केरकचरा, सांडपाणी हे सगळं मानवनिर्मित हलाहल पचवण्याची अद्भुत क्षमता या खाजणांतल्या पाणवनस्पतींमध्ये आणि तिथल्या जलचरांमध्ये असते. पण कोकणच नव्हे, तर गुजरात, केरळ, तामिळनाडू अशा सगळीकडेच औद्योगिक विकासाच्या नावाखाली या खाजण जमिनी भराव घालून बुजवल्या जाऊ लागल्या आहेत. साहजिकच नैसर्गिकरीत्या पर्यावरणाचं संतुलन राखणारी ही जंगलं मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. त्याचे दुष्परिणामही अलीकडे जाणवू लागले आहेत. इथून पुढे ते अधिकाधिक ठळक होत जातील. तेव्हा कदाचित परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असू शकते.

काही वर्षांपूर्वी आमच्या किनारपट्टीवरचा हा रासायनिक प्रकल्प मंजूर झाल्याची घोषणा झाली होती. आमच्या एका पर्यावरणप्रेमी ग्रूपची मुलं तेव्हा या प्रकल्पाचं श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करायला गेली होती. प्रकल्प जिथं उभारायचा होता तिथली खाडी बुजवायचं काम वेगाने सुरू झालं होतं. खाडी बुजवायची म्हणजे तिथल्या दलदलीच्या खाजण जमिनी त्यातल्या पाणवनस्पती आणि समुद्री जीवांसह नष्ट करून टाकायच्या. ते पाहून अस्वस्थ झालेल्या मुलांनी विचारलं, ‘अशाने एका अर्थी सागरी जीवांच्या उत्पत्ती केंद्रांचाच विनाश होऊ घातलाय त्याचं काय? आवश्यक ती नैसर्गिक परिस्थिती नाही लाभली तर अनेक मत्स्यप्रजाती नष्ट होऊ शकतात. मत्स्यनिर्मितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यावर चरितार्थ असलेल्या असंख्य मच्छिमार लोकांना त्याची झळ बसू शकते. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? शिवाय सागरी प्रदूषण वाढेल ते पुन्हा वेगळंच.’

यावर खांदे उडवीत बेफिकीरपणे ते म्हणाले होते, ‘तुमाला म्हायती हाये ना, हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आह्ये. दिल्लीत तुमच्यापेक्षा भारी अभ्यासू तज्ज्ञ मंडळी बसली हायेत. त्येंच्यानी या प्रकल्पामुळे पर्यावरणाची काय्येक हानी होणार नाय म्हणून सांगितलेलं ओ. आणि व्हय्त्या निरुपयोगी खाजनाच्या जमिनींपेक्षा दुसरी जास्त चांगली जमीन या प्रकल्पासाठी मिळूच शकणार ना्. या ओसाड जमिनीत आता आमाला आणखीन काय काय उद्योगधंदे आणायचे ओत. तरुण लोकांच्या हाताला काम द्यायाचं तर उद्योगनिर्मिती करावीच लागेल. नव्या वसाहती उब्या कराव्या लागतील. तारांकित हॉटेल्स बांदावी लागतील. तुमच्यासारखे सगळेच त्या फालतू जलचर संपत्तीची नि पर्यावरणाची चिंता करत बसले तर कोकणी माणसांची प्रगती कशी व्हईल वो? तुमच्यासारख्या तरुणांच्या भविष्याचा विचार करूनच हे प्रकल्प आमी आणले आहेत. त्यासाठीच ह्य खाजन जमिनी ताब्यात घेतल्यात. नाय तरी आजपर्येत इतकी वर्षे या जमिनी वाया जात पडूनच होत्या ना? आधीच कोकणातल्या समुद्रामुळे आपली किती जमीन फुकट गेली आ, बगताय ना तुमी? आता कम से कम या दलदलीच्या जमिनी तरी उपयोगात आणू या ना! भविष्यात फुडेमागे मग याच पद्धतीनं समुद्रसुद्दा एकदम मागे हटवून तेवढी जमीन वापरायचं पन बगता येईल. विकास करायला हवा तर सगळ्या शक्यता अजमावून बगायला पायजेत. आणि तुमाला तर म्हायतीच हाये, कोकणी मान्सानं एकदा ठरवलं तर त्याला अशक्य काहीच नसतं. निदान माज्यासारक्याला तर कुनीच अडवू शकत नाय.’

त्यांचं हे आक्रमक बोलणं ऐकताना मुलं चांगलीच गोंधळून गेली होती. तरीही धीर करून त्यांनी म्हटलं, ‘विकास हवा म्हणून आपण खाडय़ा बुजवल्या. खारं पाणी पचवायची क्षमता असलेली खारफुटी आणि तिवरांची आदिम जंगलं नामशेष केली. याच खाजण जंगलांत समुद्रातल्या जलचरांचं प्रजनन, भरणपोषण होतं, अन्नसाखळी तयार होते. विषारी केमिकल्स, शहरांचं सोडलेलं मलमूत्र, सांडपाणी सगळं या दलदलीतले जीव पचवतात. ही असाधारण क्षमता कमवायला त्यांना लाखो वर्षे लागली असतील. त्यांच्या याच क्षमतेमुळे सागरी प्रदूषण रोखायला किती मदत होत असते. आणि आपण एका फटक्यात हे लाखो वर्षांपासूनचे जीव नष्ट करून टाकतोय.’

कींव केल्यासारखे ते म्हणाले, ‘कसले रे फालतू जीवजंतू घेव्न बसलाय! अरे, अशा युजलेस गोष्टींचं भावनिक कवतिक करीत रालो तर दुनयेच्या मागेच ऱ्हावू आपण. तिकडे अमेझॉनच्या खोऱ्यात बगा.. अशी हजार व्हरायटीची जीवसृष्टी असेल. पण असले नसते लाड नाय करत कोण तिकडे पर्यावरनाचे. पैला मानसांच्या सुखाचा विच्यार. तुमचं ते पर्यावरनबिरन बाद में..’

या अडाणी आणि असंवेदनशील बोलण्यावर काय उत्तर होतं कुणाकडे? मध्यंतरी जनतेच्या रेटय़ामुळे काही काळ रेंगाळलेल्या त्या प्रकल्पाला आता पुन्हा नव्याने गती मिळणार होती. म्हणजे आताही पुन्हा तसंच सगळं सुरू होणार होतं. सगळी नैसर्गिक जैवसंपदा बेफिकीरपणे चिरडून टाकून निव्वळ भौतिक विकास केला म्हणजे सगळं काही मिळवलं असं समजण्याच्या या आंधळ्या दिवसांत पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळू लागलाय हे ध्यानात घ्यायला कुणाकडेच वेळ नाहीये. बघता बघता आपल्या जीवावर बेतू शकतंय हे. वेळ नाही लागायचा नष्ट होऊन जायला. तसे इशारे मिळायलाही सुरुवात झाली आहे. तरीही आपले डोळे का उघडत नाहीयेत? एकीकडे अन्नसाखळी तुटत चालल्याने मत्स्यदुष्काळाचं संकट भेडसावू लागलंय. माशांची समुद्रातली निर्मितीच घटत चाललीय. शिवाय माशांच्या प्रजननकाळात पावसाळ्यातही सगळ्या नियम आणि नैतिकतेची पायमल्ली करून समुद्राचा तळ खोलवर ढवळून काढणारी आधुनिक जाळी आणि यांत्रिक बोटी घेऊन आम्ही मासेमारी करतोय- म्हणताना दुसरं काय होणार? होडकी घेऊन किनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे गरीब मच्छिमार बिचारे मात्र त्याचवेळी खवळलेला दर्या शांत व्हायची वाट बघत घरात बसलेले असतात. पावसाळी दिवसांत दर्यात जायचं नाही, नारळी पुनवेला समुद्राला नारळ अर्पण करेपर्यंत मासेमारी करायची नाही, एक वेळ उपासमारीची पाळी आली तरी चालेल, असं म्हणत आपली पिढीजात नीतिमत्ता जपत बसतात. दुसरीकडे भूमी आणि सागर यांच्यामधला दुवा असलेलं हे क्षेत्र- खारफुटींनी व्यापलेल्या या खाजण जमिनीच आपण नष्ट करू लागलोय. या खाजण जमिनींनीच तर आपली निचरा व्यवस्था सांभाळली आहे. सगळी घाण पोटात रिचवून हजारो प्रकारचे जीवाणू, जलचर, कीटक, अळ्या, सरपटणारे जीव, पाणसाप, सुसरी, पक्षी, वनस्पती, बारीकसारीक मासे, खेकडे, शिंपल्या, चिंबोऱ्या, कोळंबी, शिवड, कालवं.. किती काय काय जपलं आहे या दलदलीनं. पण हेच नष्ट झालं तर पुढची सगळी अन्नसाखळीही तुटत जाईल आणि बघता बघता सगळंच संपत जाईल.

खरं तर एक प्रकारची जैविक गाळणीच असते ही दलदल म्हणजे. माणसानं टाकलेलं सगळं हलाहल पोटात घेऊन प्राणवायू देणारं हे एक प्रकारचं बहुउद्देशीय नैसर्गिक प्रक्रिया केंद्रच असतं. पण पर्यावरणाचं शुद्धिकरण करणारं हे निसर्गाचं इंद्रियच आपण आपल्या स्वार्थासाठी खुडून टाकायला निघालो आहोत. शासकीय दप्तरांतून या जागा ‘निरुपयोगी’ म्हणून त्यांच्यावर शेरे मारले जातायत. इतक्या जमिनी कसल्याही उपयोगाविना वाया जातायत म्हणून कवडीमोलाने त्या खाजगी कंपन्यांना दिल्या जातायत. बांधकामांसाठी, कारखान्यांसाठी, प्रदूषणात भर घालणाऱ्या एखाद्या रासायनिक वा औष्णिक प्रकल्पासाठी त्यांचा ‘उपयोग’ करणे म्हणजे विकास असा गैरसमज सोयीस्करपणे पसरवला जातोय. समुद्राकाठच्या अशा कितीतरी जमिनी पर्यावरणविषयक सगळे कायदे, नीतिनियम गुंडाळून ठेवून, किनारपट्टीवरच्या गोरगरीब मच्छिमारांना देशोधडीला लावून खाजगी कंपन्यांच्या घशात घातल्या जाऊ लागल्या आहेत. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे उद्या मत्स्यदुष्काळाने गांजलेल्या मच्छिमारांनीही जाळ्यात स्वत:ला गुंडाळून घेत दर्याचा तळ जवळ केला तर आश्चर्य वाटायला नको.

विकास हवा, भौतिक सुखं हवीत म्हणून काय न करायचं आम्ही शिल्लक ठेवलं आहे? आम्ही नद्या आटवल्या. समुद्र हटवले. जंगलं कापून काढली. डोंगर सपाट केले. हवा-पाणी-सूर्यप्रकाश-माती-झाडंवेली-पशुपक्षी सगळ्याचीच खा खा सुटलीय आम्हाला. सगळ्या पंचमहाभुतांना गाडून विकासाचे इमले उभारू पाहणारी माणसांची ही जात कुठे घेऊन जाणाराय आमच्या किडय़ामुंग्यांसारख्या मुक्या, दुबळ्या जीवांना? निसर्गातल्या या किडय़ामुंग्यांसकट सगळं नष्ट केल्यावर भविष्यातल्या आमच्याच पिढय़ांसाठी काय शिल्लक ठेवणार आहोत आम्ही? हे दु:स्वप्न आपल्या मौखिक परंपरेतल्या त्या कुणा अज्ञात स्त्रियांनी कित्येक पिढय़ांपूर्वीच पाहिलं असावं काय? म्हणूनच त्या म्हणत असतील काय-

‘दर्या बांधुनी नेला बाई, सूर्य बांधूनी नेला गं

दर्या बांधुनी नेला सात डोंगरांच्या पार गं

वैरी कली मातला, माझा मोडला संसार

सूर्य उचलुनी नेला सात डोंगरांच्या पार गं

डोळां काळोख दाटला माझा मोडला संसार..’

दलदलीतल्या ज्या एकपेशीय जीवांपासून आपली निर्मिती झाली, त्या जीवांची जन्मभूमी नष्ट करताना आम्ही आमची मृत्यूभूमीच तयार करतो आहोत, हे सत्य कधी तरी आम्हाला उमजेल काय?

samwadpravin@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article by praveen dashrath bandekar arten na parten environmentalists ssh