हिमानी निलेश
अॅडलेड मधील ‘ऑझ एशिया फेस्टिव्हल’चा अविभाज्य भाग असलेला चंद-दिव्यांचा उत्सव अगदी दिवाळीच्या अलीकडेच असतो. टोरान्स नदीच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर शेकडो लाल-केशरी आकाशकंदिलांच्या माळाच्या माळा लावून अनेक मंडप उभे केले जातात..
‘उजळ उजळल्या राजमंदिरी चंद्र दिव्यांची माला गं
आज केवडा केशरीयाच्या फुलात झिंगून गेला गं..’
कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये ना. धों. महानोर, आनंद मोडक, जब्बार पटेल, पु. ल. देशपांडे अशी दिग्गज मंडळी बसली आहेत. महानोर त्यांच्या खास पद्धतीनं स्वरचित गीत मोडकांना गुणगुणून दाखवतायत. मी चिमुरडी लुकलुकत्या डोळ्यांनी कॅमेरा ट्रॉलीवर बसून हे सगळं बघतेय. आज जवळपास २५ वर्षांनी या गाण्याची सय येते. आज माझ्या बाजूला शेकडो केशर दिवे उजळून निघाले आहेत. मला त्या वातावरणाची झिंग चढू लागलीय. ज्या अॅडलेड शहराला जगातील शेकडो देशांच्या मधून ‘मोस्ट लिव्हेबल सिटी इन द वर्ल्ड’ यादीत दहाव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त झालेय तिथे साजरा होतोय ‘मून लँटर्न फेस्टिवल’!
ऑझ एशिया फेस्टिव्हलचा अविभाज्य भाग असलेला हा चंद्र दिव्यांचा उत्सव अगदी दिवाळीच्या अलीकडेच असतो. टोरान्स नदीच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर शेकडो लाल केशरी आकाशकंदिलांच्या माळाच्या माळा लावून अनेक मंडप उभे केले जातात.
चीन देशात वर्तुळ म्हणजे पूर्णत्व मानले जाते. सुगीचे दिवस म्हणून शरद ऋतूमध्ये कुटुंब एकत्र जमून वर्तुळाकार चंद्राची पूजा करतात. यालाच ‘मिड ऑटम फेस्टिव्हल’ असेही म्हणतात. त्याच धर्तीवर मून लँटर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो. नदीकाठावरच आकाशदिव्यांच्या तोरणांच्या प्रकाशात चार रंगमंच उभारलेले असतात. इथे विविध वेळी विविध कार्यक्रम सादर केले जातात. दुपारपासूनच हे कार्यक्रम बघण्यासाठी माणसं जत्थ्या-जथ्याने जमू लागतात. कुठे भरतनाटय़म सुरू असते तर कुठे चायनीज लायन डान्स सुरू असतो. कुठे ‘निचिबू’ (जापनीज नृत्य) तर कुठे ऑस्ट्रेलियातले अबोरिजिनल (आदिवासी) नृत्यासारखे अनोखे पारंपरिक प्रकारही अगदी जवळून पाहायला मिळतात. हे मफिलीचं वातावरण आपल्याला थेट ‘दिवाळी पहाट’ संकल्पनेची आठवण करून देतं. मुख्यत्वेकरून आशियाई देशातील गायन-वादन आणि नृत्याचा आस्वाद रसिकांना घेता येतो. याला कारणही तसंच आहे. ऑझ एशिया फेस्टिव्हलची संकल्पनाच मुळी इतर आशियाई देशांचा आणि ऑस्ट्रेलिया देशाचा सांस्कृतिक मिलाफ आणि संवर्धन यावर बेतलेली आहे. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
तर या सर्व कार्यक्रमांबरोबरच इथे अनेक प्रकारचे छोटेमोठे स्टॉल्स असतात. चंद्र दिव्याचा उत्सव असल्यानं अर्थातच आकाशकंदील बनविण्याचे काही स्टॉल्स असतात. त्यावर लहान मुलं नि पालक मिळून पारदर्शक कागद, तारांचे कंदील बनविण्यासाठी बेतलेले सांगाडे, दोऱ्या, रंग, चमकी असं काय काय वापरून आकर्षक कंदील तयार करतात. काही वेळातच अंधार पडणार असतो. मग ते तयार केलेले आकाशदिवे आणि त्यातून झिरपणारा इंद्रधनूचा प्रकाश पाहून मुलं हरखून जाणार म्हणून पालकांनाही कोण आनंद झालेला असतो. पुढे ओरिगामीच्या स्टॉलवर छोटे छोटे पणत्यावजा दिवे आकार घेत असतात. इवले इवले चिमुकले हात बघता बघता नक्षीदार कागदांचे रंगीबेरंगी दिवे तयार करतात. चायनीज होरोस्कोप, चायनीज चित्र, अक्षरलिपी, अबोरिजनल कुराना लोकांचे कोरीव काम अशी प्रात्यक्षिकेही अनेक स्टॉल्सवर सुरू असतात.
कार्यक्रम पाहून आणि विविध स्टॉल्सना भेटी देऊन झाल्यावर जवळच उभ्या असलेल्या फूड ट्रक्सकडे पाय वळतात. इथे व्हिएतनामीज बाओज, जपानी डम्पिलग्स, श्रीलंकन कोत्थु रोटी, भारतीय पंजाबी थाळी आणि हर तऱ्हेच्या आशियाई पदार्थाची रेलचेल असते. मंडळी आपापली जागा धरून आपापल्या सतरंज्यांवर दुलया, ओव्हरकोट, कानटोप्या घालून गुरफटून बसतात. रात्रीप्रमाणे थंडी चांगलीच चढू लागलेली असते. एकीकडे नदीवरून येणारं गार झोंबरं वारं आणि दुसरीकडून हात गाडय़ावरून येणारा तळण्याचा खमंग वास यामुळे आपोआपच फूड ट्रक्स पुढे रांगा लागतात. खरी मजा तर पुढेच असते, त्यामुळे सर्व जण आपल्याला हवे ते पदार्थ आधी धरलेल्या जागांवर जाऊन खातात आणि मून लॅन्टर्न परेडसाठी सरसावून बसतात.
आता ढोलाचा शिस्तबद्ध आवाज येऊ लागतो. मुलांनी खादाडीपुर्वी तयार केलेले आकाशकंदील लावले जातात, नदीमध्ये इतका वेळ अंधारात लपून राहिलेले दिवे लागतात. ही सर्व तयारी असते ‘त्या’च्या आगमनाची. तो अनेक फूट उंच आणि बऱ्यापैकी लांबुळका असतो. धगधगत्या केशरी लाल रंगाचा-ड्रॅगनचा आकाशदिवा मिरवत मिरवत निघतो. त्याला वाहून न्यायला अनेक स्वयंसेवक असतात. ढोलाच्या तालावर तो दमदारपणे येत राहतो. मग अनेक बनावटींचे मोठाले आकाशदिवे येत राहतात. चीनचा राष्ट्रीय प्राणी पांडा, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, तसेच खवलेदार प्रकाशमान रंगीत मासे, पंचरंगी हलते व उडण्याचा भास निर्माण करणारे लॉर्किट पक्षी, हत्ती, इतकाच काय, भारतीय पोशाखातील स्त्री व पुरुषांचे दिवे मानवंदना स्वीकारत येत राहतात. या आणि अशा अनेक पारदर्शी प्रकाशमान आकृत्या डोळ्यापुढून सरकत राहतात. ही मिरवणूक ठरल्या वेळी सुरू होते. शाळा व विद्यापीठासांरख्या बहुतांश संस्थांनी हे दिवे तयार केलेले असतात. त्या मोठय़ा आकाशदिव्यांमागे मग त्या त्या शाळेतली मुलं छोटे कंदील घेऊन विजयी मुद्रेने मिरवणुकीतून चालत असतात. अर्थात हे दिवे उंच नि रुंद असल्यानं ते तुम्हाला लांबून, बसूनदेखील सहज दिसू शकतात.
चहुबाजूंनी लुकलुकणारे केशरी पिवळे दिवे, नदीच्या पुलावर केलेलं फिरतं लायटिंग आणि त्यांच्यामधून जाणारी ही दिव्यांची मिरवणूक सगळा आसमंत उजळून टाकते. नदीमधल्या दिव्याचा वाहता झळझळीत सोनेरी प्रकाश, जरतारी पदरावरच्या मोठय़ा सोनेरी बुट्टय़ांची आठवण करून देतो. हे महावस्त्र ल्यायलेल्या सरितेला वेलबुट्टीची किनार असते ती मिरवणुकीतल्या आकाशदिव्यांची. आकाशदिव्याच्या दागिन्यांनी मढलेली ही सरितारूपी लक्ष्मी ओटीत दान देते प्रकाशाचं, तेजाचं, उत्सवाचं, नि आनंदाचं! त्या तेजानं आपण दिपून जातो न् जातो तोच आकाशात विविध रंगांची रोषणाई सुरू होते आणि आतषबाजीने परिसर उजळून निघतो. पारंपरिक ढोलाचा स्वर आता टिपेला पोहोचलेला असतो. पृथ्वीवरच्या सरितेचं ते मोहक रूप पाहायलाच जणू आकाशगंगेत गंधर्व लोटले असावेत असा प्रकाश चांदण्यांचा तो अविरत वर्षांव बघून डोळ्याचं पारणं फिटतं. ढोलाचा आवाज कमी होऊन सुषिर वाद्यांचे मधुर आवाज कानी येऊ लागतात आणि फिरून फिरून त्याच ओळी कानात वाजत राहतात.
himanikorde123@gmail.com