प्रशांत कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी व्यंगचित्रकलेला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. लचके, सरवटे, फडणीस, ठाकरे यांच्या नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे व्यंगचित्रकार म्हणजे मंगेश तेंडुलकर! राजकीय तसेच सामाजिक व्यंगचित्रांमध्ये त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आपल्या आयुष्यभरातल्या अनुभवांचा, आठवणींचा ऐवज म्हणजे त्यांचे आत्मचरित्र- ‘रंगरेषा व्यंगरेषा’!

ओघवत्या शैलीत लिहिलेले हे आत्मवृत्त निश्चितच वाचनीय आणि तितकेच चटका लावणारेही आहे. याचे कारण म्हणजे ते मंगेश तेंडुलकरांच्या निधनानंतर प्रकाशित झालेले आहे.

तेंडुलकरांच्या या आत्मचरित्राचे आशयाच्या दृष्टीने प्रामुख्याने तीन भाग आहेत. एकात त्यांचे बालपण, शिक्षण आणि तरुणपणाची खडतर वाटचाल याचे वर्णन आहे. दुसऱ्या भागात व्यंगचित्रकला आणि तिसऱ्यात त्यांचे नाटय़विषयक अनुभव आहेत. पैकी व्यंगचित्रे आणि नाटक यांच्याबाबतीतले त्यांचे विवेचन आणि अनुभवांतून मिळालेली जाणीव हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. परंतु त्यातही त्यांचा बालपणीचा काळ हा अत्यंत प्रभावी लेखनाचा नमुना असून, असे वाटते की खुद्द तेंडुलकर वाचकाचे बोट धरून त्याला त्यांच्या बालपणीच्या कालखंडातून फिरवून आणत आहेत! याबरोबरीनेच त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची रेखाटलेली शब्दचित्रेही अतिशय हृद्य आहेत. आपल्या विख्यात भावंडांबरोबरचे संबंधही त्यांनी मोठय़ा जिव्हाळ्याने- त्यातल्या ताण्याबाण्यांसह रेखाटले आहेत. तेंडुलकरांची हुकमत ब्रशसोबत लेखणीवरही होती, हे ते सिद्ध करतात. त्यांच्या जीवनात आलेले अनेक कटु प्रसंग, झालेले अपमान यामुळे मनावर चरे पडून गेल्याने त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झाल्याचे ते कबूल करतात.

व्यंगचित्रे आणि नाटक या दोन्हीत त्यांनी केलेले ‘प्रयोग’, व्यंगचित्रांची प्रदर्शने, नाटय़समीक्षा यांबाबतची त्यांची मते मननीय आहेत. याशिवाय सरकारी नोकरीतले अनुभव आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुरुस्ती या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनोख्या बाबीही वाचकांना आश्चर्यचकित करतील.

ज्योतिषी आणि डॉक्टर यांनी लहानपणीच त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी करूनदेखील ते बचावले. आणि पुढे सत्तर-पंच्याहत्तर वर्षे जगले! नुसतेच जगले नाहीत, तर कलाक्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवत, परिस्थितीशी झुंज देत खंबीरपणे जगले. हे सारे वाचताना मती गुंग होते.

तेंडुलकरांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे आणि तेंडुलकरांची निवडक व्यंगचित्रे यामुळे पुस्तकाची मांडणी आशयाशी सुसंगत झाली आहे.

चित्रकार रविमुकुल कृत कृष्णधवल मुखपृष्ठ उत्तम व वेधक आहे. तेंडुलकर पुस्तकातून तुमच्याकडे पाहत तुमच्या प्रतिक्रियेचीच वाट पाहत आहेत, असा यथार्थ भाव त्यातून व्यक्त होतो. स्वाती प्रभुमिराशी यांनी शब्दांकित केलेले हे आत्मवृत्त झकास जमले आहे. विशेषत: तेंडुलकरांच्या अक्षरश: शेवटच्या दिवसांतले मनोगत! हे लेखन शब्दांकन वाटत नाही, हीच याची पावती आहे.

‘रंगरेषा व्यंगरेषा’- मंगेश तेंडुलकर,

शब्दांकन- स्वाती प्रभुमिराशी,

अनुबंध प्रकाशन, पुणे,

पृष्ठे – २८८, मूल्य – ४०० रुपये

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on rangresha vyangresha by mangesh tendulkar
First published on: 17-02-2019 at 00:24 IST