अतुल पंडित सुलाखे
भारतीयांच्या मनातील ‘श्रीरामा’चे स्वरूप नेमके कसे आहे हे ‘विश्वाचा विश्राम’ यापेक्षा चपखल शब्दांत सांगणे कठीण. विनोबांनी या विशेषणांचा विस्तार आणखी व्यापक केल्याचे आढळते. ‘‘तुम्ही रामनाम घेता तो राम दशरथाचा राम आहे का?’’ या प्रश्नावर ‘‘माझा राम विश्वनंदन आहे आणि मागाहून दशरथनंदन आहे.’’ असे ते सांगतात.
रामाचे हे रूप सनातन आहे. राम – कृष्ण – हरि या मंत्रातील प्रत्येक अक्षर सकारात्मक आणि कल्याणकारी आहे. राम म्हणजे रमवितो तो. कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा आणि हरि म्हणजे राम आणि कृष्णाच्या पलीकडील सर्व विश्व. भूलोकातील आनंद देणारी सुंदर गोष्ट म्हणजे राम. या आनंददायी रामाचा प्रवास म्हणजे रामायण. रामाची ही विशेषता त्याच्यापुरती सीमित नाही आणि राम तिचा आरंभही नाही. लौकिक आणि अलौकिक उद्धाराचा मार्ग रामाच्या कुलाने सुरू केला आणि रामप्रभूंनी तो प्रशस्त केला. राजा दिलीपाच्या निमित्ताने महाकवी कालिदासाने आदर्श राजाचे जे चित्र रेखाटले आहे त्यात संपूर्ण ईक्ष्वाकू वंशाची महती येते.
प्रजानां विनयाधानात्
रक्षणाद्भरणादपि ।
स पिता पितरस्तासां
केवलं जन्महेतव: रघुवंश
‘जनतेचे पालन करणारा, पोषण करणारा, रक्षण करणारा, तिला सन्मार्गावर नेणारा तो खरा राजा. त्याचे स्थान पित्यापेक्षाही उंच. जन्म देणे हे पित्याचे काम, पण राजा प्रजेला चरित्रशील बनवतो म्हणून तो यथार्थ पिता अशी ही आदर्श राजाची कल्पना आहे. राजा दिलीप आणि गोमाता नंदिनी यांचे नाते असेच रमणीय आहे. नंदिनीची सेवा करणाऱ्या दिलीप राजाचा वारसा रामाने जपला आणि मोठा केला. रामाची ही कृती रामायणाचा अलौकिक विशेष आहे. रामायणात नर आणि वानरांचे नाते नसते तर रामायण वाचुनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण-
श्रीरामासम मिळता नायक
वानरसुद्धा मारिति रावण
हे विंदा करंदीकर यांचे शब्द या महाकाव्याची आणि महानायकाची महती सांगण्यासाठी पुरेसे आहेत. रामकथेच्या अनुषंगाने संक्षेप रामायण या नावाने राजधर्माचे विवेचन येते. हे नीतिविवेचन नारदमुनी करतात. त्यांनी आदर्श राजाचे सोळा गुण वर्णिले आहेत. नीतिमान, पराक्रमी, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवचनी, आत्मवचनी, चारित्र्यसंपन्न, सर्वभूत हितैषी, विद्वान, सामथ्र्यशील, प्रियदर्शी, आत्मवंत, जितक्रोध, अनसूयक आदी गुणांचा यात समावेश आहे. राजा दशरथाने आपल्या पुत्रांना हाच राजधर्म शिकवला.
आणखी वाचा-उस्ताद, तिहाई बडी जल्दी ले ली..
कुलाप्रमाणेच गुरूंच्या मार्गदर्शनातून रामाची घडण झाली. वाल्मीकी, विश्वामित्र, वसिष्ठ या ऋषींच्या अनुषंगाने रामायणामधे लोकहितैषी ऋषी परंपरेचे उत्कट दर्शन होते. ही परंपरा, व्यवहारानुसार नीतीला मुरड घालण्याऐवजी, व्यवहाराला नैतिक मुशीत घालते. राम कोदंडधारी आहेच, पण त्याहूनही जास्त तो कल्याणकारी आणि जनहिताचा मार्ग दाखवणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे ही नीती अभ्युदयाच्या आड येत नाही. नैतिकतेशिवाय साधला जाणारा विकास केव्हाही ‘प्रतिष्ठा पावत’ नाही हे सनातन सत्य वाल्मीकी रामाच्या माध्यमातून जगासमोर ठेवतात. रामाच्या जीवनचरित्राला आकार देणारे आणखी एक श्रेष्ठ व्यक्तित्व म्हणजे ब्रह्मर्षी वसिष्ठ. राम ईक्ष्वाकू वंशाचा प्रतिनिधी तसे वसिष्ठ कुलाचे प्रतिनिधी. ते रघुकुलाचे मार्गदर्शक. वैदिक कालातच त्यांचा वंश प्रतिष्ठित होता. सप्तर्षीमधील त्यांचे स्थान आजही अनुभवता येते.
रामाच्या जन्मापूर्वीपासून वसिष्ठ राजपुरोहित होते. दशरथाला पुत्रकामेष्टि यज्ञाचा मार्ग दाखवण्याचे काम वसिष्ठांनीच केले. अभ्युदय आणि नि:श्रेयस या दोन्ही मार्गावर श्रीरामांना वसिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले. या मोक्ष मार्गदर्शनाचा उपदेश योगवासिष्ठ म्हणून विख्यात आहे. त्यालाच महारामायणही म्हटले जाते. योगवासिष्ठाची रचना वाल्मीकींनी केली आहे असेही मानले जाते. त्यात तथ्य आहे असे मानले तर लौकिक आणि पारलौकिक कल्याणाचा मार्ग दाखवणे हा रामायणाचा प्रमुख उद्देश आहे. पुढे दीर्घकाळ आणि नीतिमार्गाने राज्य चालवल्यानंतर रामाच्या मनात वैराग्यभावना प्रबळ होते. तिचा आदर करून वसिष्ठ त्याला वैराग्याचे मार्गदर्शन करतात. योगवासिष्ठाची रचना करून वसिष्ठ ऋषींनी रामाला नि:श्रेयसाची म्हणजे मोक्षमार्गाची वाट दाखवली. वसिष्ठांची ही शिकवण ‘मोक्षरामायण’ म्हणूनही ख्यात आहे.
भारतीय धर्मकल्पनेमधे अभ्युदय आणि नि:श्रेयस या दोन्ही कल्पनांना अत्यंत मोठे स्थान आहे. या काही परस्पर भिन्न गोष्टी नाहीत. धर्म आणि नीतीचा अवलंब करून लौकिक यशाचा मार्ग चोखाळायचा अशी ही धारणा आहे. अशा व्यक्तीवर राज्याची जबाबदारी असेल तर तिचा हा प्रवास अधिक खडतर असतो. रामाच्या काळात, ‘राजा कालस्य कारणं’ अशी समाजातील धुरीणांची धारणा होती. राम या कसोटीवर पुरेपूर उतरला.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: काळाची बखर
रामाच्या राज्याभिषेकापर्यंतचा कथाभाग म्हणजे अभ्युदय आणि वसिष्ठांचा उपदेश म्हणजे नि:श्रेयस. हा उपदेश योगवासिष्ठ म्हणून विख्यात आहे. मोक्षमार्गाची वाटचाल ज्याची त्याला करावी लागते. तो मार्ग सर्वासाठी ‘क्षुरस्य धारा’ असतो. रामाने हा रस्ता कसा चोखाळला, त्याच्यासाठी ही वाट कशी किती खडतर होती हे कदाचित सांगता येणार नाही. तथापि वसिष्ठ, विश्वामित्र, वाल्मीकी यांना आपण नारायणाला मार्गदर्शन करतो याचे भान होते. संयम आणि विवेक यांचे उल्लंघन होणार नाही याची गुरू आणि शिष्य या उभयतांनी काळजी घेतली.
प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ होय आणि शास्त्रानुकूल पुरुषार्थामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. ज्ञान, वैराग्य व अभ्यास यांनी आत्मपद प्राप्त होते. आत्मपद प्राप्त झालेला साधक सुख-दु:खामुळे प्रभावित होत नाही. सर्व जगत् त्याला ‘आत्मा’ या रूपात दिसते. हा उपदेश पुढे अहंकार, तृष्णा, वासना यांच्या त्यागाचा मार्ग दाखवतो. आणि या मार्गाने जीवन्मुक्तीचा मार्ग प्रशस्त करतो. योगवासिष्ठाचे सार असे थोडक्यात सांगता येईल. वैराग्यमार्गाची ही शिकवण असंख्य सोप्या कथांमधून व उदाहरणांमधून उलगडत जाते. सहा प्रकरणांमधे मोक्षमार्गाचे विवेचन आहे. ब्राह्मण आणि श्रमण अशा दोन्ही परंपरांचा आढळ योगवासिष्ठात दिसतो. नैतिक, संयमी अशा नायकाचे चित्र श्रमण परंपरेला आपलेसे वाटले. त्यातून रामकथेचे त्या श्रमण रूपही आकाराला आले.
रामकथेत हनुमंत नवविधा भक्तीपैकी दास्यभक्तीचा उद्गाता आहे. या अनुषंगाने दास बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण वीरामधे किंवा महावीरामध्येच असायचे याची साक्ष बजरंगाच्या चरित्रामुळे ध्यानात येते. रामचरिताची किल्ली म्हणजे हनुमंत असे मारुतीचे स्थान त्याच्या सेवावृत्तीमुळे झाले आहे. सकारात्मकता, सेवाभाव, करुणा, लौकिक आणि अलौकिक यश, संयम आदी अंगभूत गुण रामाने जगासमोर प्रत्यक्ष कृतीने आणले. गरज असेल तर कोदंडही वापरले, पण त्याच्या चरिताचा तो आधार नव्हे. प्रजाहितासाठी रचना, कल्याण, आदी गुणांची खरी गरज असते. व्यक्ती आणि नेता या गुणांनी मंडित असेल तर त्याचा प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक कण मंगल असतो हे रामचरित सिद्ध करते. हा महानायक, संत सज्जनांना कसा दिसतो याचे वर्णन कबीराने केले आहे.
चार राम हैं जगत में,
तीन राम व्यवहार।
चौथ राम सो सार है,
ताका करो विचार ।।
एक राम दसरथ घर डोलै,
एक राम घट-घट में बोलै ।
एक राम का सकल पसारा,
एक राम हैं सबसे न्यारा ।।
सकार राम दसरथ घर डोलें,
निराकार घट-घट में बोलै ।
बिंदराम का सकल पसारा,
अक: राम हैं सबसे न्यारा ।।
ओऽम राम निरंजन रारा,
निरालम्ब राम सो न्यारा ।
सगुन राम विष्णु जग आया,
दसरथ के पुत्र कहाया ।।
निर्गुण राम निरंजन राया,
जिन वह सकल श्रृष्टि उपजाया ।
निर्गुण गुण सगुन दोउ से न्यारा,
कहैं कबीर सो राम हमारा ।।
सगुण राम और निर्गुण रामा,
इनके पार सोई मम नामा ।
सोई नाम सुख जीवन दाता,
मैं सबसों कहता यह बाता ।।
ताहि नाम को चिन्नहु भाई,
जासो आवा गमन मिटाई ।
पिंड ब्रह्माण्ड में आतम राम,
तासु परें परमातम नाम ।।
राम, रामराज्य आणि रामनाम ही विश्वकल्याणाची भारतीय कल्पना आहे. त्यात रामनामाची सर्वाधिक महती आहे. रामनामाचा मार्ग महादेवांचा. तो त्यांना कसा मिळाला याचीही एक गोष्ट परंपरेमध्ये आहे. पूर्वी रामायणांची संख्या १०० कोटी होती. शंकराने त्यांचे वितरण केले. शेवटी दोन अक्षरे उरली. शिवाने ती स्वत:कडे ठेवली. ती अक्षरे होती. ‘रा’ आणि ‘म’. राम म्हणजे नाम आणि नाम म्हणजे राम असा हा प्रवास दिसतो. महादेव, नारद, वाल्मीकी, हनुमंत, बिभीषण असे देव आणि अवतार या मार्गाचे अनुसरण करताना दिसतात. तुलसीदास, कबीर, रामदास, एकनाथ, दक्षिण भारतातील दोन्ही रामदास आदी संतगण आधुनिक भारतातील गांधीजी आणि विनोबा असा हा समृद्ध वारसा आहे.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वास्तव नावाची जादू
रामचरित मानसामध्ये नामरामायण अशी एक रचना आहे. नामाचा महिमा वर्णन करताना त्यांनी ही निर्मिती केली. गोस्वामींचा रामनामाचा अधिकार फार मोठा होता. गांधी-विनोबांनी ही वाट सर्व उपासना मार्गासमोर मांडली. नाम महिमा सर्व धर्माना मान्य आहे. आपापल्या श्रद्धा विश्वातील नामाचे स्थान बळकट केले तर आदर्श मानवी समाज निर्माण होईल. नामस्मरण म्हणजे नम्रतेचे अनुसरण. नम्रता हा मानवी संस्कृतीचा कणा आहे आणि रामनाम म्हणजे सत्याचे करुणापूर्ण आचरण.
रामयुक्त समाजाचा आधुनिक आविष्कार म्हणून भूदान यज्ञाकडे पाहायला हवे. या आंदोलनाचा आरंभ रामनवमीला झाला. राजाचा आदर्श म्हणजे राम आणि सेवकाचा श्रीकृष्ण. राम आणि कृष्ण या अवतारांच्या छायेत अखिल मानव समाजाची गुंफण करून गांधी, विनोबांनी विश्वसंस्कृतीची रामकेंद्री घडण केली. संत रामदासांनी त्यांच्या रामरायाकडे प्रार्थना करताना अत्यंत व्यापक मागणी केली आहे. जनहिताचे विवरण, अज्ञानी जीवांचे कल्याण, जनतेला आधार.. अशी कृपा करताना समाजाची स्खलनशीलता आणि लोकांची असंयमी वृत्ती रामरायाने पोटात घ्यावी असे हे मागणे आहे.
राममय संस्कृती जतन करणे, तिचा विस्तार करणे हा कल्याणाचा खरा आदर्श आहे. विश्वाचा विश्राम, आनंदाचे धाम यांचा खरा आढळ तिथे आहे. रमणीय, नमनीय आणि कल्याणदायी गोष्टींचा हा समुच्चय आपल्या नित्य स्मरणात राहो ही रामचरणी प्रार्थना.
satul68@gmail.com