‘पृथ्वीवरील सर्वात प्रगत प्राणी म्हणजे माणूस’ असे आपण नेहमी म्हणतो. (नव्हे तशी आपली खात्रीच असते.) यासाठी माणसाच्या शरीराची विशिष्ट ठेवण, इतर बोटांपेक्षा वेगळा असणारा हाताचा अंगठा, मेंदूचा आकार अशा काही बा गोष्टी कारणीभूत आहेतच; पण या प्रगतीसाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता! शिकारीची शस्त्रे ते शेतीचे शास्त्र, गुहेतील चित्रांपासून ते भाषा आणि कला यांचा विकास, टोळ्यांपासून ते संस्कृतीपर्यंत आणि ‘आहार-निद्रा-भय-मथुन’पासून धर्म, धर्य, नैतिकता अशा संकल्पनांपर्यंत.. असा माणसाचा हा समृद्ध करणारा प्रवास झाला, त्यात त्याच्या बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे. या बुद्धिमत्तेचाच वापर करून माणसाने अनेक शास्त्रं, तंत्रज्ञानं विकसित केली आणि अनेक शोध लावले. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसतशी मानवाने आपली कामे यंत्रांकडून करून घेण्यास सुरुवात केली आणि प्रगतीचा वेग अजूनच वाढवला. मानवी बुद्धिमत्तेतूनच ही यंत्रे विकसित झाली. तरीही विचार करण्याचे, एखादी समस्या सोडवण्याचे काम अजूनही माणूस त्याच्या बुद्धीनेच करत होता..करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच संदर्भात एक विचार पुढे आला : हे कामसुद्धा आपण यंत्रांना देऊ शकतो का? यंत्रे मानवासारखा विचार करू शकतील का? यातूनच एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झाली.. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश गणितज्ञ अ‍ॅलन टय़ुरिंग यांनी एका यंत्राच्या साह्यने जर्मन फौजांच्या सांकेतिक भाषेतील संदेशांचा अर्थ शोधण्याचे महत्त्वाचे काम केले. यातूनच पुढे त्यांनी युद्धानंतर १९५० साली यंत्रांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी टय़ुरिंग टेस्ट विकसित केली. जिचा उपयोग ‘यंत्रे, संगणक मानवासारखा विचार करू शकतात का?’ हे ठरवण्यासाठी केला गेला. टय़ुरिंग टेस्ट तशी सोपी होती. एक माणूस एका बंद दाराआडून संगणकाला आणि दुसऱ्या एका माणसाला लिखित स्वरूपात काही प्रश्न विचारतो. प्रश्नकर्त्यांला केवळ त्याला मिळालेल्या लिखित उत्तरावरून संगणक कोण आणि माणूस कोण, हे ओळखायचे असते. जर प्रश्नकर्ता त्या दोघांना ओळखू शकला नाही, म्हणजेच याचा अर्थ- संगणक माणसासारखा विचार करून उत्तर देतो आहे असा होईल. आणि तो संगणक ही कृत्रिम बुद्धिमत्तेची परीक्षा पास होईल. जरी या परीक्षेच्या काही मर्यादा होत्या, तरीही मानवी बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, हे माहिती नसतानाही संगणकाची बुद्धिमत्ता मोजण्याची ती एक व्यावहारिक पद्धत होती.

पुढे १९५६ साली डार्टमाऊथ येथे झालेल्या कार्यशाळेत स्टॅनफर्ड संशोधक जॉन मॅकार्थी यांनी प्रथम ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) हा शब्द वापरला आणि ही कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनाची सुरुवात ठरली.

पण बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? माणसाची बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण समजावून घेणे, गोष्टींचा संबंध लावणे, विचार करणे, त्यातून शिकणे आणि या सर्वाचा वापर करून योग्य तो निर्णय घेऊन कृती करता येणे. याच गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये एखाद्या यंत्राकडून/ संगणकाकडून अपेक्षित आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याला माणसांसारखे दिसणारे आणि वागणारे रोबोट डोळ्यासमोर उभे राहतात. अर्थात त्यांचा समावेशही कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये होतोच; पण त्याचसोबत इतर अनेक गोष्टींतही या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. ज्यात विचार करून रणनीती आखावी लागते असे खेळ.. उदा.  बुद्धिबळ, पोकर, फुली-गोळा इत्यादी, मानवी भाषा समजावून घेणे (Natural  Language  Processing ), आवाज ओळखणे (Speech Recognition), चित्र ओळखणे (Computer Vision) अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपज्ञानशाखा आहेत- ज्यांचा भर त्या क्षेत्रांतल्या संशोधनावर आणि समस्या सोडवण्यावर असतो. आज कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालकविरहित गाडी चालवणे, संगणकानेच एखाद्या पुस्तकाचा काही ओळींत बसेल असा गोषवारा बनवणे, चित्र काढणे, गोष्टी लिहिणे यांसारख्या सर्जनशील कामांसाठीही वापर होऊ लागला आहे. आपल्या ई-मेलमधले स्पॅम ई-मेल ओळखण्यापासून ते रोगांचे निदान करण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत याचा उपयोग होतो आहे. चॅटबोट्स (चॅटिंग करणारे रोबोट्स) आज आपण अनेक वेबसाइट्सवर बघू शकतो. मर्यादित स्वरूपात का होईना, पण हे चॅटबोट्स टय़ुरिंग टेस्ट पास करू शकतात.

पण हे सगळं होतं कसं? कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. मुख्यत्वे सांख्यिकीच्या अनेक संकल्पनांचा वापर आज यात केला जातो. कृत्रिम बुद्धिमतेच्या संदर्भात ‘मशीन लर्निंग’ हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी मशीन लर्गिंगचा वापर होतो; ज्याद्वारे संगणकाला थेट सूचना देण्याऐवजी माहिती (data) पुरवली जाते, ज्याचा अभ्यास करून संगणक स्वत:च शिकतो, निर्णय घेऊ शकतो आणि आपल्याला हवे असणारे विश्लेषण करू शकतो. तसेच ‘डीप लर्निंग’ हा मशीन लर्निंगचाच एक भाग आहे; ज्यात मेंदूच्या न्युरॉन जाळ्यांचे अनुकरण केले जाते. याचा उपयोग मुख्यत: भाषेच्या आकलनासाठी आणि विश्लेषणासाठी केला जातो. माहिती गोळा करणारी, तिचे विश्लेषण करणारी, विचार करणारी, निर्णय घेणारी आणि त्यानुसार कृती करणारी यंत्रे/ मशीन्स/ संगणक आपण तयार करत आहोत. माणसासारखीच ही यंत्रे असतील तर त्याचे कोणते चांगले-वाईट परिणाम होतील, हा एक मोठाच प्रश्न आहे. एका बाजूला अशा यंत्रांची आपल्याला किती प्रकारे मदत होऊ शकते याची आपण कल्पना करू शकतो, त्याचबरोबर जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी याचा दुरुपयोगही होऊ शकतो, हेदेखील आपल्याला मान्य करावे लागेल. त्यामुळेच नैतिकतेचा मुद्दा या चर्चामध्ये महत्त्वाचा ठरतो. तंत्रज्ञानाचा हा वेगाने वाहणारा प्रवाह आपल्याला कुठे घेऊन जाईल हे येणारा काळच ठरवेल. पण त्यात वाहवत न जाता, न बुडता आणि स्वत:ला आणि दुसऱ्यांना इजा न पोहोचवता या प्रवाहात पोहणे आपल्याला आले पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानाची ही दुधारी तलवार हाताळण्याचीही बुद्धिमत्ता आणि नैतिकता नैसर्गिकरीत्या आपल्यात असावी म्हणजे झालं.

parag2211@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial intelligence mpg
First published on: 25-08-2019 at 00:05 IST